Friday, April 23, 2010

तेथे पाहिजेच का जातीचे???


``आपल्यात एकी नाही ना...त्यामुळे आपण मागे पडतो!!'' ``आपण जर संघटीत झालो, तर इकडची दुनिया तिकडे करू शकू!!'' ....कोणत्याही एका प्रकारची, वर्गाची, जातीची टाळकी एकत्र आली की अशी वाक्ये ऐकू येणे आणि ``कशासाठी करताय संघटना?'' या प्रश्नावर, ```ते' संघटीत होतात, तर मग आम्ही का होऊ नये?'' ``हा प्रश्न `त्यांना' आधी विचारा, आम्हाला का विचारता?'' असे प्रतिप्रश्न केले जाणे ही बाब अगदीच नित्याची,सवयीची झाली आहे. यावेळी `बहुभाषिक ब्राह्मणे' एकत्र आली आहेत.....तेंव्हाही वेगळे काही प्रतिवाद होणार नाहीत...किंबहुना कोणत्याही संमेलन, मेळाव्यात वेगळे काहीच घडत नसते. त्यामुळे `ब्राह्मणांच्या' संमेलनात वेगळे काही घडण्याची अपेक्षा का धरावी?? आणि भुवया का उंचावल्या जाव्यात?? वास्तविक कोणत्याही जातीय,धार्मिक अथवा वांशिक आधारावर संमेलन, मेळावा करण्याचे किंवा एकत्र येण्याचे नैतिक समर्थन होऊ शकत नाही. कारण अशा जन्माधिष्ठित निकषांवर एकत्र येण्यातूनच अन्य समाजापेक्षा आपण भिन्न आहोत हे गृहीतक निर्माण होते, स्वाभाविकच पुढे त्या भिन्नतेचे `उच्च-नीच'तेत रुपांतर होऊन, अंतिमत: समाजांमध्ये दरी आणि वैर निर्माण होते. तथापि, भारतात किंवा जगात वांशिक,धार्मिक,जातीय आधारावर लोक एकत्र येणे हे एक `रुटीन' आहे. त्यामुळे ब्राह्मण एकत्र येण्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे, वेगळ्या अपेक्षा करण्याचे कारण काय??

भुवया उंचावण्याचे कारण असे आहे की गेली दीडशे वर्षे संघटना, मेळावे यांचे आयोजन हे नेहमी ब्राह्मणांच्या विरुध्द असायचे, मग आता उलट ब्राह्मणांनाच संमेलन-संघटनेची निकड का भासावी??असा प्रश्न जनसामान्याना पडत असावा. वेगळ्या अपेक्षेचे कारण अर्थातच ब्राह्मणांची जनसामान्यातील`वेगळी' प्रतिमा हे असावे!!!बहुतांश जात-धर्म-वंशांची वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत काही वैशिष्ट्ये समान आढळतात. काहींच्या मते तर आचरणात देखील समानता असते. `ब्राह्मण' म्हटले की कुठले वैशिष्ट्य डोळ्यांसमोर काय येते?? [लहानपणी वाचलेल्या `चांदोबा' मधील कथा ``एक गरीब ब्राह्मण होता'' या वाक्या पासून सुरु होत असे. त्यानंतर आजतागायत आर्थिकरित्या गरीब ब्राह्मण अपवादानेच दिसला...आणि स्वभावाने गरीब ब्राह्मण अपवादानेही अनुभवास आला नाही!! असो. शेवटी `चांदोबा' म्हणजे `परी'कथाच, `खरी' कथा नव्हे!! त्यामुळे, त्यातील उदाहरणे प्रत्यक्षात नसणारच.] आज `ब्राह्मण' म्हटल्यावर `शेंडी-जानवे' नजरे समोर येते का?? सध्या शेंडी-जानवे वाला ब्राह्मण पाहिल्यावर अन्य ब्राह्मणच आश्चर्य व्यक्त करतील. शेंडी-जानवे च नव्हे, तर एकंदरीतच जन्मा नंतरच्या सोयरयाच्या दिवसांपासून ते मृत्यू नंतरच्या सुतकाच्या दिवसांपर्यंत कुठल्याही सामुहिक परंपरा, रूढी आणि तत्सम बंधने झुगारणे हे `ब्राह्मण' जातीचे व्यवच्छेदक लक्षण आहे असे लोकाना वाटते!! उच्चारापासून भाषाच नव्हे, तर त्यातील आशया पर्यंत प्रत्येक बाबत `ब्राह्मण' स्वत:चे [जातीचे नव्हे] वेगळेपण जपू पाहतात अशी त्यांची प्रतिमा आहे. म्हणूनच मेळावे, संमेलना सारख्या सामुहिक कृत्य बाबत `वेगळी' अपेक्षा असावी.

जन्माधीष्ठीत अलगता किंवा जात मानणे अत्यंत गैर असले तरी लोक जात मानतात हे एक वास्तव म्हणून स्वीकारल्यास जात मानणारयाचा स्वत:च्या जाती बाबत दृष्टीकोन कसा असतो हे पाहणे महत्वाचे आहे. कोणताही माणूस आपल्या जातीची ओळख देताना स्वत:च्या जातीतील कर्तृत्ववान-नामांकित माणसांचीच नावे सांगतात. अमुक-तमुक दरोडेखोर,खुनी किंवा गुंड हा माझ्या जातीचा असे कोणीच सांगत नाही. त्याच्या जातीची तशा [कुख्यात] व्यक्तींची सांगड दुसऱ्या जातीचा माणूस करून देत असतो. स्वत:च्या जातीतील चांगली आणि इतर जातीतील वाईट उदाहरणे अगदी प्रत्येक जण फाडफाड देत असतो. दोनही उदाहरणे खरीच असतात. त्यातील कोणत्या व्यक्तीला त्या जातीतील माणसे आदर्श मानते, कोणत्या व्यक्तीशी त्या जातीची माणसे आपली अस्मिता जोडतात हा मुद्दा कळीचा ठरतो. ज्या जातीत राणा प्रताप जन्माला त्याच जातीत मानसिंग आणि भारमल देखील जन्मले. ज्या जातीत माधवराव पेशवे जन्मले त्याच जातीत दुसरा बाजीराव देखील जन्मला. मग त्या त्या जातीतील माणसे आज त्यातील कोणाला आदर्श मानतात ही बाब त्या जातीयांच्या भविष्यातील वर्तन-विचार ठरण्यासाठी व त्या जातीचे अन्य समाजातील प्रतिमा ठरण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते.

ज्या नाशिक नगरीमध्ये ब्राह्मण सम्मेलन-अधिवेशन आयोजित करण्यात आहे ती नाशिक नगरी एके काळी भटा-भिक्षुकांची नगरी मानली जात असे.. अशा भटा-भिक्षुकांच्या नगरीमधील `जन्माधिष्ठित श्रेष्ठ' म्हणजे, तथाकथित ब्राह्मण आठवायचे झाल्यास कोणती नावे आठवतात?? कोणती तथाकथित `ब्राह्मण' नावे `मोठी' वाटतात ??? बहुदा एकही नाव समोर येणार नाही. आलेच तर अपवादाने,... चांदोबातील `गरीब ब्राह्मणा' सारखे!! तथापि, कर्तृत्व किंवा विचारांनी श्रेष्ठ व्यक्तींची नावे आठवायची झाल्यास कोणती नावे येतात?? अगदी गेल्या शतकाच्या पूर्वार्धा पासून एकेक नाव पाहिल्यास रे.टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून सुरुवात होते. समाजातील विषमता,सामाजिक अन्याय याविरुध्द टिळक युगुलांनी केलेले कार्य आणि लेखन हे सर्वज्ञात आहे. नाशिकचे पहिले खासदार गो.ह.देशपांडे यांनी `काळाराम मंदिर' सत्याग्रहात बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला पाठींबा व त्यानंतर सामाजिक समानतेची केलेली जोपासना. कॉ.विठ्ठलराव[सुधीर] फडके, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, दादासाहेब बिडकर यांनी जात-पात विरोधी विचारांचा केलेला पाठपुरावा, आदिवासी-वनवासी जनतेच्या उध्दारासाठी वेचलेले कष्ट, माधवराव लिमये, कुसुमताई पटवर्धन यांनी पुरोगामी, सम्यक चळवळी साठी दिलेले योगदान या गोष्टी सर्वप्रथम नजरेसमोर येतात. तमाम नाशिककरांचे दैवत तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या साहित्यातून, आचरणातून पूर्णत: नाकारलेली सामाजिक उतरंड, त्यांचा `काळाराम मंदिर' मोर्च्यातील सहभाग हे झटकन आठवते... आणि नावे तर मोठी आहेतच पण त्याही पेक्षा आचरण, कार्य आणि विचार मोठे!!! या सर्वांमध्ये एक बाब सामाईक होती, एक समान धागा होता.. तो ते जन्माने ब्राह्मण होते हा नसून या सर्वांनी `जन्माने असलेले ब्राह्मण्य' नाकारले होते हा होता. या सर्वांची जात काय होती, ते जन्माने ब्राह्मण होते का? हा प्रश्न ना कोणाला पडला आणि ना कोणाला कधी पडेल.......

नाशिकच कशाला??? संपूर्ण महाराष्ट्रात अशा कर्तृत्वाधारीत व्यक्तींची नावे पाहिल्यास त्या सर्वांनी `जन्माधिष्ठित उतरंड' नाकारलेली आढळते. जन्माने ते कोणीही असोत, त्या सर्वांनी जातीय विषमता नाकारली आणि निव्वळ कर्तृत्वानेच ते श्रेष्ठ ठरले. अशा कर्तृत्ववान लोकात अर्थातच जन्माने ब्राह्मण व्यक्तीही आहेत...कदाचित ते संख्येने जास्त देखील असतील...पण त्याने सिद्ध काय होईल??? एवढेच, की जन्माची जात नाकारणारयामध्ये जन्माने ब्राह्मणांची संख्या जास्त आहे!!! हे फक्त संख्याशास्त्रीय विश्लेषण होईल त्या पलीकडे त्यास किंमत नाही. म. फुलेंच्या कार्यात त्याना आयुष्यभर साथ देणारे गोवंडे आणि वाळवेकर हे ब्राह्मण होते, त्यांच्या पहिल्या शाळेसाठी जागा देणारे `भिडे' ब्राह्मणच होते..चवदार तळ्याच्या सत्याग्रहात आंबेडकरांच्या बरोबर अग्रणी लढणारे बापू `जोशी' होते आणि त्यांच्याबरोबर `मनुस्मृती दहना'चा ठराव मांडणारे गंगाधर `सहस्रबुद्धे' होते ...इतकेच कशाला?? बाबासाहेबांना आपले आडनाव `आंबेडकर' हे देणारेही ब्राह्मण होते आणि त्या काळी त्यांच्याशी विवाह करणाऱ्या `माई' देखील ब्राह्मणच!!! मुद्दा संख्याशास्त्रीय नसून या सर्वांमध्ये असलेल्या समान धाग्याचा `कर्तृत्वाचा आणि `जन्माची' जात नाकारण्याचा आहे.

जन्माधिष्ठित जातीच्या आधारे, अलगता पाळणे, जातीय उतरंड मानणे किंवा जातीय धाग्याने एकत्र येणे अनैतिकच आहे त्यामुळे दुरान्वये देखील त्याचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र सर्वच जण तसे एकत्र येतात हे वास्तव स्वीकारले तर ब्राह्मणांनी काय [वेगळे] घोडे मारलंय??? मग मुद्दा उरतो तो फक्त या संमेलनात- अधिवेशनात पुढील पिढीस आदर्श कोणता घालून देणार?? ब्राह्मण जातीची ओळख कोणत्या व्यक्तींची नावे देऊन करून देणार?? गोवंडे,वाळवेकर, बापू जोशी, गंगाधर सहस्रबुद्धे, आंबेडकर, र.धों.कर्वे या नावांनी की दुसरा बाजीराव आणि राघोबादादा या नावांनी??? नाशिकची ओळख देताना इथे आलेल्या अन्य भाषिक ब्राह्मणांना कोणत्या व्यक्तींचे नावे सांगणार??? रे.टिळक, हुदलीकर, पटवर्धन, शिरवाडकर यांची की अन्य.....नावे माहित नसलेल्या `शेंडी-जानवे' ठेवलेल्या `जन्माने ब्राह्मण' व्यक्तींची??? कोणत्या व्यक्तींशी अस्मिता तथाकथित `ब्राह्मण्या'ची जोडण्याचे काम अधिवेशनात ठरावे??? ते कसेही ठरले तरी, एका बाबत मात्र जन्माधारित जातीयता ओलांडण्याचे या संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले पाहिजे.... ते म्हणजे संमेलन नगरीचे नाव वसिष्ठ, विश्वामित्र असे ब्राह्मणाचे न ठेवता `श्रीराम'नगरी असे एका क्षत्रियाचे नाव दिले.....असेच यापुढे कधीतरी फुले, आम्बेडकरांचे ही नाव दिले जाईल ही आशा करायला काय हरकत आहे???
लोकेश शेवडे २४/०४/२०१०

No comments:

Post a Comment