Friday, March 13, 2015

नॉट मी

                                                     नॉट मी
 
 या हंगामातील निवडणूक जाहीर झाल्यावर कोणीतरी `रेबीज'सारखा एखादा जंतू जनतेत सोडला होता की काय न कळे, कारण निवडणुका जाहीर झाल्यापासून  वय वर्षे नऊ ते वय वर्षे नव्वद या गटातील तमाम नागरिक पिसाळल्यासारखे लोकशाही, भ्रष्टाचार, नैतिकता याविषयावर त्यांच्या त्यांच्या  संबंधित गल्ल्यांमध्ये कळपा-कळपाने भुंकू लागले. उसंत असली की विरंगुळा म्हणून मीदेखील त्यांचे ऐकायला उभा राहात असे. पण मी  आजतागायत मतदान कधीच केलं नाही हे जेंव्हा त्यांना कळायचे तेंव्हा ते सगळेच्या सगळे एकमेकांवरचे भुंकणे थांबवून एकत्रितपणे माझ्यावर शिव्यांची धार सुरु करायचे! जणू मी  म्हणजे  इलेक्ट्रिकचा खांब!! त्यांच्या मते सर्व समस्यांचे मूळ मतदान न करण्यात आहे. जणू मी मतदान केले नाही  त्यामुळे भारतीय लोकशाही  रसातळाला गेली आणि मी मतदान केले असते तर  आपला देश एकदम टकाटक  होऊन एक नंबर बनला असता!! प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मला हा जाच सहन  करावा  लागतो, यावेळी तो  आणखी वाढला, कारण प्रत्येक जण सांगे, "तुला मतदान करायचे नसले तरी यावेळी तू मतदानाला जा कारण आता तू `नोटा' दाबू शकतोस!" मतदानसंदर्भात `नोटा दाबणे' याचा मला माहीत असलेला `अर्थ' वेगळाच  होता. आता त्यातील महत्वाचा `अर्थ' निघून जाऊन `उरलेला' कोरडा  ठणठणीत `नोटा' दाबून  काय फायदा? असा विचार डोक्यात आलाच. तरी, निदान माझ्या मत न देण्यामुळे  देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे या आरोपातून एकदाची सुटका  होईल. हे ध्यानात आल्यामुळे मी यावेळी  सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन थडकलो.
 
 
बाकी कोणी येण्याच्या  आत आपण पोहोचलो तर रांगेत उभे राहावे लागणार नाही व वेळ वाचेल असा विचार  करून आंघोळ करण्यात वेळ न दवडता, मॉर्निंग वॉकवरून परस्पर  केंद्रावर सक्काळी सात वाजताच  पोहोचलो. पाहतो, तर तिथे दोन-पाचशे लोक मतदान सुरु होण्याआधीच रांगेत ताटकळत उभे होते, सगळे  माझ्या आजूबाजूचेच, ओळखीचे रहिवाशी  होते. त्यातील बहुतांश लोक रोज मी सकाळी सहाला मॉर्निंग वॉकला  जातो तेंव्हा झोपलेले असतात, मी सात  वाजता परत येतो तेंव्हाही झोपलेले असतात आणि मी  कामावर आठ  वाजता निघतो तेंव्हाही बरेचदा झोपलेलेच असतात. आज मात्र सर्वांनी कमालच केली होती. सगळे भल्या  पहाटे उठून, आंघोळ-पाणी उरकून, चांगले-चुंगले कपडे घालून सातच्या   आधी मतदानाच्या रांगेत!!! जणू आज  एखादा मोठा सण असावा. मी काहीशा साशंकतेने बाजूच्या गलेलठ्ठ गृहस्थाला  विचारले, 'मतदानासाठी आधी आंघोळ करणे कंपल्सरी आहे का?"
"छे छे!!" तो त्याच्या डाव्या हाताची तर्जनी आणि तिच्यातील हिऱ्यांची अंगठी कुरवाळत म्हणाला, "मी तर  कालदेखील आंघोळ केलेली  नाही, आज  फक्त नवे कपडे अंगावर चढवले अन आलो इथे"
"म्हणजे, नवे कपडे घालणे कंपल्सरी आहे का?" मी चिंतेने विचारलं.
"कंपल्सरी नसलं तरी, केंद्रावर टीव्हीवाले येणार, ते नाही आले तर आपणच आपल्या मोबाईलवर आपल्या  बोटासकट  फोटो काढणार, मग चांगले कपडे  घालायलाच पाहिजेत ना?" ते ऐकून मी चमकून आजूबाजूला  पाहिलं तर सर्वत्र टीव्ही चैनलवाल्यांचे उगारलेले कॅमेरे आणि त्यांच्यासमोर जणू दुश्मनाच्या सैन्याचा खात्मा करायला निघाल्यासारखे छाती फुगवून आणि  दंतमंजन-जाहिरातसुलभ हास्य चेहऱ्यावर  आणून  सरसावणारे मतदार दिसत होते. मला हे फोटोप्रकरण आधी न उमगल्यामुळे  मी बावळट ठरलो असे वाटू  लागले. माझ्याशी बोलणारा  गृहस्थ बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिध्द होता.  नुकतीच त्याच्यावर  आयकर  विभागाने धाड टाकून बेनामी मालमत्तेची कागदपत्रे व मोठी बेहिशेबी रोकड जप्त केली होती. त्याने  मला ओळख दाखवली आणि बोलला यामुळे मात्र मी सुखावून गेलो. त्याच्याच ओळखीतून माझ्या एका  प्लॉटचे अडकलेले पेपर्स क्लिअर करून घ्यायचे असे मी मनात लगेच ठरवले.  मी पुन्हा त्याला  विचारले,     
"तुमची हरकत नसेल तर, कोणाला मत देणार ते सांगाल का?" यावर अचानक एखाद्या स्कूटरचा सायलेन्सर  फुटावा तसा मोठ्ठ्या आवाजात  म्हणाला,     
"त्यात न सांगण्यासारखे काय? अहो, किती भयानक परिस्थिती आलीय देशात!! भ्रष्टाचारानं, गैरव्यवहारानं सबंध देश पोखरला गेलाय. " त्याच्या या खुलाश्यावरून मला वाटलं की त्याला  स्वत:च्या व्यावसायिक मार्गाबद्दल पश्चात्ताप होत असावा. म्हणून मी "आता व्यवसाय बंद करणार  का?" असे   विचारणार होतो, तेवढ्यात पुन्हा त्याच्या कंठाचा सायलेन्सर फुटला,
"माजलेत हो राजकारणी, या हरामखोरांना जागा दाखवून द्यायला पाहिजे." याचा अर्थ, त्याला स्वत:च्या नव्हे, तर फक्त राजकारण्यांच्या गैरव्यवहाराबद्दल  आक्षेप होता हे लक्षात आले. पण त्याचे मत कोणाला याचा  उलगडा मात्र झाला  नाही. म्हणून मी पुन्हा विचारलं,
"म्हणजे मत कोणाला?"
" अर्थातच, मी `अमुक' पक्षालाच मत देणार!! दुसरा ऑप्शन काय?" इतक्यात एका कॅमेराचा रोख त्याच्याकडे आला म्हणून त्याने माझ्याशी बोलणे थांबवून प्रतिष्ठासुलभ पोज घेतली.  मग मीदेखील त्या फोटारड्याला सोडून आमच्या गल्लीत राहणाऱ्या ओळखीच्या मुलाकडे मोर्चा वळवला. याचे  वडील पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता होते. आपल्या अभियांत्रिकी  `कौशल्या'ची ओळख  लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एक आमच्या गल्लीत तर  दुसरा पुण्यात असे  दोन  प्रशस्त  बंगले आणि एक फार्म हाउस बांधले होते. त्यातील त्यांच्या  बंगल्यांचा उपयोग त्यांच्याच दोन प्रशस्त बायका करत असत, तर फार्म हाउसचा उपयोग माझ्यासमोर उभे असलेले त्यांचे अजस्त्र चिरंजीव रेव्ह पार्ट्यांसाठी  करत असत. वर्षभरापूर्वी  हा बालक सतरा वर्षांचा असतानाच त्याने घरी काम करणाऱ्या मोलकरणीला तो `युवक' झाल्याचे प्रात्यक्षिक दिले होते. नुकत्याच फुटलेल्या मिसरुडावरून तो पहिल्यांदाच मतदान  करत असावा हे दिसत असलं तरी त्याच्या आत्मविश्वासावरून आणि तांबारलेल्या  डोळ्यांवरून मात्र तो पाचदा निवडून आलेला खासदार भासत होता. मी कुतूहलानं विचारलं,
   "काय रे, आजच लवकर उठलास की रोज लवकरच उठतोस?"
   "काहीतरीच काय? यावेळी रोज मी झोपायला बेडरूम मध्ये शिरत असतो. आज मतदान आहे म्हणून झोपायला न जाता सरळ इथेच आलो. आता मतदान करून फोटो काढले की  जाऊन ताणून देणार!!" त्यानं स्वत: सिगरेट शिलगावत मलाही ऑफर केली.             
    "मतदानासाठी झोप सोडून आलास? कमाल आहे! इतका त्याग कशासाठी??" मी त्याचीच सिगारेट ओढत त्यालाच टोमणा मारला.   
    "झोपच  काय, मतदानासाठी  ब्रश करायचेदेखील सोडून आलो." तो टोमणा कळण्याच्या पलीकडे गेला होता. 
   "कोणाला देणार मत ते सांगशील का? "
  "कमॉन अंकल, तुम्हाला का नाही सांगणार? अहो, वी डोंट हेव एनी चॉइस अंकल. सो मच करप्शन, सो मच इन्फ्लेशन यु नो!!" तो कोणाबद्दल  बोलतोय ते मी विचारणार तेवढ्यात त्याचे फाडफाड इंग्रजी पुन्हा सुरु  झाले, "आय हेट दीज ब्लडी डर्टी पॉलीटिशियन्स! ऑल ब्लडी कॅरेक्टरलेस, दे डोंट हेव एनी मॉरल वेल्यूज!  इफ वि वाँट क्लीन ऎंड गुड पिपल इन पार्लमेंट, वि हेव टू वोट `तमुक' पार्टी!!!" 
 
त्या इंग्रजीच्या पापडाचे बोलणे संपण्याच्या आत माझ्या कानांचा ताबा माझ्यासमोरच्या चाळीत राहणाऱ्या  तिघा गृहस्थांनी घेतला. त्यातील एकाचे `भुरटे' असे नामकरण चाळवासियांनी  केले होते. कोणाच्याही घरी  किंवा एखाद्या दुकानात गेले की आजूबाजूच्यांच्या नकळत एखाद दोन गोष्टी लंपास करण्याची त्यांना खोड होती. एकदा कोपऱ्यावरच्या मेडिकल स्टोअर्समध्ये  त्यांनी जिलेट ब्लेड्सची दोन पाकीटे हडप करतांना मी पाहिलं होतं तेंव्हा त्यांनी त्यातलं एक हळूच माझ्या खिशात सरकवलं होतं. दुसरे गृहस्थ पेन्शनर होते.दिवसभर काही ना काही कारण काढून चाळीतील वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन फुकटात चहा,  बिस्कीट, पोहे सदरी पाडून घ्यायचे ही त्यांची दिनचर्या! बऱ्याच बायकांच्या मते ते कप, प्लेट वगैरे देता-घेताना बायकांना चोरटे स्पर्श करायचे. नुकतेच त्यांच्या मुलाचे लग्न झाल्यामुळे त्यांच्या हाती पत्रिका वाटताना चाळीबाहेरच्या बायकांचे स्पर्श आणि हुंड्याचे पैसे लागले होते. तिसरे गृहस्थ त्या चाळीच्या  रहिवाशी संस्थेचे  अध्यक्ष होते. त्यांच्या खोल्या एका कोपऱ्यात होत्या फायदा घेत त्यांनी कॉमन पैसेज खोलीशी ऐटेच करून एन्क्लोज करून घेतला होता आणि त्यास स्वत:ची अध्यक्षीय  संमतीदेखील घेऊन टाकली होती. भुरटे आणि  पेन्शनर या दोघांची जात एकच होती, त्यामुळे ते नेहमी एकत्रच  फिरत. दोघेही मला हिरीरीने सांगायला लागले,
" आमच्या काळातली संस्कृतीच नष्ट झालीय देशातली, संपूर्ण देश पोखरलाय जातीयवादानं …हल्लीच्या  नेत्यांना फक्त पैसा खायचा माहिती आहे…नीतीमत्तेची  काही चाडसुध्दा  राहिली नाहीये. आमच्या काळात  चांगली माणसं यायची राजकारणात…  राजकारण पुन्हा पूर्वीसारखं चांगलं करायचं असेल तर … `ढमुक' पक्षच निवडून यायला हवा…" मी त्यांना काही प्रतिसाद देणार, तेवढ्यात अध्यक्षांनी समारोपाचे भाषण  ठोकण्याच्या थाटात मला सांगायला सुरुवात केली.
"काय आहे साहेब, राजकारण कधी सुधारणे शक्यच नाही. कारण सगळे नेते सारखेच नालायक  आहेत. एक टक्का फरक नाही एकाही नेत्यात. आत्ताच पाहा ना,  एक तरी उमेदवार `माणूस' म्हणण्याच्या लायकीचा आहे का? च्यायला, कोणीही निवडून आला तरी पैसा  खाणारच!! मी तर `नोटा'च  दाबणार आहे, `नन ऑफ द अबौव्ह'!! साला, आपण मत द्यावं अशी एकाचीही लायकी नाही!!"   
 
 
अध्यक्षाचे शेवटचे वाक्य मात्र एकदम माझ्यावर येऊन आदळल्यासारखे मला वाटले. चाळीचा कॉमन पैसेज हडप करणारा हा अध्यक्ष  कोणत्या नैतिक बळावर `सगळे  उमेदवार पैसे  खातात' असे म्हणू शकतो? आणि स्वत: अध्यक्ष असल्याचा गैरफायदा घेणारा हा महाभाग कोणत्या नैतिक आधारावर तमाम  उमेदवारांना `नालायक' ठरवू शकतो? भारतात `फक्त  नेत्यांमुळे' भ्रष्टाचार, अनैतिकता बोकाळली आहे' असे ओक्साबोक्शी सांगण्याचा त्या फ़ोटारड्या  बिल्डरला, त्या इंग्रजीच्या पापडाला, भुरटे आणि पेन्शनरना  अधिकार आणि  आत्मविश्वास कोठून येतो? या प्रश्नांनी मी घेरला गेलो. हे असे बोलणाऱ्या सर्वांशी माझे  सौहार्दाचे संबंध आहेत याची मलाच लाज वाटायला लागली.  त्यात जिलेट ब्लेड, लग्नाचे जेवण आणि सिगारेट घेऊन मी देखील त्यांच्यात सामील  झालो  या विचाराने मला गरगरायला लागले. एव्हाना लोक बूथच्या आत जाऊन, मत देऊन, आपापले दात आणि बोट  दाखवत बाहेर यायला लागले होते. ते सगळे मतदार मलाच बोटे दाखवत आहेत आणि माझ्याकडेच पाहात दात विचकत आहेत असे मला वाटायला लागले. नकळत मी बाजूच्याला विचारले,
"`नोटा' प्रमाणे `नॉट मी' असे बटन असते का हो त्या मतदान यंत्रात?" 
त्याने माझ्याकडे संशयाने रोखून पाहात विचारलं, "म्हणजे?"
"मत द्यायची ज्याची लायकी नसेल, त्याच्यासाठी एखादे बटन असते का?"
"नाही." तो म्हणाला. 
 
मी पुन्हा मत न देताच परत आलो.      
 
    
                
 
लोकेश शेवडे 
 ७/५/२०१४ १२.४५