Friday, May 21, 2010

`कसाब'सा उज्ज्वल


`कसाब'सा उज्ज्वल / `उज्ज्वल' प्रतिमा

क्रिकेट किंवा अन्य कोणत्याही खेळात एखादा संघ जिंकल्या नंतर त्यातील कर्णधाराला अथवा सामनावीराला त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर त्याचे श्रेय ते हमखास `टीम'-सवंगडी वगैरेंना देतात किंवा त्याबाबत ते अनुकूल परिस्थिती, प्रतिस्पर्ध्याच्या चुका, योगायोग इत्यादींचा देखील उल्लेख करतात. सांघिक यशाचे सोडा, अगदी एसएससी बोर्डाच्या किंवा युनीवर्सीटीच्या परीक्षेत एखादा विद्यार्थी पहिला आला [म्हणजे अर्थातच एकट्यानेच अभ्यास करून] आणि त्याला कोणीही विचारले की, `तुझ्या यशाचे रहस्य काय?' तरी तो त्याचे श्रेय पूर्णपणे स्वत:कडे न घेता त्यात आई,वडील,गुरु किंवा सहकारी मित्र वगैरेंना श्रेयाचा मोठा वाटा देतो. अनेकजण तर संपूर्णच श्रेय इतरांना देतात.

या उलट सिने-स्टार,तारका, वलयांकित व्यक्ती, राजकारणी वगैरेंच्या बाबत मात्र नेमके उलटे घडते. त्यांच्यात श्रेय उपटण्याची [ किंवा लाटण्याची] अहमहमिकाच चाललेली असते. सिनेमा गाजल्यानंतर तो `माझ्यामुळेच गाजला' असे अभिनेते,दिग्दर्शक,लेखकांपासून ते अगदी एक्स्ट्रापर्यंत प्रत्येक जण कंठशोष करत सांगत फिरतो. एखादे धरण, पूल किंवा प्रकल्प एखाद्या गावात सुरु झाल्या नंतर प्रत्येक पुढारी तो आपल्याच पुढाकाराने, प्रभावाने झाला असे ओक्साबोक्शी सांगत सुटतो आणि स्वत:च्या कार्याच्या अहवालात त्याचा ठासून उल्लेख करतो. पडलेल्या पुलाबद्दल, फुटलेल्या धरणाबद्दल मात्र सारेच चिडीचूप!!! आणि बोललेच तर फक्त दोनच शब्द .....दुसऱ्याचे नाव आणि आडनाव!!! राजकारणी आणि सिनेस्टार यांच्यात आणखी एक साम्य असते...अर्थातच, सतत कॅमेरा समोर येण्यासाठी तळमळ आणि धडपड!!!

एकंदरीत....सतत कॅमेरा समोर येणे आणि यशाचे, सत्कृत्यांचे श्रेय उपटणे ही सिनेस्टार, राजकारणी वगैरे लोकांची खासियत असते असा एक सार्वत्रिक समज आहे. सध्या त्यात आणखी एका व्यावसायिकांची भर पडली आहे....ती म्हणजे सरकारी वकिलांची!!! गेली वर्ष- दोन वर्षे टी.व्ही. स्क्रीनवर राखी सावंत पेक्षाही जास्त तावातावाने आणि जास्त वेळ बोलणारया व्यक्तीचे नाव काय??? असा प्रश्न विचारल्यास ऑप्शन्स न विचारता उत्तर येईल...`सरकारी वकील उज्ज्वल निकम'!!! उज्ज्वल निकम हे सरकारी वकील नसते तर सर्व खटले सरकार हरले असते की काय? आणि [गाजलेल्या] खटल्यांमध्ये तारीख जरी पुढची पडली तरी ती बातमी द्यायला दस्तूर खुद्द `सरकारी वकीलच' पाहिजे असा भारतीय संसदेने कायदा केला आहे की काय? असे प्रश्न टी.व्ही.पेक्षकांना पडावेत इतके वेळा श्री उज्ज्वल निकम हे कॅमेरा समोर येतात आणि आपण एकट्याने कसा `हुश्शारी'ने हा खटला जिंकला किंवा पुढची तारीख घेतली असे सांगतात. यात श्री उज्ज्वल निकम हे हुशार आहेत की नाहीत, सरकारी वकिलांनी टी.व्ही. कॅमेरा समोर यावे की नाही हे मुद्दे नसून... उज्ज्वल निकमांच्या कॅमेरा समोरच्या वक्तव्यांमुळे आणि अविर्भावांमुळे जनसामान्यांच्या मनात न्याय-व्यवस्थेबाबत कोणती प्रतिमा निर्माण होते हा आहे.

२६/११च्या गाजलेल्या खटल्याच्या निकाला नंतर उज्ज्वल निकमांसकट अनेक भारतीयांना आनंद-समाधान वाटणे स्वाभाविक आहे. तसे वाटल्यावर ते व्यक्त करणे ही स्वाभाविकच आहे. तथापि, ते समाधान व्यक्त करताना निकमांच्या शब्दातून, हावभावांतून, अविर्भावांतून `स्वत:चे आत्यंतिक महत्व प्रकट झाल्यास, जनसामान्यांना त्याचे फार वेगळे अर्थ पोहोचतात. ते असे की,

१] श्री.निकम यांच्याखेरीज एकही [लायक] वकील सरकारकडे उपलब्ध नाही.
२] जर निकम आजारी पडले असते किंवा अन्य काही कारणाने उपलब्ध नसते आणि खटला `दुर्दैवाने' दुसऱ्या वकिलाकडे गेला असता तर अखंड भारत हरला असता व कसाब सुटला असता.
३] २६/११ या संपूर्ण खटल्याच्या प्रक्रियेत पुरावे, तपास, कायदे विषयक सल्ला इत्यादी बाबींसाठी निकमांकडे `टीम' किंवा `संघ' किंबहुना कुठलेही सहकारी असे नव्हतेच आणि असलेच तर ते पूर्णत: `निकामी' होते. [तसे सहकारी असते, तर त्यातील एखादा तरी एकदा तरी एखादी तरी किरकोळ माहिती देण्यासाठी तरी कॅमेरा समोर आला असता]
४] ज्या अर्थी श्री निकमांना त्यांची अपरंपार असलेली अक्कल-हुशारी इतकी पणाला लावावी लागते त्या अर्थी असंख्य लोकांना गोळ्या घालून ठार मारणारया गुन्हेगारांना भारतात शिक्षा होणे कठीण आहे. दहशतवादी, खुनी अशा अत्यंत भयानक गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकेल असे कायदे आणि न्याय-व्यवस्थाच भारतात नाही!!
५]पोलिसांपासून न्याय-व्यवस्थे पर्यंत सर्वजणामुळे कसाब निर्दोषच सुटला असता, तर त्याला दोषी ठरवण्यासाठी निकम एकटे [एकहाती] लढत होते. एकंदरीत श्री निकम हे कसाब विरुध्द नव्हे तर मूलत: भारतीय न्यायालय व पोलीस यांच्या विरुध्द लढत होते.

यात शेवटचे दोन मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. जनसामान्यांच्या मनात आपल्या देशाची व न्याय-व्यवस्थेची इतकी वाईट प्रतिमा निर्माण होणे ही बाब देशासाठी विघातक व दूरगामी परिणाम करणारी आहे. २६/११ च्या खटल्याच्या निकालानंतर एका मराठी वाहिनीला निकम यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह मुलाखत दिली!!! त्यात श्री निकम यांचे गुणगान [कुटुंबीय दुसरे काय करणार??] करताना खटल्याच्या निकालासाठी अन्य कोणी दुरान्वये देखील काही काम केल्याचा उल्लेख होत नव्हता व श्री निकम देखील त्यास आक्षेप घेत नव्हते. माझ्या ठिकाणी अन्य कोणीही असता तरी कसाब सुटलाच नसता, असे ते [वरवरच्या विनयाने सुध्दा] म्हणत नव्हते, उलट केवळ त्यांच्या मुळेच कसाबला शिक्षा घडली व अखंड भारत जिंकला असे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या वक्तव्य व हावभावातून प्रतीत होत होते. जणू श्री निकम म्हणजे अखंड भारत!! न्यायालये- पोलीस वगैरे केवळ निमित्तमात्र !! म्हणजे, या खटल्याशी संबंधित पोलिसांपैकी करकरे, साळसकर वगैरे बंदुकीच्या गोळ्यांमुळे गेले.....आणि बाकीचे अनुल्लेखामुळे!!!!

राजकारणी आणि सिनेस्टार यांच्याशी श्री निकम यांचे असलेले दुसरे साम्य देखील महत्वाचे आहे. ते म्हणजे `अपयशा बाबत मौन'!! टी.व्ही.वरील अविर्भाव आणि वक्तव्यांवरून असे श्री निकम यांच्या आयुष्यात एका `केस' ला देखील अपयशाचा धक्का लागलेला नाही असे चित्र निर्माण होते!! मागे एकदा एका गाजलेल्या खून खटल्यात एका संगीतकारावर आरोप ठेवण्यात आला होता. सदर आरोपी भारतातून इंग्लंड मध्ये स्थायिक झाल्यामुळे श्री निकम महोदय अत्यंत `चवताळून'[ निदान हावभावांवरून तसे वाटत होते] टी.व्ही.वर म्हणाले होते की, ``त्याला [आरोपीला] भारतात आणणे अनिवार्य आहे. त्यामुळे मी स्वत:च इंग्लंडला जाऊन तिथल्या कोर्टात उभा राहून युक्तिवाद करणार आहे.'' पुढे निकम यांनी `आरोपीला भारतात घेऊनच येईन' अशी गर्जनाही केली. त्यानंतर श्री.निकम इंग्लंडला गेले आणि.........परत आले........पण नंतर टी.व्ही. समोर ते `केस'च्या निकालाविषयी `खुलाश्याचे' काहीच बोलले नाहीत. बहुदा इंग्लंड मधील कोर्टात `केस'च्या ऐवजी निकमांच्या युक्तिवादाचाच `निकाल' लागला असावा!! [या खटल्यात इंग्लंड कोर्टात युक्तिवादाचे वाभाडे निघाले असे नंतर वाचनी आले.] मुद्दा युक्तिवादाचा किंवा पराभवाचा नसून त्याबद्दल मौन पाळण्याचा, अपयशाबाबत अनुल्लेखाचा आहे.... असे अपयश अनेकदा आले [ आले असणारच] तरी निकमांच्या कौशल्य आणि बुध्दिमत्ते विषयी आदरच राहील. पण ते अपयश मोकळेपणाने कबूल करण्याऐवजी लपवले-झाकले जात असेल तर मात्र बुद्धिमत्ता आणि हेतू या दोनही बाबी शंकास्पद का ठरू नयेत??

निकमांच्या कॅमेरा समोर येण्याच्या संदर्भात आणखी एक वेगळा मुद्दा उपस्थित होतो. त्याच `२६/११'च्या निकालानंतरच्या `कौटुंबिक' मुलाखतीत स्वत: बद्दल बोलताना श्री निकम यांनी अबू सालेम या आरोपीला ``मी `अब्या' म्हणतो'' असे मोठाइकीने सांगितले. त्याला `अब्या' म्हणतेवेळी अबू सालेम हा तुरुंगात होता व स्वत: निकम हे अर्थातच `सरकारी वकील' म्हणून त्याचा जबाब घ्यायला गेले होते, असे निकमांनीच सांगितले. मुळात, ``सरकारी वकिलाने आरोपीचा जबाब `त्याची कोंडी करणारा' मिळवण्यात धन्यता मानावी की आरोपीची वैयक्तिक हेटाळणी करण्यात?'' हा प्रश्न लगेचच मुलाखतकर्त्याने त्यांना विचारावयास हवा होता. ही `सुरस आणि चमत्कारिक' कथा निकमांनी टी.व्ही.वर रंगवून सांगण्याचे प्रयोजनच काय?? गुन्हेगारांबद्दल जनतेमध्ये कमालीची चीड आणि तिडीक असते याचा फायदा घेऊन `स्टंट'बाजीतून लोकप्रियता त्यांना मिळवायची आहे काय?? तसे असेल, तर त्यासाठी त्यांनी शासकीय पद, शासकीय व्यवस्था, न्याय-व्यवस्था,लोकशाही व्यवस्था या सारयांचा व त्या साऱ्यांनी सोपवलेल्या जबाबदारीचा वापर केला असे त्यांना वाटत नाही काय?? असेही प्रश्न पुढे त्यांना विचारावयास हवे होते. तुरुंगात जेरबंद केलेल्या आरोपीचा `जबाब घेताना' सरकारी वकील म्हणून स्वत:च्या दोनही बाजूंना दोन सशस्त्र पोलीस ठेवून त्याला `अब्या' म्हणण्यात काय शौर्य आहे?? त्या ऐवजी निकमांनी कोणतेही सरकारी पद व सुरक्षा न घेता स्वत:च्याच गल्लीतल्या एखाद्या छडमाड गुंडाला जरी हटकले, तरी ते अभिनंदनीय असेल!! ते कसेही असले तरी, अशा फुशारक्या मारून निकम काय साध्य करू पाहताहेत? हा खरा प्रश्न आहे. असे `स्टंट' [करून व] सांगून, फक्त आणि फक्त वैयक्तिक `ग्लेमराइज़ेशन' [ खरे म्हणजे पदाचे `थिल्लराइज़ेशन'] घडू शकेल अन्य काहीही नाही. २६/११ च्या खटल्यां बाबत अशाच एका [अर्थातच] टी,व्ही. वरील मुलाखतीत मुलाखतकर्त्याने निकमांना ``तुम्ही राजकारणात जाणार काय??'' असा प्रश्न विचारला. निकमांकडून त्याचे उत्तर ``मी सरकारी वकील आहे आणि खटल्यांबाबत बोलतोय. हा प्रश्न इथे अप्रस्तुत-गैरलागू आहे'' असे त्यावेळी यायला हवे होते. या ऐवजी निकमांनी ``राजकारणात गौडफादरची आवश्यकता असते, मला मात्र कोणी गौडफादर नाही'' असे उत्तर दिले. हे `वैषम्य-पूर्ण' उत्तर ऐकून आणि त्यांच्या स्वत:च्या तोंडून स्वत:च्याच शौर्याची रसभरीत वर्णने ऐकून श्री. निकम यांची विद्वत्ता, कौशल्य याबाबत आदर असूनही त्यांना `ग्लैमर' आणि [कदाचित] राजकारण यांचा मोह आवरत नसावा अशी शंका येते. अशा मोहाचे भयानक दुष्परिणाम जनमानसावर घडण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारी वकिलांनी प्रसार-माध्यमांना सामोरे जाण्याबाबत `शुचिता' पाळण्या संबंधी संहिता तयार करणे आवश्यक आहे. अन्यथा निकमांची प्रतिमा `उज्ज्वल' होईल पण पोलीस व न्याय-व्यवस्थेची प्रतिमा मात्र `निकम्मी' होईल !!!

लोकेश शेवडे [२१/५/२०१०]