Friday, May 21, 2010

`कसाब'सा उज्ज्वल


`कसाब'सा उज्ज्वल / `उज्ज्वल' प्रतिमा

क्रिकेट किंवा अन्य कोणत्याही खेळात एखादा संघ जिंकल्या नंतर त्यातील कर्णधाराला अथवा सामनावीराला त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर त्याचे श्रेय ते हमखास `टीम'-सवंगडी वगैरेंना देतात किंवा त्याबाबत ते अनुकूल परिस्थिती, प्रतिस्पर्ध्याच्या चुका, योगायोग इत्यादींचा देखील उल्लेख करतात. सांघिक यशाचे सोडा, अगदी एसएससी बोर्डाच्या किंवा युनीवर्सीटीच्या परीक्षेत एखादा विद्यार्थी पहिला आला [म्हणजे अर्थातच एकट्यानेच अभ्यास करून] आणि त्याला कोणीही विचारले की, `तुझ्या यशाचे रहस्य काय?' तरी तो त्याचे श्रेय पूर्णपणे स्वत:कडे न घेता त्यात आई,वडील,गुरु किंवा सहकारी मित्र वगैरेंना श्रेयाचा मोठा वाटा देतो. अनेकजण तर संपूर्णच श्रेय इतरांना देतात.

या उलट सिने-स्टार,तारका, वलयांकित व्यक्ती, राजकारणी वगैरेंच्या बाबत मात्र नेमके उलटे घडते. त्यांच्यात श्रेय उपटण्याची [ किंवा लाटण्याची] अहमहमिकाच चाललेली असते. सिनेमा गाजल्यानंतर तो `माझ्यामुळेच गाजला' असे अभिनेते,दिग्दर्शक,लेखकांपासून ते अगदी एक्स्ट्रापर्यंत प्रत्येक जण कंठशोष करत सांगत फिरतो. एखादे धरण, पूल किंवा प्रकल्प एखाद्या गावात सुरु झाल्या नंतर प्रत्येक पुढारी तो आपल्याच पुढाकाराने, प्रभावाने झाला असे ओक्साबोक्शी सांगत सुटतो आणि स्वत:च्या कार्याच्या अहवालात त्याचा ठासून उल्लेख करतो. पडलेल्या पुलाबद्दल, फुटलेल्या धरणाबद्दल मात्र सारेच चिडीचूप!!! आणि बोललेच तर फक्त दोनच शब्द .....दुसऱ्याचे नाव आणि आडनाव!!! राजकारणी आणि सिनेस्टार यांच्यात आणखी एक साम्य असते...अर्थातच, सतत कॅमेरा समोर येण्यासाठी तळमळ आणि धडपड!!!

एकंदरीत....सतत कॅमेरा समोर येणे आणि यशाचे, सत्कृत्यांचे श्रेय उपटणे ही सिनेस्टार, राजकारणी वगैरे लोकांची खासियत असते असा एक सार्वत्रिक समज आहे. सध्या त्यात आणखी एका व्यावसायिकांची भर पडली आहे....ती म्हणजे सरकारी वकिलांची!!! गेली वर्ष- दोन वर्षे टी.व्ही. स्क्रीनवर राखी सावंत पेक्षाही जास्त तावातावाने आणि जास्त वेळ बोलणारया व्यक्तीचे नाव काय??? असा प्रश्न विचारल्यास ऑप्शन्स न विचारता उत्तर येईल...`सरकारी वकील उज्ज्वल निकम'!!! उज्ज्वल निकम हे सरकारी वकील नसते तर सर्व खटले सरकार हरले असते की काय? आणि [गाजलेल्या] खटल्यांमध्ये तारीख जरी पुढची पडली तरी ती बातमी द्यायला दस्तूर खुद्द `सरकारी वकीलच' पाहिजे असा भारतीय संसदेने कायदा केला आहे की काय? असे प्रश्न टी.व्ही.पेक्षकांना पडावेत इतके वेळा श्री उज्ज्वल निकम हे कॅमेरा समोर येतात आणि आपण एकट्याने कसा `हुश्शारी'ने हा खटला जिंकला किंवा पुढची तारीख घेतली असे सांगतात. यात श्री उज्ज्वल निकम हे हुशार आहेत की नाहीत, सरकारी वकिलांनी टी.व्ही. कॅमेरा समोर यावे की नाही हे मुद्दे नसून... उज्ज्वल निकमांच्या कॅमेरा समोरच्या वक्तव्यांमुळे आणि अविर्भावांमुळे जनसामान्यांच्या मनात न्याय-व्यवस्थेबाबत कोणती प्रतिमा निर्माण होते हा आहे.

२६/११च्या गाजलेल्या खटल्याच्या निकाला नंतर उज्ज्वल निकमांसकट अनेक भारतीयांना आनंद-समाधान वाटणे स्वाभाविक आहे. तसे वाटल्यावर ते व्यक्त करणे ही स्वाभाविकच आहे. तथापि, ते समाधान व्यक्त करताना निकमांच्या शब्दातून, हावभावांतून, अविर्भावांतून `स्वत:चे आत्यंतिक महत्व प्रकट झाल्यास, जनसामान्यांना त्याचे फार वेगळे अर्थ पोहोचतात. ते असे की,

१] श्री.निकम यांच्याखेरीज एकही [लायक] वकील सरकारकडे उपलब्ध नाही.
२] जर निकम आजारी पडले असते किंवा अन्य काही कारणाने उपलब्ध नसते आणि खटला `दुर्दैवाने' दुसऱ्या वकिलाकडे गेला असता तर अखंड भारत हरला असता व कसाब सुटला असता.
३] २६/११ या संपूर्ण खटल्याच्या प्रक्रियेत पुरावे, तपास, कायदे विषयक सल्ला इत्यादी बाबींसाठी निकमांकडे `टीम' किंवा `संघ' किंबहुना कुठलेही सहकारी असे नव्हतेच आणि असलेच तर ते पूर्णत: `निकामी' होते. [तसे सहकारी असते, तर त्यातील एखादा तरी एकदा तरी एखादी तरी किरकोळ माहिती देण्यासाठी तरी कॅमेरा समोर आला असता]
४] ज्या अर्थी श्री निकमांना त्यांची अपरंपार असलेली अक्कल-हुशारी इतकी पणाला लावावी लागते त्या अर्थी असंख्य लोकांना गोळ्या घालून ठार मारणारया गुन्हेगारांना भारतात शिक्षा होणे कठीण आहे. दहशतवादी, खुनी अशा अत्यंत भयानक गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकेल असे कायदे आणि न्याय-व्यवस्थाच भारतात नाही!!
५]पोलिसांपासून न्याय-व्यवस्थे पर्यंत सर्वजणामुळे कसाब निर्दोषच सुटला असता, तर त्याला दोषी ठरवण्यासाठी निकम एकटे [एकहाती] लढत होते. एकंदरीत श्री निकम हे कसाब विरुध्द नव्हे तर मूलत: भारतीय न्यायालय व पोलीस यांच्या विरुध्द लढत होते.

यात शेवटचे दोन मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. जनसामान्यांच्या मनात आपल्या देशाची व न्याय-व्यवस्थेची इतकी वाईट प्रतिमा निर्माण होणे ही बाब देशासाठी विघातक व दूरगामी परिणाम करणारी आहे. २६/११ च्या खटल्याच्या निकालानंतर एका मराठी वाहिनीला निकम यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह मुलाखत दिली!!! त्यात श्री निकम यांचे गुणगान [कुटुंबीय दुसरे काय करणार??] करताना खटल्याच्या निकालासाठी अन्य कोणी दुरान्वये देखील काही काम केल्याचा उल्लेख होत नव्हता व श्री निकम देखील त्यास आक्षेप घेत नव्हते. माझ्या ठिकाणी अन्य कोणीही असता तरी कसाब सुटलाच नसता, असे ते [वरवरच्या विनयाने सुध्दा] म्हणत नव्हते, उलट केवळ त्यांच्या मुळेच कसाबला शिक्षा घडली व अखंड भारत जिंकला असे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या वक्तव्य व हावभावातून प्रतीत होत होते. जणू श्री निकम म्हणजे अखंड भारत!! न्यायालये- पोलीस वगैरे केवळ निमित्तमात्र !! म्हणजे, या खटल्याशी संबंधित पोलिसांपैकी करकरे, साळसकर वगैरे बंदुकीच्या गोळ्यांमुळे गेले.....आणि बाकीचे अनुल्लेखामुळे!!!!

राजकारणी आणि सिनेस्टार यांच्याशी श्री निकम यांचे असलेले दुसरे साम्य देखील महत्वाचे आहे. ते म्हणजे `अपयशा बाबत मौन'!! टी.व्ही.वरील अविर्भाव आणि वक्तव्यांवरून असे श्री निकम यांच्या आयुष्यात एका `केस' ला देखील अपयशाचा धक्का लागलेला नाही असे चित्र निर्माण होते!! मागे एकदा एका गाजलेल्या खून खटल्यात एका संगीतकारावर आरोप ठेवण्यात आला होता. सदर आरोपी भारतातून इंग्लंड मध्ये स्थायिक झाल्यामुळे श्री निकम महोदय अत्यंत `चवताळून'[ निदान हावभावांवरून तसे वाटत होते] टी.व्ही.वर म्हणाले होते की, ``त्याला [आरोपीला] भारतात आणणे अनिवार्य आहे. त्यामुळे मी स्वत:च इंग्लंडला जाऊन तिथल्या कोर्टात उभा राहून युक्तिवाद करणार आहे.'' पुढे निकम यांनी `आरोपीला भारतात घेऊनच येईन' अशी गर्जनाही केली. त्यानंतर श्री.निकम इंग्लंडला गेले आणि.........परत आले........पण नंतर टी.व्ही. समोर ते `केस'च्या निकालाविषयी `खुलाश्याचे' काहीच बोलले नाहीत. बहुदा इंग्लंड मधील कोर्टात `केस'च्या ऐवजी निकमांच्या युक्तिवादाचाच `निकाल' लागला असावा!! [या खटल्यात इंग्लंड कोर्टात युक्तिवादाचे वाभाडे निघाले असे नंतर वाचनी आले.] मुद्दा युक्तिवादाचा किंवा पराभवाचा नसून त्याबद्दल मौन पाळण्याचा, अपयशाबाबत अनुल्लेखाचा आहे.... असे अपयश अनेकदा आले [ आले असणारच] तरी निकमांच्या कौशल्य आणि बुध्दिमत्ते विषयी आदरच राहील. पण ते अपयश मोकळेपणाने कबूल करण्याऐवजी लपवले-झाकले जात असेल तर मात्र बुद्धिमत्ता आणि हेतू या दोनही बाबी शंकास्पद का ठरू नयेत??

निकमांच्या कॅमेरा समोर येण्याच्या संदर्भात आणखी एक वेगळा मुद्दा उपस्थित होतो. त्याच `२६/११'च्या निकालानंतरच्या `कौटुंबिक' मुलाखतीत स्वत: बद्दल बोलताना श्री निकम यांनी अबू सालेम या आरोपीला ``मी `अब्या' म्हणतो'' असे मोठाइकीने सांगितले. त्याला `अब्या' म्हणतेवेळी अबू सालेम हा तुरुंगात होता व स्वत: निकम हे अर्थातच `सरकारी वकील' म्हणून त्याचा जबाब घ्यायला गेले होते, असे निकमांनीच सांगितले. मुळात, ``सरकारी वकिलाने आरोपीचा जबाब `त्याची कोंडी करणारा' मिळवण्यात धन्यता मानावी की आरोपीची वैयक्तिक हेटाळणी करण्यात?'' हा प्रश्न लगेचच मुलाखतकर्त्याने त्यांना विचारावयास हवा होता. ही `सुरस आणि चमत्कारिक' कथा निकमांनी टी.व्ही.वर रंगवून सांगण्याचे प्रयोजनच काय?? गुन्हेगारांबद्दल जनतेमध्ये कमालीची चीड आणि तिडीक असते याचा फायदा घेऊन `स्टंट'बाजीतून लोकप्रियता त्यांना मिळवायची आहे काय?? तसे असेल, तर त्यासाठी त्यांनी शासकीय पद, शासकीय व्यवस्था, न्याय-व्यवस्था,लोकशाही व्यवस्था या सारयांचा व त्या साऱ्यांनी सोपवलेल्या जबाबदारीचा वापर केला असे त्यांना वाटत नाही काय?? असेही प्रश्न पुढे त्यांना विचारावयास हवे होते. तुरुंगात जेरबंद केलेल्या आरोपीचा `जबाब घेताना' सरकारी वकील म्हणून स्वत:च्या दोनही बाजूंना दोन सशस्त्र पोलीस ठेवून त्याला `अब्या' म्हणण्यात काय शौर्य आहे?? त्या ऐवजी निकमांनी कोणतेही सरकारी पद व सुरक्षा न घेता स्वत:च्याच गल्लीतल्या एखाद्या छडमाड गुंडाला जरी हटकले, तरी ते अभिनंदनीय असेल!! ते कसेही असले तरी, अशा फुशारक्या मारून निकम काय साध्य करू पाहताहेत? हा खरा प्रश्न आहे. असे `स्टंट' [करून व] सांगून, फक्त आणि फक्त वैयक्तिक `ग्लेमराइज़ेशन' [ खरे म्हणजे पदाचे `थिल्लराइज़ेशन'] घडू शकेल अन्य काहीही नाही. २६/११ च्या खटल्यां बाबत अशाच एका [अर्थातच] टी,व्ही. वरील मुलाखतीत मुलाखतकर्त्याने निकमांना ``तुम्ही राजकारणात जाणार काय??'' असा प्रश्न विचारला. निकमांकडून त्याचे उत्तर ``मी सरकारी वकील आहे आणि खटल्यांबाबत बोलतोय. हा प्रश्न इथे अप्रस्तुत-गैरलागू आहे'' असे त्यावेळी यायला हवे होते. या ऐवजी निकमांनी ``राजकारणात गौडफादरची आवश्यकता असते, मला मात्र कोणी गौडफादर नाही'' असे उत्तर दिले. हे `वैषम्य-पूर्ण' उत्तर ऐकून आणि त्यांच्या स्वत:च्या तोंडून स्वत:च्याच शौर्याची रसभरीत वर्णने ऐकून श्री. निकम यांची विद्वत्ता, कौशल्य याबाबत आदर असूनही त्यांना `ग्लैमर' आणि [कदाचित] राजकारण यांचा मोह आवरत नसावा अशी शंका येते. अशा मोहाचे भयानक दुष्परिणाम जनमानसावर घडण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारी वकिलांनी प्रसार-माध्यमांना सामोरे जाण्याबाबत `शुचिता' पाळण्या संबंधी संहिता तयार करणे आवश्यक आहे. अन्यथा निकमांची प्रतिमा `उज्ज्वल' होईल पण पोलीस व न्याय-व्यवस्थेची प्रतिमा मात्र `निकम्मी' होईल !!!

लोकेश शेवडे [२१/५/२०१०]

Friday, April 23, 2010

तेथे पाहिजेच का जातीचे???


``आपल्यात एकी नाही ना...त्यामुळे आपण मागे पडतो!!'' ``आपण जर संघटीत झालो, तर इकडची दुनिया तिकडे करू शकू!!'' ....कोणत्याही एका प्रकारची, वर्गाची, जातीची टाळकी एकत्र आली की अशी वाक्ये ऐकू येणे आणि ``कशासाठी करताय संघटना?'' या प्रश्नावर, ```ते' संघटीत होतात, तर मग आम्ही का होऊ नये?'' ``हा प्रश्न `त्यांना' आधी विचारा, आम्हाला का विचारता?'' असे प्रतिप्रश्न केले जाणे ही बाब अगदीच नित्याची,सवयीची झाली आहे. यावेळी `बहुभाषिक ब्राह्मणे' एकत्र आली आहेत.....तेंव्हाही वेगळे काही प्रतिवाद होणार नाहीत...किंबहुना कोणत्याही संमेलन, मेळाव्यात वेगळे काहीच घडत नसते. त्यामुळे `ब्राह्मणांच्या' संमेलनात वेगळे काही घडण्याची अपेक्षा का धरावी?? आणि भुवया का उंचावल्या जाव्यात?? वास्तविक कोणत्याही जातीय,धार्मिक अथवा वांशिक आधारावर संमेलन, मेळावा करण्याचे किंवा एकत्र येण्याचे नैतिक समर्थन होऊ शकत नाही. कारण अशा जन्माधिष्ठित निकषांवर एकत्र येण्यातूनच अन्य समाजापेक्षा आपण भिन्न आहोत हे गृहीतक निर्माण होते, स्वाभाविकच पुढे त्या भिन्नतेचे `उच्च-नीच'तेत रुपांतर होऊन, अंतिमत: समाजांमध्ये दरी आणि वैर निर्माण होते. तथापि, भारतात किंवा जगात वांशिक,धार्मिक,जातीय आधारावर लोक एकत्र येणे हे एक `रुटीन' आहे. त्यामुळे ब्राह्मण एकत्र येण्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे, वेगळ्या अपेक्षा करण्याचे कारण काय??

भुवया उंचावण्याचे कारण असे आहे की गेली दीडशे वर्षे संघटना, मेळावे यांचे आयोजन हे नेहमी ब्राह्मणांच्या विरुध्द असायचे, मग आता उलट ब्राह्मणांनाच संमेलन-संघटनेची निकड का भासावी??असा प्रश्न जनसामान्याना पडत असावा. वेगळ्या अपेक्षेचे कारण अर्थातच ब्राह्मणांची जनसामान्यातील`वेगळी' प्रतिमा हे असावे!!!बहुतांश जात-धर्म-वंशांची वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत काही वैशिष्ट्ये समान आढळतात. काहींच्या मते तर आचरणात देखील समानता असते. `ब्राह्मण' म्हटले की कुठले वैशिष्ट्य डोळ्यांसमोर काय येते?? [लहानपणी वाचलेल्या `चांदोबा' मधील कथा ``एक गरीब ब्राह्मण होता'' या वाक्या पासून सुरु होत असे. त्यानंतर आजतागायत आर्थिकरित्या गरीब ब्राह्मण अपवादानेच दिसला...आणि स्वभावाने गरीब ब्राह्मण अपवादानेही अनुभवास आला नाही!! असो. शेवटी `चांदोबा' म्हणजे `परी'कथाच, `खरी' कथा नव्हे!! त्यामुळे, त्यातील उदाहरणे प्रत्यक्षात नसणारच.] आज `ब्राह्मण' म्हटल्यावर `शेंडी-जानवे' नजरे समोर येते का?? सध्या शेंडी-जानवे वाला ब्राह्मण पाहिल्यावर अन्य ब्राह्मणच आश्चर्य व्यक्त करतील. शेंडी-जानवे च नव्हे, तर एकंदरीतच जन्मा नंतरच्या सोयरयाच्या दिवसांपासून ते मृत्यू नंतरच्या सुतकाच्या दिवसांपर्यंत कुठल्याही सामुहिक परंपरा, रूढी आणि तत्सम बंधने झुगारणे हे `ब्राह्मण' जातीचे व्यवच्छेदक लक्षण आहे असे लोकाना वाटते!! उच्चारापासून भाषाच नव्हे, तर त्यातील आशया पर्यंत प्रत्येक बाबत `ब्राह्मण' स्वत:चे [जातीचे नव्हे] वेगळेपण जपू पाहतात अशी त्यांची प्रतिमा आहे. म्हणूनच मेळावे, संमेलना सारख्या सामुहिक कृत्य बाबत `वेगळी' अपेक्षा असावी.

जन्माधीष्ठीत अलगता किंवा जात मानणे अत्यंत गैर असले तरी लोक जात मानतात हे एक वास्तव म्हणून स्वीकारल्यास जात मानणारयाचा स्वत:च्या जाती बाबत दृष्टीकोन कसा असतो हे पाहणे महत्वाचे आहे. कोणताही माणूस आपल्या जातीची ओळख देताना स्वत:च्या जातीतील कर्तृत्ववान-नामांकित माणसांचीच नावे सांगतात. अमुक-तमुक दरोडेखोर,खुनी किंवा गुंड हा माझ्या जातीचा असे कोणीच सांगत नाही. त्याच्या जातीची तशा [कुख्यात] व्यक्तींची सांगड दुसऱ्या जातीचा माणूस करून देत असतो. स्वत:च्या जातीतील चांगली आणि इतर जातीतील वाईट उदाहरणे अगदी प्रत्येक जण फाडफाड देत असतो. दोनही उदाहरणे खरीच असतात. त्यातील कोणत्या व्यक्तीला त्या जातीतील माणसे आदर्श मानते, कोणत्या व्यक्तीशी त्या जातीची माणसे आपली अस्मिता जोडतात हा मुद्दा कळीचा ठरतो. ज्या जातीत राणा प्रताप जन्माला त्याच जातीत मानसिंग आणि भारमल देखील जन्मले. ज्या जातीत माधवराव पेशवे जन्मले त्याच जातीत दुसरा बाजीराव देखील जन्मला. मग त्या त्या जातीतील माणसे आज त्यातील कोणाला आदर्श मानतात ही बाब त्या जातीयांच्या भविष्यातील वर्तन-विचार ठरण्यासाठी व त्या जातीचे अन्य समाजातील प्रतिमा ठरण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते.

ज्या नाशिक नगरीमध्ये ब्राह्मण सम्मेलन-अधिवेशन आयोजित करण्यात आहे ती नाशिक नगरी एके काळी भटा-भिक्षुकांची नगरी मानली जात असे.. अशा भटा-भिक्षुकांच्या नगरीमधील `जन्माधिष्ठित श्रेष्ठ' म्हणजे, तथाकथित ब्राह्मण आठवायचे झाल्यास कोणती नावे आठवतात?? कोणती तथाकथित `ब्राह्मण' नावे `मोठी' वाटतात ??? बहुदा एकही नाव समोर येणार नाही. आलेच तर अपवादाने,... चांदोबातील `गरीब ब्राह्मणा' सारखे!! तथापि, कर्तृत्व किंवा विचारांनी श्रेष्ठ व्यक्तींची नावे आठवायची झाल्यास कोणती नावे येतात?? अगदी गेल्या शतकाच्या पूर्वार्धा पासून एकेक नाव पाहिल्यास रे.टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून सुरुवात होते. समाजातील विषमता,सामाजिक अन्याय याविरुध्द टिळक युगुलांनी केलेले कार्य आणि लेखन हे सर्वज्ञात आहे. नाशिकचे पहिले खासदार गो.ह.देशपांडे यांनी `काळाराम मंदिर' सत्याग्रहात बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला पाठींबा व त्यानंतर सामाजिक समानतेची केलेली जोपासना. कॉ.विठ्ठलराव[सुधीर] फडके, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, दादासाहेब बिडकर यांनी जात-पात विरोधी विचारांचा केलेला पाठपुरावा, आदिवासी-वनवासी जनतेच्या उध्दारासाठी वेचलेले कष्ट, माधवराव लिमये, कुसुमताई पटवर्धन यांनी पुरोगामी, सम्यक चळवळी साठी दिलेले योगदान या गोष्टी सर्वप्रथम नजरेसमोर येतात. तमाम नाशिककरांचे दैवत तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या साहित्यातून, आचरणातून पूर्णत: नाकारलेली सामाजिक उतरंड, त्यांचा `काळाराम मंदिर' मोर्च्यातील सहभाग हे झटकन आठवते... आणि नावे तर मोठी आहेतच पण त्याही पेक्षा आचरण, कार्य आणि विचार मोठे!!! या सर्वांमध्ये एक बाब सामाईक होती, एक समान धागा होता.. तो ते जन्माने ब्राह्मण होते हा नसून या सर्वांनी `जन्माने असलेले ब्राह्मण्य' नाकारले होते हा होता. या सर्वांची जात काय होती, ते जन्माने ब्राह्मण होते का? हा प्रश्न ना कोणाला पडला आणि ना कोणाला कधी पडेल.......

नाशिकच कशाला??? संपूर्ण महाराष्ट्रात अशा कर्तृत्वाधारीत व्यक्तींची नावे पाहिल्यास त्या सर्वांनी `जन्माधिष्ठित उतरंड' नाकारलेली आढळते. जन्माने ते कोणीही असोत, त्या सर्वांनी जातीय विषमता नाकारली आणि निव्वळ कर्तृत्वानेच ते श्रेष्ठ ठरले. अशा कर्तृत्ववान लोकात अर्थातच जन्माने ब्राह्मण व्यक्तीही आहेत...कदाचित ते संख्येने जास्त देखील असतील...पण त्याने सिद्ध काय होईल??? एवढेच, की जन्माची जात नाकारणारयामध्ये जन्माने ब्राह्मणांची संख्या जास्त आहे!!! हे फक्त संख्याशास्त्रीय विश्लेषण होईल त्या पलीकडे त्यास किंमत नाही. म. फुलेंच्या कार्यात त्याना आयुष्यभर साथ देणारे गोवंडे आणि वाळवेकर हे ब्राह्मण होते, त्यांच्या पहिल्या शाळेसाठी जागा देणारे `भिडे' ब्राह्मणच होते..चवदार तळ्याच्या सत्याग्रहात आंबेडकरांच्या बरोबर अग्रणी लढणारे बापू `जोशी' होते आणि त्यांच्याबरोबर `मनुस्मृती दहना'चा ठराव मांडणारे गंगाधर `सहस्रबुद्धे' होते ...इतकेच कशाला?? बाबासाहेबांना आपले आडनाव `आंबेडकर' हे देणारेही ब्राह्मण होते आणि त्या काळी त्यांच्याशी विवाह करणाऱ्या `माई' देखील ब्राह्मणच!!! मुद्दा संख्याशास्त्रीय नसून या सर्वांमध्ये असलेल्या समान धाग्याचा `कर्तृत्वाचा आणि `जन्माची' जात नाकारण्याचा आहे.

जन्माधिष्ठित जातीच्या आधारे, अलगता पाळणे, जातीय उतरंड मानणे किंवा जातीय धाग्याने एकत्र येणे अनैतिकच आहे त्यामुळे दुरान्वये देखील त्याचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र सर्वच जण तसे एकत्र येतात हे वास्तव स्वीकारले तर ब्राह्मणांनी काय [वेगळे] घोडे मारलंय??? मग मुद्दा उरतो तो फक्त या संमेलनात- अधिवेशनात पुढील पिढीस आदर्श कोणता घालून देणार?? ब्राह्मण जातीची ओळख कोणत्या व्यक्तींची नावे देऊन करून देणार?? गोवंडे,वाळवेकर, बापू जोशी, गंगाधर सहस्रबुद्धे, आंबेडकर, र.धों.कर्वे या नावांनी की दुसरा बाजीराव आणि राघोबादादा या नावांनी??? नाशिकची ओळख देताना इथे आलेल्या अन्य भाषिक ब्राह्मणांना कोणत्या व्यक्तींचे नावे सांगणार??? रे.टिळक, हुदलीकर, पटवर्धन, शिरवाडकर यांची की अन्य.....नावे माहित नसलेल्या `शेंडी-जानवे' ठेवलेल्या `जन्माने ब्राह्मण' व्यक्तींची??? कोणत्या व्यक्तींशी अस्मिता तथाकथित `ब्राह्मण्या'ची जोडण्याचे काम अधिवेशनात ठरावे??? ते कसेही ठरले तरी, एका बाबत मात्र जन्माधारित जातीयता ओलांडण्याचे या संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले पाहिजे.... ते म्हणजे संमेलन नगरीचे नाव वसिष्ठ, विश्वामित्र असे ब्राह्मणाचे न ठेवता `श्रीराम'नगरी असे एका क्षत्रियाचे नाव दिले.....असेच यापुढे कधीतरी फुले, आम्बेडकरांचे ही नाव दिले जाईल ही आशा करायला काय हरकत आहे???
लोकेश शेवडे २४/०४/२०१०

Wednesday, March 24, 2010

नैतिकता आणि आव


"गुटख्यातून मिळवलेला पैसा साहित्यसंमेलना साठी वापरू नये" असे विधान श्री. अभय बंग यांनी केले. पुढे, असे पैसे वापरून "संमेलन `शुध्द' ठेवावे" असेही त्यांनी सुचविले. ही विधाने करण्यापूर्वी श्री. बंग यांनी ती विधाने ज्यांच्या देणग्या बाबत केली होती त्या `माणिकचंद' या `ब्रांड' किंवा त्या उद्योग समुहाचे प्रमुख श्री.धाडीवाल यांनी तो पैसा कसा मिळवला आणि त्यांच्या कोणत्या उद्योगातून देऊ केला होता याची त्यांना कल्पना नसल्याचे कबूल करून मग ती विधाने केली. मग काय विचारता???......



संमेलनापूर्वी कोणत्या ना कोणत्या विषयावरून वादळ उठलेच पाहिजे...ही एक परंपरा ... साहित्याशी संबंध नसलेल्या विषयावरूनच वादळ उठवण्याची दुसरी परंपरा...आणि.... भाष्य करण्यापूर्वी माहिती मिळवण्याची आपल्या विचारवंतांची तिसरी परंपरा....सर्वच्या सर्व परंपरा यथासांग पार पडल्या!!!! त्यामुळे यंदाचेही साहित्य संमेलन अगदी पारंपारिकरित्या यशस्वी होईल हे नि:संशय!! असो, पण या वादळामुळे पैसा,शुध्दता आणि नैतिकता या साऱ्या बाबत प्रश्न-निकष-व्याख्या आणि संमेलनासाठी [म्हणजे ते शुध्द राहण्यासाठी]`काय वापरावे' याचे नियम तपासण्याची मात्र आवश्यकता निर्माण झाली. या प्रक्रियेत श्री.बंग किंवा तत्सम विचारवंत सहभागी नाही झाले [ विधाने केल्या नंतर त्यावर फेरविचारकिंवा वेगळा दृष्टीकोन स्वीकारण्याची देखील अशा विचारवंतांची परंपरा असू शकते] तरी देखील या बाबी तपासणे अनिवार्यच आहे.



प्रश्न . कायदेशीर-सनदशीर मार्गाने केलेल्या श्रमांमध्ये, व्यवसायांमध्ये, उद्योगांमध्ये शुध्द-अशुध्द, नैतिक-अनैतिक असे काही प्रकार असतात का??


प्रश्न . ज्या श्रमांच्या, उपजीविकेच्या किंवामिळकतीच्या प्रकारांना, व्यवसायांना, उद्योगांना, व्यवहारांना कायद्याने मान्यता आहे त्यांचे पुनर्मूल्य-निर्धारण [re-assessment] करण्यासाठी न्यायालय-संसद-विधानसभा-नियत-कालिके,` त्या-त्या विषयाशी संबंधित संस्था' यातील कोणताही मार्ग उपलब्ध नाही का ?? जर ते मार्ग उपलब्ध असतील तर त्या मार्गाने जाता त्या विषयाशी संबंध नसलेल्या संमेलनावर दबाव टाकणे नैतिक ठरते का??? सेंसोर-सरकार यानी सम्मत केलेल्या नाटय-चित्र-साहित्य इ. विरुध्द बंदी साठी रस्त्यावर उतरणारया आन्दोलाकाचा निषेध करून त्यानी सरकार-न्यायालय-सेंसोर कड़े जावे असे हेच विचारवंत सुचवित असतात....ही आत्म-विसंगति नव्हे काय??


प्रश्न . ज्या व्यक्तीच्या मिळकतीची अनेक साधने/मार्ग आहेत [उदा. लेखक लेखनातून पैसे मिळवत असताना त्याची एखादी जागा किंवा वाहन भाड्याने देऊन काही कमाई करू शकतो], जी व्यक्ती अनेक उद्योग/उत्पादने करत असेल, किंवा ज्या उद्योग समुहाची अनेक उत्पादने आहेत [उदा. एखाद्या समूहाची विमान-सेवा, सोडा, कपडे आणि दारू अशी अनेक उत्पादने असू शकतात] किंवा एकच ब्रांड पण एकमेकांशी संबंध नसलेले अनेक उद्योग उत्पादने असतील [उदा. `स्वस्तिक' हा ब्रांड वापरणारी अनेक उत्पादने आहेत परंतु त्या उद्योगांचा त्यांच्या संचालकांचा परस्परांशी कोणताही संबंध नाही] अशा सर्व प्रकार मार्गा मधील कोणता पैसा हा शुध्द/नैतिक किंवा अशुध्द/अनैतिक मानावा???


प्रश्न . गुटख्याचा पैसा अशुध्द/अनैतिक असेल तर त्याच्या वितरकाचा, किरकोळ विक्रेत्याचा, पानवाल्याचा पैसा,अशुध्द-अनैतिक ठरतो की नाही?? मग एखाद्या पानवाल्याने देऊ केलेले पैसे संमेलनासाठी स्विकारावे की नाही??


प्रश्न . आपल्या दुकानात्तील अनेक वस्तूमध्ये एक गुटखा किंवा सिगारेट ठेवणाऱ्या किराणा व्यापारयाचे पैसे अशुध्द मानावे की नाही?? मानायचे झाल्यास किती प्रमाणात ?? म्हणजे एकूण विकल्या जाणारया २०० वस्तूंमध्ये एक गुटखा विक्री करणारया किराणा व्यापाऱ्याचा शंभर टक्के पैसा अशुध्द होतो असे मानावे, की अर्धाटक्का अशुध्द?? तो टक्का वस्तुंच्या संख्येचा धरावा की,मूल्याच्या ??


प्रश्न . भारतातील अनेक मोठी देवस्थाने समाजोपयोगी कारणांसाठी पैसा खर्च करतात. मोठ-मोठ्या देणग्या देतात. त्यांचा पैसा काही आपोआप तयार झालेला नसतो. देवस्थानांकडे जमा झालेला पैसा हा दर्शन घेणारया लोकांनी मूर्ती समोर वाहिलेला किंवा `बड्या' मंडळीनी दागिने-देणग्या स्वरूपात दिलेलाच असतो. त्यात अर्थातच अनेकविध प्रकारची मंडळी असतात, ज्यात अनेकांनी आपले अनैतिक हेतू साध्य व्हावे म्हणून केलेल्या नवसाचे पैसे-वस्तू असतात [उदा. जक्कल-सुतार या खुन्यांनी खून करण्यापूर्वी ते खून आपल्या हातून घडावे यासाठी एका प्रसिध्द देवळात जाऊन नवस केला होता तो फेडलाही होता] तसेच अनेकांनी आपला काळा पैसा देवस्थानांना दिलेला असतो [उदा. दक्षिण भारतातील एका प्रसिध्द देवस्थानाला काळा पैसा/दागिने दिल्यास उर्वरित काळा पैसा`tax- इन्स्पेक्टर्स' पासून सुरक्षित राहतो अशी श्रद्धा अनेक कृष्ण-धनिका मध्ये आहे म्हणून ते `तशी' सुरक्षा मिळवतात], एकंदरीत कसेही असले तरी देवस्थानाकडे जमा झालेल्या पैशात गुटख्याचा-मद्याचा किंवा त्या व्यापारयांचा, किंवा त्यांच्या जाहिरात एजंसी, जाहिरातीची मोडेल्स वगैरे या ना त्या प्रकारे सम्बंधित,लाभार्थिन्चा पैसा असणारच.मग, देवस्थानांकडून आलेला `तसा' पैसा, देणगी अथवा प्रायोजकत्व हे शुध्द-अशुध्द, नैतिक-अनैतिक यापैकी काय आणि का मानावे??

या साऱ्या प्रश्नांचे उत्तर काहीही असले तरी त्याहून वेगळा आणि महत्वाचा प्रश्न उरतोच ... तो म्हणजे...जो गुटखा [किंवा सिगारेट, मद्य वगैरे कोणतेही अंमली पदार्थ] बनवून किंवा विकून मिळवलेला पैसा अशुध्द-अनैतिक ठरतो...त्याच अंमली पदार्थांचे सेवन करणाऱया साहित्यिकाचे साहित्य, किंवा अशा पदार्थाचे सेवन करताना निर्माण झालेले साहित्य अशुध्द ठरते की शुध्द?? अशा पदार्थांचे सेवन करणारया साहित्यिकांनी संमेलनात प्रवेश केल्यास संमेलन `बाटणार' नाही का??

असो...प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य, मत-स्वातंत्र्य आहेच!! त्यामुळे श्री.अभय बंग किंवा तत्सम व्यक्तींच्या मताचा तेवढा आदर आहेच. त्यात, निर्व्यसनी असूनही सज्जन असलेली जगात जी काही तुरळक मंडळी आहेत, त्यात श्री. अभय बंग, अनिल अवचट हे अग्रणी आहेत हे तर निर्विवाद आहे. तथापि, श्री. बंग यांच्या विधाना नंतर श्री.धाडीवाल यांनी प्रायोजकत्व मागे घेतल्याचे जाहीर केले.. याबाबत त्या मंडळीनी हा "नैतिकतेचा विजय झाला"असे जाहीर केले त्याचे मात्र आश्चर्य वाटले...श्री.धाडीवाल यांनी [प्रायोजकत्व]`नाकारणे' यात संमेलनाची कसली नैतिकता?? नाकारलेल्या उपवर मुलीने तिला नाकाराल्यावर "मला लग्नच करायचे नव्हते आणि`सोज्ज्वळ'’ राहायचे..होते'' असे म्हणण्या सारखे ते वाटले. हे बोलणे म्हणजे `नैतिकतेचा आव' असल्या सारखेच भासते. मराठी मध्ये `आव' याला दुसराही एक अर्थ आहे. अपुरया माहितीवर भाष्य करने आणि त्याच्या परिणामाना `नैतिकतेचा विजय संबोधणे' म्हणजे नैतिकता नव्हे `आव' आहे. अर्थात `आव' कोणत्या अर्थाने हां प्रश्न आहेच!!!