Friday, August 9, 2013

किसीको `मत' देना

             किसीको `मत' देना
 
 'तू मतदान केले नाहीस ना?? मग तुला राजकारणावर बोलायचा काही हक्कच नाही!!" हे वाक्य आयुष्यात मी इतक्या वेळेला ऐकले आहे की त्यापेक्षा भारतातील मतदारांची संख्या  देखील कमी असेल. खरे तर हे वाक्य ज्याने मतदान केले त्याला ऐकवणे संयुक्तिक ठरेल. "मत देण्याचा हक्क तू एकदा बजावलास ना? मग, आता पुन्हा पुन्हा राजकारणावर मत द्यायचा, बोलायचा तुला हक्क नाही. तू मत दिलेस आणि त्या दिलेल्या मतदानानुसार चाललेले राजकारण सध्या तुझ्यासकट आम्हाला भोगावे लागत आहे. मग आता त्यावरच पुन्हा पुन्हा तुझे मत ऐकवून आम्हाला का गांजवतोस?" असे म्हणणे जास्त तर्कशुध्द ठरेल. पण घडते उलटेच!
एकूणच  राजकारणावर चर्चा सुरु झाली की बहुतांश भारतीय चवताळल्यासारखेच होतात! त्यात त्यांना `मी  मतदान करत नाही' असे सांगितले की ते माझ्यावरच खवळतात. मला तर त्यांच्या खवळण्याचे
    कारणदेखील कळत नाही. म्हणून त्याचे कारण विचारले तर ते आणखी बिथरतात!!  आणि `मतदान  मी         कशासाठी करायचं?' या माझ्या प्रश्नावर तर त्यांचा भडकाच उडतो.
 
असंच एकदा एका सामाजिक बांधिलकीची लागण झालेल्या एका अभिनेत्या मित्राला भेटलो. मी त्याला  माझा मतदानाचा प्रश्न आणि खवळण्याचं कारण विचारलं, तर तो समोरचा ग्लास उचलून एका दमात रिकामा करत म्हणाला,        
"तुमच्यासारखे लोक मत देत नाहीत ना.... म्हणून देशावर अशी परिस्थिती आलीय!!"
"अशी परिस्थिती म्हणजे नेमकी कशी?" तो सिनेमा नट असल्यामुळे त्याची स्वत:ची सामाजिक-आर्थिक  परिस्थिती अगदी ढिंग- च्यांग होती. त्यामुळे त्याची तक्रार नेमक्या कुठल्या परिस्थितीबाबत आहे ते विचारून  घेतलं. त्यावर  तोंड वाकडं करून नापसंती दाखवत, त्यानं आणखी एक ग्लास भरला.
"एकंदरच देशाची परिस्थिती!! काय चांगलं आहे इथे?? साधं विचारस्वातंत्र्य, आविष्कारस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य देखील नाही!" तो घोटागणिक  एकेक शब्द ठासून बोलायला लागला,
"पण या परिस्थितीचा आणि  मी मत न देण्याचा काय संबंध?" मी लोकप्रतिनिधी किंवा सरकारी अधिकारी  नसूनही या परिस्थितीचे खापर तो माझ्यावर का फोडतोय ते मला कळेना. 
"तुझ्यासारखे लोक मतदान करत नाहीत त्यामुळे हे असले xxxxx लोक निवडून येतात …आणि म्हणून ही परिस्थिती  ओढवली….कळलं??" आता त्यानं आवाज खर्जात लावून, तोंड विस्फारत बोलायला  सुरुवात केली.    
"अरे, पण मत मिळाल्यामुळे उमेदवार निवडून येतात. मत न दिल्यामुळे कसा कोणी निवडून येईल??"
"वाट्टेल ते बोलू नकोस….सगळ्या मतदारांनी मतदान केलं ना की या xxxxx उमेदवारांना घरी बसायची  पाळी येईल. ही परिस्थिती बदलायची असेल तर,…मतदानाची सक्ती करायला हवी!!"
"म्हणजे विचार-आविष्कार स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य आहे पण मत न देण्याचं स्वातंत्र्य मात्र नाही असं??"
"चूप बस. xxxxx !!"  जोरात ग्लास आपटून म्हणाला, "तुला काही अक्कल नाही!! तुझ्यासारख्या xxx ना  तर मतदान नाकारलं पाहिजे!"  ग्लास फुटू नये म्हणून मला तिथून निघावं लागलं.   
 
मतस्वातंत्र्याचा आग्रह धरणारा तो अभिनेता जनतेवर मतदानाची आणि माझ्यावर मत न देण्याची  सक्ती करण्याचे विचार अद्वातद्वा मांडत होता. मला या विसंगतीचे आणि त्याच्या चिडण्याचे कारण कळेना म्हणून हा प्रसंग मी एका आंदोलन-लोलुप  `सामाजिक चळवळया' मैत्रिणीला सांगितला आणि पुन्हा माझा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देण्याऐवजी ती तासभर विषमता, शोषण, पिळवणूक, विस्थापित असे  अनेक शब्द म्हणत प्रत्येक शब्दाला उसासा टाकत केसांच्या बटा उडवू लागली. बटांनी डोळे अर्धवट झाकल्यानंतरच ती मूळ विषयावर आली,  
"तो बरोबर म्हणतोय. देशाची प्रगती ही जनतेच्या सहभागाखेरीज होऊ शकत नाही. आपल्या देशात चांगले लोक मतदानालादेखील सहभागी होत नाहीत, ते बाकी कशात काय सहभाग घेणार? कशी होणार  मग  प्रगती?"     
 "म्हणजे ज्या देशांनी प्रचंड प्रगती साधली आहे त्या देशात शंभर टक्के मतदान होतं की काय?" - यावर तिनं चिडून ३-४ पांढऱ्या बटा पुढे आणल्या आणि म्हणाली,
 "तुझ्यासारखे मतदान न करता हे असले निरर्थक प्रश्न आणि चर्चा करणारेच जबाबदार आहेत देशाच्या  अवस्थेला! तुमच्यामुळे हे टिनपाट उमेदवार निवडून येतात आणि विकासाच्या नावाखाली देश भकास  करतात !" 
"म्हणजे ते टिनपाट उमेदवार निवडून आले याला, ज्यांनी त्या टिनपाटांना मतदान केलं ते जबाबदार नसून  ज्यांनी त्यांना मत दिलं नाही ते आम्ही जबाबदार! असं??"     
"मूर्ख !!!" खांद्यावरची शबनम झोळी चुरगाळत ती फिस्कारली.
"म्हणजे? उमेदवार मूर्ख??"
"उमेदवार नव्हे, तू मूर्ख!!" आता तिच्या डोक्यावरचे सर्व केस पिंजारले गेले होते.
"म्हणजे, मूर्ख माणसानं मत दिलं तर चांगला उमेदवार निवडून येतो?" मी घाबऱ्या विचारले.
"शतमूर्ख!! मीच शतमूर्ख म्हणून तुझ्याशी हे बोलले!!"  एका हाताने शबनम सांभाळत दुसऱ्या हातानं  झुलपं   विस्कटत ती  निघून गेली आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर काही मिळालेच नाही.
 
 नंतर एका प्रसंगात मात्र अशाच एका `अभ्यासक' म्हणवून घेणाऱ्या `स्वदेश-लंपट ' गृहस्थाने मला माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी तर्कशास्त्रच दिले.
"तुझ्यासारखे लोक मतदान करत नाहीत ना...त्यामुळे चांगल्या उमेदवाराला मते मिळत नाहीत, कमी मते पडतात....तसे त्या नालायक  उमेदवारांचे होत नाही! त्यांचे सगळे मतदार मतदानाच्या दिवशी सकाळीच बरोब्बर येतात आणि मतदान करून जातात. त्यामुळे ते नालायक  उमेदवार निवडून  येतात!" प्रत्येक वाक्याला थोडे थांबत ते स्वत:ची दाढी खाजवून घेत होते.
"ते नालायक उमेदवार साधारण पाच-पन्नासहजार मतांनी तरी जिंकतात. मग माझ्या एकट्याच्या मताने तो पडणे किंवा जिंकणे कसे शक्य आहे?" त्याच्या तर्कशास्त्रावर मला पडलेला प्रश्न त्यांना विचारला. डोळे बारीक करून आवाज न चढवता दाढी खाजवत म्हणाले,
"तू काही एकटा नाहीस, असे तुझ्यासारखे हजारो-लाखो आहेत. चांगली माणसं जातच नाहीत मतदानाला, त्यामुळे हे नालायक निवडून येतात!"
"चांगली माणसं मतदानाला जात नाहीत म्हणजे, जे मतदान करतात ते सगळे वाईट असतात, असं ??" मी गोंधळून जाउन विचारले. यावर  त्यांचा आवाज चढला. चेहरा उग्र करत जरबेनं ते म्हणाले,
"सगळे वाईट नसतात, काही चांगले देखील असतात. पण चांगल्या मतदारांची संख्या कमी असते, त्यामुळे चांगल्या उमेदवाराला मतं कमी पडतात"  
"म्हणजे, जे उमेदवार पडतात, तेच चांगले असतात...असं???" माझा गोंधळ कमी होईना  म्हणून पुन्हा विचारले. आता मात्र त्यांच्या आवाजाला धार आली आणि दाढी जोरात खाजवत म्हणाले,
"काहीतरीच काय? चांगले लोक निवडून येतात की…. आणि मतदान कंपल्सरी केलं ना की मग नक्की चांगली माणसं येतील निवडून!" 
"पण चांगल्या मतदारांची संख्या कमी असते आणि वाईट मतदारांची जास्त असते ना?? मग मतदान सक्तीचं केलं की उलट वाईट उमेदवारच निवडून येईल!" माझा गोंधळ आणखी वाढला.
 "तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीय! कोणीही काहीही बोललं तरी तू त्याच्या उलटंच बोलणार!!!" ते देखील रागावून दाढी खेचत निघून गेले. पुन्हा, माझा प्रश्न निरुत्तरीतच राहिला.  
 
आणखी एका प्रसंगात तर एका `ज्येष्ठ विचारवंत' असे विशेषण लावणाऱ्या `उपदेश- खोर' गृहस्थाने  माझे `प्रबोधन'च करायला सुरुवात केली.
"तू सुजाण नागरिक आहेस ना? सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे मतदान करणं…."                 
 "पण मतदान हे कर्तव्य नाही हक्क आहे ना?" शंकानिरसनासाठी मी विचारले. माझ्या प्रश्नावर कसानुसा होणारा त्यांचा चेहरा  कसाबसा आवरत म्हणाले,
"अरे, आपण जिथे राहतो तिथली व्यवस्था, देशाची परिस्थिती सुधारणं, चांगली ठेवणं हे कर्तव्य नाही का सुजाण नागरिकाचं? मग परिस्थिती सुधारण्यासाठी, चांगल्या लोकांना मतदान करायला हवे ना? म्हणून मतदान हे कर्तव्य समजायचं आपण." 
"तुम्ही मतदान करता का प्रत्येकवेळी?"
माझा प्रश्न ऐकून ते सावरले आणि काहीशा अभिमानानं म्हणाले, "अर्थात!! गेल्या तीस वर्षांत एकदादेखील  चुकवले नाही मी मतदान!!" 
"म्हणजे तुम्ही नियमित मतदान केल्यावर भारताची परिस्थिती इतकी खराब झाली?" या प्रश्नावर ते गडबडले, पण सावरत म्हणाले,
"तसं नव्हे. मी कटाक्षाने मतदान करतो, पण सगळेच करत नाहीत तसं, म्हणून अशी अवस्था आहे. नियमित मतदान करणारे फारतर ३५-४० टक्केच लोक असतील!" हे उत्तर ऐकून मी हबकलोच. मला आणखी  मोठ्ठाच प्रश्न पडला,
"बाप रे! ४० टक्के लोकांनी नियमित मतदान केलं तर एवढी बिकट अवस्था आली, मग जास्त टक्क्यांनी  मतदान केलं तर किती वाईट होईल? अगदी ८० टक्क्यांनी मतदान केलं तरी दुप्पट वाईट अवस्था होईल ना!!!" 
मला वाटले होते की पेच लक्षात आणून दिल्याबद्दल ते माझ्यावर खूष होतील. पण ते एकदम कावले, चेहरा लाल-तांबडा झाला. मग अत्यंत किनऱ्या आवाजात म्हणाले,
"तू कधीच सुधारणार नाहीस! एकवेळ अखंड भारत देश सुधारता येईल, पण  तुला सुधारणे शक्य नाही!" हे ऐकून आणि त्यांचे अविर्भाव पाहून मी गांगरूनच गेलो. त्यांचे ब्लड-प्रेशर वाढून भलतेच काहीतरी घडू नये म्हणून हात जोडून त्यांची क्षमायाचना केली आणि त्यांना शांत करत म्हटले,
"मला सुधारायचंय. काय करू ते सांगा, तुम्ही सांगाल ते करतो." त्यांचा चेहरा पूर्ववत करत ते म्हणाले,
"इतर मतदान करताहेत की नाही, त्यांच्या मतदानानं चागलं होतंय की वाईट याची चौकशी कशाला करतोस? तू मतदान का करत नाहीस? हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे, त्याचे उत्तर शोध!" ते शांत झाले यापेक्षा ते माझ्या मूळ प्रश्नाकडे वळलेत हे पाहून मी खूष झालो आणि प्रांजळपणे सांगितलं,
"मी मतदान कसं करणार? मला राजकारणातलं काहीच कळत नाही. देशाचं हित कशात आहे, आपल्या राज्याचं, शहराचं हित कशात आहे हे मला अजिबात कळत नाही." विचारवंतांच्या चेहऱ्यावर आता स्मित  उमटलं.  
"त्यात कळायला काय लागतं? वर्षानुवर्षे मत देणाऱ्यांना तरी कुठे काय कळतं? मतदानाला काय अभ्यास लागतो की अक्कल लागते? बिनडोक माणूससुध्दा मत देऊ शकतो! अगदीच शून्य माहिती असेल तर   उमेदवाराकडे पाहून ठोकायचं मत! आहे काय अन नाही काय!!!!"  त्यांच्या मोलाच्या उपदेशाने मला थोडे  उमजले तरी माझे पूर्ण समाधान झाले नव्हते. म्हणून वरमून म्हटले,    
" पण कोणता उमेदवार चांगला कोणता वाईट ते तर मला अजिबातच कळत नाही. मुळात चांगला-वाईट माणूस ओळखण्याइतपत बुद्धीदेखील मला नाही.…आणि- " माझं बोलणं थांबवून, हातावर थोपटत ते माझं सांत्वन करू लागले,
"अरे, त्यात काय एवढे? मतदान करायला कसलीही बुद्धी-अक्कल लागतच नाही. टीव्हीवर जाउन मतदानाचे विश्लेषण करायला देखील काही अक्कल लागत नाही, तिथे नुसत्या मतदानाला काय अक्कल  लागणार? फक्त केंद्रावर जाउन रांगेत उभं राहण्यासाठी उसंत असली म्हणजे झालं!! मूर्खातला  मूर्खदेखील  बिनधास्त कोणालाही मत देतो, मग तू का इतका संकोच करतोयेस??"
मी मान डोलावली.  ते पाहून स्वत:च्या प्रतिपादनावर खूष  होऊन त्यांनी मला टाळी मागितली आणि माझा हात त्यांनी तसाच त्यांच्या हातात धरून ठेवला व म्हणाले,
 "आता मला आश्वासन दे, यापुढे तू मतदान करशील."
 
आता मला पूर्णत: आकलन झाले होते. प्रश्नांचे संपूर्ण निराकरण झाले होते त्यामुळे आश्वासन द्यायला कोणतीच अडचण भासली नाही.
 
 
लोकेश शेवडे
२४/ ६/ २०१३ - सायं ५.०० 
 
      
 
    
 

राजा तो राजाच!!

                  राजा तो राजाच!!

 
मध्यंतरी मी गल्फ-अरबस्तानातील एका जगप्रसिध्द शहराला गेलो होतो. हे शहर `मुक्त व्यापारी केंद्र' म्हणून प्रसिध्द आहे. ज्यांना `स्वस्त' खरेदीची हाव असते तसे  कित्येक लोक तिथे फक्त खरेदीसाठी जातात आणि वस्तूंचे भाव ऐकून चित्रविचित्र पद्धतीने चित्कारत हावरटासारखे खरेदी करतात. `हाव'`भाव' या शब्दाचा एक वेगळाच अर्थ तिथल्या खरेदीदारांचे चेहरे पाहून मला लागला! मी खरेदी काहीच केली नाही त्यामुळे माझ्या हावभाव किंवा खिशावर काही परिणाम झाला नाही. तथापि या शहरवारीचे  माझ्या डोळ्यांवर मात्र दोन परिणाम झाले. त्यातील पहिला म्हणजे, तिथले भव्य मॉल्स, उंच इमारती वगैरे पाहून डोळे दिपले. ते कसेबसे चोळत उघडून परत मायदेशी आलो, तर  तिथे मी मोबाईल वापरला होता त्याचे बिल हाती पडले, ते पाहून डोळे पांढरे झाले, हा दुसरा!!! मी त्या शहरात केवळ ४ दिवस होतो, तेथे मोबाईल फारसा वापरला  देखील नव्हता आणि बिल मात्र पन्नास हज्जार रुपये!!! डोळे पुन्हा नॉर्मल झाल्यावर मी ते बिल ४- ४  वेळा उलटे-पालटे करून चूक कुठे झालीय ते पाहायचा प्रयत्न केला तेंव्हा लक्षात आले की चूक बिलात नसून `प्रती मिनिट रेट'बाबतच्या माझ्या अंदाजात होती. मोबाईलवर बोलण्याचा प्रती मिनिट `भाव' तिथे प्रचंड आहे हे मला कळले आणि त्यावरून गल्फ मध्ये राहून आलेले  भारतीय, सामान्य लोकांशी बोलताना  `भाव' का खातात तेही मला उलगडले. 

मोबाईल [हेंडसेट] स्वस्त असलेल्या या ठिकाणी मोबाईलवर बोलणे मात्र इतके महाग का?? याचे उत्तर मात्र सापडेना. म्हणून मी तिथे राहिलेल्या, म्हणजे `वेल'ने सुरुवात करून `यूनो' ने वाक्य संपवणाऱ्या आणि अधूनमधून `व्हेन आय वॉज इन गल्फ' असे वाक्य पेरणाऱ्या अनेक `गल्फी'ना हा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर, `वेल, तिथे टॉक टाइम एक्स्पेन्सीवच आहे, यूनो…!' या पलीकडे मिळाले नाही. पण मी प्रश्न थांबवले नाहीत. `तिकडे टीआरएआय सारखा भाव ठरवणारे खाते नाही का? तिथल्या मोबाईल नेटवर्कमध्ये स्पर्धा नाही का? टेंडर वगैरे न काढता रेट  ठरवले की काय?'
माझ्या या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तरेही तितक्याच वेगाने दिली गेली.
`छे छे! असे कसे होईल? मोबाइल नेटवर्कच्या सेवेसाठी टेंडर काढले होते ना! अगदी ग्लोबल टेंडर होते. यूनो… त्यात सर्व मोठ्या कंपन्यांनी भाग घेतला होता. आणि त्यातल्या सर्वात कमी `रेट'वाल्यांनाच टेंडर मिळालेय.  २-३ कंपन्यांचे `लोएस्ट रेट' होते, त्यांनाच टेंडर मिळाले. यूनो….'
मला या उत्तरांनी समाधान होण्याऐवजी कुतूहल वाढले. म्हणून विचारले, `कोणत्या आहेत या कंपन्या? कोण आहेत त्यांचे मालक?'  यावर उत्तर मिळाले,
`वेल…त्या तिन्ही कंपन्यांचे बहुतांश शेअर्स तिथल्या राजाचेच आहेत. ग्लोबल टेंडर जरी काढले तरी राजाचा `इंटरेस्ट' असलेल्या कंपनीविरुध्द कमी रेट्स भरण्याची हिम्मत कोणती कंपनी करेल? तिथे राजाशी वैर करणे म्हणजे पाण्यात मगरीशी वैर  करण्यासारखे. त्यामुळे कागदोपत्री अगदी ग्लोबल स्पर्धा दिसली तरी प्रत्यक्षात राजाला ज्या कंपन्यांमध्ये इंटरेस्ट असतो त्याच कंपन्यांना, राजाला जे रेट्स हवे असतील त्याच रेट्सने टेंडर मिळते!!'
मला पुन्हा प्रश्न पडला, `राजाला अशा सरकारी टेंडरमध्ये सहभागी व्हायला परवानगी आहे?' या प्रश्नाला अगदी तात्काळ उत्तर आले,
`का नाही? राजाने खाजगी उद्योग करायला हरकत काय?'
`उद्योग करावेत रे, पण `सरकारी कामांच्या टेंडर्स'मध्ये राजा किंवा त्याचे कुटुंबीय सहभागी झाले की ते काम त्यांनाच मिळणार आणि त्यांच्याच दराने!  हे उघडच आहे ना!! कारण, राजाच्या विरुध्द कमी रेट कोट करण्याची कोणीच हिम्मत करणार नाही. मग जनता लुटली जाईल की!' मी म्हणालो.  
`वेल…तसे तर सगळेच राजे करतात की. १५-२० वर्षांपूर्वी नेपाळला राजेशाही  होती. तेंव्हा सर्व तिथले टेलिफोन्स, विमानतळ वगैरे राजाचेच होते की. ब्रूनईला देखील तिथल्या सुलतानाकडेच तेल, खनिज, कोळसा वगैरेंच्या खाणी-वाळू उपसा पासून विमानतळापर्यंत सर्व महत्वाच्या आणि अत्यावश्यक सेवांची कंत्राटे आहेत, यूनो ….. अन्यथा हे राजे-सुलतान वगैरे इतके श्रीमंत होतीलच कसे? यूसी, ज्या गोष्टीला प्रचंड मागणी आहे त्या गोष्टीच्या विक्रीचा एकाधिकार आणि दर या दोन्ही बाबी एकाच व्यक्तीकडे एकवटल्या तरच `मोठा डल्ला' मारता येतो. पूर्वी सर्वत्र राजेशाही होती….तेंव्हा राजे काय करायचे? तेंव्हाही ते लुटालूट करायचेच. इंग्लंड, पोर्तुगालच्या राजांनी इकडे येऊन जनतेला लुटलेच नाही का? ते लुटीसाठी लांबवर येऊ शकले म्हणून आले, बाकीचे राजे शेजारच्या राज्यात घुसून तिथल्या  जनतेला लुटायचे आणि घबाड मिळवायचे…आताच्या काळात या राजांना शेजारच्या देशात घुसून तिथल्या जनतेला लुटणे शक्य नाही, त्यामुळे त्यांना  स्वत:च्या देशातल्या लोकांनाच लुटणे भाग आहे… यूनो….! त्याकाळी राजाचे सरदार,सुभेदार, वतनदार ते तर स्वत:च्या सुभ्यातल्या, वतनातल्या लोकांना लुटूनच राजाला खंडणी पाठवायचे ना? आता या देशांत निदान सुभेदार, वतनदार नाहीत, फक्त राजाच असतो! फार तर त्याचे कुटुंबीय! ट्राय टू अंडरस्टेंड यार! अरे, शेवटी राजाच तो! लुटणारच! त्याने सामान्य उद्योजकांशी स्पर्धा करून ५-१० टक्के नफ्यावर उद्योग चालवावेत, किंवा मिळणाऱ्या भत्त्यावर, तनख्यावर गुजराण करावी अशी अपेक्षा आहे की काय?'
मला त्या `गल्फी'चे म्हणणे बऱ्यापैकी पटू लागले. तरी एक प्रश्न विचारलाच, `म्हणजे आत्ताचे हे राजे श्रीमंत झालेत ते अशी `सरकारी कंत्राटे' मिळवून?'
`ऑफ कोर्स! नाही तर त्यांच्या उधळपट्टीसाठी सतत पैसा लागतो तो येणार कुठून? जुना पैसा जरी असला तरी तो शेवटी कधीतरी संपेलच ना? म्हणून नवनवी कंत्राटे मिळवावीच लागतात!'   
मला पुन्हा  प्रश्न पडला, `पण मग तिथले सरकारी ऑडिटर्स या गोष्टीला आक्षेप घेत नाहीत?'   
` छे छे छे! ऑडीटर्स काय आक्षेप घेणार?? राजेशाहीमध्ये राजाला अशी प्रॉफिट मेकिंग `सरकारी कंत्राटे' घेण्याचा हक्कच आहे! यूनो! किंबहुना अशी कंत्राटे फक्त राजाला किवा त्यांच्या कुटुंबियांनाच मिळतात. इतरांना टेंडर  भरण्याआधीच दटावलेले असते, `हे टेंडर राजा भरणार आहे, त्यालाच मिळेल असे रेट्स टाका' असे. आणि सरकारी ऑडीटर्स त्याला `क्लीन चिट' देतात. एवढेच कशाला, राजा किंवा त्याच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी मोक्याच्या जागा हडप केल्या, अतिक्रमण केले, बेकायदेशीर बांधकाम केले तरी ऑडीटर्स काही कारवाई करत नाहीत '
या उत्तराने मी बुचकळ्यात पडलो म्हणून विचारले,` बाप रे! सरकारी ऑडीटर्स जर असे वागत असतील तर मग सगळेच उद्योगपती, व्यापारी आणि कंत्राटदार लुटत असतील ना सरकारला आणि जनतेला??'
`नाही. तसे अज्जिबात घडत नाही. कारण, ही सोय खास फक्त राजा आणि त्याच्या कुटुंबियांसाठी आहे. राजघराण्यात एकूण फक्त चार-पाचशे सरंजामदार कुटुंबं आहेत. त्या सर्वांना प्रांत वाटून दिलेले आहेत. त्यांच्याच प्रांतात त्यांना किंवा त्यांचे शेअर्स असलेल्या कंपन्यांनाच अशी `टेंडर्स' मिळतात. यूनो! सामान्य उद्योजक, कंत्राटदार यांना सर्व कायदेकानू, नियम वगैरे पूर्णत: लागू आहेत. त्यांनी काही असे काही फायदे घेतले तर अत्यंत  कडक शिक्षा दिल्या जातात. त्यामुळे तिथल्या लोकांना उठसूट कोणीही लुटणे अशक्य आहे. लोकांची लूट फक्त राजाच किंवा त्याचे कुटुंबीयच, म्हणजे एकंदर चार-पाचशे जणच करू शकतात.'             
आता माझे समाधान होत आले. म्हणून शेवटचा प्रश्न विचारला, `मग  जनता आक्षेप नाही घेत? आंदोलन नाही करत राजाच्या या लुटीविरुध्द?'
तो हसायला लागला आणि म्हणाला, `वेल…. जनता??? अरे तिथे जनता नाही, प्रजा असते यूनो, प्रजा! तिथे कोणी नागरिक नसतात….प्रजाजन असतात! आंदोलन जनता-नागरिक करू शकतात, प्रजा नव्हे! प्रजेच्या आक्षेपाला-आंदोलनाला राजा कशाला भिक घालील? राज्यकर्त्याने जनतेला घाबरायला आणि राज्यकर्त्याला सरकारी कंत्राटे मिळवण्याचा हक्क नसायला ही काही लोकशाही नव्हे!!'
 
या उत्तराने मला एकदम भानावर आणलं आणि आपण भारतासारख्या लोकशाही देशाचे `नागरिक' आहोत हे अकस्मात लक्षात आलं! `नागरिकत्वाच्या' या साक्षात्कारानं छाती फुगली. खरोखरच आपण किती भाग्यवान, आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे जनता किती सुखात आणि सुरक्षित आहे! आपल्याकडे मुळात राजाच नाही!! तर, `लोकप्रतिनिधी' आहेत! प्रजा नाही, तर `नागरिक' आहेत, जनता आहे! प्रत्यक्षात लोकप्रतिनिधी सरंजामदारासारखे वागत असले किंवा आपण प्रजेसारखे वागत असलो म्हणून काय झालं? शेवटी प्रत्यक्षापेक्षा तत्व महत्वाचे असते. भारतात तत्वत: लोकशाही असल्यामुळे सरकारी कंत्राटे, सरकारी जागा लोकप्रतिनिधी तत्वत: घेऊच शकत नाहीत. अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामदेखील लोकप्रतिनिधी आपल्याकडे करूच शकत नाहीत … तत्वत: ! असे काही तत्वत: लोकप्रतिनिधीने केल्याचे एखादे तरी उदाहरण आपल्याकडे अपवाद म्हणून तरी सापडते?? शक्यच नाही…कारण लोकशाहीत कायद्यानेच त्याला बंदी आहे…तत्वत:! आणि वरून जनता जागरूकही आहे तत्वत:!!! त्यामुळे लोकप्रतिनिधी जनतेला लुटूच शकत नाहीत तत्वत :!! तसे एखादे  जरी कंत्राट लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी घेतले, एखादी सरकारी जागा किंवा लाभ घेतले, तर सरकारी  ऑडीटर्स त्यांच्यावर कठोर कारवाई करतात आणि जनता `लोकप्रतिनिधीला'  निवडणुकीत पाडून टाकते!!!!!! राज्यकर्त्याने जनतेला लुटायला ही राजेशाही किंवा सरंजामशाही नव्हे………….  सारे काही तत्वत:!!!! 

आईशप्पत!!  इतके दिवस ध्यानातच आलं नव्हतं, आपला भारत हाये ना,……थितं लोक्शाई हाय ….राजेशाई नाय…. राजेशाई लय ब्येक्कार डेंजर ऱ्हाते….
लोक्शाई येक्दम भिन्नाट ऱ्हाते……आपल्या लोक्शाईनं राजेशाई आन सरंजामशाई आशी खल्लास क्येली का…. कुटं शिल्लकबी ऱ्हायली नाय आन कुटं दिसतबी नाय….      
म्हून तर म्हंत्या… आपला भारत  लई म्हंजी लई म्हंजी लईच महान! ………. तत्वत:!!!!!  
 
लोकेश शेवडे