Tuesday, February 9, 2010

डे बाय डे

`मेडिकल' क्षेत्रा मध्ये जसे नियमितपणे दर काही दिवसांनी आधीच्या नेमके उलट घडत असते, तसेच हल्ली जीवनातल्या अन्य अनेक बाबतीत घडताना जाणवते. मेडिकल जाणकारांकडून ``कॉफी आरोग्यास अत्यंत घातक असते'' असे काही काळ कंठशोष करत सांगितले जात असते, आणि मग कधीतरी अचानक ``कॉफी ही आरोग्यास अत्यंत पोषक'' असल्याचे तितक्याच उच्चारवाने सांगितले जाऊ लागते. हीच पध्दत अन्य बाबतीतही लागू झाल्याचे भासते. उदा. `` आमच्या काळी नव्हते बुवा हे असले काही `फॅड'!!'' अशा हेटाळणी करणारया वाक्यांनी कुठल्याही फॅड किंवा फ्याशनचे स्वागत करण्याचे `फॅड' आता जुने झाले. हल्ली मात्र त्याच `फॅड'मध्ये काय आणि कसे `चांगले'च दडले आहे ते `विश्लेषणात्मक आणि लॉजिकल' पध्दतीने मांडण्याचे `फॅड' आले आहे. थोडक्यात, ज्या गोष्टीची टीका किंवा समर्थन करायचे तेही `फॅड' आणि `टीका किंवा समर्थन' करण्याचे देखील `फॅड'!!! एकंदरीत भात जसा फडफडीत असतो तसा सध्याचे जीवन `फॅड-फडीत' झालेले भासते. त्यामुळे, एखाद्या लंबका प्रमाणे उलट-सुलट वागणाऱ्या `काल'चक्राचे आपण एक क्षुद्र घटक आहोत ही जाण आल्यावर ...त्या-त्या काळात आपल्या वाट्याला आलेले `फॅड' निभावणे हाच आजचा मनुष्यधर्म मानावा हे श्रेयस्कर !!

आता, या `डे'चेच उदाहरण घ्या! ``हल्ली उठसूट कुठला ना कुठला `डे' साजरा करतात...पूर्वी कुठे होते हे सगळे `डे'?? तरी वर्षातले ३६५ दिवस आमचे छान-आनंदात जायचेच ना??'' असे हिणवत फ्रेन्डशिप किंवा वेलन्ताइन `डे' वर कडाडून टीका झाली. त्यातही वेलन्ताइन `डे'ला तर तोडफोड करत, बंद पुकारत विरोध झाला....त्यामुळे आता साहजिकच त्यात काय आणि कसे चांगले आहे हे मांडणे `काल-चक्रानुसार क्रमप्राप्त ठरते....म्हणूनच ...................

हा वेलन्ताइन `डे' जेंव्हा पहिल्यांदा जाणवला तेंव्हाच खर तर नुसता `डे' देखील जाणवला! `वेलन्ताइन डे' आहे, आणि त्याला कोणाचा तरी कडाडून विरोध आहे अशी काही वर्षांपूर्वी बातमी वाचली, तेंव्हा पहिला प्रश्न मनात आला```डे' म्हणजे काय?'' आणि मग लगेच दुसरा प्रश्न आला ``वेलन्ताइन म्हणजे काय?? लहानपणी `डे' म्हणजे बंगाली आडनाव वाटत असे. पुढे इंग्रजी शिकू लागल्यावर `दिवसा'ला डे म्हणतात, आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला शेवटी `डे' म्हटले जाते हे ही समजले. पण आठवड्यातल्या एकाही दिवशी हा वेलन्ताइन कधी आला नव्हता. म्हणून विचारणा केली तेंव्हा कळले, की हल्ली असे अनेक `डे' असतात आणि ते चित्र-विचित्र पणे साजरे केले जातात.....त्या साजरे करण्याच्या प्रकारा वरून का कुणास ठाऊक, पण `उकिर'डे, `माक'डे हे देखील साजरे केले जाणारे दिवसच आहेत की काय असे वाटून गेले. असो. '' बेलन्ताइन या नावाची एक स्कॉच व्हिस्की माहित होती, त्यावरून वेलन्ताइन ही `रम', `व्होडका' किंवा कुठली तरी दारू असावी असे वाटले. जाणकारांनी ते चूक असल्याचे सांगितले. नंतर या `वेलन्ताइन'चा प्रेमाशी संबंध असल्याचे जेंव्हा कळले तेंव्हा त्याचा दारुशी संबंध असल्याचे वाटणे अगदीच असंबद्ध नव्हते असे वाटले. कारण, अनुभव, कथा- कादंबऱ्या आणि चित्रपट या सर्वामध्ये प्रेमाची परिणती ही `दारू'तच झालेली माहित होती....

पण पुन्हा दारू आणि प्रेम या दोनही विषयातल्या `जाणकारांनी' हा समजही हिरीरीने खोडून काढला आणि त्याऐवजी वेलन्ताइन्चा संबंध फुलांशी आहे आणि फ्रेन्डशिपचा संबंध `ब्यांड'शी आहे असे ठामपणे सांगितले. त्यात मात्र काहीच आश्चर्य वाटले नाही, उलट स्वाभाविकच वाटले, कारण पूर्वी एखादा मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडून `मित्र-मैत्रीण' झाले, की त्यांच्या घरचे लोक त्यांचा `ब्यांड' वाजवायचे, आणि दुसऱ्या कोणाशी लग्ने लावून देऊन त्यावेळी त्यांच्यावर फुले टाकायचे हा सामाजिक इतिहास पक्का लक्षात होता. असो. अखेर त्या `ब्यांड'वाल्यांनी, सॉरी, ब्यांड बांधणाऱ्यानी स्फुंदत-स्फुंदत फायनल खुलासा केला की, ``वेलन्ताइन' या नावाचा एक माणूस होता''[ यावरही प्रश्न पडलाच की तो बंगाली होता का?? म्हणजे, त्याचे पूर्ण नाव श्री. वेलन्ताइन डे असे होते का?] ``त्याच्या नावाने हा `प्रेमाचा दिवस' साजरा केला जातो''[पुन्हा प्रश्न आलाच, की प्रेमामुळे `दिवस' जातात हे कळू शकते, पण प्रेमाचाच दिवस म्हणजे काय??] ``आणि प्रेमाचे प्रतिक म्हणून ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असेल तिला फुले दिली जातात आणि त्या आधी `फ्रेन्डशिप डे' ला तिच्या हाताला ब्यांड बांधला जातो..'' हे ऐकल्यावर मात्र ते प्रश्न विचारावेसे वाटलेच नाहीत..आपले प्रेम व्यक्त केले जाऊ शकते या कल्पनेनेच हरखून जायला झाले!!! आणि.... आपले प्रेम व्यक्त करण्याची आपल्या काळी मुभा असती तर............??????? हा एकच, एकच, एकच आणि एकमेव प्रश्न मनात घुमायला लागला!!!!!

हल्लीची मुले काय बिनधास्त झालीयेत, त्यांना आपल्या सारखे `ब्लॉक्स' नाहीत. जे वाटते ते तसेच्या तसे व्यक्त करतात आणि त्यामुळे आनंदी राहतात!! आपल्या काळात फार सामाजिक बंधने, कौटुंबिक दडपणे असायची. बंध-मुक्त विचार आणि आविष्कारावर टीका करून सबंध पिढीनेच स्वत:चे नुकसान करून घेतले. या अशा दिवसांना, फुले देण्याला, ब्यांड बांधण्याला नाकारून, किती [सोप्या पण तरीही] मोठ्या गोष्टीला आपल्या पिढीने झिडकारले आणि स्वत:चीच कुचंबना करून घेतली. आपण फार लवकर जन्माला आलो. असे सारे विचार डोक्यात काहूर उठवू लागले. एक साधे फुल देऊन किंवा साधा `ब्यांड' मनगटावर बांधून किती मोठा आशय `कम्युनिकेट' होऊ शकतो ते लक्षात आले...या दिवशी कोणाचीही कुठलीही तमा,भीड,मुर्वत न बाळगता आपल्याला आपले प्रेम आपल्याला हव्या त्या व्यक्ती पर्यंत पोहोचवता येऊ शकते... हल्लीच्या मुलांबद्दल असुयाच दाटून येऊ लागली. स्वत:च्या अनेक वर्षे मागास विचार करण्याबद्दल लाज वाटू लागली आणि हल्लीच्या तरुणांच्या विशाल दृष्टीकोनाबद्दल आदर वाटू लागला. संकुचित आणि भंपक विचारांमुळे पूर्वीची पिढी कायमच असंतुष्ट, वैफल्यग्रस्त राहिली. सर्व कथा, कादंबऱ्यामध्ये प्रेम `कम्युनिकेट' करण्यातच अर्धे कथानक संपायचे आणि नंतर साहजिकच `शोकांतिका'च व्हायची. संकोच, त्यातून तयार होणारी गुप्तता आणि त्यामुळे साचून राहणारी आत्म-वंचना, न्यूनगंड या दुष्ट विळख्यात आपल्या पिढीने स्वत;ला गुरफटून,गुदमरून टाकले याचा एक प्रखर साक्षात्कार झाला!! आणि समाजाला, पिढीला दोष देऊन उपयोग नाही...तर आपणच बदलायला हवे...याचाही साक्षात्कार झाला!!!

बदलायचे म्हटल्यावर पुन्हा प्रश्नच प्रश्न!! पण ब्यांडवाले, सॉरी, तरुण जाणकार उत्तरे द्यायला तयार असल्यामुळे, तशी अडचण आली नाही. किंबहुना, प्रत्येक प्रश्नावर हल्लीच्या मोबाईल किंवा टी- कॉफी व्हेंडिंग मशीनप्रमाणे उत्तरांची अनेक ओपशन्स मिळत होती. फुले किंवा ब्यांडची किंमत किती असते ?? या पहिल्याच प्रश्नावर एक रुपया पासून साडेतीनशे रुपयापर्यंत अशी `ओपशन्स' ऐकल्या बरोबर मात्र धडकीच भरली! त्यात एका जाणकाराने सव्वाचारहजार रुपयांचा एक सोन्याचा ब्यांड एका मैत्रिणीला बांधला हे ऐकून तर ठोकाच चुकला. ``प्रेमा समोर पैश्याला काहीच किंमत नाही'' असेही वर त्याने ठासून सांगितले...त्याने इतर काही जणींना पंचवीस-पंचवीस रुपयांचे गुछ्च तर काही जणींना दोन-दोनशे रुपयाचे ब्यांड बांधल्याचेही आवर्जून सांगितले. असा भेदभाव करण्याचे कारण विचारल्यावर, त्याने `अरे, त्या पोरीची पण लायकी बघायला नको का??'' असा खुलासा केला. म्हणजे फुलांमध्ये ओपशन्स, ब्यांडमध्ये ओपशन्स, मैत्रिणीमधेही ओपशन्स आणि त्यांच्या लायकीमध्ये देखील!!! पण इतक्या मैत्रिणीसाठी इतके महागडे ब्यांड आणायला पैसे कुठून आणलेस?? या प्रश्नावर मात्र तो का गप्प बसला ते कळले नाही. कदाचित, त्याला तो प्रश्न फार उथळ वाटला असावा. काही जाणकारांनी मात्र केवळ एक किंवा दोनच मित्र-मैत्रीणीना ब्यांड बांधले होते. त्यांच्या कारणामधेही अनेक ओपशन्स होती. एकाने विषादाने म्हटले, ``आपल्याकडून दुसरी कोणी बांधूनच घ्यायला तयार नाही, मग काय करणार??'' दुसरा म्हणाला,``इतक्या जणीना ब्यांड बांधायला आपल्याकडे `बजेट'च नाय!! आपला बाप कंजूस आहे. तेवढा पोकेटमनीच देत नाय!'' बिचाऱ्याचा बाप मागच्या पिढीचा `संकुचित-मागास' असणार! तरीही त्यातल्या त्यात `जेवढे' `प्रेम व्यक्त' करता येणे शक्य होते तेवढे करण्यासाठी तो धडपडत होता बिचारा!! एकाने तर फक्त आणि फक्त एकाच मैत्रिणीलाच एक फुल दिले होते. त्यालाही विचारले की त्याने एकाच मैत्रिणीला का फुल दिले?? ....त्यावर तो जरा संकोचून म्हणाला ``कारण माझे फक्त तिच्यावरच प्रेम आहे आणि ते खरे आहे.'' ही ओपशन्स प्रेमाची होती म्हणून जरा अद्भुत वाटली...ज्या अर्थी एखाद्याचे खरे प्रेम असते त्या अर्थी एखाद्याचे खोटे प्रेमही असू शकते. म्हणून न राहवून विचारले `खरे प्रेम' म्हणजे काय?? त्यावर......तो काही काळ विचारात गढून गेला मग घुटमळत, तोंडातल्या तोंडात म्हणाला, ``मी जे करतो ते.'' हे उत्तर तर अधिकच गूढ झाले. म्हणून पुन्हा पुन्हा पाठपुरावा करत विचारले की प्रेम म्हणजे काय? शेवटी तो चिडून म्हणाला ``अहो, काय लावलंय काय? मी प्रेम करतो म्हणजे मला प्रेमाचा अर्थ माहित पाहिजे असा काही कायदा आहे का??''

ज्या प्रेमाचा शोध अगणित कलाकार, लेखक, विचारवंत, आणि अगदी अखंड जग गेली हजारो वर्षे घेऊ पाहताहेत आणि ठेचकाळत, असफल होताहेत. ते प्रेम आणि त्याचा अर्थ एका दिवशी, एका फुलाने मिळवून देणारा तो वेलन्ताइन नावाचा माळी, त्या फुलात ते प्रेम मिळाले असे मानून वेलन्ताइन `डे' साजरा करणारे `फूल्स', आणि ते प्रेम एका ब्यांड ने मनगटाला जखडून फ्रेंडशिप डे साजरा करणारे ब्यांडवाले, यांच्या समोर स्वत:ची आणि स्वत;च्या पिढीची हजामत करून घेण्याखेरीज आपण करू काय शकतो. त्यामुळे आपल्या हाती उरते फक्त `शेव' `डे' साजरे करणेच ...बाकी काय??