Tuesday, December 15, 2009

परंपरेच्या आयच्चा घो!!!!

`एखाद्या कथे मधून एखादे तात्पर्य जसे निर्माण होते, तशीच संस्कृती मधून परंपरा निर्माण होते'' असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. मात्र, `विदूषक' या आपल्या गाजलेल्या कथेत `जी. ए.कुलकर्णी' म्हणतात, ``कथेचे तात्पर्य हे स्त्री च्या कटी वरील बालकासारखे असते.... ते बालक तिचेच असले पाहिजे असे नाही''. `जीएं' च्या चालीवर बोलायचे झाल्यास ``परंपरा देखील त्याच संस्कृतीतून जन्मायला पाहिजे, असेही नाही''. एकंदरीत संस्कृती आणि परंपरा यांचा परस्परांशी काही संबंध असण्याचे काही कारणच नाही म्हणायचे!!! गेल्या हजारो वर्षांचा भारतीय परंपरा-रुढींचा इतिहास पाहता `जी.एं'च्या वाक्याच्या सांस्कृतिक रूपाचे प्रत्यंतरच येते!!! तरी देखील परंपरांच्या सुतावरून संस्कृतीचा स्वर्ग [!!!] गाठून संस्कृती व परंपरा या दोहोंचा जयघोष करण्यात साने गुरुजींपासून `अट्टल'बिहारी पर्यंत सर्व समाज धुरीणामध्ये आणि राखी सावंत पासून बच्चनजीच्या अमिताभ पर्यंत सर्व वलयांकीतामध्ये जणू छुपी चढाओढ लागलेली असते!!!! अस्तित्वातच नसलेल्या या बाबीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी इतक्या लोकांनी आटापिटा का करावा?? याचे कारण तसे करणे किफायतशीर आणि अत्यंत सोप्पे असावे हेच असणार!!!

`संस्कृती' या विषयाशी निगडीत मानवी जीवन, जीवनशैली, समाज, हितसंबंध,धर्म,उपासना या सर्व बाबी मध्ये इतकी प्रचंड संदिग्धता, वैविध्य, वैचित्र्य सामावलेले असते कि त्यात काय वाट्टेल ते सिध्द करायचे झाल्यास, कुठले ना कुठले उदाहरण सापडतेच!!! उदा. भारतात पाहुण्यांचे सत्कार किंवा सन्मान करताना `नारळ' वापरण्याचे मूळ कशात आहे?? या प्रश्नाचे उत्तर ``नारळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे...वरून `शिस्त व बंधन' रुपी कठीण करवंटी आहे...पण आत मात्र `निर्मळ व गोड' पाणी आहे'' [ अबबबबब!!!] असा शुद्ध बकवास करून अगदी सहज देता येऊ शकते. समजा, याच भारतात याच सत्कार-सन्मानासाठी नारळाऐवजी`एरंड' वापरत असते तर `एरंड' हा संस्कृतीचे प्रतिक ठरला असता! आणि ``ज्याप्रमाणे एरंडाचे तेल प्याल्यावर `पोटातील जंत' बाहेर पडतात,...त्याप्रमाणेच संस्कृतीचे सार आत्मसात केले कि `मनातील जंत' बाहेर पडतील!!!'' असा आणखी मोठा बकवास केला गेला असता!!

प्राचीन परंपरांचा मेळ संस्कृती किंवा नीतिमूल्यांशी बसत नसला तर ते एकवेळ मान्य करता येण्यासारखे आहे.. परंतु नवीन परंपरांचा कुठल्याच मूल्यांशी संबंध का सुटावा?? उदा. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केले त्यास आता उणीपुरी सव्वाशे वर्षेदेखील झाली नसतील, पण गणेशोत्सवातील कार्यक्रमात व विसर्जनाच्या वेळी जे टिळकांनी कधी स्वप्नातही पहिले नसतील असे हातवारे करत कर्णकर्कश संगीतावर भयानक नृत्य करण्याची `अद्भुत' परंपरा आज इतक्या अरेरावीने पाळली जाते, जणू ते संगीत आणि नृत्य टिळकांनीच बसवले असावे आणि त्या नर्तकांना `स्कोप' मिळावा या उद्देशानेच गणेशोत्सव सुरु केले असावेत !!! परंपरांचे असे पालन फक्त सार्वजनिक बाबतीतच लागू असते असे नाही..अगदी वैयक्तिक-कौटुंबिक प्रतिष्ठेशी निगडीत बाबतही असेच घडते. प्रतिष्ठे सोबत येणारा कोडगेपणा पुरेसा आला कि हुंड्यापासून मानपानापर्यंत कोणत्याही परंपरांचे `उच्चत्व' हक्काने `मुलीकडच्याना' ऐकवून बजावूनही घेतले जाते!!! `मुलाकडचे' लोक असे कोणत्या पारंपारिक अधिकाराने करतात आणि या असल्या परंपरामागे कसले सांस्कृतिक अर्थ निघू शकतात हे अनाकलनियच आहे!!!....मुलीकडील लोक सामाजिक सक्तीमुळे हे खपवून घेतात असे एकवेळ मानता येईल.

पण भारतात, लग्न, समारंभ, कुटुंब व्यवस्था वगैरे अनेक बाबतीत कसलीही सक्ती नसतानाही अगदी विनाकारण अत्यंत अर्थहीन परंपरा [हि द्विरुक्तीच वाटते ना?] पाळणारेहि काही कमी नाहीत. संगीत काय, वरात काय, त्यात नाचणे काय, त्या वधू-वरांना विदुषक बनवणाऱ्या मुंडावळ्या काय... यात नेमकी प्रतिष्ठा कशात वाटते? अशा टिनपाट परंपरा लोक का पाळतात, यापेक्षा त्या कशा निर्माण होतात हा प्रश्न जास्त जटील आहे. मुलीचे सोडा [ती सामाजिक सक्ती मानता येईल] पण मुलाचे लग्न आई-वडिलांनी खर्च करून लावून द्यायचे आणि त्यात मिरवायचे हि कसली परंपरा? बरे, पूर्वी निदान मुलांची लग्ने आई-वडील जुळवायचे. हल्ली जर मुले मुळात २६-२८ वर्षे शिकतच राहतात, त्या नंतर लग्न, ती देखील त्यांची त्यांनीच ठरवलेली...मग त्यात आई-वडिलांचा संबंध येतोच कुठे? मग त्यांनी ते समारंभ ठरवावे आणि त्यात मिरवावे तरी का?? लग्न तरी आयुष्यात एकदाच होत असते पण कुटुंब रहाटी तर रोजचीच-आयुष्यभर चालणारी ना? त्याबाबतहि भारतात काही वेगळे दृश्य नाही...

वानगीदाखल आपण एका कुटुंबाची `अथ ते इति' वाटचाल पाहिली तर,....मुंडावळ्या बांधून स्वत: माकडासारखे दिसत, वराती मधल्या इतरांच्या `अथक' माकडचेष्टा पाहून `थक्क' झाले, तरी `अथ' काही संपतच नाही. घोड्यावर बसल्यामुळे पाठ, नातेवाईकांच्या पाया पडल्यामुळे कंबर, रिसेप्शन नावाच्या वैभव प्रदर्शनात तासन तास उभे राहिल्यामुळे पाय आणि त्याच वेळी, तितकाच वेळ तोंड वेंगाडत थन्क यू, सी यू म्हणण्यामुळे ओठ ..असे लग्नानंतर महत्वाच्या कामी येणारे सर्व अवयव पूर्ण निकांमी करूनच पती-पत्नींच्या कौटुंबिक आयुष्याच्या `अथ'ची `इति'श्री होते...... या नंतर `दिवस' जाई पर्यंत जे काही दिवस हाती लागतात तेवढेच त्यांचे दिवस...त्यानंतर पूर्णत: मुलांसाठी!!!! यात आश्चर्य किंवा आक्षेप वाटण्याजोगे काही नाही. संगोपन, शिक्षण इ. बाबींची जबाबदारी जगभर साहजिकच पालक, म्हणजे आई वडिलांची- म्हणजे या `वानगी'दाखल घेतलेल्या पती-पत्नींची असणार. भारतात वेगळे आणि विचित्र म्हणजे..या जबाबदारीचा प्रदीर्घ कालखंड!!! मुलांच्या केवळ शालेय शिक्षणाची नव्हे, तर अगदी ग्रज्युएशन, पोस्ट ग्रज्युएशन आणि त्या नंतर अमेरिका किंवा इंग्लंडला `उच्च' शिक्षण ....या साऱ्याची पूर्ण जबाबदारी आई-वडिलांवर!!!!

या तथाकथित `संगोपनाच्या' काळात मुले डॉक्टर, इंजिनियर वगैरे होत, आता आम्ही `मोठे' [major] झालो असे बजावत, हक्क, स्वातंत्र्य, पिकनिक्स, हॉटेलिंग, व्यसने आणि स्वत:चे गर्ल किंवा बॉयफ्रेंड उपभोगणे सुरु करतात. खरे म्हणजे भारतातीलच नव्हे तर, जगभरातील मुले १५/१६ वर्षांची झाल्यापासून [शिक्षण घेवो किंवा न घेवो] या सर्व गोष्टी चालू करतातच. या सोबत ते जर शिक्षण [देखील] घेणार असतील तर ते शिक्षण, पुढे उच्च शिक्षण वगैरेसाठी फी, परदेशी जाणे, येणे, राहणे वगैरे गोष्टी या `अतिरिक्त' करतात. परंतु या सर्व गोष्टींसाठी जगभरातील मुले आई-वडिलांवर अवलंबून नसतात. आपापले शिक्षण, हक्क, स्वातंत्र्य, व्यसने आणि `तारुण्य' ते स्वत: कमावून, स्वत:च्या जीवावर उपभोगतात. भारतात मात्र शिक्षणासोबत व्यसनांपासून `आसनां'पर्यंत सर्व तारुण्य व पुढे त्यांच्या लग्न- हनिमून पर्यंत जबाबदारी आणि खर्च आई-वडिलांनी, म्हणजे आपल्या `वानगी'दाखल वाल्या पती-पत्नींनी उचलायचा!!!! का????तर म्हणे `परंपरा'!!!! एके काळी भारतात मुंज करून मुलाला गुरुकुलात पाठवेपर्यन्तच आई-वडिलांची जबाबदारी असे. ती परंपरा बंद पडून हि `मुलांच्या तारुण्यचेष्टा' आई-वडिलांनी `भोगण्याची' परंपरा कधीपासून, कशी रूढ झाली?? या कशाचीच उत्तरे मिळत नाहीत......पण याहून भयानक मोठा प्रश्न अनुत्तरीत राहतो, तो म्हणजे, मुले यांच्या जीवावर शिकून, लग्न करून गेलीत परदेशी कि मग या आपल्या `वानगी'दाखल घेतलेल्या `वांग्यांचे' काय???

पण या तथाकथित `उच्च' भारतीय संस्कृतीमध्ये परमोच्च कर्तव्य म्हणून जे ओक्साबोक्शी सांगण्यात येते ते म्हणजे `वडीलधाऱ्यांचा आदर' [जणू अन्य संस्कृतींमध्ये वडीलधारयांचा अपमान करण्याचीच परंपरा असते!!!] आणि `वडीलधारयांचा सांभाळ'....[जणू अन्य संस्कृतींमध्ये वडीलधारयाना वारयावरच सोडतात!!] या परंपरेचा पुरावा म्हणून आपल्याकडे अद्याप वृद्धाश्रमांची संख्या खूप कमी आहे असा देतात...वृध्दाश्रम नसणे हि समस्या आहे, कि संस्कृतीच्या महानतेचा पुरावा?? हि महान संस्कृती, किंवा त्यातून जन्मलेली परंपरा भारतात प्रत्यक्षात कशी अनुभवायास मिळते?? .......तर, या अशा `उच्च' संस्कृतीचे पाईक असणारे हे `उच्च'शिक्षित लग्न करून परत परदेशी [किंवा भारतातच आपापल्या नोकरी-धंद्यासाठी शहरो-शहरी] निघून गेल्यावर त्या `वानगी' वाल्या वांग्यांनी त्या मुलांच्या `उच्चत्वा'साठी व लग्नात मिरवण्यासाठी काढलेली कर्जे फेडत आयुष्य कंठायचे आणि त्या मुलांना मुले झाली कि मग आपल्याला `बेबी सिटींग' साठी बोलावतील याची वाट पाहत बसायची! त्यात कमाल अशी कि आपली मुले आपल्याला `बेबीसिटींग'साठी का होईना, पण बोलावतील आणि आपल्याला परदेशवारी मिळेल याची वाट पाहण्याचा या `वांग्यांना' देखील कंटाळा येत नाही. उलट, इतरांना आपल्या मुला, नातवंडाची मोठाइकी आणि परदेशवारीचे रसभरीत प्रवासवर्णन सांगत-- आशाळभूतपणे पुन्हा बोलावण्याची वाट पाहत, कर्जे फेडत आयुष्य कंठत राहतात.

मध्यंतरी, वृद्धांच्या निराधारपणाबाबत दखल घेऊन महाराष्ट्र शासनास ``मुलांनी आई-वडिलांचा सांभाळ करावा''असा कायदा करावा लागला होता. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्य म्हणवले जाते. याच काळात याच राज्यात शासनास आणखी एक कार्य हाती घ्यावे लागले होते....ते म्हणजे, ``जनतेने उघड्यावर शौचास जाऊ नये, घरोघर संडास बांधावेत''....`लोक उघड्यावर शौचास बसणारया' राज्याला जर `सर्वात प्रगतीशील' मानले जात असेल तर `वृद्धांना निराधार सोडणारया' संस्कृतीला `सर्वात महान' मानण्यात गैर काय??? यावरून हेही सिद्ध होते कि, समस्येलाच `सांस्कृतिक महानता' मानण्याची एक भयानक परंपरा देखील भारतात प्रचलित आहे. परंतु त्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण, शेवटी परंपरा हि संस्कृतीच्या कटी वरील बालका सारखी असते, ते बालक तिचेच असले पाहिजे असे नाही.... त्यामुळे परंपरा भयानक असली तरी संस्कृती भयानक असलीच पाहिजे असेही नाही. परंपरा भयाण पण संकृती महान!!!......... ......असू शकते!!!!!

लोकेश शेवडे
२७/१२/२००९