Tuesday, July 15, 2014

इशारा, तात्पर्य आणि टीप

      इशारा, तात्पर्य आणि टीप
 
`माकड' या  प्राण्यात उत्क्रांती घडत जाउन त्यातून पुढे `माणूस' तयार झाला असावा हे उत्क्रांतीवाद्यांचे म्हणणे पटण्यासारखे आहे. माकड  जसे वाट्टेल तिथून वाट्टेल तिथे वाट्टेल तशा उड्या मारू शकतं तसे  माणूस शारीरिकरित्या करू शकत नसला तरी माणसाचे विचार तश्शाच, किंबहुना त्याहून पलिकडच्या उड्या मारू शकतात, यावरून ते सिद्धच होतं. एका अर्थी, माणसाचा मेंदू हा माकडासारखाच असतो. अनेकजण  साध्या-सरळ बाबीतसुध्दा कोणत्याही मुद्द्यावरून कोणत्याही तर्कावर उड्या मारताना आढळतात त्यामागे  हेच कारण असावे. उदा. चांगल्या वस्तूची किंमत जास्त असते म्हणून महाग वस्तू  चांगली असते असा तर्क करून माणूस महाग वस्तू विकत घेतो. तर्काची ही `पलटी' बरोब्बर `माकडाच्या `शारीर पलटी'सारखीच  आहे.  माणूस नावाच्या  नि:पुच्छ प्राण्याच्या या  `वैचारिक माकडचेष्टां'ची सुरुवात बहुधा बालपणीच होत  असावी. तान्हेपणी माणसाचे हावभाव, हातवारे तर माकडासारखे असतातच, पण वरून त्यानंतर बाल्यावस्थेच्या काळात बडबडगीतांतून विसंगती आणि  असंबध्दतेचे  बाळकडूदेखील दिले जाते. उदा. राम  म्हणजे देव, देवच्या उलट वदे, वदे म्हणजे बोलतो,  `बोलतो'चे क्रियापद `बोलणे', बोलण्याचे `आज्ञा'रूप `बोला', ``बोला' म्हणजे  हिंदीत `बोलो', बोलोच्या  उलट `लोबो', लोबो हा एक  शास्त्रज्ञ होता,  म्हणून राम म्हणजे  शास्त्रज्ञ! अशा अजब तर्कटांवर आधारित बरीच बडबडगीतेअसतात. परिणामी, मोठे झाल्यावरही माणसे  अशाच  वैचारिक मर्कट किंवा तर्कटलीला  करत राहतात आणि त्या लीलांना `प्रगल्भता' मानतात. किंबहुना विसंगती, असंबद्धता हा माणसाच्या दैनंदिन जीवनाचा  भागच बनून राहिला आहे.  उदा. एखाद्या मुखपत्रात त्याच्या मालक असलेल्या राजकीय नेत्याची अथवा पक्षाची वारेमाप स्तुती त्याचा पगारी संपादक करत असतो. अर्थातच, तशी स्तुती करण्याच्या हेतूनेच त्या मुखपत्राची स्थापना व संपादकाची नेमणूक झालेली असते. तरीही त्या मुखपत्रात विवक्षित ठिकाणी चौकट टाकून ठळकपणे छापलेले असते, `या मुखपत्रात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतील असे नाही.' हे छापण्यात त्या संपादकाला, मुद्रकाला काहीही विसंगत वाटत नाही, इतकेच नव्हे तर वाचकालादेखील काही विचित्र वाचतो आहोत असे वाटत नाही. कित्येक  माणसांना  कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टीवरून  कोणत्यातरी  असंबध्द,  ऊटपटांग गोष्टी आठवतात आणि त्यासाठी ते कशी का असेना, पण तर्कसंगती देखील देत नाहीत, तरीही लोकांना ती समजावी  त्यांची अपेक्षा असते. उदा. मध्यंतरी दोन परस्पर विरोधी ज्येष्ठ नेत्यांच्या  मुलाखती टीव्हीवर दाखवल्या गेल्या.  त्यात दोन्ही नेत्यांना  `दंगल व हत्याकांड' या विषयावर  प्रश्न केल्यावर एकाने `देशात दारिद्र्य निर्मूलन  आवश्यक आहे' असे उत्तर दिले तर दुसऱ्याने `पाणी मागवले' व ते पिऊन मुलाखत सोडून निघून गेला.  मूळ  प्रश्न ऐकल्यावर एकाला दारिद्र्य आणि दुसऱ्याला पाणी का आठवावे? या प्रश्नाचा उलगडा श्रोत्यांना झालाच नाही. पण तसा उलगडा कोणाला  आवश्यकदेखील  वाटला नाही, कारण दोन्ही मुलाखती नंतर श्रोते आपापल्या नेत्याची ही वैचारिक उडी होती असे मानून बेहद्द खुश झाले होते. आणि टीव्हीवरील  विचारवंत [!!!] तर, आपापल्या नेत्यांच्या `उडी'रूप प्रतिक्रियांबाबत  `बडबडगीत ष्टाईल' तर्कट मांडत होते. 
 
 
तर, असंबध्दता आणि विसंगतीमध्ये `तर्कट' मांडण्यावरून आठवले. आमच्या कॉलेजच्या काळात अनेक  नावांनी व पध्दतींनी अवैध जुगार खेळला जात  असे.  त्यात `मटका', `वळण' हे प्रकार इतके लोकप्रिय होते की जुगाऱ्यांसाठी  `लंगडेकी  चाल' `जय बाबा' अशा अत्यंत चित्रविचित्र नावांनी मटका खेळण्याचे प्रशिक्षण  आणि हमखास जिंकण्याच्या युक्त्या देणारी पुस्तके फुटपाथवर जागोजाग मिळत असत. आमचा एक मित्र  `मटका' लावत असे, तर त्याचा मोठा  भाऊ घोडे लावत असे, म्हणजे धाकटा मटक्यावर तर थोरला रेसमधल्या घोड्यांवर पैसे लावत असे. दोघेही लायब्ररीमध्ये येऊन आमच्या ग्रूपच्या बाजूलाच  बसून त्यांची `जुगारलेली' पुस्तके वाचायचे व त्यानुसार पैसे लावायचे. कधी हरायचे तर कधी जिंकायचे, पण पैसे लावण्यापूर्वी कोणत्या  आकड्यावर  किंवा घोड्यावर  हमखास विजय मिळेल ते अभ्यासण्यासाठी आणि  हरले की हरण्याची कारणे  शोधण्यासाठी ते पुन्हा त्या पुस्तकांचे पारायण करत एखाद्या जाणकाराप्रमाणे एकमेकांशी व अधूनमधून आमच्याशी, म्हणजे सर्वसामान्यांशी चर्चा करायचे. आम्ही सर्वसामान्य असल्यामुळे, साहजिकच आम्हाला  त्यातील ओ की ठो  कळत नसे, पण त्यामुळे रंजन होई म्हणून आम्ही देखील उगाचच काहीतरी आकडे किंवा  नावे सुचवत असू. आकडा किंवा घोडा जिंकण्याची किंवा हरण्याची त्यांनी दिलेली कारणे  मात्र अत्यंत रोचक आणि  अद्भुत असत. एखादा घोडा हरला याचे कारण त्याची शेपटी मोठी होती, त्या घोड्याचा तबेला योग्य  नव्हता, याउलट एखादा घोडा जिंकला तर त्याचे कारण त्या घोड्याचा बाप अस्सल जातिवंत होता, त्याची  खोगीर उच्च  दर्जाची होती अशी कुठलीही कारणे अत्यंत गंभीरपणे द्यायचे. धाकटा तर आकडा लावताना तोच आकडा लागणार असल्याची ग्वाही देताना समजा, जुलैच्या सतरा तारखेचा मटका असेल तर, जुलै म्हणजे  सातवा महिना-सतरा तारीख, शिवाय शहात्तर साल म्हणजे तीनही  ठीकाणी सात आहेत; याचा अर्थ सात  गुणिले तीन, म्हणजे एकवीस; एकवीसमध्ये दोन  आणि एक हे आकडे; यांची बेरीज तीन, त्यामुळे आज `तीन' हाच  आकडा  लागेल,  असे  काहीतरी सांगायचा आणि मग समजा तोच तीन हा आकडा न येता सहा आकडा आला, की  मग "अरे, संध्याकाळी सहा वाजता   आकडा लावला होता, ते चुकलं, सहा वाजता आणि शहात्तर  साल आणि शनिवार  म्हणजे आठवड्याचा  सहाव्वा दिवस! त्यामुळे तिन्ही ठिकाणी सहा आकडा होता.  त्यामुळे तीन ऐवजी  सहा आकडा आला" असे सांगायचा. पण हे  दोघेही अव्याहतपणे जिंकण्या-हरण्याची तमा न बाळगता आपापले अंदाज, होरे हे  तार्किकदृष्ट्या बरोबर कसे आहेत हे सांगत फिरायचे. 
 
 हे सारं आठवण्याचं कारण, अर्थातच अगदी असंबध्द! नुकत्याच निवडणुका पार पडून त्यांच्या निकालाविषयी अनेक तज्ञ मंडळी त्या निकालाचे विश्लेषण व चिंतन करताना टीव्हीवर सतत दाखवत होते. खरं म्हणजे, मला  निवडणूक आणि त्यांचे निकाल यात काडीमात्रही स्वारस्य कधीच नव्हते. गेली अनेक  वर्षे मी निवडणुका  आणि त्यांचे  निकाल  पाहतो आहे. एकाही  निवडणुकीचे  निकाल  पाहून आणि त्यानंतरच्या पाच वर्षांतील
 देशाची वाटचाल अनुभवून जनतेने  हे प्रतिनिधी का नेमके का निवडून दिले असावेत  आणि ज्यांना  पाडले  त्यांना का पाडले असावे याचा कधीही बोध झाला नव्हता. पण समोर टीव्हीवर सर्व पक्षांची आकडेवारी विविध रंगात दाखवणारे बहुरंगी वर्तुळ मला गोल रंगीत तबकडीसारखे भासले, रंगीत तबकडीवरून कॅसिनो हा जुगाराचा प्रकार आठवला, जुगारावरून मटका आठवला, मटक्यावरून कॉलेजमधले ते दोन भाऊ आठवले, त्या दोघांवरून त्यांचे तर्कट आठवले आणि त्यांच्या तर्कटावरून  अचानक निकालामागील कारणमीमांसाच  उलगडली. उमेदवाराचे कार्य, व्यक्तिमत्व आणि त्याचा विजय यांची सांगड लक्षात आली. उदा. जनतेला घोटाळे  नकोसे झाले होते, त्यामुळे अशोक चव्हाण निवडून आले.  जनतेला घराणेशाही समूळ नष्ट करायची  होती म्हणून खडसे यांची सून व   गावित  यांची कन्या  निवडून आल्या. जनतेला सरंजामशाही उखडून  टाकायची होती म्हणून उदयनराजे भोसले प्रचंड बहुमताने  निवडून आले. आणि निर्णायकपणे घराणेशाही व भ्रष्टाचाराचे निर्मूलन करून  केवळ विकास आणि अविरत समाजकार्य करणाऱ्यांनाच  खासदार करायचे म्हणून प्रमोदकन्या  पूनम महाजन यांना जनतेने जबरदस्त  मताधिक्याने निवडून आणले. जनता काही  खुळी नाही, मतदारांना कोणी उल्लू बनवू शकत नाही हे मागील सर्व निकालांप्रमाणे  यावेळच्या निकालावरून सिद्ध झालेलेच होते. याखेरीज याखेपेस जनतेला `बदल' हवा होता, म्हणून जनतेने निम्मे खासदार हे त्यांनी  फक्त त्यांचा पक्ष  `बदल'ल्यावरच निवडून दिले. यावरून, मतदार अत्यंत चाणाक्ष असतात, कमालीच्या हुशारीने आपले प्रतिनिधी निवडतात. हे अगदी अधोरेखित झाले. हा  साक्षात्कार मला टीव्हीवरील विश्लेषण पाहतानाच का झाला? याचे उत्तर इतकेच की, माकडाची शारीरिक आणि माणसाची वैचारिक उडी कोठून  कुठे काही जाईल ते सांगता येत नाही!!! 
 
वैधानिक इशारा: जुगार खेळणे वैचारिक व आर्थिक आरोग्यास हानिकारक आहे. 
तात्पर्य: बडबडगीत, जुगार आणि निवडणुकीचे निकाल यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही!! 
टीप: या लेखात यदाकदाचित मत व्यक्त झालेच असल्यास, त्या मताशी केवळ संपादकच नव्हे,  तर खुद्द लेखक देखील सहमत नाही. 
 
 
 
लोकेश शेवडे 
२५/०५/१४ सायं ५.४५