Tuesday, July 15, 2014

इशारा, तात्पर्य आणि टीप

      इशारा, तात्पर्य आणि टीप
 
`माकड' या  प्राण्यात उत्क्रांती घडत जाउन त्यातून पुढे `माणूस' तयार झाला असावा हे उत्क्रांतीवाद्यांचे म्हणणे पटण्यासारखे आहे. माकड  जसे वाट्टेल तिथून वाट्टेल तिथे वाट्टेल तशा उड्या मारू शकतं तसे  माणूस शारीरिकरित्या करू शकत नसला तरी माणसाचे विचार तश्शाच, किंबहुना त्याहून पलिकडच्या उड्या मारू शकतात, यावरून ते सिद्धच होतं. एका अर्थी, माणसाचा मेंदू हा माकडासारखाच असतो. अनेकजण  साध्या-सरळ बाबीतसुध्दा कोणत्याही मुद्द्यावरून कोणत्याही तर्कावर उड्या मारताना आढळतात त्यामागे  हेच कारण असावे. उदा. चांगल्या वस्तूची किंमत जास्त असते म्हणून महाग वस्तू  चांगली असते असा तर्क करून माणूस महाग वस्तू विकत घेतो. तर्काची ही `पलटी' बरोब्बर `माकडाच्या `शारीर पलटी'सारखीच  आहे.  माणूस नावाच्या  नि:पुच्छ प्राण्याच्या या  `वैचारिक माकडचेष्टां'ची सुरुवात बहुधा बालपणीच होत  असावी. तान्हेपणी माणसाचे हावभाव, हातवारे तर माकडासारखे असतातच, पण वरून त्यानंतर बाल्यावस्थेच्या काळात बडबडगीतांतून विसंगती आणि  असंबध्दतेचे  बाळकडूदेखील दिले जाते. उदा. राम  म्हणजे देव, देवच्या उलट वदे, वदे म्हणजे बोलतो,  `बोलतो'चे क्रियापद `बोलणे', बोलण्याचे `आज्ञा'रूप `बोला', ``बोला' म्हणजे  हिंदीत `बोलो', बोलोच्या  उलट `लोबो', लोबो हा एक  शास्त्रज्ञ होता,  म्हणून राम म्हणजे  शास्त्रज्ञ! अशा अजब तर्कटांवर आधारित बरीच बडबडगीतेअसतात. परिणामी, मोठे झाल्यावरही माणसे  अशाच  वैचारिक मर्कट किंवा तर्कटलीला  करत राहतात आणि त्या लीलांना `प्रगल्भता' मानतात. किंबहुना विसंगती, असंबद्धता हा माणसाच्या दैनंदिन जीवनाचा  भागच बनून राहिला आहे.  उदा. एखाद्या मुखपत्रात त्याच्या मालक असलेल्या राजकीय नेत्याची अथवा पक्षाची वारेमाप स्तुती त्याचा पगारी संपादक करत असतो. अर्थातच, तशी स्तुती करण्याच्या हेतूनेच त्या मुखपत्राची स्थापना व संपादकाची नेमणूक झालेली असते. तरीही त्या मुखपत्रात विवक्षित ठिकाणी चौकट टाकून ठळकपणे छापलेले असते, `या मुखपत्रात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतील असे नाही.' हे छापण्यात त्या संपादकाला, मुद्रकाला काहीही विसंगत वाटत नाही, इतकेच नव्हे तर वाचकालादेखील काही विचित्र वाचतो आहोत असे वाटत नाही. कित्येक  माणसांना  कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टीवरून  कोणत्यातरी  असंबध्द,  ऊटपटांग गोष्टी आठवतात आणि त्यासाठी ते कशी का असेना, पण तर्कसंगती देखील देत नाहीत, तरीही लोकांना ती समजावी  त्यांची अपेक्षा असते. उदा. मध्यंतरी दोन परस्पर विरोधी ज्येष्ठ नेत्यांच्या  मुलाखती टीव्हीवर दाखवल्या गेल्या.  त्यात दोन्ही नेत्यांना  `दंगल व हत्याकांड' या विषयावर  प्रश्न केल्यावर एकाने `देशात दारिद्र्य निर्मूलन  आवश्यक आहे' असे उत्तर दिले तर दुसऱ्याने `पाणी मागवले' व ते पिऊन मुलाखत सोडून निघून गेला.  मूळ  प्रश्न ऐकल्यावर एकाला दारिद्र्य आणि दुसऱ्याला पाणी का आठवावे? या प्रश्नाचा उलगडा श्रोत्यांना झालाच नाही. पण तसा उलगडा कोणाला  आवश्यकदेखील  वाटला नाही, कारण दोन्ही मुलाखती नंतर श्रोते आपापल्या नेत्याची ही वैचारिक उडी होती असे मानून बेहद्द खुश झाले होते. आणि टीव्हीवरील  विचारवंत [!!!] तर, आपापल्या नेत्यांच्या `उडी'रूप प्रतिक्रियांबाबत  `बडबडगीत ष्टाईल' तर्कट मांडत होते. 
 
 
तर, असंबध्दता आणि विसंगतीमध्ये `तर्कट' मांडण्यावरून आठवले. आमच्या कॉलेजच्या काळात अनेक  नावांनी व पध्दतींनी अवैध जुगार खेळला जात  असे.  त्यात `मटका', `वळण' हे प्रकार इतके लोकप्रिय होते की जुगाऱ्यांसाठी  `लंगडेकी  चाल' `जय बाबा' अशा अत्यंत चित्रविचित्र नावांनी मटका खेळण्याचे प्रशिक्षण  आणि हमखास जिंकण्याच्या युक्त्या देणारी पुस्तके फुटपाथवर जागोजाग मिळत असत. आमचा एक मित्र  `मटका' लावत असे, तर त्याचा मोठा  भाऊ घोडे लावत असे, म्हणजे धाकटा मटक्यावर तर थोरला रेसमधल्या घोड्यांवर पैसे लावत असे. दोघेही लायब्ररीमध्ये येऊन आमच्या ग्रूपच्या बाजूलाच  बसून त्यांची `जुगारलेली' पुस्तके वाचायचे व त्यानुसार पैसे लावायचे. कधी हरायचे तर कधी जिंकायचे, पण पैसे लावण्यापूर्वी कोणत्या  आकड्यावर  किंवा घोड्यावर  हमखास विजय मिळेल ते अभ्यासण्यासाठी आणि  हरले की हरण्याची कारणे  शोधण्यासाठी ते पुन्हा त्या पुस्तकांचे पारायण करत एखाद्या जाणकाराप्रमाणे एकमेकांशी व अधूनमधून आमच्याशी, म्हणजे सर्वसामान्यांशी चर्चा करायचे. आम्ही सर्वसामान्य असल्यामुळे, साहजिकच आम्हाला  त्यातील ओ की ठो  कळत नसे, पण त्यामुळे रंजन होई म्हणून आम्ही देखील उगाचच काहीतरी आकडे किंवा  नावे सुचवत असू. आकडा किंवा घोडा जिंकण्याची किंवा हरण्याची त्यांनी दिलेली कारणे  मात्र अत्यंत रोचक आणि  अद्भुत असत. एखादा घोडा हरला याचे कारण त्याची शेपटी मोठी होती, त्या घोड्याचा तबेला योग्य  नव्हता, याउलट एखादा घोडा जिंकला तर त्याचे कारण त्या घोड्याचा बाप अस्सल जातिवंत होता, त्याची  खोगीर उच्च  दर्जाची होती अशी कुठलीही कारणे अत्यंत गंभीरपणे द्यायचे. धाकटा तर आकडा लावताना तोच आकडा लागणार असल्याची ग्वाही देताना समजा, जुलैच्या सतरा तारखेचा मटका असेल तर, जुलै म्हणजे  सातवा महिना-सतरा तारीख, शिवाय शहात्तर साल म्हणजे तीनही  ठीकाणी सात आहेत; याचा अर्थ सात  गुणिले तीन, म्हणजे एकवीस; एकवीसमध्ये दोन  आणि एक हे आकडे; यांची बेरीज तीन, त्यामुळे आज `तीन' हाच  आकडा  लागेल,  असे  काहीतरी सांगायचा आणि मग समजा तोच तीन हा आकडा न येता सहा आकडा आला, की  मग "अरे, संध्याकाळी सहा वाजता   आकडा लावला होता, ते चुकलं, सहा वाजता आणि शहात्तर  साल आणि शनिवार  म्हणजे आठवड्याचा  सहाव्वा दिवस! त्यामुळे तिन्ही ठिकाणी सहा आकडा होता.  त्यामुळे तीन ऐवजी  सहा आकडा आला" असे सांगायचा. पण हे  दोघेही अव्याहतपणे जिंकण्या-हरण्याची तमा न बाळगता आपापले अंदाज, होरे हे  तार्किकदृष्ट्या बरोबर कसे आहेत हे सांगत फिरायचे. 
 
 हे सारं आठवण्याचं कारण, अर्थातच अगदी असंबध्द! नुकत्याच निवडणुका पार पडून त्यांच्या निकालाविषयी अनेक तज्ञ मंडळी त्या निकालाचे विश्लेषण व चिंतन करताना टीव्हीवर सतत दाखवत होते. खरं म्हणजे, मला  निवडणूक आणि त्यांचे निकाल यात काडीमात्रही स्वारस्य कधीच नव्हते. गेली अनेक  वर्षे मी निवडणुका  आणि त्यांचे  निकाल  पाहतो आहे. एकाही  निवडणुकीचे  निकाल  पाहून आणि त्यानंतरच्या पाच वर्षांतील
 देशाची वाटचाल अनुभवून जनतेने  हे प्रतिनिधी का नेमके का निवडून दिले असावेत  आणि ज्यांना  पाडले  त्यांना का पाडले असावे याचा कधीही बोध झाला नव्हता. पण समोर टीव्हीवर सर्व पक्षांची आकडेवारी विविध रंगात दाखवणारे बहुरंगी वर्तुळ मला गोल रंगीत तबकडीसारखे भासले, रंगीत तबकडीवरून कॅसिनो हा जुगाराचा प्रकार आठवला, जुगारावरून मटका आठवला, मटक्यावरून कॉलेजमधले ते दोन भाऊ आठवले, त्या दोघांवरून त्यांचे तर्कट आठवले आणि त्यांच्या तर्कटावरून  अचानक निकालामागील कारणमीमांसाच  उलगडली. उमेदवाराचे कार्य, व्यक्तिमत्व आणि त्याचा विजय यांची सांगड लक्षात आली. उदा. जनतेला घोटाळे  नकोसे झाले होते, त्यामुळे अशोक चव्हाण निवडून आले.  जनतेला घराणेशाही समूळ नष्ट करायची  होती म्हणून खडसे यांची सून व   गावित  यांची कन्या  निवडून आल्या. जनतेला सरंजामशाही उखडून  टाकायची होती म्हणून उदयनराजे भोसले प्रचंड बहुमताने  निवडून आले. आणि निर्णायकपणे घराणेशाही व भ्रष्टाचाराचे निर्मूलन करून  केवळ विकास आणि अविरत समाजकार्य करणाऱ्यांनाच  खासदार करायचे म्हणून प्रमोदकन्या  पूनम महाजन यांना जनतेने जबरदस्त  मताधिक्याने निवडून आणले. जनता काही  खुळी नाही, मतदारांना कोणी उल्लू बनवू शकत नाही हे मागील सर्व निकालांप्रमाणे  यावेळच्या निकालावरून सिद्ध झालेलेच होते. याखेरीज याखेपेस जनतेला `बदल' हवा होता, म्हणून जनतेने निम्मे खासदार हे त्यांनी  फक्त त्यांचा पक्ष  `बदल'ल्यावरच निवडून दिले. यावरून, मतदार अत्यंत चाणाक्ष असतात, कमालीच्या हुशारीने आपले प्रतिनिधी निवडतात. हे अगदी अधोरेखित झाले. हा  साक्षात्कार मला टीव्हीवरील विश्लेषण पाहतानाच का झाला? याचे उत्तर इतकेच की, माकडाची शारीरिक आणि माणसाची वैचारिक उडी कोठून  कुठे काही जाईल ते सांगता येत नाही!!! 
 
वैधानिक इशारा: जुगार खेळणे वैचारिक व आर्थिक आरोग्यास हानिकारक आहे. 
तात्पर्य: बडबडगीत, जुगार आणि निवडणुकीचे निकाल यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही!! 
टीप: या लेखात यदाकदाचित मत व्यक्त झालेच असल्यास, त्या मताशी केवळ संपादकच नव्हे,  तर खुद्द लेखक देखील सहमत नाही. 
 
 
 
लोकेश शेवडे 
२५/०५/१४ सायं ५.४५                           

Friday, April 25, 2014

एसटूबीटू

   एसटूबीटू
 
मी ५/६ वर्षांचा असताना जेंव्हा मला वाचता येऊ लागलं तेंव्हा माझ्या वडलांनी रोज माझ्यासमोर वर्तमानपत्रे ठेवायला सुरुवात केली. त्यांचा उद्देश असा की रोज फक्त गोष्टीची पुस्तके वाचण्याबरोबरच हळूहळू वर्तमान देखील जाणण्याची सवय लागावी. त्या वयात वर्तमानपत्रे वाचून मला काय  कळणार  होते [आज तरी काय कळते, म्हणून फक्त `त्या वयाला' दोष द्यावा?]?? हा प्रश्न अलाहिदा. बाकी काही कळो  न कळो पण, तेंव्हापासून `सामान्य माणूस' हा  शब्द प्रयोग रोज माझ्या वाचनी येऊ लागला. साहजिकच हा `सामान्य माणूस' म्हणजे नेमका कोण? हा प्रश्न मला तेंव्हा पडला.  या प्रश्नाचे समाधानकारक  उत्तर मला कोणी दिले नाही, पण काही वर्षानंतर आमच्याकडे टाईम्स येऊ लागला तेंव्हा लक्ष्मणच्या व्यंगचित्रामध्ये नेहमी एक धोतर, कोट आणि चष्मा  लावलेला माणूस असतो, तो कोण? असा प्रश्न विचारल्यावर `तो' सामान्य माणूस आहे असे मला वडलांनी सांगितले. लक्ष्मणने रेखाटलेला तो प्रतिकात्मक  `सामान्य माणूस' पाहून मौज वाटली. पण तरीही त्या चित्रामुळे प्रत्यक्षातला सामान्य माणूस कोण, याबद्दलचे कुतूहल काही कमी झाले नाही. पुढील  आयुष्यात अक्षरश: रोज सकाळ-संध्याकाळ `सामान्य माणसाला अमुक वाटतंय, सामान्य माणसाला तमुक वाटतंय, सामान्य माणसाला अमुक नकोय, सामान्य  माणसाला  ढमुक हवंय, सामान्य माणसाच्या  मनात संताप आहे, सामान्य माणसाच्या मनात प्रेम आहे' असे कोणी ना कोणी फेकलेले संवाद कानावर  आदळत राहिले.  हे संवाद ऐकले की प्रत्येक वेळी मला बोलणाऱ्याची कॉलर पकडून त्याला विचारावसं वाटतं, की "तू उठसूट ज्याचा संदर्भ देतोयेस तो सामान्य माणूस  कोण? एकदा दाखव तर खरा तो तुझा सामान्य माणूस!!" काही लोकांच्या बोलण्याची सुरुवात तर चक्रावून टाकणारी  असते.  उदा.  "माझ्यासारख्या एका  सामान्य माणसाला…" आणि मग यापुढे कोणत्याही प्रकारचे, कोणत्याही अर्थाचे शब्द, विधाने येतात. गम्मत अशी, की ही विधाने झोपडपट्टीमधल्या जीर्ण  कपड्यातल्या  माणसापासून चकचकीत कोऱ्या मर्सिडीज  बेंझ मधून सुटाबुटात फिरणाऱ्या माणसापर्यंत कोणाच्याही तोंडून स्रवताना ऐकू येतात. अशा  वैविध्यपूर्ण लोकांच्या तोंडून ही विधाने ऐकून प्रथम गोंधळायला झाले तरी नंतर `हा जो कोणी सामान्य माणूस असेल, तो त्यांच्यासारखा असेल' असा  समज मात्र झाला.  म्हणून अशी विधाने करणाऱ्या लोकांनाच विचारणा केली तेंव्हा लक्षात आले की त्यांच्या`सारखा' म्हणजे सूटबूट घालून मर्सिडीजच्या  मागच्या सीटवर आपल्या लेडी पीएशी `त्यांच्यासारखे' चाळे करणारा नव्हे किंवा बायकोच्या कष्टाच्या पैशांवर  दारू पिऊन बायकोलाच `त्यांच्यासारखा' मारणारा नव्हे, रिक्षा-टेक्सीच्या मीटरमध्ये  फेरफार करून पैसेंजरना लुटणारा नव्हे किंवा बाल्कनी अवैधपणे एन्क्लोज करून महापालिकेचा कर बुडवणारा नव्हे, मुलाच्या लग्नात सुनेकडून `त्यांच्यासारखा' हुंडा घेणारा नव्हे किंवा बारगर्लवर  `त्यांच्यासारखा' दौलतजादा करणारा नव्हे ……ते स्वत: जरी अगदी तस्सेच असले  तरी त्यांच्या मते सामान्य माणूस म्हणजे कधीही-कोणतेही गैरकृत्य करणारा नव्हे… तर  सामान्य माणूस म्हणजे वट्ट `साधा-सरळ, भोळा-भाबडा'! हल्लीच्या  भाषेत बोलायचे तर सामान्य माणूस म्हणजे `S२-B२'  म्हणजे एसटू बीटू!! हा झाला सामान्य माणसाच्या मानसिकतेचा उलगडा!  
 
 
सामान्य माणसाच्या मानसशास्त्रीय उलगडा होण्याबरोबरच आणखी एक उलगडा असा झाला की, या एसटूबीटूचा एक गुणधर्म असा आहे की तो नेहमी पीडीतच  असतो. तो जर पीडीत नसेल तर त्याचे एसटूबीटूत्व काढून घेण्यात येते. उदा. एखाद्या रांगेत २५ लोक काहीतरी घेण्यासाठी उभे आहेत. त्यातील २४ लोकांना  जे पाहिजे ते मिळाले आणि एकाला नाही मिळाले तर तो `न मिळालेला' एक हा सामान्य माणूस, सॉरी, एसटूबीटू ठरतो आणि ज्यांना मिळाले ते २४ जण त्या `न मिळालेल्या' माणसापेक्षा गरीब, दुबळे किंवा अपंग असले, तरी त्यांना `सामान्य'त्व मिळत नाही. इथे `सामान्यत्व' हे फार  `असामान्य' आहे असे वाटले  तरी ते साफ चूक आहे. कारण, समजा पुढे दुसऱ्या  एखाद्या रांगेत त्या अगोदरच्या `एसटूबीटू'ला हवे ते मिळाले आणि बाकीच्या २४ जणांना नाही मिळाले  तर त्या अगोदरच्या  `एसटूबीटू'चे  सामान्यत्व काढून घेतले जाईल आणि त्या २४ जणांना सामान्यत्व  मिळेल!! इथे हा उलगडा `संख्याशास्त्रीय' वाटत असला  तरी ती दिशाभूल आहे समजून घेतले पाहिजे. कारण २४ असो की १ हे महत्वाचे  नसून `पीडीत' असणे हे वैगुण्य महत्वाचे आहे. म्हणजेच ते  `वैगुण्य' हे एका अर्थी सामान्य माणसाचा `गुण'धर्म आहे. इथे हा उलगडा गुणात्मक वाटत असला तरी त्यात `वैगुण्य' हेच `गुण' ठरत असल्यामुळे  तो  वास्तवात `विरोधाभास अलंकार', म्हणजे `भाषाशास्त्रीय' ठरतो. एकंदरीत, सामान्य माणसाबद्दल जे काही मांडले जाते ते फक्त `अलंकार' आहेत, ते देखील प्रत्यक्षातील नव्हे, तर भाषेतील!!! 
 
 
सामान्य माणसाबाबत मराठी भाषेतील या उलगड्याने दिलेल्या धक्क्यातून  मी सावरतोय न सावरतोय तोच त्याच बाबतीत अचानक हिंदी भाषेनं त्याहून  मोठा धक्का दिला. हिंदीत आंब्याला `आम' म्हणतात असे आम्हाला शाळेत राष्ट्रभाषा शिकलो तेंव्हापासून माहित होते. आणि `आंबा' हा सामान्य  माणसाला  `न परवडणारा' असतो हे अनुभवातून माहित झाले होते, त्यामुळे `आंब्या'चा सामान्यांशी संबंध पूर्णपणे तुटला आहे हे मला ठाऊक झाले होते. पण काही  महिन्यांपूर्वी बातम्यांतून ऐकले की, हल्ली हिंदीत `सामान्य माणसाला' `आम आदमी' म्हणतात!!  म्हणजे, मुळात `सामान्य  माणूस' कोण याचा अद्याप पत्ता  लागलाच नव्हता, त्यात आता त्याला हिंदीत `आम आदमी' का म्हणतात त्याचाही छडा लावायचे  डोक्याला नवीन काम लागले!!!! या साऱ्याचा परिपाक म्हणून गेले काही महिने मी `आम आदमी' म्हणजे कोण? किंवा एखाद्याला `आम आदमी'  का म्हणतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. `आम आदमी' बाबत मी अभ्यास सुरु केला तेव्हढ्यात कळले की दिल्लीमध्ये एक `पार्टी' सुरु झालीय आणि तिचे नाव `आम  आदमी' आहे. हे ऐकून मी बेशुध्दच पडलो!
 
 
 
शुद्धीवर आल्यावर मात्र लक्षात आले की  दिल्ली या शहराचा अभ्यास केल्यास आम आदमी कळेल आणि तो कळला की मग फायनली सामान्य माणूस  म्हणजे कोण ते कळू शकेल. अभ्यास सुरु केल्यावर कळले की दिल्ली हे ऐतिहासिक व राजकीय बाबींत एक नंबरचे शहर असले तरी औद्योगिक  वर्तुळात मात्र ते भारतभरात `दोन नंबर'चे शहर मानले जाते. यातील `दोन नंबर' हा अनुक्रम किंवा `शिशु' विहारातील सांकेतिक आकडा नसून `आर्थिक परिभाषेतील' शब्द आहे. उद्योग व व्यापार या दोन्हीबाबत दिल्ली प्रसिध्द आहे, ती `विदाउट बिल', म्हणजे काळ्या पैशांसाठी, म्हणजेच `दोन नंबर'च्या  व्यवहारांसाठी!! दिल्लीत उद्योग-व्यापार किंवा स्थावर व्यवहार मोठ्या प्रमाणात अबकारी कर, विक्रीकर, स्टेंप ड्युटी वगैरे सारे कर बुडवूनच केले जातात आणि  खरेदी करणाऱ्या तिथल्या जनतेलादेखील वस्तू किंवा वास्तू खरेदी करताना कर-बीर भरून खरेदी करायला  आवडत नाही, विदाउट बिल-कमी किमतीत खरेदी करायलाच  आवडते. पालिका बझार, कॅनॉट प्लेसपासून अगदी करोलबाग व जुन्या दिल्लीतील  छोट्या `हट्ट्या'पर्यंत सर्वत्र अशी ही नंबर दोनची  खरेदी-विक्री  अव्याहत सुरु  असते. दिल्लीतील लोकप्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीबद्दल काय बोलावे?? ते तर टीव्ही-वर्तमानपत्रांमधे रोज वाचत असतो, त्यात खरे किती आणि  खोटे किती कुणास ठाऊक? मात्र अशा व्यवहाराला  दिल्लीत `एक' किंवा `दोन नंबरचा' व्यवहार किंवा पैसा असे म्हणत नाहीत. तर `तीन नंबरचा' व्यवहार  म्हणतात. काळा पैसा हा कर न भरलेला  असला तरी तो त्या  व्यक्तीचा स्वत:चाच असतो. कष्ट करून, उद्योग-धंदा करून मिळवलेल्या स्वत:च्या कमाईवर  कर भरला की तो पैसा `एक नंबर', त्याच कमाईवर कर भरला नाही की तो `दोन नंबर'चा पैसा.  तत्राप, जी मालमत्ता किंवा पैसा मुळात स्वत:चा नाहीच, दुसऱ्यांचा म्हणजे जनतेचा  आहे तो परस्पर  डल्ला मारून त्यावर केलेल्या व्यवहाराला `तीन  नंबरचा' व्यवहार म्हणतात. हे विचित्र असले तरी न समजण्यासारखे मुळीच नाही. शब्द आणि त्यांच्या व्याख्या निर्मितीमध्ये दिल्लीकर  जनतेसमोर पुणेकरदेखील `नंबर दोन'  ठरतील एवढे ध्यानात ठेवले तर पुढचे समजणे सोपे आहे!! किंबहुना दिल्लीकर जनता विक्षिप्तपणातदेखील  पुणेकरांच्या पुढे, म्हणजे संपूर्ण देशात `नंबर एक' आहे. उदा. दिल्लीकर जनता  स्वत:च व्यवहारात नंबर दोनच्या-काळ्या पैशांचा आग्रह धरत असली तरी  हीच जनता दर काही दिवसांनी  त्याच काळ्या पैशांविरुध्द आंदोलन करत रस्त्यावर  उतरते. त्या आंदोलनात का कुणास  ठाऊक पण रस्त्यांवर पथदीप असतांना आणि त्यांचा लख्ख उजेड पडलेला असतांनादेखील ही जनता मेणबत्त्या लावून रस्त्यावर फिरते. त्यामुळे  दिल्लीत मेणबत्त्यांचे उत्पादन व व्यापार  करणाऱ्यांची संख्या  वेगाने  फोफावली आहे. अर्थातच ते  सर्व उत्पादक  व व्यापारी या मेणबत्त्या  विदाउट बिल, म्हणजे `दोन नंबर'च्या  व्यवहारात विकतात. परिणामी आंदोलनकर्ते त्या काळ्या पैशातल्या मेणबत्त्या  विकत घेऊन काळ्या पैशाच्या विरुध्द आंदोलनाचा उजेड  पाडतात!!!असा विक्षिप्तपणा पुणेकर कध्धीच करणार नाहीत. ते खचित मेणबत्त्यांचे पैसे वाचवतील आणि त्या पैशांत `प्रतिकात्मक आंदोलने अयशस्वी का होतात?' यावर एक परिसंवाद आयोजित करतील. असो. 
 
 
कोणत्याही राष्ट्राच्या महसुलाचा काही भाग हा त्याच्या `राजधानी'च्या विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी राखीव ठेवलेला असतो. दिल्लीत बहुतांश उद्योजक, व्यापारी, बिल्डर्स आणि जनता कर बुडवत असूनही `दिल्ली' राजधानी असल्यामुळे साहजिकच तिथे सरकारी इमारती, रस्ते, पूल, बगीचे वगैरे सर्व मात्र मुबलक आणि भव्य-दिव्य आहे. याचा अर्थ, भारतभरातील लोक वेगवेगळ्या प्रकारचे कर भरण्याचे  कार्य करतात, त्या करांतून सरकार दिल्लीच्या  विकासाचा, बाग-बगीच्यांचा, सुशोभीकरणाचा आणि तिथल्या ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचे कार्य करते आणि दिल्लीकर जनता ते सारे वापरण्याचे, उपभोगण्याचे कार्य  करते. एकंदरीत, स्वत: फारसे कर न भरता मोठ-मोठे रस्ते, पूल, बगीचे वगैरेंसकट अनेकविध सुखसोयी उपभोगणे हे दिल्लीकर जनतेचे खास वैशिष्ट्य! थोडक्यात, संपूर्ण भारतातील जनतेच्या कष्टांवर चैन करणे हे दिल्लीतील केवळ राजकारण्यांचाच नव्हे तर बहुतांश  जनतेचादेखील `स्वभाव' आहे.  
 
 
तर मुद्दा असा की, `सामान्य माणूस' कोण? हे समजण्यासाठी मी त्याला हिंदीत `आम आदमी' का म्हणतात ते समजून घेऊ पाहात होतो. तेवढ्यात असे  कळले की दिल्लीत `आम आदमी पार्टी' सत्ताधारी  झाली आणि अगोदरच सारे काही फुकट  मिळणाऱ्या त्या दिल्लीकर जनतेला त्यांनी आता वरून पाणी फुकट आणि वीज स्वस्त द्यायलादेखील सुरुवात केली. हे ऐकून मी पुन्हा एकदा बेशुध्द पडलो. आणि पुन्हा  शुद्धीवर  आल्यावर पुन्हा सामान्य माणसाला `हिंदीत' आम का म्हणतात त्याचा शोध सुरु केला. शोध घेताना एक हिंदी वाक्प्रचार ऐकला, `आम के आम, और गुठलीयोंके दाम' ! अर्थ विचारल्यावर कळले की एखाद्याचे  भाग्य फारच फळफळले की त्याला आंबे फुकट खायला तर मिळतातच पण ते खाल्यानंतर उरलेल्या कोयींचे देखील पैसे मिळतात!! वाक्प्रचाराचे  मर्म कळल्याबरोबर निदान दिल्लीच्या तमाम जनतेला  `आम आदमी' म्हणणेच समर्पक असल्याचे लक्षात आले. त्यावरून उर्वरीत भारतातील भारतीय हा  दिल्लीकरांसारखा `आम' होऊ शकत नाही या गोष्टीचा `दर्द ना जाने कोय' हे देखील ध्यानात आले. पण ज्यासाठी `आम'चा अभ्यास केला तो `आदमी' काही उमगलाच नाही. बालपणापासून मी ज्याचा शोध घेतो आहे तो भारतातला `सामान्य माणूस' कोण? गर्भनिदान करून स्त्रीभ्रूण हत्या करणारा की भक्तांची रांग मोडून लवकर देवदर्शन मिळावे म्हणून पुजाऱ्याला `दक्षिणा' देणारा? स्वत: लठ्ठ पगार मिळवूनही मोलकरणीला मात्र तुटपुंजा पगार देणारा की स्वच्छतेच्या गप्पा मारत प्रत्येक कोपऱ्यात पचकन थुंकणारा ….… स्वत: कर बुडवून, भ्रष्टाचाराविरुध्द बोंबा मारत, सरकारकडून सारे फुकट मिळण्याची अपेक्षा करणारा की धर्मांधतेला आणि जातीयतेला शिव्या घालत स्वत:च्याच  धर्माच्या किंवा जातीच्या उमेदवारालाच मतदान करणारा?? किंवा असाच  कुठलातरी, भारतात जागोजाग आढळणारा….पण नेमका कोण? ………. ते मात्र शेवटी कळले नाही…ते नाहीच.  
 
 
लोकेश शेवडे 
६/२/१४ सायं ६.१५            
             

मध्यम वर्ग, कॉर्पोरेट्स आणि 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'

                      मध्यम वर्ग, कॉर्पोरेट्स आणि  'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'  
मी जर्मनीला येतोय असं यतीन मराठे, म्हणजे माझा बालमित्र `राजू'ला जेंव्हा कळलं तेंव्हाच त्यानं मला फोन करून दटावलं होतं की "किमान दोन दिवस माझ्या घरी राहायचंच!". मी तत्काळ होकारही दिला. राजू गेली १५ वर्षं जर्मनीत राहतोय, पूर्वी `डुसेलडॉर्फ' जवळ `क्रिफ़ेल्ड'ला राहायचा, आता `म्युनिक'ला. त्याची बायको `क्लौडिया' ही मूळची जर्मनच आहे. संपूर्ण जर्मन आचार-विचार आणि कुटुंब पध्दत स्वीकारून राजू, पत्नी व दोन मुलांसह तिथे स्थायिक आहे. राजूबरोबर लहानपणापासूनच खेळ-मस्ती-उनाडक्या केलेल्या असल्यामुळे तिकडे गेल्यावर त्याच्याशी भरभरून गप्पा होणं स्वाभाविकच होतं. पण क्लौडियादेखील तितक्याच उत्साहानं गप्पांमध्ये सामील झाली. पहिल्या दिवशी दोघं मला म्युनिक दाखवायला घेऊन गेले, तर वाटेत स्थळं-वास्तू दाखवण्याबरोबरच ती त्यासंबंधीचा काहीसा इतिहास आणि तिथल्या चाली-रिती यासंबंधीची माहिती देत होती. दुसऱ्या दिवशी काय पाहायचे त्या यादीत म्युनिकमधील आणखी अनेक प्रसिध्द वास्तू, संग्रहालये, मार्केट आणि भव्य राजवाडा वगैरे गोष्टी होत्या. पण याबाबत चर्चा सुरु असताना अचानक क्लौडियानं विचारलं "'कॉन्सन्ट्रेशन कॅंप' बघणार का? बघून खूप क्लेश होतात, आणि बघायला वेळही खूप लागतो, कदाचित दुसरं काही पाहायला वेळ उरणार नाही. तू इथे हौसेमौजेसाठी आला आहेस…त्यामुळे पाहायचं की नाही विचार करून ठरव." क्षणाचाही विलंब न लावता मी म्हणालो "प्रश्नच नाही. उद्या 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'च! बाकी काही बघता नाही आलं तरी चालेल!" तिनं दुसऱ्या दिवशी सकाळी राजू व मला रवाना करत स्वत: येण्याचं नाकारलं.
म्युनिकपासून २५ -३० कि.मी.वर असलेल्या `दाखाउ' या गावात असलेल्या 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप मेमोरियल साईट' या जागी मी राजूसह पोहोचलो.
 
 
 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'च्या स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार हे त्याकाळी कैद्यांना आणण्या-नेण्यासाठी वापरले जाणारे एकमेव द्वार होते. बाकी संपूर्ण प्रांगणास उंच भिंतीचा विळखा पडलेला होता. त्यामुळे कैद्याला पळून जाण्यास किंचितही फट मिळत नसे. हिटलरने चान्सलरपद हस्तगत केल्यावर काही आठवड्यातच, दि. २२ मार्च १९३३ रोजी हा 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप' त्याच्या विरोधकांसाठी बांधण्यात आला. राजकीय विरोधक व ज्यू लोकांचा छळ व सामुदायिक हत्या करण्यासाठी हिटलरला `वेगवान, खात्रीशीर व किफायतशीर योजना' राबवण्याची निकड होती. अशी योजना `दाखाउ' येथे सर्वप्रथम यशस्वीरित्या राबवण्यात आली व नंतर असे सर्व `कॅंप' बांधण्यासाठी `दाखाउ कॅंप' हा `मॉडेल' धरला गेला. या `छळ-छावणी' चे एकूण १७ भाग आहेत. त्यापैकी ` मेन्टेनन्स' विभागाच्या इमारतीत प्रदर्शन मांडले आहे. या प्रदर्शनात मोठमोठ्या पँनल्सवर १९१८साला पासून, `हिटलर'च्या उदयापासून १९४५ साली छळ-छावणीतील कैद्यांच्या मुक्ततेपर्यंतच्या राजकीय घडामोडींचे छायाचित्रांसह वर्णन, चित्रफिती, तसंच, छळ-छावणीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू, आयुधे, रजिस्टर्स, शिक्के वगैरे बाबी मांडून ठेवल्या आहेत. प्रदर्शनातील प्रत्येक खोलीत शिरताना तेथील `नाझी' शिपायांची मानवी उंची इतकी मोठी छायाचित्रे उभी केली आहेत. त्यामुळे खोलीत शिरताना अनेकदा समोर नाझी सैनिकच उभा असल्याचा भास होतो व दचकायला होतं.
 
प्रदर्शनातील पँनल्सवर सुरुवातीला, १९१८ साली सेप्टेंबरमध्ये पहिल्या महायुध्दात जर्मनीचा पाडाव होऊन जर्मनीचा राजा कैसर हा हॉलंडला पळून गेला यासंबंधीची छायाचित्रे व माहिती लावलेली होती. त्यातच पुढे अशी माहिती होती की, दोस्त राष्ट्रांनी जर्मनीपुढे ठेवलेल्या `शरणागतीच्या करारावर' सह्या करण्यासाठी जर्मनीच्या वतीने कोणी राष्ट्रप्रमुखच न राहिल्यामुळे नाइलाजास्तव [त्यावेळी त्रिशंकू अवस्थेत असलेल्या] जर्मन संसदेत त्यातल्या त्यात सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या `सोशल डेमोक्राट्स' या पक्षाला सह्या करणे भाग पडले. या काळात जर्मनीत तीन-चार प्रमुख पक्ष होते. १] सोशल डेमोक्राट्स- समता व बंधुत्व हा त्यांचा नारा होता २] ख्रिश्चन सोशलिस्ट- यांचा `ज्यू'ना प्रखर विरोध असला तरी नेते मात्र खाजगीत `ज्यूं'शी मैत्रीचे संबंध ठेवत. त्यांच्या नेत्याचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. नेत्यांच्या व त्यांच्या भाषणांच्या लोकप्रियतेच्या बळावर हा पक्ष अवलंबून होता. ३] पँन जर्मन नाशनालिस्ट - जर्मन वंश [प्रामुख्याने प्रोटेस्टंट] व जर्मन भूभागाचे एकीकरण आणि डाव्यांचा विरोध असे यांचे प्रमुख उद्दिष्ट होते [यांच्यातही बहुतांश जणांना `ज्यूं'बद्दल द्वेष वाटे]. ४] कम्युनिस्ट- जर्मनीचा पराभव त्यांना साम्राज्यवाद-भांडवलदारीचा पराभव वाटत होता व कामगार-क्रांती साठी चालून आलेली सुवर्णसंधी वाटत होती. याखेरीज अन्य पक्ष होतेच, परंतु ते प्रमुख चार पक्षांना आलटून पालटून पाठींबा देत भुरट्या राजकारणातच गर्क होते. त्याकाळातील या राजकीय माहिती सोबत पँनल्सवर त्या नेत्यांची, बैठकांची व शरणागती सह्या करतानाची छायाचित्रे लावलेली होती. कैसर पळून गेल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या सोशल डेमोक्राट्सना आपोआप सत्ता मिळाली. परंतु त्याबरोबरच शरणागतीवर सह्या क्रमप्राप्त ठरल्या. पुढील काळात जर्मनीवर युध्द व पराभव या दोन्हींचे प्रचंड परिणाम घडू लागले. पायाभूत सुविधा बऱ्याच अंशी उध्वस्त झाल्या होत्या, चलन फुगवटा प्रचंड होऊन महागाईने टोक गाठले होते. विरोधक तर होतेच, पण सत्तेत सहभागी असलेले पक्ष देखील सोशल डेमोक्राट्सना धमकावून अडचणीत आणत, स्वत:च्या मर्जीतल्या लोकांना सरकारी कंत्राटे मिळवून देत असत. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला होता. सर्व विरोधक व विशेषत: कम्युनिस्ट जनतेत सतत असंतोष माजवत होते व संप करून सत्ता उलथवण्यास चिथावणी देत होते. शरणागती करारावर सोशल डेमोक्राट्सनी नोव्हेंबर [१९१८] मध्ये सह्या केल्या होत्या म्हणून त्यांना `नोव्हेंबरचे हरामखोर' म्हणून हिणवले जाऊ लागले. प्रदर्शनातील पँनल्सवरची त्याकाळातील निवडणुकांतील पोस्टर्स, जाहिराती, मोर्चाची छायाचित्रे पाहून पूर्वी मी वाचलेल्या जर्मनीच्या इतिहासाचा पडताळा होत होता आणि का कुणास ठाऊक, भारताच्या सद्य:स्थितीशी मनोमन तुलनाही होत होती.
 
याच काळात हिटलरने राजकारणात पदार्पण करून सोशल डेमोक्राट्स बरोबरच `ज्यूं'वर पराभवाचे खापर फोडायला सुरुवात केली. [त्याकाळी बहुतांश बँका-पतपेढ्या सकट सावकारी धंदा `ज्यूं'च्या हाती होता. बरेचसे अवैध धंदेही `ज्यू' लोकांच्या हाती होते. तसेच काही `ज्यूं'वर फितुरी केल्याचा व जर्मनीची काही गोपनीय कागदपत्रे शत्रूस विकल्याचा आरोप केला जात होता. ] त्याकाळी युरोपियन्सना, विशेषत: जर्मन्सना `ज्यू' लोकांबद्दल कमालीचा तिरस्कार होता. त्यामुळे हिटलरने `ज्यूं'च्या विरुध्द भाषणे देण्यास सुरुवात केल्याबरोबर त्याला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. लोकांच्या प्रतिसादाचा कानोसा घेऊन त्याने एप्रिल १९२०मध्ये आपल्या पक्षाचे नाव बदलून `नाझी' [नाशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी] असे नाव दिले व पक्षाचे धोरण व उद्दिष्ट जाहीर केले. : १] सर्व जर्मन भूमी एकत्र करून `विशाल जर्मनी' स्थापन करणे २] `ज्यूं'चे नागरिकत्व काढून घेऊन सरकारी पदांवरून काढून टाकणे. त्यानंतर त्याने शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी `व्यायाम, खेळ व [जर्मन] संस्कृतीचे' प्रशिक्षण देण्यासाठी `एस. ए.' नामक एक संघटना सुरु करून जागोजाग त्या संघटनेच्या शाखा स्थापन केल्या. यानंतर लागलीच पक्षाची `एस.एस.' नामक एक `सैनिकी संघटना'ही सुरु केली. जर्मन वंशाचा, संस्कृतीचा व देशाचा जाज्वल्य अभिमान तरुणांमध्ये रुजवण्याचे कार्य या नावाखाली प्रत्यक्षात मात्र `ज्यू' धर्मियांचा द्वेष पसरवण्याचे विषारी काम `एसएस' व `एसए' या संघटना करीत असत. हे सर्व सांभाळण्यासाठी काय करावे हे सोशल डेमोक्राट्सना कळत देखील नव्हते. आणि कळले, तर उपाययोजना करण्याची धमकच त्यांच्या नेत्यांत नव्हती. अन्य पक्षियांचा पाठींबा मिळवत कशीबशी सत्ता टिकवण्याची केविलवाणी धडपड करण्यात त्यांचा शक्तिपात होत होता. या वाचलेल्या इतिहासापैकी बरेच उल्लेख या प्रदर्शनात छायाचित्रांसह सापडत होते. आणि त्यात भारतीय राजकारण अनिवारपणे डोकावत होते.
 
सुरुवातीच्या काळात केवळ २.६टक्के मते मिळवू शकणाऱ्या हिटलर व त्याच्या पक्षाला १९३२ साली, म्हणजे पुढील केवळ ११-१२ वर्षांत ३७ टक्के मते मिळाली. एवढी दीर्घ व वेगवान झेप नाझी घेऊ शकण्याचे कारण एसएस व एसए या संघटनांनी चोख बजावलेले `ज्यू' द्वेष पसरवण्याचे कार्य हे जितके होते, तितकेच शेवटच्या तीन वर्षांत आलेली जागतिक मंदी, त्यामुळे आलेली बेरोजगारी, भडकलेली महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार व ही सारी परिस्थिती हाताळण्यात सोशल डेमोक्राट्सना येणारे सपशेल अपयश, त्यांच्या नेतृत्वात असलेला दुबळेपणा हे देखील होते! सर्व प्रश्नांवर सोशल डेमोक्राट्सकडे फक्त "शांतता, समता व बंधुभाव!" यापलीकडे उत्तर नव्हते. याउलट हिटलर बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचार या साऱ्याचे अगदी सोप्पे कारण देत होता, ते म्हणजे `ज्यूं'चा देशद्रोह व सोशल डेमोक्राट्सनी चालवलेले `ज्यूं'चे तुष्टीकरण!! जणू देशभक्ती म्हणजेच `ज्यू' द्वेष!! हे जनतेला झटकन आकर्षून घेणारे तत्वज्ञान होते. `ज्यूं'चा द्वेष हा ते आपल्या देशभक्तीचा पुरावा मानू लागले. हिटलर त्याच्या सभांमध्ये गर्जत असे, " सोशल डेमोक्राट्स हा पक्ष म्हणजे समता व बंधूभावाचा बुरखा पांघरलेली रोगट वेश्या आहे!!" आणि जनता टाळ्यांचा कडकडाट करत असे. हिटलरच्या सभांना होणारी गर्दी पाहून कॉर्पोरेट्स मागे राहणे शक्यच नव्हते. हिटलरच्या बाहूंना [आर्थिक] बळ देण्यासाठी `हायडेलबर्ग' च्या कारखानदारांपासून बीएमडब्ल्यू, फोक्स-वेगन पर्यंत सारे विख्यात उद्योगपती हिटलरचे गोडवे गात नाझींच्या तंबूत दाखल झाले. हे बळ वापरून हिटलर कम्युनिस्टांसह अन्य पक्षांची मदत घेऊन [नाझी विरोधी] सोशल डेमोक्राट्सप्रणीत आघाडी सरकार विरुध्द सेप्टेम्बर १९३२मध्ये अविश्वासाचा ठराव आणून तो संमत करून घेऊ शकला. याच उद्योगांच्या `आर्थिक बळावर' पुढच्या मुदतपूर्व निवडणुकीत नोव्हेंबर १९३२ मध्ये नाझी पक्षाला ५४५ पैकी १९६ जागा मिळूनही तो चान्सलरपद हस्तगत करू शकला आणि पुन्हा मुदतपूर्व निवडणूक घेऊन मार्च १९३३ मध्ये २८८ [बहुमत] जागा मिळवू शकला. एकंदरीत `भिन्नधर्मियांच्या द्वेषावर आधारित `राष्ट्रवाद' आणि उद्योगपतींचे आर्थिक बळ यांच्या मैथुनातून २१ मार्च १९३३ रोजी हिटलरचे `थर्ड राइश' जन्माला आले!!
 
आणि २२ मार्च १९३३ रोजी `दाखाउ' छळ छावणी प्रस्थापित झाली. इतिहास वाचताना तारखा अशा कधी भयानकरीतीने समोर आल्या नव्हत्या. प्रदर्शनानंतर छळ-छावणीतील बराचसा भाग जतन करून ठेवला आहे तो पाहिला. कैद्यांचे [प्रामुख्याने `ज्यू'] हजेरी घेण्याचे मैदान, त्यांचा कोंडवाडा, शौचालय व सर्वात शेवटी शॉवर [स्नानगृह] म्हणजेच छुपे गैस चेंबर व त्याच्या बाजूला दहनगृह. एका कोंडवाड्यात ६००, असे एकूण ४० कोंडवाड्यात मिळून २४,००० कैदी डांबण्याची तेथे `व्यवस्था' होती. या सर्व कैद्यांपैकी बहुतांश कैदी `ज्यू' असल्यामुळे "ते देशद्रोही असणारच, मग त्यांची चौकशी, न्यायनिवाडा करण्याची गरजच काय??" म्हणून एसएस व एएसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ट्रकमधून आणल्यावर आरोप-गुन्हे वगैरे कसलीही शहानिशा न करता ते `ज्यू' आहेत हाच गुन्हा असल्याचे गृहीत धरून कैद्यांची वर्गवारी केली जाई. १] `उपयुक्त' [तरुण, जे अंगमेहनतीचे काम करू शकतील असे] २] मध्यम उपयुक्त [मध्यमवयीन. जे मेहनत करू शकत नसत. त्यामुळे विविध रोगांचे व औषधांचे परिणाम तपासण्याच्या प्रयोगांसाठी वापरले जात, असे] ३] अनावश्यक [ज्यांचा कुठलाच उपयोग नाही असे म्हातारे]. `उपयुक्त' वर्गातील `ज्यू' स्त्रियांचा `उपयोग' साहजिकच तेथील एसएस व एएस संघटनांचे पदाधिकारी `सांस्कृतिक कार्यासाठी' करीत असत. तर `मध्यम उपयुक्त' स्त्रिया `राष्ट्रभक्त' ज्येष्ठ जर्मन अधिकाऱ्यांच्या `घरगुती कामासाठी' वापरल्या जात. स्मारकाच्या शेवटच्या भागात गैस चेंबर व दहनगृह आहे. गैस चेंबरमध्ये एका वेळी ५० `अनावश्यक वर्गीयांना' [`ज्यूं'ना] ठार मारण्याची व दहनगृहात ६ मेलेल्या `अनावश्यकांना' जाळण्याची `सोय' केलेली होती. त्यामुळे गैस चेंबरबाहेर दहनासाठी प्रेतांचे `वेटिंग' असे. गैस चेंबरच्या बाहेर चेंबरमध्ये नेण्यात येणाऱ्या व त्यानंतर दहनासाठी रचण्यात आलेल्या प्रेतांच्या ढिगाची छायाचित्रे लावली आहेत. पुढचे छायाचित्र २९ एप्रिल १९४५ रोजी अमेरिकन सैन्याने येथील कैद्यांना मुक्त केले त्याचे होते. तोपर्यंत संस्कृतीचे अभिमानी व राष्ट्रभक्त एसएस व एएसच्या सदस्यांनी अदमासे ४१,५०० कैद्यांना चेंबरद्वारे या `इहलोकातूनच मुक्त' केले होते. काहीकाळ मी सुन्न होऊन तिथेच उभा राहिलो.
 
परत आल्यावर देखील काहीच बोलावेसे वाटत नव्हते. काही वेळानंतर `क्लौडीया'ला विचारले, "तुझ्या आई-वडिलांना कधी विचारले होतेस का, की त्या काळात हिटलरला इतकी मतं कशी मिळालीत? हिटलरबद्दल त्यांचे त्याकाळी काय मत होते?" क्लौडिया काही क्षण गप्प बसली. मग म्हणाली, "माझी आई सांगायची, `सगळा मध्यमवर्ग `जर्मन राष्ट्रवाद' आणि `ज्यू'द्वेषानं पेटला होता. त्यात `दुबळ्या लोकशाही'चा त्यांना तिटकाराही आला होता, त्यांना हिटलर `पोलादी पुरुष' वाटत होता. काही जाणते लोक सांगत की, हिटलर हुकुमशहा बनेल, तो पुन्हा देशाला युध्दाकडे नेईल, विरोधकांची कत्तल घडवेल! पण सामान्य लोकांचा त्यावर विश्वासच बसत नसे. हत्याकांड, युध्द वगैरे होणं इतकं सोपं आहे का? असा ते प्रतिप्रश्न करत. काहीजण तर काही `ज्यू' मेले तर मरू देत, हिटलर हुकुमशहा झाला तर होऊ देत! पण तो देश तरी सुधारेल! असे म्हणत."या माहितीमुळे मला आश्चर्य वाटलं आणि ती सध्याच्या भारतातील मध्यमवर्गाबद्दल बोलतेय की काय असंही वाटायला लागलं. पुन्हा विचारलं, " आईचं स्वत:चं मत काय होतं?" ती म्हणाली, "आईच नव्हे, संपूर्ण मध्यमवर्ग तेंव्हा महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारानं गांजून गेला होता त्यामुळे `दुबळ्या शांतता-समतावादी सरकार विरोधी झाला होता. माझे आजोबा बेरोजगार झाले होते, त्यांना नाझींमुळे नोकरी मिळाली, त्यामुळे त्यांना हिटलर देशाला तारेल असे मनापासून वाटत होते, असे आई सांगत असे. पहिल्या काही दिवसात हिटलरनं भ्रष्टाचारी `ज्यूं'ना पकडलं होतं, महायुध्दात उध्वस्त झालेले पूल, रस्ते, इमारती वगैरे दुरुस्तीची कामे, नवीन प्रकल्प उभारणीची कामं खूप वेगानं केली होती. त्यामुळे मध्यमवर्गाला हिटलर हा पोलादी पुरुष, `डायनामिक' आणि देशाचा तारणहार वाटत होता" क्लौडिया सांगत होती, आणि मी भारतातील साम्यस्थळ जाणवून धास्तावत होतो. "माझे वडील तर प्रभावित होऊन जर्मन सैन्यात दाखल झाले होते. त्यांना युध्दकैदी म्हणून पकडून इंग्लंडला नेलं होतं. नंतर सोडलं त्यांना, ते अत्याचारात सामील नव्हते म्हणून " - ती पुढं म्हणाली. मी स्तिमित होऊन विचारलं, "मग नंतरच्या काळात त्यांना काय वाटायचं ते तू विचारलंस का त्यांना?" "हो. खूप वेळा. पण त्यांनी कधीच त्याचं उत्तर दिलं नाही. नुसतं शून्यात बघायचे. मी मोठी झाल्यावर प्रश्न नव्हे जाब विचारू लागले वडलांना… पण नंतर ते आणखी आणखी गप्प होत गेले. पुढे पुढे तर ते काहीच न बोलता घुम्यासारखे बसून असायचे. आता मला खूप वाईट वाटतं, मी त्यांना टोचणारे प्रश्न विचारून क्लेश दिले म्हणून. ते एकटेच नव्हे सगळा मध्यमवर्गच भुलला होता की `एकव्यक्तीकेन्द्री' नाझीवादाला, त्या सर्वांनाच मनापासून वाटत होतं की, `नोव्हेंबरच्या हरामखोरांना आणि ज्यूंना हाकलून दिल्याखेरीज देश सुधारणार नाही असे!' वेर्नर हायडर हे एक होते अशा असंख्य लोकांपैकी! सगळ्यांनी मिळून हिटलरला निवडून दिलंय एकट्या वेर्नर हायडरने नव्हे!"- ती म्हणाली. "वेर्नर हायडर म्हणजे कोण?"मी विचारलं. " माझे वडील. मी माझ्या वडलांना जाब विचारून क्लेश दिल्याबद्दल जितकं दु:ख होतं, तितकंच वडलांनी हिटलरला मत देऊन नंतर त्याच्याबाजूनं युध्द केल्याबद्दलही !!! डोकं भणाणून जातं याबाबतीत विचार करून!"- ती म्हणाली. " तुझ्या आणि तुझ्या पुढच्या, म्हणजे हल्लीच्या पिढीला काय वाटत नाझी कालखंडाबाबत?"- मी विचारलं. ती अधिकच खिन्नपणे म्हणाली, "आमची पिढी तर जर्मन असण्याची केवळ लाज बाळगत जगली. जगभरात कुठेही `जर्मन' म्हणून ओळख देताना मान खाली जायची. आमची पिढीनं दुभंगलेला देश अनुभवला. आत्ताच्या पिढीला कदाचित तितके अपमानित वाटत नसेल. कारण आता पुन्हा जर्मनी एक झाला, आता नाझींच्या आठवणी सांगू शकणारे त्या पिढीतले कोणी राहिलेले नाहीत फारसे. पण तरी या `दाखाउ' 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप मेमोरियल सारख्या वास्तू आहेत ना बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे आपल्या पूर्वजांचं पाप विसरणं अशक्य आहे नवीन पिढीला देखील. क्वचित एखादा निओ नाझी निपजतो आणि काही कारवाया करूही पाहतो. परंतु असे लोक अर्धा टक्का देखील नाहीत. आणि दुसरं, जर्मनीत हिटलर, नाझी याचं दुरान्वये देखील समर्थन करणे, किंवा `ज्यूं'बद्दल अप्रत्यक्षदेखील अपशब्द बोलणं हा कायद्यानं मोठा गुन्हा आहे. त्यामुळे धार्मिक द्वेष आणि आक्रमक राष्ट्रभक्ती या दोनही जीवघेण्या रोगांना जालीम प्रतिबंधक लस संपूर्ण नव्या पिढीला टोचली गेली आहे." क्लौडियाचं ऐकताना `दाखाउ'ला येण्याचं तिनं का नाकारलं त्याचा उलगडा मला झाला.
 
जर्मनीत १५ वर्षे राहिलेला राजू एव्हाना भारताबद्दल ऐकण्यास अधीर झाला होता. संधी मिळताच राजूनं विचारलं, "भारतात कसं आहे रे सध्या? मी गप्प बसलो. त्यानं पुन्हा विचारलं "तिथंही डायनामिक नेत्यांच्या मागे मोठेमोठे उद्योगपती पैशाच्या थैल्या घेऊन उभे राहिलेत म्हणे?". हा प्रश्न ऐकून वेर्नर हायडरप्रमाणे मलादेखील शून्यात पाहात राहण्याखेरीज पर्याय दिसेना…
 
 
लोकेश शेवडे ४/११/१३ दुपारी १.४०

Wednesday, January 22, 2014

भाजपचा `दिग्विजय'


                                                                भाजपचा `दिग्विजय' 

 माझा एक सख्खा मित्र ज्योतिषी आहे तर दुसरा तितकाच सख्खा मित्र अत्यंत बुद्धीप्रामाण्यवादी. ते दोघे एकमेकांचे कट्टर वैरी. मी आपला दोघांनाही सांभाळून असतो  दुसऱ्याला खोटे पाडण्यासाठी, दुसऱ्याच्या तत्वांची हुर्यो करण्यासाठी दोघेही सतत आटापिटा करत असतात. `विज्ञान, मानवी बुद्धी आणि लॉजिक' किती तोकडे पडते ते पहिला सांगत फिरत असतो. याउलट पाहिल्याचे भाकित चुकून  कधी खरे ठरले तरी दुसरा त्यात `लॉजिक'च कसे होते, घडले ते `विज्ञानानुसारच' कसे घडले ते पटवू पाहतो. मी आपला सामान्य माणूस असल्यामुळे त्यातले काहीच कळत नाही, त्यामुळे मी फक्त त्या दोघांचे भांडण व त्यांचे एकमेकांसमोर येणे टाळायचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्याच्या समोर मी कधीही मान्य केले नसले तरी एक गोष्ट मात्र कबूल करावी लागेल की अधून-मधून पहिल्याने वर्तवलेले अत्यंत उटपटांग भविष्य खरे ठरलेले पाहून मी सुध्दा चक्रावलो आहे. उदा. मागे एकदा त्यानं असं भाकित केलं की "भारतीय जनता भ्रष्टाचार निर्मुलनासाठी मेणबत्त्या लावेल".  तेंव्हा मला कळेच ना की भ्रष्टाचार आणि  मेणबत्त्यांचा संबंध काय? पण नंतर जेंव्हा भारतभर लोक `मी अण्णा हजारे' असे छापलेल्या टोप्या लावून मेणबत्त्या लावून फिरले तेंव्हा मात्र भाकित खरे ठरले हे पटले. दुसरा मात्र म्हणत राहिला की "अशा माकडचेष्टांनी भ्रष्टाचार निर्मुलन होणे अशक्य आहे  आणि प्रत्यक्षात झालाही नाही." वगैरे वगैरे. `भ्रष्टाचार' भले न जावो पण तरीही `मेणबत्त्यांचे' भाकित खरे ठरले होतेच ना!! त्यामुळे मला याला भाकित म्हणावे की `लॉजिक' हा उलगडा मात्र झालाच नाही. असेच पूर्वी एकदा पहिल्याने सांगितले की, यापुढे भारतात अत्यंत गरीब जनतादेखील फक्त कोट्याधीश -अब्जाधीशांना आमदार-खासदार म्हणून निवडून देईल. तेंव्हाही दुसऱ्याने या त्याच्या भाकिताला  त्याच वेळी आक्षेप  घेऊन म्हटले,"अरे,  निवडणुकीत तिकीट मिळवण्यापासून मतदानापर्यंत इतके पैसे खर्चावे लागतात की कोट्याधीश-अब्जाधीशच निवडणूक जिंकू शकतो.  त्यामुळे तुझे भाकित हे भाकित नसून निव्वळ `लॉजिक' आहे!!". त्यानंतरचे निवडणुकीचे निकाल पाहून भाकित की लॉजिक हा माझा गोंधळ मात्र दूर झालाच नाही.

काल हा माझा पहिला मित्र अचानक समोर उभा ठाकला. आणि म्हणाला, "एकवीसशे चौदा साली भारतात निवडणुका होतील, त्यात भ्रष्टाचार, महागाई आणि विकास हे प्रमुख मुद्दे असतील. आणि त्यावर्षी भाजप दिग्विजय सिंहांचा पुतळा उभारेल." आतापर्यंत हा माझा मित्र पुढच्या पाच-सात वर्षांचं भविष्य सांगत असे, याखेपेस त्यानं थेट शंभर वर्षांची मजल मारली हे पाहून मी दचकलोच. जेंव्हा नजीकच्या काळाचे भविष्य तो सांगत असे तेंव्हा त्यात `लॉजिक' असण्याची खात्री नसली तरी तशी शक्यता मलादेखील वाटत असे. पण याखेपेला शंभर वर्षांचा प्रश्न असल्यामुळे मला यात लॉजिक नसून शुध्द भविष्य आहे याची बालंबाल खात्री पटली. एकदाचा माझ्या मनातला गोंधळ दूर झाल्यामुळे बऱ्यापैकी आत्मविश्वासानं मी दुसऱ्याकडे गेलो आणि त्याला हे भविष्य सांगून टेचात म्हणालो,
 "आता बोल, यावर तुझं काय म्हणणं आहे?" त्यानं तोंडातल्या तंबाखूची पिचकारी मारून पुन्हा नेहमीचं उत्तर दिलं,
"हे कसलं भविष्य? सिम्पल लॉजिक आहे?" भविष्यावर मारलेल्या  पिचकारीचा मला रागच आला आणि जरा आक्रमकपणे म्हणालो,
"नुसत्या पिचकाऱ्या मारून काही होत नाही. तुला ते लॉजिक खुलासेवार मांडून सिद्ध करावं लागेल." यावर त्यानं पाणी घेऊन खळखळून चूळ भरली आणि म्हणाला,
"अरे, आता दोनहजार चौदा साली निवडणूक होणार आहे. दर पाच वर्षांनी निवडणूक होते, याचा अर्थ विसावी निवडणूक शंभर वर्षांनी, एकवीसशे चौदा साली असेल इतकं साधं गणित आहे. दुसरं, भारतीय जनता स्वत:च इतकी भ्रष्ट आणि नादान आहे, की भ्रष्टाचार, महागाई हे कुणाचीही कितीही सरकारं आलीत तरी भारतातून कधीच जाणार नाही आणि विकास कधीही होणार नाही. त्यामुळे हे मुद्दे शंभर वर्षांनी देखील चालूच असतील, हे सांगायला काही ज्योतिषशास्त्र लागत नाही `लॉजिक' लागतं." त्याचं उत्तर मला काहीसं पटायला लागलं. म्हणून स्वत:ला सावरत त्याला निरुत्तर करणारा माझा जमालगोटा प्रश्न विचारला,
"पण मग भाजप त्यावेळी पुतळा का उभारेल?"
"ती त्यांची पध्दतच आहे. आता नाही का सरदार पटेलांचा पुतळा उभारणार आहेत ते?" तो दात कोरत म्हणाला. त्याचं म्हणणं मला आणखी थोडं पटायला लागलं. पण मन पराभव पत्कारेना. म्हणून विचारलं,
"पण पुतळा ते कॉंग्रेसच्या नेत्याचा उभारतील हे कशावरून?"
"आतासुध्दा ते सरदार पटेलांचा, म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्यांचाच उभारताहेत की. !!" हे मला बऱ्यापैकी मान्य झालं, पण पूर्ण नाही.
"पण कॉंग्रेसच्या नेत्यांचाच पुतळा उभारणार असतील तर मग इंदिराजींपासून सोनियाजींपैकी कोणाचा का नाही?"
"नाही. ते शक्य नाही. गांधी नाव असलेल्या व्यक्तीचा पुतळा ते उभारत नाहीत त्यांच्या शिष्यांचा उभारतात. आतादेखील ते महात्मा गांधींचा पुतळा कुठे उभारताहेत? गांधीजींच्या शिष्याचा, म्हणजे सरदार पटेलांचा उभारताहेत. गांधीजींचा नव्हे."  माझ्या शंका फिटत आल्या होत्या. तरी एक प्रश्न विचारल्या शिवाय राहवेना म्हणून विचारलं,
"पुतळेच उभारायचे असतील तर भाजप स्वत:च्या पक्षातल्या नेत्यांचे का नाही उभारत?"
"पुतळा उभारावा अशा लायकीचे नसतील कदाचित कोणी त्यांच्यात. मग काय करतील बिचारे? पण ते जाऊ दे, मुद्दा असा की ज्योतिष-बितीष सगळं थोतांड आहे. माहिती आणि लॉजिकचा वापर करून हे लोक पुढे काय घडेल ते ओळखतात आणि सर्वात महत्वाचं असं आहे की शंभर वर्षांनी काय घडणार आहे ते तपासायला तू, मी आणि तो भंपक ज्योतिषी असणार आहोत कुठे?"
हे ऐकून मीच पुतळ्यासारखा थिजलो...............
 लोकेश शेवडे

चॉकलेट्स आणि कोको

चॉकलेट्स आणि कोको 
 
वाईट सवयींमुळे, व्यसनांमुळे केवळ त्या व्यक्तीचे आयुष्यच बरबाद होते असे नाही तर त्या व्यक्तीचे कुटुंब, समाज, देश या सर्वांवर गंभीर परिणाम होत असतात हे एखाद्या मूर्खालादेखील समजू शकते, त्यामुळे लोकप्रतिनिधींना समजणारच. याबाबत लहानपणापासूनच मुलांना सांभाळलं पाहिजे, अन्यथा त्यांना चटकन चित्र-विचित्र सवयी लागतात, परिणामी पुढची पिढी अत्यंत रोगट निर्माण होते हे देखील सर्वांना समजले पाहिजे.    हल्लीच्या लहान मुलांना चॉकलेट्स शिवाय चालतच नाही. आमच्या काळात असं नव्हतं. लहान मुलांना आम्ही चॉकलेट्स अज्जिबात देत नसू. आम्हीच नव्हे त्याकाळी मुलांना चॉकलेट्स कोणीच देत नसत. अर्थातच, मुलांना चॉकलेट्स नाकारण्यामागे कारण म्हणजे मुलांचे दात किडणे. सर्वेक्षणात असे आढळून आले की लहानपणी चॉकलेट्स खाणाऱ्या मुलांपैकी २९ की  ३९ टक्के मुलांचे दात नंतर किडतात. आता, ही टक्केवारी किडक्या मुलांची, सॉरी, किडक्या दातांच्या मुलांची की निव्वळ किडक्या दातांची, त्यात २९ टक्के बरोबर की ३९ टक्के असे बरेच वाद होते ही गोष्ट अलाहिदा!![ इंग्रजीत लहान मुलाला `कीड' म्हणतात त्याचे कारण ती मुले चॉकलेट्स खातात हे असावं की काय कुणास ठाऊक.] पण, हे गोड खाणं, चॉकलेट्स खाणं यामुळे लहान मुलांवरच नव्हे तर म्हाताऱ्यांवरदेखील गंभीर परिणाम होतो हे निश्चित. मुलांचे दात किडतात आणि म्हाताऱ्यांचे तर पाहायलाच नको,  म्हणजे आपण नव्हे, त्यांनीच पाहायला नको, आय मीन, ते पाहूच शकत नाहीत कारण गोड, चॉकलेट्स खाऊन मधुमेहानं त्यांचे डोळेच जातात. त्याखेरीज किडनी, हृदय वगैरेवर परिणाम आणि पायाला गॅगरीन हे सारे वेगळेच!!! आज मधुमेहींची संख्या इतकी वाढली आहे की … जाऊद्या. 

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे, परवा एका ठिकाणी एक आजोबा आणि एक नातू असे एक दुकानाबाहेर उभे राहून चॉकलेट्स खाताना पाहिले. अविर्भावावरून त्या आजोबांचे डोळे आणि नातवाचे दात गेलेले वाटत होते…त्या आजोबांचा मुलगा, म्हणजे नातवाचा बाप, असा तो बाप कम मुलगा, हतबल कम हताशपणे त्या दोघांचे चॉकलेट्-चर्वण पाहात उभा होता! दरम्यान आजोबांनी आणखी चॉकलेट्स विकत घेण्यासाठी खिशातून पैसे काढले. एवढ्यात एक गुंड धक्काबुक्की करत नातवाला ढकलून देऊन आजोबांकडील नोटांचे आख्खे बंडल घेऊन पळून गेला. `चोर, चोर, पकडा पकडा' असा गिलका करत गर्दी जमा झाली आणि चोर पळून गेल्याच्या दिशेनं हातवारे करत सर्वांनी त्या तिघांभोवती असं कोंडाळं केलं की जणू आजोबा म्हणजे `आयटम गर्ल'!! इतक्यात ती गर्दी पाहून एक शुभ्र वस्त्रांकित, महाकाय तिथे अवतरला आणि त्यानं त्या साऱ्या गर्दीचे लक्ष त्या तिघांकडून काढून स्वत:कडे वेधून घेतलं. त्याचा वर्ण असा विलक्षण होता की त्याच्या चेहऱ्यावर गॉगल आणि केस वेगळे कळतच नव्हते. त्याला पाहून लगोलग चार फूट उंच, दीड फूट व्यासाचा एक कॉन्स्टेबलही अचानक कुठूनतरी तिथे उपटला आणि त्यानं लागलीच मोबाईलवरून अर्धा फूट मिशीवाल्या त्याच्या `पीआय' साहेबालाही बोलावून घेतलं. त्या `लक्षवेधी'च्या पांढऱ्या-फटक कपड्यांवरून तो नेता असावा हे कळत होतंच पण त्याच्या जरबयुक्त स्मितहास्यामुळे  तो तेथील लोकप्रतिनिधीच असावा हे सर्वांनीच ताडलं आणि गर्दीतला प्रत्येकजण चेहऱ्यावर निखळ  ओशाळपण आणून त्याच्याशी बोलू लागला. त्या इन्स्पेक्टरनं त्या `ब्लाक एंड व्हाइट' `होल्डॉल'साठी आणि  स्वत:साठी त्याच दुकानातल्या खुर्च्या उचलून आणून तिथंच जाब-जबाब घेणं सुरु केलं.
"कुठं राहता? कशासाठी आलात इथं ? खिशातून पैशे बाहेर का काढले?"- त्यानं प्रश्नांचा गोळीबारच सुरु केला. प्रत्येक प्रश्नानंतर तो मिशीवर बोटे फिरवत त्या पांढऱ्या-कुट्ट पेहरावाकडे  दाद मिळवण्याप्रित्यर्थ पाहत होता. त्यावर तो नेताही स्वत:च्या बोटातील सोन्याची जाड अंगठी फिरवत नितांत वाणिज्य दाद द्यायचा. इन्स्पेक्टर अशा अविर्भावात प्रश्न विचारायचा की गर्दीतल्या नवीन लोकांना ते तिघंच चोर वाटत होते.
"नोटांचे नंबर माहित आहेत का? नोटा ओळखू शकाल का?" 
"नाही"  
"निदान चोराला ओळखाल का? त्याला आधी कधी कुठं पाह्यलं होतं का?" या प्रश्नांवर तिघांनीही नकारात्मक मान डोलावली हे पाहताच इन्स्पेक्टरनं  चिडून हातातली छडी आपटली. दचकून म्हातारा म्हणाला,
"मी कसं पाहणार? मला दिसतच नाही. माझे डोळे मधुमेहानं गेलेत" 
"दिसत नाही तर मग घरात बसायचं!! इथं कशाला आलात? बरं, आलात ते आलात, वरून एवढ्या नोटा कशाला बाहेर काढल्या?" इन्स्पेक्टरने म्हाताऱ्याला खडसावलं. 
"चॉकलेट्स खरेदीसाठी आलो होतो आणि चॉकलेट्सचे पैसे देण्यासाठी  बटवा खिशाबाहेर काढला होता" हे म्हाताऱ्यानं सांगितल्यावर इन्स्पेक्टर आक्रसला पण ते कृष्ण-धवल गाठोडं मात्र विस्कटलं!
"म्हणजे, मधुमेहानं डोळे गेले तरी  चॉकलेट्स खाताय?? अहो आजोबा तुमचं वय काय आणि खाताय काय? आपल्याला झेपतं तेच आणि तेवढंच खावं माणसानं!!!" मग त्याच्या नातवाकडे वळून ओरडला, "काय रे पोरा? दात किडले तुझे तरी खातोस का  चॉकलेट्स?? लाज नाही वाटत का एवढा गोरा असून काळे दात घेऊन फिरायला?" ओरडताना नेत्याच्या चेहऱ्यातून त्याचे पांढरे दात, रस्त्याच्या कडेचे पांढरे दगड काळोखात जसे दिसतात तसे दिसत होते.    
"इन्स्पेक्टरसाहेब, आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत, दहाहजार रुपये गेलेत, त्या चोराला पकडा साहेब, तो लांब गेला नसेल अजून" मधली पिढी इन्स्पेक्टरच्या विनवण्या करायला लागली. 
"चोराला पकडणं म्हणजे काय सोपं वाटलं काय तुम्हाला, चॉकलेट्स खाण्यासारखं? चोराला पकडा म्हणे! इथे सबंध एरियासाठी मी एकटा पीआय! काय काय सांभाळायचं आम्ही?" त्या तिघांना झापता झापता तो अचानक त्या श्वेतवस्त्रावृताकडे वळून आवाजात मार्दव आणत म्हणाला,  "साहेब, एक जीप तरी अर्जंट वाढवून घ्यायला पाहिजे आपल्या एरियासाठी. तुम्ही सांगितलं मंत्रीसाहेबांना तर होऊन जाईल साहेब. तुमच्या सभा-मोर्च्याच्या कामी येईल." थोडं थांबून अतीव लाचारीनं ओथंबलेल्या आवाजात म्हणाला, " बदलीचं लवकर बघा ना साहेब, तुमचं ठरलेलं उद्याच पोचवतो. पण काम करून द्या." यावर तो अजस्त्र देह गॉगलच्या कोपऱ्यातून इन्स्पेक्टरकडे पाहात म्हणाला,
" उद्या, उद्या करताय नुसतं! आमच्या बिल्डींगमधले भाडेकरूसुध्दा हुसकले नाहीत अजून!"
"साहेब, उशीर झाला तर चोर सापडणार नाही हो …. साहेब!!" बाप कम मुलगा आर्जव करू लागला.   
"हा,… आम्ही चोरांना पकडायचं आणि पैसे परत मिळाले की तुम्ही परत चॉकलेट्स खायचे!!! मग परत तिथे चोर येणार!! दुसरं काही कामच नको करायला" इन्स्पेक्टर मिशा पिळत म्हणाला. मग ठेवणीतल्या नम्रपणानं अंगठीवाल्याला म्हणाला, "अशा लोकांमुळेच चोरांचं फावतं साहेब!! चॉकलेट्ससाठी आख्खं बंडल कशाला काढायचं?"
अंगठीधारकानं गॉगल काढून पुसला आणि खड्या आवाजात म्हणाला,
"चॉकलेट्समुळे पैसे चोरीला गेले ते गेलेच, शिवाय चॉकलेट्स खाऊन यांचे डोळे गेले, त्या पोराचे दात गेले ते आणखी वेगळेच!! त्यासाठी पुन्हा डॉक्टर, हॉस्पिटल, खर्च … त्याचं काय??" त्यानं संपूर्ण गर्दीकडेपाहून प्रश्नार्थक चेहरा केला. या प्रश्नानं  सारे थक्क होऊन आपल्या लोकप्रतिनिधीकडे कौतुकाने पाहायला लागले. त्यानं पुन्हा गॉगल लावला आणि आवाज वाढवून म्हणाला, "म्हणजे पुन्हा तुम्ही आम्हालाच म्हणणार, सरकारनं हॉस्पिटल काढावं, मोफत डोळे, दात तपासावे, मोफत उपचार करावे …. काय आजोबा??" या प्रश्नानं तर आता सारे अवाकच झाले. आता तो उत्तेजित होऊन उभाच राहिला आणि भाषण दिल्यासारखे बोलू लागला, 
`चॉकलेट्समुळे पुढच्या पिढीचे भविष्य किडतंय हे चॉकलेट्समुळेच आधीची पिढी पाहू शकत नाही!!!" या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. लोक एकमेकांशी कुजबुजत आपापल्या मुलांच्या, आई-बापांच्या अशाच तक्रारी सांगून त्यामुळे होणाऱ्या समस्यांची व खर्चाची कबुली देऊ लागले,जणू त्या नेत्यानं जनतेच्या वेदनेलाच वाचा फोडली होती. त्याचा आवाज आणखी वाढला,
"या दोनही पिढ्यांची आज दारुण अवस्था दिसतेय ती फक्त चॉकलेट्समुळेच!!! हे थांबवायचे असेल तर चॉकलेट्स खाणे थांबले पाहिजे!! म्हणून मी चॉकलेट्स विक्रीवर बंदी आणावी यासाठी संबंधित मंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवून पुढच्या अधिवेशनात `बंदी विधेयक' मंजूर करून घेईन.!!!" यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊन तो थांबेच ना, गर्दी वाढतच होती, तो बाप कम मुलगा अधूनमधून क्षीण आवाजात चोरीबद्दल इन्स्पेक्टरकडे विचारणा करत होता. त्याला टाळून इन्स्पेक्टर गर्दीला छडीने आवरत होता. तेवढ्यात त्या गर्दीमुळे तिथे एक `ओबी' वाहन आले आणि त्यातून एक युवक हातातल्या कॅमेरा व माइकसकट हातवारे करत उतरला. त्यानं `रोजचा बकवास'कडून आल्याचं सांगून नेत्याला `बोला बोला' म्हणत प्रश्न विचारला,    
" साहेब, राजकारण्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, गुंडगिरी हे कसे थांबवणार ते बोला !! कायदा, सुव्यवस्था ढासळली आहे त्याबाबत बोला." कॅमेरा पाहून नेता चेकाळला आणि उच्चारवात म्हणाला,
"आपल्या राज्यात कायदा-सुव्यवस्था ढेपाळली म्हणून काय झालं? लोकप्रतिनिधींचे घोटाळे ,भ्रष्टाचार बंद केले नसले तरी आपल्या सरकारनं आतापर्यंत डान्स बार, हायवे-साईड बार, गुटखा, मावा, खर्रा या सर्वांवर  बंदी आणली आहे. या बंदीला विरोधी पक्षांनीसुध्दा विरोध न करता एकमतानं विधेयक मंजूर केलं हे लक्षांत घ्या. गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही काही करू शकलो नसलो तरी सामान्य जनतेला आम्ही निर्व्यसनी आणि नैतिक बनवतो आहोत, जेणेकरून भविष्यात आपोआपच त्यांचे प्रतिनिधी नैतिक बनतील, ज्यामुळे पुढे कधी ना कधी गुंडगिरी, घोटाळे आणि भ्रष्टाचारापासून राज्य मुक्त होईल!!" आता लोक खुशीनं  पिसाटून घोषणा देऊ लागले आणि मोठ्ठा कल्लोळ माजला. बाप कम मुलग्याने छडीपासून बचावण्यासाठी इन्स्पेक्टरचा नाद सोडून नेत्याला गाठून विचारले,
"साहेब, माझे दहाहजार रुपये चोरीला गेलेत, त्याचं काहीतरी करा ना!" 
नेत्यानं  गॉगल काढून त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं,
"अहो काळजी कसली करताय? ही नवी बंदी आली की तुमचे वडील आणि  मुलगा चॉकलेट्स खाऊ शकणार नाहीत. म्हणजे पुढच्या औषध-पाण्यासाठी तुम्हाला खर्चच पडणार नाही. अन्यथा काही दिवसातच  हॉस्पिटल, डॉक्टर, औषधे यांच्यावर तुमचे लाखो रुपये खर्च झाले असते, दहा हजार रुपयांचं काय एवढं घेऊन बसलात?"

हे सारं पाहून, आमच्या काळात राजकारणात भ्रष्टाचार, गुंडगिरी वगैरे काही नव्हतंच, याचं कारण उमगलं, की त्याकाळी डान्स बार, गुटखा, खर्रा वगैरे असलं काही नव्हतंच. समाज जर नैतिक आणि निर्व्यसनी असेल तर त्यांचे प्रतिनिधी देखील साहजिकच सज्जन असणार, मग भ्रष्टाचार, गुंडगिरी निर्माण होईलच कशी? आमदारांना मानधन-भत्ता-निधी वाढवणे आणि मुंबईत स्वस्त सदनिका देणे याखेरीज कधीही यापूर्वी सरकार आणि विरोधक एकत्र आले नव्हते. आता सरकार आणि विरोधक वगैरे सर्वांनी एकमताने समाजाला निर्व्यसनी आणि नैतिक बनवण्याचा चंग बांधला आहे, ही किती भाग्याची गोष्ट आहे!! समाज सुधारला की  पुढे कधीतरी त्यांचे प्रतिनिधी सुधारतीलच आणि मग अंतिमत: गुंडगिरी-भ्रष्टाचार देखील नष्ट होईलच. आमच्या काळात मुलांना केवळ चॉकलेट्स नव्हे, तर चहादेखील दिला जात नसे, फारतर कोको दिला जाई. सरकार आणि विरोधक आता अनायासे समाजसुधारण्यासाठी एकत्र आले आहेतच, तर मग सरकारनं वृध्द आणि मुलांच्या चॉकलेट्स खाण्यावर तर बंदी आणावीच, पण चहावरदेखील बंदी आणावी. चॉकलेट्स व चहाबंदीची ही विधेयके येतील तेंव्हा येतील, पण तोपर्यंत मंत्रालयात, निदान अधिवेशनकाळात चहापान बंद करून कोको सुरु करायला काय हरकत आहे? एवीतेवी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांचा चहापानावरच बहिष्कार असतो. विरोधकांनी अधिवेशनाआधीच या चहाबंदी विधेयकास कृतीद्वारे पाठींबा दिला असे समजून सत्ताधाऱ्यांनी कोको प्यायला सुरु करावे!!! आधी विधेयक मांडून नंतर पाठींबा देण्याची पध्दत असली तरी चांगल्या गोष्टीसाठी आधी पाठींबा आणि नंतर विधेयक असे करण्यात वावगे काय??     
           
लोकेश शेवडे 
२५. ७. २०१३ सायं ६.००