Sunday, April 17, 2011

`श्रेय'खंड आणि केक

`श्रेय'खंड आणि केक

काही करायचे म्हटले की `काय', कसे, किती, केंव्हा आणि कुठे असे अनेक प्रकारचे प्रश्न पडतात आणि पडत...राहतात. परंतु, एखाद्या शहराचा विकास किंवा त्या शहराचे तत्सम `काहीही' करायचे झाल्यास `काय, कसे' वगैरे हे प्रश्न फारच दुय्यम ठरतात आणि पहिला आणि एकमेव प्रश्न पडतो. ...तो म्हणजे `कोणी'????

नाशिकच नव्हे, तर कोणत्याही शहराचा, भागाचा, प्रांताचा `विकासा'च्या मुद्द्यावर कधीच फारसे मतभेद होत नाहीत. विकास व्हायला हवा या बाबत तर अगदी घट्ट एकमतच असते, पण, काय-कसा वगैरे तपशिला बाबतही म्हणजे, अग्रक्रमाच्या बाबत थोड्या-बहुत फरकाने सर्वाना सर्व बाबी मंजूर असतात. रस्त्यांचे रुंदीकरण,फुटपाथ,सुशोभीकरण,सिग्नल्स, दुतर्फा झाडे इ.इ. पासून शाळा, खेळाची मैदाने,जॉगिंग ट्रक,स्टेडीअम, बगीचे, तरण-तलाव..अगदी शेवटी....स्मशाने.. या सा-यापर्यंत कोणीच काही अमान्य करत नाही. एकाच मुद्द्यावर चर्चा येऊन अडकते, ती म्हणजे...समजा, हा विकास झालाच... तर तो `कोणी' केला? अर्थात.....त्याचे श्रेय कोणाला जाईल??? आणि मग...त्या ठिकाणीच घोडे असे काही अडते...की, ते नंतर उठतच नाही. कारण त्या श्रेयावर डोळा नगरसेवकांपासून, महापौर, आमदार, खासदार ...अगदी मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाचा असतो. हे श्रेय मिळवण्यासाठी लोक-प्रतिनिधींमध्ये इतकी जीवघेणी चुरस असते की, श्रेय आपल्याला मिळणार नसेल तर तो विकास `होऊच नये' यासाठी ते आटापिटा करतात. आणि मग बहुतांश विकास-प्रकल्प खोळंबून राहतात. लोक-प्रतिनिधी तसे का करतात, ते उघड आहे. त्या श्रेयाच्या आधारावरच पुढच्या वेळी जनता त्याना निवडून देत असते आणि पुन्हा पुढची पाच वर्षे त्यांना बिन-बोभाट `सर्व काही' मिळणार असते.

तथापि, विकासाच्या संदर्भात दोन महत्वाच्या बाबी दुर्लक्षिल्या जात आहेत. विकास खोळंबण्यामागे स्थानिक तपशीलातील चुका, नोकरशाहीची लाल-फीत,जमिनी, कायद्यांची गुंतागुंत, भ्रष्टाचार वगैरे ही कारणे आहेतच. परंतु `श्रेया'वरून अडवणूक ही एक अतिरिक्त व गंभीर असूनही जनतेकडून दुर्लक्षिली गेलेली बाब आहे. `श्रेया'चा ताबा ही भारतातील विकासाला लागलेली कीड आहे. तरीही, भ्रष्टाचार, लाल-फितीचा कारभार याबाबत जागरूक असणारे विचारवंत व जनसामान्य `श्रेया' बाबत गप्प बसतात. भूखंडाचे `श्रीखंड' असे मथळे देणारे आणि वाचणारे दोनही जण `श्रेय'खंडा बाबत चिडीचूप का ? ही एक महत्वाची बाब. दुसरे म्हणजे विकास म्हणजे रस्ते-मैदाने-तलाव-शाळा हे जसे आवश्यक आहे तसेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त या `विकसित' भागात निर्माण होणारी घाण-कचरा-मलनि:सारण यांची विल्हेवाट आवश्यक आहे. शहर असो की खेडे, जनता वसतीस आल्यावर चांगले काही करतील की नाही यावर अनेक शक्या-शक्यता असतील मात्र ही जनता `घाण आणि कचरा' करणारच आणि करतच राहणार हे मात्र अनिवार्य आहे. असे असूनही नाशिकच नव्हे तर, अगदी मोठ-मोठ्या शहरांमध्ये मैदाने-तरणतलाव-बगीचे इ. गोष्टी विकसित होऊन ५०-५० वर्षे लोटली आहेत आणि कचरा-मलनि:सारण यांची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प मात्र अद्याप आलेले नाहीत. ड्रेनेज तर कोणत्याही प्रक्रियेशिवाय नदीत सोडले जाते!!

या दोन महत्वाच्या बाबींकडे तमाम जनतेचे दुर्लक्ष...हा परिणाम, भारतीय मानसिकतेचा असावा. आपण ज्याला लोकशाही म्हणतो व ती आपल्याकडे रुजली आहे असेही म्हणतो, ती वास्तवात `लोकशाही' नसून पूर्णत: `लोक-प्रतिनिधी'शाही आहे. संपूर्ण देशभर त्या-त्या ठिकाणचे लोक-प्रतिनिधी हे जहागीरदार किंवा राजे असल्यासारखे वागतात आणि जनताही लोकप्रतिनिधींना `राज्यकर्ते' मानते. अनेकजण तर या व्यवस्थेचे समर्थनच करतात. `अमुक-अमुक' नेत्याने भ्रष्टाचार केला तर काय झाले?? त्याने आमच्या भागाचा `विकास केला आहे ना?' असे समर्थन देऊन त्या नेत्याची भलावण करतात. वरून ``भ्रष्टाचार काय सगळेच करतात!'' अशी पुष्टीदेखील जोडतात. ब्रिटीश भारतात येऊन-जाई पर्यंत भारतात हजारो वर्षे लहान-लहान राजे, जहागीरदार राज्य करीत आणि जनता त्यांचे लांगुल-चालन करीत, त्यांच्या चित्र-विचित्र `इच्छा' पुरवीत आपापला `विकास' साधत असे. यानंतर आपल्याकडे तथाकथित लोकशाही आली....इतकी वर्षे उलटून गेल्यावरही आपण त्याच सरंजामशाहीतून बाहेर आलेलो नाही एवढाच या पहिल्या बाबीचा अर्थ. दुसरी बाब देखील आपल्या मानसिकतेचे द्योतकच आहे. कर्जबाजारी झाले तरी धाम-धूमीत लग्न साजरे करायचे अशी भारतीयांची वृत्ती आहे, [पेशवाई मोडकळीला आली तरी साजूक तुपाच्या लाडवांच्या जेवणावळी चालूच होत्या!] त्याच वृत्तीने घाण-कचरा निर्मूलनाची व विल्हेवाटीची व्यवस्था नाही आणि बाग-बगीचे, जॉगिंग ट्रक मात्र आहेत अशी शहरे असण्यात आश्चर्य काय??? `केक' या पदार्थावर सुशोभीकरणासाठी `आईसिंग' करण्यात येते. `आईसिंग'चा थर दिल्यावर मात्र आत केक आहे की अन्य काही, ते काहीच समजून येत नाही. कचरा व मलनि:सारण विल्हेवाटीची [ड्रेनेज-ट्रीटमेंट] व्यवस्था नसताना बगीचे व तरण तलाव यांना `विकास' म्हणणे म्हणजे `आईसिंग' केलेल्या शेणाला `केक' म्हणण्या सारखे आहे!!!!

`श्रेय'खंड आणि `केक' हे दोनही पदार्थ नाशिकला उपलब्ध आहेत का हे आपले आपणच पाहिलेले बरे !!

लोकेश शेवडे १७/४/२०११