Monday, October 9, 2017

म्हातारा, म्हातारी, मुंगी आणि मोगँबो

१ ऑक्टोबरच्या `लोकरंग' मध्ये प्रकाशित झालेल्या `महात्मा गांधी आणि डॉ हेडगेवार' या लेखाला माझे उत्तर:

म्हातारा, म्हातारी, मुंगी आणि मोगँबो

मराठी लोकांना लहानपणापासूनच कोड्यांची फार संवय असते. कोड्यात बोलणे, कोड्यात टाकणे असे वाक्प्रचार त्यामुळेच मराठीत रूढ झाले असावेत. कोड्यांच्या बाबतीत दोन प्रसंग मला नेहमी आठवतात.  आमच्या लहानपणी एक गमतीशीर कोडं मुलं एकमेकांना घालत असत, "तीन मुंग्या एका दिशेने, एका पाठोपाठ, सरळ रेषेत जात असतात. पहिली मुंगी म्हणते, माझ्या मागे दोन मुंग्या आहेत. दुसरी म्हणते माझ्या मागे एक आहे ...... यानंतर तिसरी मुंगी म्हणते माझ्या मागे दोन मुंग्या आहेत. असं कसं???? ......" या प्रश्नाची दहा पंधरा अंदाजपंचे, तर्कपंचे उत्तरं देऊन, ती चुकीची आहेत हे ऐकून, समोरचा दमून `हरलो' म्हणाला की मग प्रश्न विचारणारा सांगायचा, "तिसरी मुंगी खोटं बोलली!!" यावर तो उत्तरं शोधून दमलेला, "आपण का मूर्खांसारखे `तर्कशुद्ध' उत्तर शोधण्याच्या मागे लागलो" असा विचार करून खजील होई आणि प्रश्न विचारणारा त्यावर प्रचंड गडगडाट करत मोगँबोसारखा हसे! असाच या कोड्याला हरून मी एकदा खजील झाल्यावर, एका चतुर मुलानं पुन्हा काही दिवसांनी मला हेच कोडं टाकलं. तेंव्हा उत्तर अगोदरच माहीत असल्यानं मी आत्मविश्वासानं "तिसरी मुंगी खोटं बोलली" असं उत्तर दिलं. त्यावर "तिसरी मुंगी खोटं नव्हे, खरंच बोलली. पण मीच तुला सांगताना खोटं सांगितलं!" असं सांगून तो प्रश्नकर्ता पुन्हा मोगँबिक मुद्रेनं हसायला लागला आणि मी अगोदरपेक्षा अधिक खजील झालो.

पुढे कधीतरी कॉलेजमध्ये तारुण्य-रोमान्स वगैरेंची चाहूल लागल्यानंतर आमचे विनोद आणि कोड्यांचे विषय बदलले. एकदा एका मित्रानं आम्हा पाच सहा जणांना आव्हान देऊन एक कोडं सांगायला सुरुवात केली, "एकदा एक ९९ वर्षांचा म्हातारा आणि ९८ वर्षांची म्हातारी हिमालयात नारळाच्या झाडावर बसून रोमान्स करत होते......... " कोड्यातलं हे पाहिलं वाक्य ऐकल्याबरोबर हास्यांचा एक प्रचंड स्फोट झाला, सर्वच्या सर्व मित्र हसत हसत अक्षरश: जमिनीवर कोसळले. यावर कोडं टाकणाऱ्या मित्रानं " हसायला काय झालं?" असं विचारलं. त्यावर बाकीचे " हिमालय... नारळाचं झाड.....रोमान्स ..... ९९-९८ वर्षे......" असं कसंबसं म्हणत आणखी जोरानं हसत गडाबडा लोळू लागले. कोणाचंही हसणं थांबेना, त्यामुळे त्याला कोड्याचा पुढचा भाग सांगता येईना. शेवटी तो कोडं टाकणारा पुढचं काही न सांगता वैतागून तरातरा तिथून निघून गेला. परिणामी हे कोडं नेमकं काय होतं, ते आम्हाला आजतागायत कळलेलं नाही.

१ ऑक्टोबर२०१७च्या रविवारच्या `लोकरंग' मध्ये `महात्मा गांधी आणि डॉक्टर हेडगेवार' हे शीर्षक आणि शीर्षकाच्या वर त्याचे टिपण (ब्लर्ब):- "गांधीजींनी संघशिबिरास भेट देऊन त्याचे कार्य जाणून घेतले आणि नंतर सरसंघचालकांशी झालेल्या भेटीत संघकार्याचे तोंडभरून कौतुकही केले" हे वाचून, मला कॉलेजमध्ये त्या 'नारळाच्या झाडावर म्हातारा-म्हातारी'वाल्या कोड्याची आठवण झाली. तथापि, तरीही पोट धरून हसत हसत पुढे पूर्ण लेख वाचला. त्या संपूर्ण लेखात `अप्पाजी जोशी' यांनी दिलेली माहिती `मधू देवळेकरांनी' वाचकांना सांगितली आहे, त्यावरून `मुंग्यांच्या' कोड्याची आठवण झाली!! आणि या कोड्याचे, सॉरी लेखाचे उत्तर `तिसरी मुंगी' की कोडं सांगणारा `चतुर मुलगा' यापैकी काय ते कळत नाही म्हणून आज पुन्हा खजील झालो. असो, खरे उत्तर त्यापैकी काहीही असलं तरी, सध्या चतुर मुलगा मोगँबोसारखा हसत असेल हे मात्र निश्चित !!