Sunday, September 4, 2011

चांगल्यातून वाईट

बालपणापासूनच नव्हे, तर तान्हेपणापासून आपल्याबद्दल आपले आई-वडील, आप्तेष्ट मंडळी, "आपण कसे असावे" याबाबत काही ना काही सुचवत असतात, सांगत असतात....आणि या ना त्या मार्गाने आपल्या मनावर बिंबवत असतात. अगदी तान्हेपणी कोडकौतुकाने सुरुवात होते..."कित्ती छान", "कित्ती गोड", "किती सुंदर" असे जवळजवळ प्रत्येकच तान्ह्या बाळाला म्हटले जाते. पुढे त्याच्या बाल्यावस्थेत उभे राहण्याचे, चालण्याचे, शब्दोच्चारांचे कौतुक सुरु होऊन आणखी पुढे शाळेत गेल्यावर, हुशारी-चलाखी-चतुराई या बाबींचे गुणगान सुरु होते. तसे नसल्यास भोळेपणाचे, साधेपणाचे, वेंधळेपणाचे देखील कौतुक सुरूच राहते.एकंदरीत, आपण कुठल्या ना कुठल्या किंवा अनेक बाबतीत श्रेष्ठ आहोत असे बहुतांश मुलांच्या मनावर बालपणापूर्वी पासूनच रुजवले जाते. पुढे, स्वत;ला कळायला लागेपर्यंत आणि `अहं'ची जाणीव फुलल्यानंतर स्वत:चे अलगत्व [uniqueness] आणि श्रेष्ठत्व प्रत्येकाच्या मनात खोलवर बिंबले जाते.


स्वत:चे अलगत्व, श्रेष्ठत्व मनात बिंबले जात असतानाच आदर्शवादी कल्पना, व्यक्तिमत्वे इ. बाबी देखील प्रत्येकाच्या मनात घर करून बसू लागतात. संस्कारक्षम वयापासून घडत असलेल्या या साऱ्या प्रकारांतून आणि पुढे निसर्गत: निर्माण होणाऱ्या `अहं'च्या जाणीवेतून "आपण कसे असावे" याबाबत प्रत्येकजण दृढ कल्पना करून बसतो.मग बहुतांश वेळा त्या कल्पनेप्रमाणे वागण्याचा प्रयत्नही करतो.संस्कारक्षम वय संपेपर्यंत प्रत्येकाची "आपण कसेही असलो तरी खूप चांगले आहोत" अशी बालंबाल खात्री पटलेली असते. [चांगले म्हणजे कसे हे अर्थातच प्रत्येकजण आपापल्या मर्जीनेच ठरवतो] आणि या वयापर्यंत आपल्या मनात तयार केलेल्या स्वत:च्या [तथाकथित चांगल्या] आदर्शांच्या जवळपास पोहोचण्याची धडपडही सुरु झालेली असते.


तथापि, श्रेष्ठत्व-अलगत्व, चांगुलपणा आणि आदर्शांनी भारलेल्या स्वत:च्या काल्पनिक-आदर्श व्यक्तिमत्व हे अर्थातच हुशार,कला-क्रीडा संपन्न, न्यायी,कनवाळू, प्रेमळ, चपळ, बलाढ्य, निर्दोष वगैरे वगैरे अनेक अथवा एखाद्या प्रकारात मोडणारे असते आणि त्यात वासना, स्वार्थ, मोह, लोभ, मत्सर यांचा लवलेशही नसतो. प्रत्यक्षात मात्र, गुण असतीलच असे नाही, पण दुर्गुण मानले जाणाऱ्या सर्व वासना व स्वार्थ हे मात्र निसर्गदत्त असल्यामुळे खचितपणे प्रत्येक व्यक्तीत असतातच. त्यामुळे जडणघडण होत असल्यापासूनच प्रत्येकाचे स्वत:चे खरे स्वरूप आणि आदर्श [काल्पनिक] स्वरूप यांच्यात प्रचंड तफावत निर्माण होऊ लागते.`मी'चा अर्थ उमगू लागेपर्यंत प्रत्येकजण स्वत:च्या आदर्श स्वरूपाच्या इतक्या प्रेमात पडलेला असतो आणि प्रत्येकाच्या मनावर स्वत:चे आदर्श स्वरूप इतके खोलवर बिंबले गेले असते की ते `आदर्श'स्वरूप म्हणजेच `मी' असे त्याला वाटू लागते. इतकेच नव्हे, जगाने देखील आपल्याला ते `आदर्श'स्वरूपच मानावे यासाठी तो धडपड करू लागतो.


थोडक्यात, कळत्या वयात येईपर्यंत प्रत्येकजण जगासमोर आपापल्या आदर्शांनुसार स्वत:ची प्रतिमा उभी करतो आणि जगापैकी कोणाचेही आपल्याकडे लक्ष असल्याचे जाणवेल तेंव्हा लक्ष देणाऱ्यावर आपली `ती' प्रतिमा ठसावी असा आटोकाट प्रयत्न करू लागतो. अर्थात, या वयापर्यंत प्रत्येकाला आपण आपल्या आदर्शवत असल्याची इतकी पक्की खात्री झालेली असते की हे सारे प्रयत्न त्याच्या स्वत:च्या अगदी नकळत घडत राहतात. म्हणून, `मी' जगाशी संभाषण करीत नसून `माझी प्रतिमा' करते आहे, तसेच, जग मला ओळखत नसून `माझ्या प्रतिमेला' ओळखते आहे, हे वास्तव कोणाला उमगतच नाही.


मागील शतकात भारतात एक राजा होऊन गेला. हा राजा एकाक्ष होता व त्याच्या गेलेल्या डोळ्याच्या आजूबाजूची त्वचा देखील खराब झालेली होती. या राजाने स्वत:ची जी काही अनेक तैलचित्रे काढून घेतली, ती सारी profile, म्हणजे चेहऱ्याची एकच बाजू दिसेल अशी काढून घेतली....जेणे करून तैलचित्र पाहणाऱ्याला त्याचा फुटका डोळा दिसूच नये. शारीर व्यंगाबाबत त्या राजाने जे केले, तेच प्रत्येकजण स्वत:च्या एकंदर व्यक्तिमत्वाबाबत करत असतो . फरक फक्त इतकाच असतो की शारीर व्यंगाबाबत राजा जे करत होता [किंवा, अन्य लोकही जे आपापल्या शारीर व्यंगाबाबत करतात] ते जाणीवत: केले जात होते....आपल्या एकंदर व्यक्तिमत्वाबाबत मात्र बहुतांश वेळा प्रत्येकजण ते नकळत करत असतो.कुणीतरी म्हटलंय, "आपल्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे हे कळून जे वर्तन केले जाते, ते `व्यक्तिमत्व'....व आपल्याकडे कोणाचेही लक्ष नाही हे ठाऊक असूनही जे वर्तन घडते ते `चारित्र्य'!!! प्रत्येकजण आपले `चारित्र्य' कसेही असले तरी आपले `व्यक्तिमत्व' मात्र अत्यंत चांगले साकारण्याचा प्रयत्न करत असतो. यात लक्षात घेण्यासारखी मेख अशी आहे की, `व्यक्तिमत्व' किंवा `प्रतिमा' साकारावी लागते , त्यासाठी प्रयत्न करावे लागतात...याउलट `चारित्र्य' हे घडते !! त्यासाठी वेगळे काहीही करावे लागत नाही.


एकंदर स्वत:ला चांगले [आदर्श] मानण्याच्या प्रक्रियेत प्रत्येकजण स्वत:च्या प्रतिमेलाच खरे मानू लागतो व आपण खरोखरचे कसे आहोत याकडे पूर्णत: दुर्लक्ष होते. या प्रक्रियेत प्रत्येकाला आपापल्या प्रतिमेची इतकी सवय होऊन जाते कि, वास्तवातल्या[अस्सल] त्याला `स्वत:'ला जगच नव्हे तर तो स्वत:ही पाहू शकत नाही.एखाद्याला अपघाताने,चुकून कधी खऱ्या[अस्सल] `स्वत:'चे दर्शन घडलेच, तरी तो "तो मी नव्हेच" असा विश्वामित्री पवित्रा घेतो. उदा. एखाद्याला नशिबाने काही काळ लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली....नंतर ऊर्वरित आयुष्यभर कमी पगाराच्याच नोकऱ्या मिळाल्या तरी "आपली पात्रताच कदाचित कमी पगाराची असावी" हे मान्य करणे तर सोडा तसा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. "खरं तर मला अमुक-अमुक इतका मोठ्ठा पगार होता....पण दुर्दैवानं आता कोणालाही चागल्या माणसांची कदर राहिली नाही, म्हणून मला हल्ली कमी पगारावर काम करावं लागतंय..." असे तो आयुष्यभर जगाला सांगत राहतो. पण हे केवळ जगाला सांगण्यापुरते मर्यादित नसून त्याला तसेच मनापासून वाटत असते...ही गोम आहे. आयुष्यभर मिळणारा कमी पगार ...आपल्या कुवतीला अनुसरून होता...तोच आपला खरा चेहरा आहे... असे त्याला अजिबातच वाटत नाही ....कधीतरी, अल्पकाळ मिळालेला लठ्ठ पगार हाच आपला खरा चेहरा-खरी कुवत भासते. लठ्ठ पगाराच्या काळाचे `प्रोफाईल' [ profile] हाच त्याला आपला संपूर्ण चेहरा वाटतो. प्रदीर्घ काळ लठ्ठ मिळकत असणाऱ्याबद्दल तर काय सांगावे????? त्यांना तर ती मिळकत हा आपल्या खऱ्या कुवतीचा-खऱ्या चेहऱ्याचा भक्कम पुरावा...आरसाच वाटतो. उच्चपदस्थ-यशस्वी व्यक्तींना त्यांच्या चलतीच्या काळात मिळालेले सत्कार, लाभलेल्या प्रतिष्ठितांच्या ओळखी, लोकांनी दाखवलेली आपुलकी..... सुंदर-आकर्षक दिसणाऱ्याना, भिन्न लिंगीयांनी वाहिलेली स्तुतिसुमने, त्यांना वश करण्यासाठी केलेली धडपड या बाबी आपल्याला आपल्या `चांगुलपणा'मुळेच अनुभवास येत आहेत असे मनोमन वाटत असते. आपले पद, यश,सौंदर्य हे फारफार तर आपले `प्रोफाईल'[profile] आहे...आपला खरा आणि संपूर्ण चेहरा नव्हे हे त्यांना उमगतच नाही. इतर प्रत्येकाबाबत अगदी कसून परीक्षण व चिकित्सा करू शकणाऱ्या प्रथितयश, प्रतिष्ठित व्यक्ती स्वत:बाबत मात्र चिकित्सा करू शकत नाहीत व आपला खरा चेहरा पाहूच शकत नाहीत. ही बाब केवळ उच्चपदस्थ, श्रीमंत, यशस्वी व देखण्या व्यक्तींनाच लागू आहे असे तर सरसकट सर्वांनाच लागू आहे. फरक फार तर इतकाच असतो की जितक्या जास्त लोकांशी संबंध येतो, तितक्या जास्त प्रकारची `प्रोफाईल्स' [profiles] व तितक्या रंगांचे मेक-अप [make-up] केलेली `प्रोफाईल्स' [profiles] घेऊन प्रत्येकजण जगात वावरत असतो.आणि या सर्वांमध्ये साम्य असे आहे की, राजाने जसा आपल्या चेहऱ्यातील गेलेला डोळा व खराब त्वचेचा भाग नाकारला, तद्वतच प्रत्येकजण आपापल्या एकूण व्यक्तिमत्वातील खरा भागच नाकारत राहतो.


स्वत:ला `चांगला' मानण्याच्या प्रक्रियेत सर्वात मोठा धोका असतो तो सवयीतून पुढची पायरी गाठण्याचा!!! पहिली सिगारेट ओढताना ठसका लागलेला माणूस...थोड्याच काळात रोज एखाद-दोन सिगारेटी ओढू लागतो....मग दिवसाला चार-पाच ओढायला लागतो...मग पुढे ते कमी पडायला लागते म्हणून दिवसागणिक सिगारेटी वाढत जाऊन रोज एक-दोन पाकिटे सिगारेट ओढणारा `रेग्युलर स्मोकर' [regular smoker] बनतो....त्यानंतर त्याला सिगारेट सोडणेच अशक्यप्राय होते....सिगारेटशिवाय आयुष्य काढणे तर सोडा, एक दिवस...एक तासही काढणे असह्य होते. तशीच अवस्था `प्रोफाईल्स' घेऊन जगणाऱ्या- `मेक-अप' करून वावरणाऱ्या व्यक्तींचीही होते. पहिल्या `मेक-अप'ची त्याला आणि जगाला सवय झाली की तो त्यावर अधिक आकर्षक `मेक-अप'चा आणखी एक थर चढवतो.......अशी आयुष्यभर वेळोवेळी नवनवीन `मेक-अप'ची पुटे चढवत प्रत्येकजण जगात राहतो. साहजिकच, जितके वय, यश किंवा प्रतिष्ठा अधिक, तितकी `मेक-अप'ची पुटे जास्त!! याचा अर्थ अयशस्वी-अप्रतीष्ठीतांच्या चेहऱ्यावर `मेक-अप' नसतो असे नव्हे. फार तर त्या `मेक-अप'चा थर जरासा पातळ असतो किंवा पुटे कमी असतात. त्याचे कारणही साधेपणा-प्रांजळपणा नसून नवनवीन पुटे देण्यासाठी हुशारी व साधने कमी पडलेली असतात हे आहे.


स्वत:च्या चेहऱ्याला-`प्रोफाईल'ला `मेक-अप' करण्यासाठी जी प्रसाधने [कॉस्मेटिक्स] वापरली जातात, त्यात सर्वात महत्वाचे आणि सर्वात प्रचलित असलेले प्रसाधन `तात्विक समर्थन' [logical justification] हे आहे. शारीर चेहऱ्यावरील खड्डे व मुरुमांसाठी जसे `फौंडेशन' वापरले जाते, तसेच व्यक्तिमत्वाच्या चेहऱ्यावरील गैर-अनैतिक वर्तनाला तात्विक समर्थनांचा [logical justifications] लेप प्रत्येकजण लावत असतो. भावनात्मक दुखापत, अस्मितेला ठेच, अपमान वगैरेचा सूड किंवा व्यावहारिक चतुराई इत्यादी समर्थने लोक आपापल्या गैरकृत्यांना अगदी सहजगत्या देतात. "सगळेच पैसे खातात, आपण न खाल्ल्याने काय होणाराय?", "हल्ली प्रामाणिक राहून चालत नाही बाबा, लोक गैरफायदा घेतात", "आपण चांगल्याशी चांगले आणि वाईताशी वाईट आहोत!!! का S S य?" "वेळ प्रसंग पाहून कधीकधी खोटं बोलणं अपरिहार्य आहे!" "त्याने `तसे' केले तेंव्हा चालले, तर मग मी `असे' केले तर चुक काय??" अशा प्रकारची मल्लीनाथी वाक्ये फेकून विजयी मुद्रेने बहुतांश लोक फिरत असतात. अशा `लॉंजिक्स'नी चेहऱ्यावरचे व्रण - खड्डे बुजवून सगळेच स्वत:शी पूर्णत: तृप्त होतात. ती वाक्ये ऐकणारेही तसाच `मेक-अप' करून वावरत असल्यामुळे त्यांनाही अशा समर्थनांच्या `मेक-अप'वर काहीही आक्षेप नसतो.उलट त्यांनाही आपल्यासारखाच एक `सम-दु:खी'[???] सापडल्याचा आनंद होतो. एकंदरीत, खरा चेहरा कोणालाही शोधावासा वाटतच नाही.


वस्तुत: कोणाचाही खरा चेहरा हा कुरूपच असतो का?? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच `नाही' असेच आहे. कोणतीही `खरी' गोष्ट ही `सुंदर किंवा कुरूप' असतच नाही, ती केवळ `अस्सल किंवा नैसर्गिक' असते. परंतु, आपल्या `खऱ्या किंवा अस्सल स्वत:'पेक्षा वेगळा `आदर्श स्वत:' बनवल्यावर त्या `मेड-अप' आदर्शापुढे खरा चेहरा साहजिकच निस्तेज-फिकट आणि खडबडीत भासू लागतो. आणि जितकी `मेक-अप'ची पुटे जास्त तितका खरा चेहरा नकोसा वाटू लागतो. एव्हढेच नव्हे, तर खरा चेहरा पूर्ण `मेड-अप' व्हावा व तेजस्वी दिसावा म्हणून प्रत्येकजण संपादित-विपर्यस्त-काल्पनिक व खोट्या माहितीचा आधार घेऊ लागतो. मग अपरिहार्यपणे आपला खोटेपणा इतरांना कळू नये म्हणून मोकळेपणा-सहज-साधेपणा टाकून देऊन अपारदर्शक बनून स्वत:भोवती [ दोष, अपयश व कमकुवत पानाभोवती ] गुप्ततेचे कडेकोट कुंपण घालून घेतो ...आणि हळूहळू बंदिस्त-हिणकस आयुष्य स्वीकारतो. यानंतर अर्थातच, आपला खोटेपणा उघडकीस येण्याची धास्ती प्रत्येकाला वाटणे क्रमप्राप्तच ठरते. ...परिणामत: आधीचा खोटेपणा प्रगट होऊ नये म्हणून अधिक खोटेपणा- अधिक बंदिस्तपणा करण्याचे दुष्टचक्र सुरु होते. या साऱ्यासाठी नवनवीन युक्त्यांची व समर्थने-साधनांची निकड प्रत्येकाला सातत्याने भेडसावू लागते. अनेकदा ही धास्ती दूर करण्यासाठी आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडणे, दुसऱ्यांचे श्रेय नाकारणे- ते आपण लाटणे अशा किंवा अन्य हिंसा करणे देखील भाग पडते.

मोकळ्या हवेतील छोट्या रोपांना जर सतत झाकून-बंदिस्त ठेवले तर त्या रोपांची पाने-फुले पिवळी पडतात व रोगट होतात. तद्वतच, सतत अपारदर्शक-बंदिस्त राहण्याने अशा `मेड-अप' माणसांचा मूळचा साधा-नैसर्गिक चेहरा सुरकुतू लागतो...त्यांचे मन रोगट बनते. एकंदरीत, मुळातला नैसर्गिक-अस्सल-साधा चेहरा कालानुक्रमे, यशानुक्रमे व प्रतीष्ठानुक्रमे सुरकतत-मुरुमाळत जातो. मूळचा सहज-साधा-मोकळा स्वभाव अधिकाधिक अनैतिक-लबाड बनत जातो. त्यानंतर मात्र स्वत:चा चेहरा पाहणे म्हणजे खरोखरच अत्यंत कुरूप-खडबडीत-मुरुमाळ असा भयप्रद चेहरा पाहणे ठरते....जे कोणालाही स्वत:ला सहन होणे अशक्य आहे. आपण असे विद्रूप आहोत हे मान्य करणे प्रत्येकास इतके असह्य होते की, आपला खरा चेहरा ज्यात दिसेल ते आरसेच ते फोडतात.....किंवा शोक-विव्हल होऊन स्वत: भग्न होतात. स्वत:चा खरा चेहरा पाहिल्यानंतरच्या या दोनही प्रतिक्रिया हिंसात्माक्च आहेत. या प्रतिक्रियांमधून साध्य काहीच होत नाही....उलट स्वत:शी किंवा दार्शनिकाशी हिंसा करण्याचे आणखी एक पातक त्याच्या नावे जमा होते.


आपल्या मनाचा रोग किंवा चेहऱ्याचे विद्रूपत्व घालवण्यासाठी सर्वप्रथम...आपले मन किंवा चेहरा रोगट-विद्रूप झाले आहे हे स्वत: जाणवणे-उमगणे आवश्यक आहे. तसे झाले तरच त्यावर उपाय करावासा वाटेल व करता येईल. तथापि, तसे जाणवल्याबरोबर स्वत :ची घृणा वाटण्याचा, आरसा फोडावासा वाटण्याचा किंवा स्वत: शोकमग्न होऊन खचण्याचा धोका आहे.....व तशा कोणत्याही परिणामाने स्वत:ला पाहण्याची प्रक्रियाच थांबेल....ज्यामुळे उपाय सापडण्याची शक्यताच नष्ट होईल.


म्हणून स्वत:चा खरा चेहरा पाहण्याआधी हे नीट समजून घेतले पाहिजे की "स्वत:चा खरा चेहरा पाहायला मिळणे हा अत्यंत दुर्मिळ व अपूर्व योगायोग आहे!!" चेहरा कसाही असला तरी चालेल...कारण सर्वांच्याच चेहऱ्याला व्रण असतातच..सर्वांचेच चेहरे थोडे ना थोडे विद्रूप असतातच!!
महत्व तो चेहरा पाहायला मिळण्याला आहे...कारण स्वत:चा चेहरा पाहण्याचे भाग्य फारच कमी लोकांना लाभते. आपले विद्रूपत्व जाणवण्याचा क्षण अत्यंत आनंददायी आहे, कारण सुंदर बनण्याच्या वाटचालीतले ते पहिले पाउल आहे!!!!!!!




१६/०९/२००३ [२१:४५]

Sunday, April 17, 2011

`श्रेय'खंड आणि केक

`श्रेय'खंड आणि केक

काही करायचे म्हटले की `काय', कसे, किती, केंव्हा आणि कुठे असे अनेक प्रकारचे प्रश्न पडतात आणि पडत...राहतात. परंतु, एखाद्या शहराचा विकास किंवा त्या शहराचे तत्सम `काहीही' करायचे झाल्यास `काय, कसे' वगैरे हे प्रश्न फारच दुय्यम ठरतात आणि पहिला आणि एकमेव प्रश्न पडतो. ...तो म्हणजे `कोणी'????

नाशिकच नव्हे, तर कोणत्याही शहराचा, भागाचा, प्रांताचा `विकासा'च्या मुद्द्यावर कधीच फारसे मतभेद होत नाहीत. विकास व्हायला हवा या बाबत तर अगदी घट्ट एकमतच असते, पण, काय-कसा वगैरे तपशिला बाबतही म्हणजे, अग्रक्रमाच्या बाबत थोड्या-बहुत फरकाने सर्वाना सर्व बाबी मंजूर असतात. रस्त्यांचे रुंदीकरण,फुटपाथ,सुशोभीकरण,सिग्नल्स, दुतर्फा झाडे इ.इ. पासून शाळा, खेळाची मैदाने,जॉगिंग ट्रक,स्टेडीअम, बगीचे, तरण-तलाव..अगदी शेवटी....स्मशाने.. या सा-यापर्यंत कोणीच काही अमान्य करत नाही. एकाच मुद्द्यावर चर्चा येऊन अडकते, ती म्हणजे...समजा, हा विकास झालाच... तर तो `कोणी' केला? अर्थात.....त्याचे श्रेय कोणाला जाईल??? आणि मग...त्या ठिकाणीच घोडे असे काही अडते...की, ते नंतर उठतच नाही. कारण त्या श्रेयावर डोळा नगरसेवकांपासून, महापौर, आमदार, खासदार ...अगदी मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाचा असतो. हे श्रेय मिळवण्यासाठी लोक-प्रतिनिधींमध्ये इतकी जीवघेणी चुरस असते की, श्रेय आपल्याला मिळणार नसेल तर तो विकास `होऊच नये' यासाठी ते आटापिटा करतात. आणि मग बहुतांश विकास-प्रकल्प खोळंबून राहतात. लोक-प्रतिनिधी तसे का करतात, ते उघड आहे. त्या श्रेयाच्या आधारावरच पुढच्या वेळी जनता त्याना निवडून देत असते आणि पुन्हा पुढची पाच वर्षे त्यांना बिन-बोभाट `सर्व काही' मिळणार असते.

तथापि, विकासाच्या संदर्भात दोन महत्वाच्या बाबी दुर्लक्षिल्या जात आहेत. विकास खोळंबण्यामागे स्थानिक तपशीलातील चुका, नोकरशाहीची लाल-फीत,जमिनी, कायद्यांची गुंतागुंत, भ्रष्टाचार वगैरे ही कारणे आहेतच. परंतु `श्रेया'वरून अडवणूक ही एक अतिरिक्त व गंभीर असूनही जनतेकडून दुर्लक्षिली गेलेली बाब आहे. `श्रेया'चा ताबा ही भारतातील विकासाला लागलेली कीड आहे. तरीही, भ्रष्टाचार, लाल-फितीचा कारभार याबाबत जागरूक असणारे विचारवंत व जनसामान्य `श्रेया' बाबत गप्प बसतात. भूखंडाचे `श्रीखंड' असे मथळे देणारे आणि वाचणारे दोनही जण `श्रेय'खंडा बाबत चिडीचूप का ? ही एक महत्वाची बाब. दुसरे म्हणजे विकास म्हणजे रस्ते-मैदाने-तलाव-शाळा हे जसे आवश्यक आहे तसेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त या `विकसित' भागात निर्माण होणारी घाण-कचरा-मलनि:सारण यांची विल्हेवाट आवश्यक आहे. शहर असो की खेडे, जनता वसतीस आल्यावर चांगले काही करतील की नाही यावर अनेक शक्या-शक्यता असतील मात्र ही जनता `घाण आणि कचरा' करणारच आणि करतच राहणार हे मात्र अनिवार्य आहे. असे असूनही नाशिकच नव्हे तर, अगदी मोठ-मोठ्या शहरांमध्ये मैदाने-तरणतलाव-बगीचे इ. गोष्टी विकसित होऊन ५०-५० वर्षे लोटली आहेत आणि कचरा-मलनि:सारण यांची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प मात्र अद्याप आलेले नाहीत. ड्रेनेज तर कोणत्याही प्रक्रियेशिवाय नदीत सोडले जाते!!

या दोन महत्वाच्या बाबींकडे तमाम जनतेचे दुर्लक्ष...हा परिणाम, भारतीय मानसिकतेचा असावा. आपण ज्याला लोकशाही म्हणतो व ती आपल्याकडे रुजली आहे असेही म्हणतो, ती वास्तवात `लोकशाही' नसून पूर्णत: `लोक-प्रतिनिधी'शाही आहे. संपूर्ण देशभर त्या-त्या ठिकाणचे लोक-प्रतिनिधी हे जहागीरदार किंवा राजे असल्यासारखे वागतात आणि जनताही लोकप्रतिनिधींना `राज्यकर्ते' मानते. अनेकजण तर या व्यवस्थेचे समर्थनच करतात. `अमुक-अमुक' नेत्याने भ्रष्टाचार केला तर काय झाले?? त्याने आमच्या भागाचा `विकास केला आहे ना?' असे समर्थन देऊन त्या नेत्याची भलावण करतात. वरून ``भ्रष्टाचार काय सगळेच करतात!'' अशी पुष्टीदेखील जोडतात. ब्रिटीश भारतात येऊन-जाई पर्यंत भारतात हजारो वर्षे लहान-लहान राजे, जहागीरदार राज्य करीत आणि जनता त्यांचे लांगुल-चालन करीत, त्यांच्या चित्र-विचित्र `इच्छा' पुरवीत आपापला `विकास' साधत असे. यानंतर आपल्याकडे तथाकथित लोकशाही आली....इतकी वर्षे उलटून गेल्यावरही आपण त्याच सरंजामशाहीतून बाहेर आलेलो नाही एवढाच या पहिल्या बाबीचा अर्थ. दुसरी बाब देखील आपल्या मानसिकतेचे द्योतकच आहे. कर्जबाजारी झाले तरी धाम-धूमीत लग्न साजरे करायचे अशी भारतीयांची वृत्ती आहे, [पेशवाई मोडकळीला आली तरी साजूक तुपाच्या लाडवांच्या जेवणावळी चालूच होत्या!] त्याच वृत्तीने घाण-कचरा निर्मूलनाची व विल्हेवाटीची व्यवस्था नाही आणि बाग-बगीचे, जॉगिंग ट्रक मात्र आहेत अशी शहरे असण्यात आश्चर्य काय??? `केक' या पदार्थावर सुशोभीकरणासाठी `आईसिंग' करण्यात येते. `आईसिंग'चा थर दिल्यावर मात्र आत केक आहे की अन्य काही, ते काहीच समजून येत नाही. कचरा व मलनि:सारण विल्हेवाटीची [ड्रेनेज-ट्रीटमेंट] व्यवस्था नसताना बगीचे व तरण तलाव यांना `विकास' म्हणणे म्हणजे `आईसिंग' केलेल्या शेणाला `केक' म्हणण्या सारखे आहे!!!!

`श्रेय'खंड आणि `केक' हे दोनही पदार्थ नाशिकला उपलब्ध आहेत का हे आपले आपणच पाहिलेले बरे !!

लोकेश शेवडे १७/४/२०११