Tuesday, January 19, 2010

औचित्याचा अर्थ

औचित्याचा अर्थ
खर म्हणजे मराठी ही अगदी साधी सोपी भाषा आहे. परंतु काही नतद्रष्ट लोक निष्कारण शब्दांचे उलट सुलट अर्थ काढत बसतात आणि आपल्या भाषेला बदनाम करतात. आता हेच पाहा ना, वेळ प्रसंग पाहून एखादी कृती करणे,किंवा बोलणे याला `औचित्य' पाळणे म्हणतात. यात न समजण्या सारखे काय आहे?? मात्र हे दुष्ट लोक `औचित्य पाळा' असे सांगितल्यास, ``म्हणजे नेमके काय पाळा'' असे विचारतात. अहो, `औचित्य' म्हणजे काय कुत्रा आहे, की तो दाखवून सांगता येईल की ``हा पाळा!!'' किंवा मग विचारतात, ``औचित्य पाळू म्हणजे काय करू??'' ...आता याचे उत्तर कसे देणार?? त्यापेक्षा तर `स्लमडॉग'मध्ये `ऑस्कर अवार्ड' मिळण्यासारखे काय होते? याचे उत्तर देणे देखील सोपे जाईल!!

`ऑस्कर' वरून आठवले, मागे एकदा `श्वास' या मराठी चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेंव्हा हे असलेच लोक `या चित्रपटात पुरस्कार देण्यासारखे काय आहे?? असा प्रश्न विचारत होते. म्हणे,१५ मिनिटाची सामग्री दीड तास भर ताणली, आणि म्हणे, शेवट अगदी पुचाट `मेलो-मेलो-मेलो-मेलो'ड्रामा आहे!! असेना का खरेच १५ मिनिटाची गोष्ट आणि मेलो-मेलोड्रामा...पण, तब्बल ५० वर्षांनी मराठी चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळत होता, तेंव्हा असा प्रश्न विचारणे `औचित्यपूर्ण' होते का?? त्यात पुढे हा चित्रपट `ऑस्कर' साठी पाठवण्याचे घाटत होते. तरीही तेंव्हा या हलकट लोकांनी पुन्हा म्हटलेच ``या असल्या चित्रपटाला कसले मिळतेय `ऑस्कर'??आता राष्ट्रपतींकडून जे पैसे मिळालेत ते जाण्या-येण्यात आणि सब-टायटल्स वगैरे साठी खर्च होतील, आणि चेहरे पाडून रिकाम्या हाती परत येतील!! खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा- उसका बारा रुपया हुआ---असे होईल!!''तसेच झालेही..... पण म्हणून त्यावेळी तसे बोलणे `औचित्यपूर्ण' ठरते का? असे `औचित्यभंग' करून ही मंडळी काय साधतात कुणास ठाऊक???

असो. पण या, `अवार्डेच्छू' चित्रपटांचे काही ना काही प्रॉब्लेम होतातच. मध्यंतरी, अशाच एका `फायर' कि `वाटर' या नावाच्या चित्रपटा भोवती वादळ उभे राहिले होते [आग-पाण्याचाच खेळ तो!!!], तेंव्हा शबाना आझमीने अभिव्यक्ती आणि व्यक्तीस्वातंत्र्य याबाबत आग्रह धरला.. तेंव्हा ह्याच दद्रु मंडळींनी ``ही बाई स्वत: कम्युनिस्ट असून देखील`अभिव्यक्ती-व्यक्तीस्वातंत्र्या' चा आग्रह कसा काय धरते??'' असा प्रश्न विचारला! आता, मुद्दा चांगला व्यक्तीस्वातन्त्र्याचा असताना, ती बाई कम्युनिस्ट आहे यावर आक्षेप घेण्याचे काय प्रयोजन?? धोब्याचे स्वत:चे कपडे स्वच्छच असावे असे कुठे आहे? ओझे वाहण्याचाच जर हेतू असेल तर ते वाहणारा गाढव आहे कि बैल ते पाहण्याची मुळात गरजच काय?? असेना का ती बाई कम्युनिस्ट, मांडत असेल व्यक्ती-स्वातंत्र्याचा मुद्दा तर मांडू द्या ना!! पण या खडूस लोकांना कोणत्या वेळी काय बोलावे हे सांगणार कोण? आणि सांगितले तर ते ऐकणार कोण?? मग म्हणे, ``या कम्युनिस्ट लोकांनीच व्यक्ती-स्वातंत्र्याची सर्वाधिक गळचेपी केली आहे. रशियामध्ये कम्युनिस्तानीच हजारो लेखक आणि कलावंताना आजन्म तुरुंगात डांबून, हाल-हाल करून मारले, लाखो लोकांना केवळ त्यांचे विचार पटत नव्हते म्हणून गोळ्या घालून ठार केले. चीन मध्ये तर अगदी कोवळ्या वयाच्या लाखो विद्यार्थ्यांची तिआन-मेन चौकात गुरा-ढोरा प्रमाणे कत्तल केली''.... खरेच आहे त्यांचे म्हणणे, किंबहुना अमान्य करणेच अशक्य आहे. पण ते सारे परदेशात ना!.. भारतात ते दाखले देऊन [शबानाच्या] व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्याला का `अवलक्षण' करावे?? ... वस्तुत: कम्युनिस्तानी क्यूबा,पोलंड,रुमानिया, चीन-रशियाच्या मानाने भारतात काहीच हिंसाचार केलेला नाही. [तत्कालीन]रशियातिल सहा कोटि लोकासंख्येमधे त्यानी सव्वा लाख लोकाना ठार केले, हे प्रमाण धरल्यास [भारतात] त्यानी पंचवीस-एक लाख माणसे बिनधास्त मारून टाकली असती. एकट्या `सिंगुर' मधेच त्याना विस-पंचवीस हजार माणसे सहज कापून टाकता आली असती. `सिंगूर'मध्ये कम्युनिस्तानी भले हजारोंची डोकी फोडली असतील, त्यांना बेदम मारहाण केली असेल, पण ठार मारले नाही....सहिष्णुता पाळून जिवंत ठेवले!!...तरीही इथल्या कम्युनिस्ताना तिथल्या वर्तणुकीवरून बोल लावणे, ते ही शबाना सारख्या श्रेष्ठ नटीला.. आणि तेसुध्दा ती व्यक्ती-स्वातंत्र्याचा मुद्दा मांडत असताना...किती हा औचित्यभंग!!! पण औचित्य सांगून उपयोग काय ?? ते पुन्हा विचारतील,`` `उचित' म्हणजे नेमके काय बोलावे ते सांगा..'' आता, `उचित' म्हणजे काय हा खुलासा करणे शक्य तरी आहे का?? बरे, गप्प बसावे, तर पुढे म्हणतात, ``भारतातच, अगदी खुद्द बंगालमध्ये, म्हणजे कम्युनिस्तांच्याच राज्यात, नव्वदीच्या दशकात, म्हणजे अगदी ऐन `ज्योती बसूं'च्या राजवटीतच `उषा उत्तूप[अय्यर]' या गायिकेच्या कार्यक्रमावर त्यांनी बंदी आणली होती, तेंव्हा त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य का नाही आठवले???'' त्यावरजरा दटावून म्हटले, `खबरदार! शबाना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबत काहीही बोला पण या वादात `बसू'दा सारख्या थोर व्यक्तीचे नाव आणू नका''....तर.....

....तर, म्हणे ``बसू'दा ...आणि थोर??? कोणत्या कारणाने थोर म्हणावे त्यांना??? लेनिन आणि स्टालिन सारख्या दुष्ट, क्रूरकर्म्यांच्या नादी लागले म्हणून?? भारताची फाळणी करून, पाकिस्तान निर्मितीसाठी आग्रह करणारे कम्युनिस्ट झाले म्हणून?? बंगाल मधून उद्योग पळवून लावून, कामगारांना देशोधडीला लावले, भारतातील सर्वात कमी औद्योगिक विकासाचे राज्य बनवले म्हणून?? त्यांच्या कारकिर्दीत बंगाल हा `बकाल' झाला म्हणून?? की वयाच्या ८८ वर्षांपर्यंत सत्ता सोडवली नाही म्हणून???'' हे ऐकल्यावर मात्र न राहवून त्यांना खडसावून सांगणे भाग पडले,``अरे, पण `बसू'दा हे तत्वनिष्ठ होते हे लक्षात ठेवा! त्यांना कामगारांच्या बद्दल कळवळा होता, कामगाराना जागृत करून त्यांचे हक्क त्यांनी मिळवून दिले, खाजगीकरण थांबवून कामगारांचे आणि सरकारीकरण करून जनतेचे भले करण्याचा त्यांचा मार्ग होता हे विसरू नका!!'' यावर ते विघ्नसंतोषी लोक गप्प बसण्या ऐवजी आणखी खोचक पणाने म्हणे, ``त्यांना कामगारांचा कळवळा होता, तर मग बंगालमधील कामगारांचे किमान वेतन महाराष्ट्र, गुजरात, आंध्र, कर्नाटक पेक्षा सर्वात कमी का होते?? कामगारांना हक्क द्यायचे होते, तर बंगाल मध्ये कामगारांच्या संपावर बंदी आणण्याचा प्रस्ताव त्यांनी का मांडला?? खाजगी करणाला विरोध होता तर, बंगाल मध्ये वीज निर्मितीसाठी खाजगीकरण का केले?? भांडवलदारीला आक्षेप होता तर, मग कोलाकोत्यात भारतातील सर्वात मोठे `मॉल' का आणले? आणि या सर्व परस्पर-विसंगत वागण्या मागे कोणती तत्वनिष्ठा होती?'' या प्रश्नांची उत्तरे काय आणि कशी देणार??? या पेक्षा तर ```औचित्य' म्हणजे काय?'' या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे!!!

शेवटी म्हटले, ``जाऊ द्या. निदान ते किती लोकप्रिय होते, त्यांना लोक किती मानायचे, ते तरी मान्य करा!!'' यावरही ते पाजी लोक चूप न बसता कुचकटपणे म्हणे,``हो हो!! पाहिले ना, आम्ही टीव्ही वर.. सगळे `छटे हुए', अट्टल राजकारणी होते ना `बसू'दाच्या अंत्यदर्शनाला... ज्यांनी `बसू'दाना कायम विरोध केला, त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही...तेच लोक गंभीर, दु:खी मुखवटा घेऊन कॅमेरा मध्ये सर्वात पुढे होते. तोंड देखले, बोलत होते की त्यांना `बसू'दा बद्दल नितांत आदर आणि प्रेम होते वगैरे वगैरे....' सर्वच्या सर्व बोलणे आणि बोलणारे ..भंपक आणि खोटे!!' तेवढ्यात अचानक त्यांच्याच बोलण्यात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर उलगडले आणि हर्षभरीत होऊन गर्वाने त्या द्वाड लोकांना म्हटले, ``बसू'दाची थोरवी नाही समजावू शकणार तुम्हाला, पण `औचित्या'चा अर्थ मात्र आता समजावू शकतो...`ते जे `छटे हुए' राजकारणी `बसू'दाच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जे करत होते ना???? त्यालाच `औचित्य' म्हणतात!!! कळले???''

लोकेश शेवडे
२८/१/१०