Thursday, December 10, 2020

फॅसिझमचा `अर्थ'

फॅसिझमचा `अर्थ' ९ नोव्हेंबर १९२१ रोजी बेनिटो मुसोलिनी या इटालियन नेत्याने "पार्टीटो नाझिओनेल फॅसिस्टा" (नॅशनॅलिस्ट फॅसिस्ट पार्टी) या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला, या घटनेच्या शताब्दी वर्षात आता आपण वावरतो आहोत. ९९ वर्षांपूर्वीच्या या घटनेनंतर मुसोलिनीने जागोजाग स्लाव्ह व गौरेतरांविरुद्ध स्फोटक भाषणं देऊन, विखारी पत्रकं वाटून त्यांच्या विरुद्ध इटालियन्सना भडकवायला सुरुवात केली आणि वर्षभरातच या पक्षाची एक निमलष्करी शाखा `ब्लॅकशर्ट्स' या नावाने सुरु करून फॅसिस्ट पक्ष व ब्लॅकशर्ट्स मार्फत सरकारविरोधी आंदोलने उभारून देशभर असंतोष माजवला. असंतोष शिगेला पोहोचल्यावर या ब्लॅकशर्ट्सच्या हजारो स्वयंसेवकांसह मुसोलिनी इटलीच्या राजधानीवर (मार्च ऑन रोम) चालून गेला आणि २९ ऑक्टोबर १९२२ रोजी या ब्लॅकशर्ट्सच्या स्वयंसेवकांच्या दबावाला बळी पडून इटलीच्या राज्यकर्त्यानं मुसोलिनीच्या हाती सत्ता सुपूर्द केली. सत्ता हाती घेण्यापूर्वी मुसोलिनीने निवडणुका घेण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यानुसार त्यानं दोन वर्षांत, एप्रिल १९२४ मध्ये निवडणुका घेतल्या. या निवडणुकांत फॅसिस्ट पार्टी प्रचंड बहुमतानं विजयी होऊन पुन्हा मुसोलिनीच सत्ताधीश झाला. या निवडणुकीत मतपत्रिका व मतमोजणीत मुसोलिनीने `ब्लॅकशर्ट्स'मार्फत  प्रचंड मोठा घोटाळा केला अशी तक्रार सर्वच विरोधकांनी केली. त्यातला प्रमुख तक्रारदार सोशालिस्ट पार्टीचा नेता जोकोमो मित्तीओती (Giacomo Matteotti) यानं सदर घोटाळ्यामुळे ही निवडणूक रद्द ठरवावी अशी मागणी केली व त्याला लोकांचा पाठींबा मिळू लागला. मित्तीओतीच्या मागणीला पाठिंबा मिळू लागल्यानंतर काही दिवसातच त्याची हत्या झाली. तपासात त्याचा खून मुसोलिनीचा विश्वासू गारदी `अमेरिगो डुमिनी' यानं ब्लॅकशर्ट्सच्या सहाय्यानं केल्याचं सिद्ध झालं. तथापि त्याला केवळ दोन वर्षांचा तुरुंगवास देऊन नंतर `दये'खातर सोडून देण्यात आलं. (अर्थातच आता न्यायाधीशही राष्ट्रभक्त-फॅसिस्ट पार्टीचे `सहानुभूतीदार' होते) या दोन वर्षांत `ब्लॅक शर्ट्स' या संघटनेनं निवडणूक घोटाळ्याविरुद्ध चाललेलं आंदोलन चिरडून टाकलं. त्यानंतर मात्र मुसोलिनीने कायदेशीर-संविधानात्मक बदलांद्वारे विरोधकांची संपूर्ण कोंडी करून मरेपर्यंत खुल्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत आणि सर्वंकष एकमेव सत्ताधारी राहिला. सर्वंकष सत्ता हस्तगत करून सत्ता कायमस्वरूपी आपल्या एकट्याकडे ठेवण्याचं हे मुसोलिनीचं तंत्र जगभरातल्या त्या काळातल्या अनेक नेत्यांना भुरळ पाडत होतं. आपणही आपल्या देशात मुसोलिनीचं तंत्र राबवावं असं त्यांना वाटत होतं. त्यात काही भारतीय नेतेही होते आणि हिटलरदेखील होता. हिटलरनं मुसोलिनी-`नॅशनल फॅसिस्ट पार्टी' यांचं कौशल्य-तंत्र आत्मसात तर केलंच, पण पुढील दहा वर्षांत अधिकाधिक `विकसित' करून जर्मनीत अधिक `यशस्वीरित्या', अधिक `परिणामकारकरित्या' राबवलं. मुसोलिनीच्या कारकिर्दीच्या अखेरीस त्याला जनतेच्या तीव्र रोषास-असंतोषास सामोरं जाऊन बळी पडावं लागलं. मात्र संपूर्ण जर्मनी उध्वस्त झाला तरी हिटलरनं आत्महत्या करेपर्यंत जनतेनं त्याच्याविरुद्ध एकही उठाव केला नाही. म्हणून हिटलरचा फॅसिझम (याला `नाझी'झमदेखील म्हणतात) हा मुसोलिनीपेक्षा अधिक यशस्वी ठरतो. वस्तुतः "फॅसो" (fascio) या मूळ इटालियन शब्दाचा अर्थ मोळी, पेंढी किंवा `संघ'. फॅसी (fasci) हे `फॅसो'चे बहुवचन. जगभरातल्या सर्व भाषा परस्परांच्यातले शब्द स्वीकारत असतात, बरेचदा परक्या भाषेतला शब्द आत्मसात करताना त्यांचे मूळ उच्चार आणि अर्थही बदलतात. पण एखाद्या शब्दाचा मूळ भाषेतच अर्थ बदलला आणि तो शब्द जगभरातल्या सर्व भाषांमध्ये नवीन अर्थासह स्वीकारला गेला असं उदाहरण विरळच. अशा विरळ शब्दांमध्ये `फॅसी' या शब्दाची गणना होईल. मुसोलिनीच्या हाती इटलीची सत्ता आल्यानंतर इटलीसकट जगभर या शब्दाचा वापर विशिष्ट प्रकारच्या `राजकारणा'साठी होऊ लागला. हा वापर इतका सर्रास झाला की त्यावरून पुढे `फॅसीझम' असा एक शब्द आणि अर्थात `इझम' देखील अस्तित्वात आला, त्या शब्दाची जगन्मान्य व्याख्या देखील तयार झाली. "फॅसिझम म्हणजे आक्रमक राष्ट्रवाद, बहुसंख्याकवाद, बहुसंख्याकांचे सांस्कृतिक श्रेष्ठत्व, पुराणमतवाद यांच्या आधारे बहुसंख्याकांमध्ये लोकप्रियता मिळवून सत्ता मिळवून मग बहुसंख्याकांना उदारमतवाद, लोकशाही यांविरुद्ध चिथावून, कॉर्पोरेट्सच्या संगनमतानं विरोधकांना नेस्तनाबूत करत एकाधिकारशाही स्थापन करणे". अशा प्रकारच्या राजकारणाला गेली ९९ वर्षे जगभरातल्या सर्व भाषांमध्ये `फॅसीझम" हाच शब्द वापरला जातो. हीच फॅसिझमची अधिकृत व्याख्या मानली जाते. एका अर्थी फॅसिझम म्हणजे हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही किंवा लष्करशाही असते. कारण फॅसिझम मध्ये लष्करापासून, सांस्कृतिक-शैक्षणिक-क्रीडा आणि परराष्ट्र धोरणापर्यंत सर्वाधिकार एकाच व्यक्तीच्या हाती असतात. म्हणून ते शब्द फॅसिझमसाठी वेगवेगळ्या भाषांत वापरले जातात. पण केवळ एकाधिकारशाही किंवा हुकूमशाही किंवा लष्करशाही या एकेका शब्दांत किंवा अधिकृत व्याख्येत `फॅसिझम'चा अर्थ किंवा वर्णन सामावणं आणि फॅसिझमचं वास्तवातलं स्वरूप आकलन होणं शक्य नाही. फॅसिझमचा वास्तवाशी भिडणारा खरा अर्थ समजण्यासाठी व्याख्येपेक्षा `हिटलर' जाणून घेणं आवश्यक आहे.  हिटलरचा उदय हा पहिल्या महायुद्धातल्या जर्मनीच्या पराभवानंतरचा आहे. या काळात जर्मनीत तीन-चार प्रमुख पक्ष होते. १] सोशल डेमोक्रॅट्स - समता व बंधुत्व हा त्यांचा नारा होता  २] ख्रिश्चन सोशलिस्ट - यांचा `ज्यूं'ना प्रखर विरोध असला तरी नेते मात्र खाजगीत `ज्यूं'शी मैत्रीचे संबंध ठेवत. त्यांच्या नेत्याचं वक्तृत्व अत्यंत प्रभावी होतं. नेत्यांच्या व त्यांच्या भाषणांच्या लोकप्रियतेच्या बळावर हा पक्ष अवलंबून होता. ३] पँन जर्मन नॅशनॅलिस्ट - जर्मन वंश [प्रामुख्याने प्रोटेस्टंट] व जर्मन भूभागाचे एकीकरण आणि डाव्यांचा विरोध अशी यांची प्रमुख उद्दिष्टं होती [यांच्यातही बहुतांश जणांना `ज्यूं'बद्दल द्वेष वाटे]. ४] कम्युनिस्ट- जर्मनीचा पराभव त्यांना साम्राज्यवाद-भांडवलदारीचा पराभव वाटत होता व जगातील कामगारांचे एकीकरण करून `वर्ग कलह' निर्माण करण्यासाठी, कामगार-क्रांतीसाठी चालून आलेली दुसरी सुवर्णसंधी वाटत होती.[पहिली क्रांती बरोबर १ वर्षापूर्वी १९१७ साली रशियात झाली होती.] याखेरीज अन्य पक्ष होतेच, परंतु ते प्रमुख चार पक्षांना आलटून पालटून पाठिंबा देत भुरट्या राजकारणातच गर्क होते. जर्मनीचा राजा कैसर  पळून गेल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या सोशल डेमोक्रॅट्सना आपोआप सत्ता मिळाली. वास्तविक सत्ता व शरणागती या दोन्ही बाबी सोशल डेमोक्रॅट्सना परिस्थितीमुळे क्रमप्राप्त होत्या. परंतु बाकीच्या सर्व  पक्षांनी शरणागतीचं खापर सोशल डेमोक्रॅट्सच्या माथी मारायला सुरुवात केली. तरीही त्यानंतरच्या पहिल्या संसदीय निवडणुकीत सोशल डेमोक्रॅट्सना १८५ जागा मिळाल्या. विविध प्रजासत्ताकवादी पक्षांना मिळून १६६ जागा, तर प्रजासत्ताकवरोधी [म्हणजे राजेशाही/हुकुमशाही वादी] पक्षांना ६३ जागा मिळाल्या. परिणामत: सोशल डेमोक्रॅट्स इतर पक्षांच्या सहकार्याने कसाबसा सत्तेवर आला. यापुढील काळात जर्मनीवर युद्ध व पराभव या दोन्हींचे प्रचंड परिणाम घडू लागले. पायाभूत सुविधा बऱ्याच अंशी उध्वस्त झाल्या होत्या, चलन फुगवटा प्रचंड होऊन महागाईने टोक गाठलं होतं. विरोधक तर होतेच, पण सत्तेत सहभागी असलेले पक्ष व स्वपक्षीय देखील सोशल डेमोक्रॅट्सना धमकावून अडचणीत आणत. स्वत:च्या मर्जीतल्या लोकांना सरकारी कंत्राटे मिळवून देत असत. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला होता. सर्व विरोधक व कम्युनिस्ट जनतेत  सतत असंतोष माजवत होते. कम्युनिस्ट तर अव्याहतपणे सरकारी कर्मचाऱ्यांना संपासाठी हाक देऊन सत्ता उलथवण्यास चिथावणी देत होते. शरणागती करारावर सोशल डेमोक्रॅट्सना (नोव्हेंबर १९१८ मध्ये) सह्या कराव्या लागल्या होत्या, त्याबद्दल सर्व पक्ष त्यांच्यावर दोषारोप करत होते. या काळात हिटलरचा प्रभाव नगण्य असला तरी त्याची लोकप्रियता मूळ धरू लागली होती. याच सुमारास, हिटलरनं सोशल डेमोक्रॅट्स विरुद्ध `नोव्हेंबरचे हरामखोर' ही नवी संज्ञा तयार करून जनतेला चिथवायला सुरुवात केली आणि शरणागतीचं खापर सोशल डेमोक्रॅट्स बरोबरच अल्पसंख्य असलेल्या `ज्यूं'वर फोडायलाही सुरुवात केली. या नव्या संज्ञेमुळे आणि `ज्यूं'विरुद्ध चेतवलेल्या द्वेषामुळे हिटलरच्या लोकप्रियतेनं एकदम मुसंडी मारली. (त्याकाळी बहुतांश बँका-पतपेढ्या सकट सावकारी धंदा `ज्यूं'च्या हाती होता. बरेचसे अवैध धंदेही `ज्यू' लोकांच्या हाती होते. तसंच काही `ज्यूं'वर फितुरी केल्याचा व जर्मनीची काही गोपनीय कागदपत्रे शत्रूस विकल्याचा आरोप केला जात होता.) त्याकाळी युरोपियन्सना, विशेषत: जर्मन्सना `ज्यू' लोकांबद्दल कमालीचा तिरस्कार होता. त्यामुळे हिटलरनं `ज्यूं'च्या विरुध्द भाषणे देण्यास सुरुवात केल्याबरोबर त्याला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. लोकांच्या प्रतिसादाचा कानोसा घेऊन त्यानं एप्रिल १९२०मध्ये आपल्या पक्षाचं नाव बदलून `नाझी' [नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी] असं नाव दिलं आणि पक्षाचं धोरण व उद्दिष्ट जाहीर केलं. :  १] सर्व जर्मन भूमी एकत्र करून `विशाल जर्मनी' स्थापन  करणे  २] `ज्यूं'चे नागरिकत्व काढून घेऊन सरकारी पदांवरून काढून टाकणे. त्यानंतर त्याने शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी `व्यायाम, खेळ व [जर्मन] संस्कृतीचे' प्रशिक्षण देण्यासाठी, राष्ट्रभक्ती रुजवण्यासाठी `एस. ए.' (स्टुर्म ऍब्तेलंग) नामक एक संघटना सुरु करून जागोजाग  शाखा स्थापन केल्या. यानंतर लागलीच पक्षाची `एस.एस.' (शुट्झस्टॅफेल) नामक एक `निमलष्करी संघटना'ही सुरु केली. "जर्मन वंशाचा, संस्कृतीचा व देशाचा जाज्वल्य अभिमान तरुणांमध्ये रुजवण्याचे कार्य" या नावाखाली प्रत्यक्षात मात्र विरोधकांबद्दल व विशेषतः `ज्यू' धर्मियांबाबत अफवा पसरवण्याचं, त्यांच्याबद्दल जनतेत द्वेष भिनवण्याचं विषारी कार्य `एसएस' व `एसए' या संघटना करीत असत. हे सर्व सांभाळण्यासाठी काय करावं हे सोशल डेमोक्रॅट्सना कळत देखील नव्हतं. आणि कळलं, तरी उपाययोजना करण्याची धमकच त्यांच्या नेत्यांत नव्हती. अन्य पक्षियांचा पाठिंबा मिळवत कशीबशी सत्ता टिकवण्याची केविलवाणी धडपड करण्यात त्यांचा शक्तिपात होत होता. सुरुवातीच्या काळात केवळ २.६ टक्के मते मिळवू शकणाऱ्या हिटलर व त्याच्या पक्षाला १९३२ साली, म्हणजे पुढील केवळ १०-१२ वर्षांत ३७ टक्के मते मिळाली. एवढी दीर्घ व वेगवान झेप नाझी घेऊ शकण्याचं कारण एसएस व एसए या संघटनांनी चोख बजावलेलं `ज्यू' द्वेष पसरवण्याचे कार्य हे जितकं होतं, तितकंच शेवटच्या तीन वर्षांत आलेली जागतिक मंदी, त्यामुळे आलेली बेरोजगारी, भडकलेली महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार व ही सारी परिस्थिती हाताळण्यात सोशल डेमोक्रॅट्सना येणारं संपूर्ण अपयश! त्यांच्या नेतृत्वात असलेला दुबळेपणा हे देखील होतं! सर्व प्रश्नांवर सोशल डेमोक्रॅट्सकडे फक्त "शांतता, समता व बंधुभाव!" यापलीकडे उत्तर नव्हतं. याउलट हिटलर बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचार या साऱ्याचे अगदी सोप्पं कारण देत होता, ते म्हणजे `ज्यूं'चा देशद्रोह व सोशल डेमोक्रॅट्सनी चालवलेले `ज्यूं'चं तुष्टीकरण!! जणू देशभक्ती म्हणजेच `ज्यू' द्वेष!! त्यासाठी तो वेळोवेळी `ज्यूं'बाबतीत विष ओकणारी पत्रकं वाटून अफवा पसरवत असे व या अफवा पसरवण्यात त्यावेळची प्रसारमाध्यमं खोट्या बातम्या देऊन त्याला साथ देत. हे जनतेला झटकन आकर्षून घेणारं राजकारण होतं. `ज्यूं'चा द्वेष हा ते आपल्या देशभक्तीचा पुरावा मानू लागले. हिटलर त्याच्या सभांमध्ये गर्जत असे, "सोशल डेमोक्रॅट्स हा पक्ष म्हणजे समता व बंधुभावाचा बुरखा पांघरलेली रोगट वेश्या आहे!!" आणि जनता टाळ्यांचा कडकडाट करत असे. हिटलरच्या सभांना होणारी गर्दी पाहून कॉर्पोरेट्स मागे राहणं शक्यच नव्हतं. हिटलरच्या बाहूंना आर्थिक बळ देण्यासाठी `हायडेलबर्ग'च्या कारखानदारांपासून बीएमडब्ल्यू, फोक्स-वॅगन पर्यंत सारे विख्यात कॉर्पोरेट्स हिटलरच्या  रोजगार व औद्योगिक धोरणाचे गोडवे गात नाझींच्या तंबूत दाखल झाले. हे बळ वापरून  हिटलर कम्युनिस्टांसह (!!) अन्य  पक्षांची मदत घेऊन [नाझी विरोधी] सोशल डेमोक्रॅट्स प्रणित आघाडी सरकार विरुध्द सेप्टेंबर १९३२मध्ये अविश्वासाचा ठराव आणून तो संमत करून घेऊ शकला. याच उद्योगांच्या `आर्थिक बळावर' पुढच्या मुदतपूर्व निवडणुकीत नोव्हेंबर १९३२ मध्ये नाझी पक्षाला ५८४ पैकी १९६ जागा मिळूनही तो चॅन्सलरपद हस्तगत करू शकला.  १९३२ सालच्या नोव्हेंबरमधल्या निवडणुकीत हिटलरच्या नाझी पक्षाला १९६ जागा मिळून तो संसदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सोशल डेमोक्रॅटस, कम्युनिस्टस आणि सी एन पी या पक्षांना अनुक्रमे १२१, १०० व ५२ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत हिटलरच्या नाझी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्याच्या मतांची टक्केवारी ३२ टक्क्यांपेक्षा कमी होती. म्हणजे ६८ टक्के मतदान हिटलरविरोधी असूनही त्याचा नाझी पक्ष हा सर्वात प्रबळ पक्ष ठरला होता. पुढच्या दोन महिन्यात स्वपक्षीय प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढून, उद्योगपतींच्या आर्थिक मदतीने अन्य पक्षीयांत तोडफोड करून त्यांच्यातल्या काही गटांचा आणि अध्यक्ष हिंडेनबुर्ग याचा पाठींबा मिळवून हिटलर चॅन्सलरपदी (प्रधानमंत्रीपदी) विराजमान झाला. स्वतः चॅन्सलरपदी आल्याबरोबर त्यानं गृहमंत्रीपदी आणि संसदेच्या अध्यक्षपदी (सभापती) आपला अत्यंत निकटचा साथीदार `गोअरिंग' याची नेमणूक करून लगेच पुन्हा निवडणुका घेण्यासाठी अध्यक्षांमार्फत संसद बरखास्त करून घेतली. अर्थात संसद बरखास्त झाली तरी सत्ता हिटलरच्याच हाती होती. पुढच्या महिनाभरात गृहमंत्री गोअरिंगने पोलिसांमधल्या ८० टक्के जागा एसए-एसएस (नाझी निमलष्करी-सांस्कृतिक संघटना) यांनी भरून टाकल्या. यानंतर कम्युनिस्ट्स आणि एसए-एसएस यांच्यात जागोजाग हाणामाऱ्या घडवून, हिंसाचाराचं कारण पुढे करत कम्युनिस्ट पक्षावर बंदी आणली. निवडणुकांची तारीख घोषित झाली ५ मार्च १९३३!  २० फेब्रुवारीला हिटलरने गोअरिंगच्या अध्यक्षीय निवासस्थानी काही उद्योगपतींची आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह बैठक घेऊन त्यांना सांगितलं,"ही निवडणूक शेवटची व्हावी. यानंतर पुन्हा निवडणूक घेण्याची गरज पडायला नको अशी माझी इच्छा आहे. यानंतर एकाच आठवड्यात, २७ फेब्रुवारी रोजी, म्हणजे निवडणुकीला एक आठवडा उरला असताना अचानक राईशटॅगला प्रचंड मोठी आग लागली. राईशटॅगला आग लागल्याची बातमी ऐकून हिटलर, त्याचा सर्वात विश्वासू सहकारी गोबेल्स आणि गोअरिंग तिथे थोड्याच अवधीत तिथे पोहोचले. आग पाहून गोअरिंग म्हणाला, "हे कम्युनिस्टांचेच कृत्य असणार." गोअरिंगचे हे वाक्य संपतानाच पोलिसांनी `लुबी' नावाच्या एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याला संसद भवनातून पकडून बाहेर आणले. हिटलरने त्वरित ४००० नाझीविरोधी व कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबलं   आणि रेडियोवरून भाषणे करून `राईशटॅग फायर'चे खापर नाझीविरोधी राजकारण्यांवर फोडायला सुरुवात केली. गोअरिंग आणि हिटलर यांनी रेडियोवरून गर्जना केली,"संसद भवन जाळणाऱ्या देशद्रोह्यांना धडा शिकवल्याखेरीज आम्ही थांबणार नाही. राष्ट्रशक्ती आणि पोलीसांची शक्ती वापरून या देशद्रोह्यांचा नायनाट केला जाईल." हिटलरच्या अगोदरचा पंतप्रधान ( चॅन्सलर ) हेनरीच ब्रुएनिंग अध्यक्षांपासून जनतेपर्यंत सर्वांना आवाहन करत होता, "अध्यक्षांना विनंती आहे की जुलुमाच्या या थैमानाला आवर घाला. राईशटॅगच्या आगीची सखोल चौकशी करा. संविधानाचे पावित्र्य राखून सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याचा आमचा निर्धार आहे." पण जनतेला राष्ट्रवादाचा आणि निवडणुकीचा ज्वर इतका चढला होता की या माजी प्रधानमंत्र्याच्या विनंतीला कोणीही भीक घालायला तयार नव्हते. जर्मनीच्या संपूर्ण मध्यमवर्ग आणि उच्चमध्यमवर्गाच्या राष्ट्रवादाला `राईशटॅग फायर' मुळे उधाण आलं होतं. राईशटॅगवरचा हल्ला जनतेला जर्मन सार्वभौमत्वावरचा, लोकशाहीवरचा हल्ला वाटत होता. नाझीविरोध म्हणजेच राष्ट्रद्रोह याची मध्यमवर्गाला खात्रीच पटली होती. ५ मार्चला निवडणूक झाली आणि नाझी पक्षाला २८८ जागा मिळाल्या. १९६ वरून २८८ जागांची झेप नाझी पक्षानं `राईशटॅग फायर'मुळे घेतली. या उत्तुंग झेपेमागे अन्य कारणंही होती पण ती फार उशिरा लोकांना कळली. या साऱ्या निवडणुकीच्या धामधुमीत एकटा लुबी इतक्या प्रचंड मोठ्या इमारतीला आग कशी लावू शकला? हा साधा प्रश्न राष्ट्रवादाने भडकलेल्या जनतेपैकी एकालाही पडला नाही. वास्तविक, `राईशटॅग'च्या इमारतीत जाण्याचा एकच अंतर्मार्ग होता, जो राईशच्या अध्यक्षांच्या निवासाच्या तळघरातून जात होता. राईशचा अध्यक्ष होता दस्तूर खुद्द गोअरिंग!! म्हणजे, `राईशटॅग फायर'साठी लागणारं इंधन, स्फोटकं वगैरे सामग्री गोअरिंगच्याच योजनेनुसार त्याच्याच देखरेखीखाली नाझींनी संसद भवनात पोहोचवली असणार. पण असा तर्क करण्यासाठी जर्मन जनता भानावर होती कुठे? जनता सूड भावनेनं पेटली होती. जनतेनं `राईशटॅग फायरचा' प्रतिशोध घेण्यासाठी हिटलरहाती सत्ता दिली. हिटलर सत्ताधीश झाल्यावर लुबीवर खटला भरला गेला. `राईशटॅग'मध्ये स्फोटकं, इंधन केंव्हा, कसे आणले गेले याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण पुढे करून सगळेच पुरावे नष्ट करण्यात आले होते. या प्रकरणात एकही नाझी सापडला नाही.(अर्थातच आता न्यायाधीशही राष्ट्रभक्त -`नाझी' सहानुभूतीदार होते) धरपकड केलेल्या नाझीविरोधी ४/५००० लोकांचं काय झालं तेही कोणाला नेमकं माहीत नाही. लुबीचा शिरच्छेद केला गेला...... पुढे न्युरेंनबर्ग खटल्याच्या काळात असं कळलं की मार्च १९३३च्या निवडणुकांमध्ये हिटलर-गोबेल्स या जोडगोळीनं  ४/५ टक्के बनावट मतपत्रिकांचा वापर केला होता आणि एसए, एसएस यांनी बरंच खोटं मतदान देखील केलं होतं, या खोट्या मतदानाबाबत काही उमेदवारांनी व पक्षांनी तक्रारीही केल्या होत्या. पण राईशटॅग  फायरने जनतेत पेटवलेल्या राष्ट्रवादामुळे कोणालाही त्या तक्रारींत तथ्य वाटलं नाही. हिटलर-गोबेल्स यांनी मतदानात-मतपत्रिकेत घोटाळा केल्याचं कोणी मध्यम- उच्च वर्गीय ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. थोडक्यात, `ज्यू'द्वेषाधारित राष्ट्रवाद, अगोदरच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि अन्य पक्षांची सोशल डेमोक्रॅट्सच्या विरोधात हिटलरला साथ, या तीन बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे नाझी पक्षाच्या १९३२ सालच्या  १९६ जागा!! तर, बनावट मतपत्रिका, बनावट मतदान, बनावट हल्ला (राईशटॅग फायर) या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे नाझी पक्षाची १९३३ साली १९६ वरून २८८ जागांवर झेप!! अशा या `बनावट' निवडणुकीनंतर हिटलर हयात असेपर्यंत निवडणुका झाल्याच नाहीत........   फक्त युद्धं होत राहिलीत. यानंतर दुसरं महायुद्ध, त्यात घडलेला संहार, ज्यूंच्या छळछावण्या, त्यांचं हत्याकांड, ज्यूंना हुडकून छळछावण्यांमध्ये कोंडण्यासाठी `उपयुक्त' ठरलेले एसए व एसएसचे स्वयंसेवक हा सारा इतिहास सर्वज्ञात आहे. एकंदरीत `अल्पसंख्याकांच्या, भिन्नधर्मियांच्या द्वेषावर आधारित `राष्ट्रवाद', भिन्न धर्मियांविरुद्ध खोट्या बातम्या, विरोधकांविरुद्ध खोटे आरोप, खोटं मतदान आणि कॉर्पोरेट्सचं आर्थिक बळ यांनी जनतेवर केलेल्या सामूहिक बलात्कारातून २१ मार्च १९३३ रोजी हिटलरचं `थर्ड राइश' जन्माला आलं आणि हिटलरनं ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्या करेपर्यंत ते जगलं!! हे थर्ड राईश जिवंत असेपर्यंत जर्मन जनता ज्यूंच्या रक्षणासाठी किंवा हिटलरच्या अत्याचारांचा, युद्धातल्या पराभवाचा जाब विचारायला रस्त्यावर उतरली नाही. कारण या संपूर्ण कालावधीत, रेडियोच्या विविध वाहिन्यांवरचे सर्व निवेदक अव्याहतपणे `ज्यूं'विरुद्ध जहरी गरळ ओकत होते आणि जर्मनी विजयी होत असल्याच्या खोट्या बातम्या कंठशोष करत देत होते. वर्तमानपत्रांतून जर्मनी जिंकल्याच्या  आणि `ज्यूं'च्या फितुरीच्या बातम्या, खोटी छायाचित्रं पानापानावर प्रसिद्ध होत. तशातही एखाद्यानं जाब विचारलाच, तर त्याला देशद्रोही ठरवून त्याची रवानगी यमसदनी अथवा तुरुंगात केली जाई आणि मध्यम-उच्च वर्गीयांना त्या जाब विचारणाऱ्याला ठोठावलेली शिक्षा `योग्य' वाटे. परिणामतः जनतेतील ज्यूद्वेषावर आधारित राष्ट्रवाद धगधगत ठेवण्यात, युद्धात जर्मनीचा सपशेल पराभव होतो आहे हे सत्य जनतेपासून लपवून ठेवण्यात हिटलर-गोबेल्स ही दुक्कल कमालीची यशस्वी झाली होती. एव्हाना जगातले कोट्यवधी लोक हे हिटलर-मुसोलिनी प्रणित दुसऱ्या महायुद्धात आणि लक्षावधी ज्यू हिटलरच्या छळछावण्यांत मृत्यमुखी पडले होते.........  फॅसिझमचा जनक `मुसोलिनी, अथवा `फॅसिझम'चा `यशस्वी' वापर करणाऱ्या हिटलर यांची कारकिर्द पाहता, केवळ एकाधिकारशाही किंवा हुकूमशाही किंवा लष्करशाही या एकेका शब्दांमध्ये `फॅसिझम'चा  अर्थ किंवा वर्णन सामावणं शक्य नाही. एकाधिकारशाही, हुकूमशाही, लष्करशाही आणि फॅसिझम या साऱ्या प्रकारांत `विरोधकांचं निर्दालन, संहार' आणि सत्तेचं केंद्रीकरण हे सामाईक आहे हे खरंच. तरीही फॅसिझम अन्य तीन प्रकारांपेक्षा वेगळा ठरतो. कारण एकाधिकारशाही, हुकूमशाही, लष्करशाही यांत सत्तेच्या बाजूनं फार तर एखादा कंपू, अत्यल्पसंख्य गट असतो, त्याला जनतेचा पाठिंबा नसतो. तर फॅसिझमला  जनतेतल्या बहुसंख्याकांपैकी मोठ्या गटाचं, विशेषतः उच्च वर्गीय-उच्च मध्यमवर्गीय-उच्च वंशीय लोकांचं  पाठबळ असतं. दुसरं, फॅसिझममध्ये सत्ता प्राप्त करण्याचा मार्ग क्रांती, बंड किंवा उठाव हा नसून जनमत-निवडणूक-लोकशाही हाच असतो. मात्र फॅसिस्ट याच लोकशाही मार्गात असत्य, अफवा, बनावट हल्ले यांच्या वापरातून जनतेत विवक्षित अल्पसंख्य- भिन्न धर्मीय गटाविरुद्ध द्वेष भिनवतात व त्या द्वेषाला `राष्ट्रभक्ती' ठरवून ३५-३८ टक्के जनतेची मतं मिळवून १०० टक्के सत्ता मिळवतात. सत्ता हस्तगत झाल्यावर ती ३५-३८ टक्के जनता अल्पसंख्य-भिन्न धर्मीय गटाच्या द्वेषाने पेटत राहील अशा अफवा-खोट्या बातम्या पेरत राहतात, बहुसंख्याक गटाचा स्वधर्म-स्ववंश-स्वसंकृती यांचा अभिमान-गर्व चेतवत राहतात, जेणेकरून जनमताचा काही भाग कायम स्वतःच्या बाजूने राहील. बहुसंख्याकांचा स्वधर्म-स्ववंश-स्वसंस्कृती यांचा   गर्व धुमसता ठेवण्यासाठी ते देशसेवेचा व सांस्कृतिक कार्याचा बुरखा घातलेली शिस्तबद्ध-निमलष्करी स्वरूपाची संघटना चालवतात. द्वेषमूलक अफवा  पसरवण्यासाठी, स्वपक्षाच्या सत्कार्याच्या व विरोधकांच्या दुष्कृत्यांच्या खऱ्या-खोट्या बातम्यांच्या प्रसारासाठी, ते प्रसारमाध्यमं बगलेत घेतात व निधीसाठी कॉर्पोरेट्स यांना ते हाताशी धरतात. हिटलरनं हेच केलं आणि लाखो लोकांची कत्तल केली. पण, ती कत्तल तो करू शकला कारण ३५/३८ टक्के जर्मन जनतेनं `ज्यूं'चा द्वेष करत हिटलरला निवडून दिलं आणि ज्यूंची कत्तल होत असतानाही, जर्मनी पराभूत होत असतानाही हिटलरवर अढळ विश्वास ठेवून त्याच्याविरुद्ध उठाव केला नाही. म्हणून, ज्यूंच्या कत्तलीचं आणि दुसऱ्या महायुद्धातील नरसंहाराचं पाप केवळ हिटलर-मुसोलिनी यांचं नसून त्यांना मतदान करून सत्तारोहणापर्यंत नेणाऱ्या ३५/३८ टक्के मध्यम-उच्चवर्गीय जनतेचंही आहे. याचा अर्थ असा की, फॅसिझममध्ये घडणाऱ्या क्रूर घटनांचं पाप केवळ एखाद्या नेत्याचं नसतं, तर ते किमान ३५/३८ टक्के जनतेचं असतं. कारण त्या ३५/३८ टक्के जनतेनं फॅसिस्टांच्या निमलष्करी विषारी संघटनांना राष्ट्रभक्त मानलेलं असतं, त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवून अल्पसंख्य परधर्मियांचा द्वेष धरून फॅसिस्ट नेत्याला निवडून दिलेलं असतं !! एकंदरीत, त्या जनतेमुळेच लोकशाही आणि राष्ट्रभक्तीची झूल पांघरून फॅसिझम मुसंडी मारतो! स्थापनेच्या शताब्दी वर्षात असलेला `फॅसिस्ट' हा पक्ष, संस्थापक मुसोलिनीच्या पाठोपाठच नाहीसा झाला, पण तरीही त्यांची चर्चा कधीही थांबली नाही आणि थांबणार नाही. कारण सत्ता संपादनाची व सत्ताकारणाची त्यांची कार्यपद्धत अधिक यशस्वीपणे राबवणारे हिटलर सारखे नेते नव्याने जगभर तयार होत गेले आणि होत आहेत. नेत्यांची, पक्षांची, देशसेवा कम सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संघटनांची - शाखांची नावं बदलतात. देशांची नावं बदलतात, देशानुसार बहुसंख्याक-अल्पसंख्याक धर्मांची नावं बदलतात, काळानुसार प्रसार माध्यमांचे प्रकारही बदलतात. रेडियो ऐवजी टीव्ही, पत्रकांऐवजी व्हॉट्सप.....  फॅसिझम मात्र न बदलता तसाच टिकून काही महिन्यात शंभरी पूर्ण करेल..... एकच बदललं, स्थापना करताना मुसोलिनीनं पक्षाचं नावच `फॅसिस्ट' ठेवलं होतं, निदान तेवढ्या बाबतीत तरी तो प्रामाणिक होता. आता मात्र कोणताही नेता तेवढा देखील प्रामाणिक नाही. कोणीही नेता स्वतःला फॅसिस्ट म्हणवत नाही. सबब, प्रत्येकानं आपापल्या देशातल्या नेत्याचं, त्याच्या पक्षाचं आणि देशसेवा कम राष्ट्रभक्ती कम सांस्कृतिक कार्य करणाऱ्या  संघटनेचं `वास्तवातलं' नाव ओळखणं भाग आहे!! कारण न ओळखणारे लोक फॅसिस्टांना निवडून देणाऱ्या ३५/३८ टक्क्यांमधले पापी ठरतील ! सारांशानं, मुसोलिनी आणि विशेषतः हिटलरनं सत्तेपर्यंत पोहोचण्यापासून स्वतःच्या मृत्यूपर्यंत जे काही केलं ते इतकं व्यापक आणि विविधांगी आहे, की फॅसीझमचा अर्थ एकेका शब्दात तर सोडा, थोडक्यात वर्णन किंवा व्याख्या करूनही, सर्वांना समजणं अवघड आहे. त्यापेक्षा फॅसिझम म्हणजे `हिटलरने जे केले ते' असा अर्थ वास्तवाशी निगडित असल्यामुळे कोणालाही समजणं अगदी सोपं आहे ..... अर्थात, `वास्तव' या शब्दाचा अर्थ मात्र `उमजलेला' असला पाहिजे.......               लोकेश शेवडे  १२/११/२०२०    १४:०० फिनिक्स 

Monday, October 9, 2017

म्हातारा, म्हातारी, मुंगी आणि मोगँबो

१ ऑक्टोबरच्या `लोकरंग' मध्ये प्रकाशित झालेल्या `महात्मा गांधी आणि डॉ हेडगेवार' या लेखाला माझे उत्तर:

म्हातारा, म्हातारी, मुंगी आणि मोगँबो

मराठी लोकांना लहानपणापासूनच कोड्यांची फार संवय असते. कोड्यात बोलणे, कोड्यात टाकणे असे वाक्प्रचार त्यामुळेच मराठीत रूढ झाले असावेत. कोड्यांच्या बाबतीत दोन प्रसंग मला नेहमी आठवतात.  आमच्या लहानपणी एक गमतीशीर कोडं मुलं एकमेकांना घालत असत, "तीन मुंग्या एका दिशेने, एका पाठोपाठ, सरळ रेषेत जात असतात. पहिली मुंगी म्हणते, माझ्या मागे दोन मुंग्या आहेत. दुसरी म्हणते माझ्या मागे एक आहे ...... यानंतर तिसरी मुंगी म्हणते माझ्या मागे दोन मुंग्या आहेत. असं कसं???? ......" या प्रश्नाची दहा पंधरा अंदाजपंचे, तर्कपंचे उत्तरं देऊन, ती चुकीची आहेत हे ऐकून, समोरचा दमून `हरलो' म्हणाला की मग प्रश्न विचारणारा सांगायचा, "तिसरी मुंगी खोटं बोलली!!" यावर तो उत्तरं शोधून दमलेला, "आपण का मूर्खांसारखे `तर्कशुद्ध' उत्तर शोधण्याच्या मागे लागलो" असा विचार करून खजील होई आणि प्रश्न विचारणारा त्यावर प्रचंड गडगडाट करत मोगँबोसारखा हसे! असाच या कोड्याला हरून मी एकदा खजील झाल्यावर, एका चतुर मुलानं पुन्हा काही दिवसांनी मला हेच कोडं टाकलं. तेंव्हा उत्तर अगोदरच माहीत असल्यानं मी आत्मविश्वासानं "तिसरी मुंगी खोटं बोलली" असं उत्तर दिलं. त्यावर "तिसरी मुंगी खोटं नव्हे, खरंच बोलली. पण मीच तुला सांगताना खोटं सांगितलं!" असं सांगून तो प्रश्नकर्ता पुन्हा मोगँबिक मुद्रेनं हसायला लागला आणि मी अगोदरपेक्षा अधिक खजील झालो.

पुढे कधीतरी कॉलेजमध्ये तारुण्य-रोमान्स वगैरेंची चाहूल लागल्यानंतर आमचे विनोद आणि कोड्यांचे विषय बदलले. एकदा एका मित्रानं आम्हा पाच सहा जणांना आव्हान देऊन एक कोडं सांगायला सुरुवात केली, "एकदा एक ९९ वर्षांचा म्हातारा आणि ९८ वर्षांची म्हातारी हिमालयात नारळाच्या झाडावर बसून रोमान्स करत होते......... " कोड्यातलं हे पाहिलं वाक्य ऐकल्याबरोबर हास्यांचा एक प्रचंड स्फोट झाला, सर्वच्या सर्व मित्र हसत हसत अक्षरश: जमिनीवर कोसळले. यावर कोडं टाकणाऱ्या मित्रानं " हसायला काय झालं?" असं विचारलं. त्यावर बाकीचे " हिमालय... नारळाचं झाड.....रोमान्स ..... ९९-९८ वर्षे......" असं कसंबसं म्हणत आणखी जोरानं हसत गडाबडा लोळू लागले. कोणाचंही हसणं थांबेना, त्यामुळे त्याला कोड्याचा पुढचा भाग सांगता येईना. शेवटी तो कोडं टाकणारा पुढचं काही न सांगता वैतागून तरातरा तिथून निघून गेला. परिणामी हे कोडं नेमकं काय होतं, ते आम्हाला आजतागायत कळलेलं नाही.

१ ऑक्टोबर२०१७च्या रविवारच्या `लोकरंग' मध्ये `महात्मा गांधी आणि डॉक्टर हेडगेवार' हे शीर्षक आणि शीर्षकाच्या वर त्याचे टिपण (ब्लर्ब):- "गांधीजींनी संघशिबिरास भेट देऊन त्याचे कार्य जाणून घेतले आणि नंतर सरसंघचालकांशी झालेल्या भेटीत संघकार्याचे तोंडभरून कौतुकही केले" हे वाचून, मला कॉलेजमध्ये त्या 'नारळाच्या झाडावर म्हातारा-म्हातारी'वाल्या कोड्याची आठवण झाली. तथापि, तरीही पोट धरून हसत हसत पुढे पूर्ण लेख वाचला. त्या संपूर्ण लेखात `अप्पाजी जोशी' यांनी दिलेली माहिती `मधू देवळेकरांनी' वाचकांना सांगितली आहे, त्यावरून `मुंग्यांच्या' कोड्याची आठवण झाली!! आणि या कोड्याचे, सॉरी लेखाचे उत्तर `तिसरी मुंगी' की कोडं सांगणारा `चतुर मुलगा' यापैकी काय ते कळत नाही म्हणून आज पुन्हा खजील झालो. असो, खरे उत्तर त्यापैकी काहीही असलं तरी, सध्या चतुर मुलगा मोगँबोसारखा हसत असेल हे मात्र निश्चित !!

Thursday, February 16, 2017

दुसरा प्रश्न

दुसरा प्रश्न


८ नोव्हेंबर रोजी सरकारने `५०० आणि १०००' रुपयांच्या तत्कालीन नोटा रद्द झाल्याचे घोषित केले. ही घोषणा झाल्या झाल्या `नोटबंदी' किंवा `मोठ्या' रकमांचे चलन कायमचे बंद झाले असा समज करून घेऊन समाज माध्यम आणि प्रसार माध्यमांवर काहीजणांनी तत्काळ "काळे धन-भ्रष्टाचार निर्मूलन व आर्थिक सुधारणेच्या वाटेवरील नोटबंदी हा पहिला टप्पा आहे आणि सध्याच्या निरनिराळ्या अनेक करां [`टॅक्सेस']ऐवजी `व्यवहार/विनिमय कर [`ट्रँझॅक्शन टॅक्स'] हा एकमेव कर' असा शेवटचा `टप्पा' आहे", असे ओक्साबोक्षी सांगायला सुरुवात केली. अर्थशास्त्रीय गायनाचे `टप्पे' गाताना, नोटबंदी ते `ट्रँझॅक्शन टॅक्स' ही संपूर्ण मांडणी जगात प्रथमच अवतीर्ण होणार असल्याने ती केवळ नाविन्यपूर्णच नव्हे तर, क्रांतीकारक ठरणार आहे असे `खयाल' गाऊन, नोटबंदी ही भारतातील आर्थिक क्रांतीची सुरुवात आहे असे स्वागतगीतही या गायकांनी गायले. सदरहू क्रांतिदूतांच्या मते त्यांनी हे क्रांतिगीत दोन-अडीच वर्षांपूर्वी सध्याच्या पंतप्रधानांसमोर आळवले होते आणि त्या क्रांतिगीतानेच प्रभावित होऊन पंतप्रधानांनी आता पहिला `टप्पा' सादर केला आहे. त्यांच्या भाकितानुसार `नोटबंदी' ही जशी फक्त मोठ्या नोटांसाठी आहे, यापुढे फक्त छोट्याच नोटा चालूच राहतील, त्याच धर्तीवर आणखी काही वर्षांनी `मोठमोठ्या' करांवर `टॅक्सबंदी' येऊन, अगदी छोटा [अंदाजे] `केवळ' २ टक्के असलेला `व्यवहार कर' [ट्रँझॅक्शन टॅक्स] लागू होईल. वट्ट, मोठ्या नोटा आणि मोठे टॅक्सेस यांच्यावर कायमची बंदी हे या क्रांतिकारकांचे `क्रांतिसूत्र'!!

तथापि जुन्या नोटा बंद केल्याच्या घोषणेला दोन दिवस उलटण्याच्या आतच `२०००' रुपयांची नोट येतेय आणि नंतर ५००-१००० रुपयांच्याही नव्या नोटा येणार असे जाहीर झाले. त्याबरोबर लोक संभ्रमात पडले कारण आता हे प्रकरण `नोटबंदी' न ठरता फक्त `नोटबदल' ठरत होते. त्यामुळे वस्तुतः क्रांतिसूत्र पहिल्याच टप्प्यात चुकले होते. पण एक टप्पा चुकला म्हणून डगमगून गेले तर ते क्रांतिकारक कसले? ते ठणकावून सांगतच राहिले की घडले ते योग्यच आहे, वेळप्रसंग पाहून काही काळ क्रांतीला वळणे घ्यावी लागतात तसे `नव्या मोठ्या नोटांचे आगमन' हे या क्रांतीच्या मार्गातील वळण आहे. नोटबंदी यशस्वी होतेच आहे, त्यातून काळा पैसा नष्ट होणारच आहे........ आणि पुढे कॅशलेस वगैरे टप्पे घेत क्रांती `ट्रँझॅक्शन टॅक्स' पर्यंत जाणारच आहे!!  .........
क्रांतीदूतांच्या मते ही आर्थिक क्रांती पंचसूत्री आहे. १. सध्याचे सर्व कर रद्द  २. बँकेतून घडणाऱ्या सर्व व्यवहारांवर सरसकट [साधारण २ टक्के] विनिमय कर [`ट्रँझॅक्शन टॅक्स'] लागू ३. सर्व मोठ्या नोटा रद्द ४. रोख व्यवहारावर कोणताही कर नाही ५. २००० रुपयांवरील रोख व्यवहारावर कायद्याने बंदी. ही पाच सूत्रे असली तरी त्यातील तीन सूत्रे ही अंमलबजावणीच्या तपशीलाबाबत असल्यामुळे, ही क्रांती तत्वतः व्दिसूत्री होते. त्यातील पहिले सूत्र `मोठ्या नोटांवर बंदी'. या सूत्राबाबत ८ नोव्हेंबरला झाली ती नोट`बंदी' होती की नोट`बदल'? जे काही असेल त्यात यश मिळाले का? त्याचे फायदे-तोटे नेमके काय आणि कोणाला झाले? वगैरे प्रश्नांवर अव्याहत चर्चा सुरूच आहे आणि पुढेही चालू राहील. दुसरे सूत्र `मोठमोठ्या टॅक्सवर बंदी आणि त्यासर्वांच्याऐवजी एकच आणि अत्यल्प [अंदाजे] २ टक्के `ट्रँझॅक्शन टॅक्स' हे आहे. क्रांतीकारकांच्या मते या टॅक्सची संकल्पनाच क्रांतिकारक आहे कारण असा टॅक्स, त्यातील सुलभता, त्याचा अत्यल्प दर [२%] आणि तरीही मिळणारा प्रचंड महसूल व त्यातून होणारी देशाची भरभराट या साऱ्याची जगात यापूर्वी कोणी कल्पना देखील केली नव्हती. या दुसऱ्या सूत्रावर मात्र पुरेशी चर्चा घडताना दिसत नाही. परिणामतः, ट्रँझॅक्शन टॅक्स ही संकल्पना अत्यंत निर्दोष-नाविन्यपूर्ण-क्रांतिका
री व हितकारी असल्याचे डाव्यांपासून उजव्यांपर्यंत निरपवाद सर्वांनाच निर्विवाद मान्य असल्याचे क्रांतिकारकांचे म्हणणे आहे. किंबहुना ती संकल्पनाच इतकी बिनतोड आहे की त्यावर वाद-चर्चा करण्यासारखे काही शिल्लकच राहात नाही असे या जागतिक क्रांतीचे प्रणेते ठामपणाने गेले दोन महिने सांगत आहेत. म्हणूनच, १] अनेकविध मोठ्या टॅक्सेसवर बंदी आणून फक्त २ टक्के एकमेव `ट्रँझॅक्शन टॅक्स' लागू करणे, हा खरोखरच जगात प्रथमच मांडला जाणारा, म्हणजेच क्रांतिकारी `अर्थ विचार'आहे का ? आणि २] तो सरकारपासून आगरीबश्रीमंत जनतेपर्यंत सर्वांना लाभदायी असेल का? या दोन प्रश्नांवर चर्चा अनिवार्य ठरते.

भरण्यास सुलभ, वसुलीस सोपा, चुकवण्यास अशक्य असा किमान दराचा कर लावून अधिकतम महसूल मिळावा हे किमान दोनशे वर्षे जगातील प्रत्येक देशाचे स्वप्न बनून राहिले आहे. तितकीच वर्षे अशा करप्रणालीच्या शोधात अनेक अर्थतज्ज्ञ, विचारवंतदेखील आपापल्या परीने अभ्यास, संशोधन, प्रयोग करीत आहेत आणि नवनवे प्रस्तावही मांडत आहेत. `ट्रँझॅक्शन टॅक्स' [व्यवहार/विनिमय कर] ही त्यातलीच एक करप्रणाली. फायनान्शियल ट्रँझॅक्शन टॅक्स, करन्सी ट्रँझॅक्शन टॅक्स, बँक ट्रँझॅक्शन टॅक्स, बँक अकाउंट डेबिट टॅक्स, मनी ट्रान्स्फर टॅक्स, टर्न ओव्हर टॅक्स अशा विविध नावांनी विविध अर्थतज्ज्ञांनी याच करप्रणालीची संकल्पना मांडली. `जॉन मेनार्ड केन्स' या अर्थतज्ज्ञाला या संकल्पनेचा जनक मानले जाते. अमेरिकेतील `ग्रेट डिप्रेशन' या नावाने गाजलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर १९३६साली केन्स यांनी ही संकल्पना मांडली. ८०च्या दशकात या करप्रणालीचे मार्कोस सिंत्रा, रॉबर्टो कांपोस सारख्या काही अर्थतज्ज्ञांनी आग्रही समर्थन केले. अर्थातच या करप्रणालीला विरोध करणारे अर्थतज्ज्ञही संख्येने बरेच जास्त होते. परिणामी सुरुवातीच्या काळात काही देशात फक्त शेअर्स किंवा अन्य सिक्युरिटीज पुरते हे प्रस्ताव स्वीकारले गेले आणि लागूही करण्यात आले. हे लागू करणाऱ्या देशांत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिनलँड, मलेशिया, सिंगापूर, स्वीडन, ब्राझील यांचाही समावेश होतो. तथापि लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की यातील बहुतांश देशांनी हा टॅक्स काही वर्षांतच [९०च्या दशकातच] रद्द करून पुन्हा त्यांच्या मूळ करप्रणाली अथवा त्याच काळात प्रस्थापित झालेली `जीएसटी' [आपल्याकडे यापूर्वीच्या सरकारने आणू पाहिलेली व आता येऊ घातलेली] ही करप्रणाली स्वीकारली.

ऑस्ट्रेलियाने १९८२ पासून सुरु केलेला `बँक अकाउंट डेबिट टॅक्स` २००२ ते ५ या दरम्यान टप्प्याटप्प्यात बंद करून `जीएसटी'करप्रणाली स्वीकारली. अर्जेंटिनाने १९८४ पासून लागू केलेला हाच कर १९९२ साली बंद केला व पुन्हा वॅट, आयकर यासारखे कर सुरु केले. बँक ट्रँझॅक्शन टॅक्स [बीटीटी] हा एकमेव कर [सिंगल टॅक्स] स्वरूपात लागू करण्याचा प्रयोग सर्वाधिक काळ टिकला `ब्राझील' या देशात. तेथे १९९३ साली बीटीटी लागू करण्यात आला. काहींच्या मते तेथे सुरुवातीच्या काळात महसूलात वाढ देखील झाली होती. मात्र पुढे ब्राझीलची अर्थव्यवस्था कोसळू लागली आणि शेवटी २००७ साली बँक ट्रँझॅक्शन टॅक्स बंद करून तेथेही त्यांनी त्यांची जुनी करप्रणाली पुन्हा अमलात आणली. ब्राझीलची अर्थव्यवस्था कोसळण्यामागे तज्ज्ञांकडून अनेक कारणे दिली जातात. त्यात बँक अधिकाऱ्यांपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांचा भ्रष्टाचार, विनिमयावरील  करामुळे जनतेची विनिमय/व्यवहार टाळण्याची मानसिकता, महसूलात घट ही प्रमुख कारणे आहेत. स्वीडन या देशात १९८३ साली `ट्रँझॅक्शन टॅक्स' अमलात आला. पुढील दोनच वर्षांत स्वीडनच्या महसूलात प्रचंड घट झाल्यामुळे त्या कराचा दर वाढवणे सरकारला भाग पडले. परिणामतः तेथील शेअरबाजार, इन्श्युरन्स, व्याज दर या सर्वांवर गंभीर परिणाम झाले. एकंदर बाजारातील गुंतवणूक जवळजवळ निम्म्यावर आली. त्यातून सावरण्यासाठी सरकारने बीटीटीचा दर पूर्वीपेक्षाही कमी करून अर्ध्यावर आणला तरीही परिस्थिती सुधारेना. अखेरीस डिसेंबर १९९१ मध्ये हा टॅक्स बंद करण्यात आला, त्यानंतर दोन वर्षांनी स्वीडनची आर्थिक गाडी पुन्हा रुळावर आली. हीच परिस्थिती इंग्लंडमध्ये हा कर सुरु केल्यावर ओढवली व हा कर सूट-सवलत देत, दर कमी-कमी करत शेवटी १९९० साली सरकारला बंद करण्याचे जाहीर आश्वासन द्यावे लागले.
थोडक्यात , १. `सिंगल टॅक्स' - `बँक ट्रँझॅक्शन टॅक्स' ही संकल्पना अजिबात नवी नाही, ती किमान ८० वर्षे जुनी आहे. २. या करप्रणालीचा वापर केलेल्या एकाही देशाला लाभ झाला नाही, उलट तूट आल्यामुळे सर्वच देशांत या कराची अंमलबजावणी थांबवण्यात आली. ३. या करप्रणालीमुळे भ्रष्टाचार थांबला नाही हे अर्जेंटिना व ब्राझील यांच्या उदाहरणांत प्रकट होते. ४. हा कर ०.५ [अर्धा]टक्का असला तरी शेअर व गुंतवणूक बाजार कोसळला हे स्वीडन व इंग्लंडच्या उदाहरणांत नजरेस येते.

या गोषवाऱ्यावरून अर्थशास्त्राशी निगडित अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात. उदा. भारतात बँकेत अकाउंट असलेले लोक किती? मग `बँक ट्रँझॅक्शन टॅक्स'च्या जाळ्यात किती टक्के जनता येईल? २००० रुपयांवरील रोख व्यवहार जर बेकायदेशीर ठरला तर बँक अकाउंट नसलेले व अशिक्षित करोडो शेतकरी व्यवहार कसा करतील? एकमेव [सिंगल] टॅक्सच्या महसूलावर गरीबांची प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारताचे खर्च भागतील काय? या टॅक्समुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार खरोखरच थांबेल काय ? वगैरे वगैरे अशा अनेक प्रश्नांवर अर्थतज्ज्ञांनी चर्चा करणे आवश्यक आहे. ते असा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यावर चर्चा करतीलही व उत्तरे शोधतीलही. कदाचित अनेक देशात अयशस्वी झालेला हा `सिंगल टॅक्स-ट्रँझॅक्शन टॅक्स'चा प्रयोग, भारतासाठी मात्र लाभदायी ठरेलसुद्धा!! तसे घडल्यास अर्थतज्ज्ञांना या करप्रणालीचा आग्रह धरल्याबद्दल या आग्रहकर्त्यांचे आभारही मानावे लागतील. पण अर्थशास्त्राशी दूरान्वये संबंध नसलेल्या सामान्य माणसाला वेगळाच प्रश्न पडेल. तो म्हणजे, `ट्रँझॅक्शन टॅक्स' या संकल्पनेचे श्रेय `जॉन मेनार्ड केन्स' यांचे नाव न घेता स्वतः या संकल्पनेचे सर्वे सर्वा म्हणून मिरवणे नैतिक आहे का ??......... पंतप्रधानांनी अशा ८० वर्षे जुन्या, अनेक देशांनी वापरून टाकून दिलेल्या `रिसायकल्ड स्क्रॅप' क्रांतीवर विश्वास ठेवून, नोटबंदी केली की काय? - हा दुसरा प्रश्न अलाहिदा!


लोकेश शेवडे
१७.१. १७
@ ४. ०५ RCPL  

 

Sunday, February 21, 2016

स्यूडो देशभक्त

  भुरटे  द्विदेशद्रोही / [स्यूडो देशभक्त ]

जगातून आदर्शवाद हद्दपार होत असताना, भारतीय लोक मात्र अद्याप आदर्शवादाचा उदो करण्यात मोठाईकी मानतात. स्वत:चे आचरण त्या आदर्शांच्या नेमके उलट असले तरी त्यांना त्याची खंत नसते. किंबहुना, उक्ती आणि आचरण यात विसंगती असणे हे जणू भारतीय जनमानसाचे एक व्यवच्छेदक लक्षण बनून राहिले आहे. जग जडवाद - बुद्धीप्रामाण्यवादाकडे पावले टाकत असताना आपण मात्र `पैसे लाथाडण्याचे' उदात्तीकरण करणारी `परोपकारी गोपाळ'ची कथा, `आई --वडिलांची' सेवा हे एकमेव पुत्रकर्तव्य ठरवणारी `श्रावणबाळाची' कथा ऐकून धन्य होत असतो. देशभक्ती बाबत तर काही विचारायलाच नको. जगातील विचारवंतांनी `देशातीत मानवतावाद' स्वीकारल्यापासून `देशप्रेम-धर्मप्रेम' हे `मानवतावादा'पुढे `संकुचित'पणाचे लक्षण मानले जाऊ लागले. तरीही भारतात देशभक्ती ही मानवी जीवनातील परमोच्च भावना असल्याचे रुजवणाऱ्या, देशासाठी प्राण देणाऱ्या `कान्हेरें'पासून `चाफेकरां'पर्यंत असंख्य देशभक्तांच्या कथा लहानपणापासून ऐकवल्या जातात.

`शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीतीI 
देव देश अन धर्मासाठी  प्राण घेतलं हाती II  '  

अशी गाणी बालपणापासून ऐकत धर्माभिमान, देशाभिमान आपल्या मनात नकळत फुलवला जातो. तथापि देशाभिमान आणि धर्माभिमान यापैकी `देशप्रेम' हीच सर्वोच्च उदात्त भावना असल्याचे बहुतांश लोकांच्या वागण्यातून, संभाषणातून डोकावत राहते. `ने मजसी ने, परत मातृभूमीला' ऐकून स्फुरण पावणारे जनसामान्य देशाला `मातृ'भूमी संबोधतात, यावरून ते देशाला `माते'समान, म्हणजेच सर्वाधिक उदात्त मानतात हेच अधोरेखित होते. देशप्रेमास सर्वोच्च उदात्त मानण्याबाबत काहीशी द्विधा शक्य असली तरी `स्वदेश विरोध', `परदेशधार्जिण्य' या बाबींस `नीचतम' मानण्याबाबत मात्र `ठाम'पणा असतो. स्वदेशविरोध, देशद्रोह हे तर इतके नीचतम कृत्य मानले जाते की, एखाद्याने कायदा हातात घेऊन `स्वत:ला देशविरोधी वाटलेल्या' माणसास ठार मारले, तरी कित्येक लोक ते `पुण्यकर्म' मानतात. त्यामानाने धर्मप्रेम किंवा धर्माभिमान या भावनांचे स्थान समाजमानसात दुय्यम आहे. म्हणूनच  दीन-दुबळ्यांच्या सेवेत आयुष्य वेचणाऱ्या मदर तेरेसांच्या कार्यात `धर्मप्रेमा'चे सावट असल्याचा संशय एका अर्धवस्त्रावृत `स्वयं'घोषित `राष्ट्रसेवक' शिरोमणीला आल्याबरोबर त्याने तेरेसांचे ते कार्य `कमी प्रतीचे' ठरविले. त्याप्रमाणेच, धर्मवादी लोक जरी सेक्युलर लोकांना `स्युडो' म्हणून हिणवत असले तरी, एखादा परधर्मीय खेळाडू आपल्या राष्ट्रातर्फे चांगला खेळ  करत असल्यास त्या परधर्मीय खेळाडूस `आपला' माणूस, मानायला फारसे आढेवेढे घेत नाहीत. याउलट एखाद्या स्वधर्मीय खेळाडूने पैसे घेऊन आपल्या देशाविरुध्द खेळणाऱ्या संघास मदत केली, किंवा बेटींगचे पैसे घेऊन वाईट खेळ केला तरी त्या खेळाडूस तमाम जनता अत्यंत `हीन माणूस' ठरवते. वास्तविक, कोणत्याही क्रीडाप्रकारात वाईट खेळून त्या देशाचा काही विध्वंस किंवा मनुष्यहानी होणार नसते. तरीही पैशांसाठी परदेशास मदत करणे हे अत्यंत गर्हणीय कृत्य मानण्यात येते.[ अर्थात, असेच पैसे घेऊन एखाद्या अल्पसंख्य परधर्मीय खेळाडूने वाईट खेळ केला, परदेशास मदत केली तर त्याला आयुष्यातूनच उठवले जाते, ही गोष्ट अलाहिदा!!]

तथापि, हेच जनसामान्य पैशासाठी खेळ-बीळ सोडा, एखादी विकेट सोडा, पैशांसाठी स्वदेशाचे नागरिकत्व देखील सोडून देणाऱ्या लोकांबद्दल काय विचार करतात? त्यांना देशद्रोही सोडा, त्यांना `स्युडो-देशप्रेमी' तरी मानतात का? निदान त्यांच्या देशप्रेमाला `कमी प्रतीचे' तरी मानतात का? ……. हे प्रश्न पडले ते, वर्षभरापूर्वी अमेरिकेत न्यूयॉर्क येथे झालेल्या भारताच्या पंतप्रधानांच्या सभेत हजारोंनी गर्दी करणाऱ्या आणि पंतप्रधानांनी `भारतमाता की SSSS ' अशी साद घातल्यावर त्याला `जSSSSS य!!' असा ओक्साबोक्शी प्रतिसाद देणाऱ्या अमेरिकस्थ [तथाकथित] भारतीयांना पाहून! भारताचे पंतप्रधान अमेरिकेत आल्यामुळे त्यांचे देशप्रेम उफाळून आले होते म्हणे !! पंतप्रधानांनी `मेडिसन स्क्वेअर' मध्ये `भारतमाता की जय' म्हटले म्हणजे जणू भारताने `अमेरिका'च जिंकून घेतली अशा अविर्भावात प्रेक्षक चेकाळून जल्लोष करत होते आणि ते चेकाळणे हे त्यांच्या देशभक्तीच्या जाज्वल्यतेचे प्रमाण मानून तमाम माध्यमे-वाहिन्या तसे चित्रण भारतीय जनतेसमोर मांडत होत्या!! `तुम्हाला कसे वाटतंय?`असा एकच प्रश्न अनेकांना विचारणाऱ्या आणि `ग्रेट', `प्राउड' `ऑस्स्सम्म' अशी उत्तरे मिळवण्यात गर्क असलेल्या तमाम निवेदकांपैकी एकालाही हा प्रश्न विचारावासा वाटला नाही, की "तुमचे सध्याचे नागरिकत्व भारतीय आहे की अमेरिकन?"

[देशातीत] मानवतावाद्यांच्या दृष्टीने कोणत्या देशाचे नागरिकत्व आहे ही बाब अत्यंत गौण आहे. पण ते तिथे चेकाळून भारताचा `जयघोष' करणारे आणि तिथले चेकाळणे पाहून इथे भारतात चवताळणारे  `मानवतावादी' नव्हते. तिथले बहुतांश लोक स्वत:ला `मातृभूमीप्रेमी' म्हणवून घेणारे `अमेरिकेचे नागरिक बनलेले मूळ भारतीय' होते. तर इथले, स्वत:ला `देशभक्त' समजून `सामान्य माणूस' म्हणवून घेण्यात कमालीची धन्यता मानणारे, `भारतीय मध्यम किंवा उच्च-मध्यमवर्गीय' होते. या दोघांच्याही दृष्टीने `देशभक्ती' ही पराकोटीची उच्च भावना आहे आणि `देशातीत मानवतावाद', `सेक्युलेरीझम' हा निव्वळ भंपकपणा आणि `स्युडो' आहे. मग, प्रश्न असे पडतात की, ज्यांनी दहा-पंधरा लाख रुपड्यांसाठी भारताचे नागरिकत्व सोडले त्यांनी स्वत:ला भारतप्रेमी म्हणावे?? त्यांचे सोडा, इथल्या [स्वयंघोषित] देशभक्तांनीदेखील पैशांसाठी नागरिकत्व सोडणाऱ्याना देशप्रेमी मानावे?? मग त्या पैसे लाथाडणाऱ्या `परोपकारी गोपाळा'चे काय? आपापल्या आई-वडिलांना भारतात सोडून देऊन, आई-बापांना भेटायला वेळ नसणाऱ्या, `अमेरिकन्स ऑफ इंडियन ओरिजिन्स'ना देशभक्त मध्यमवर्गीयांनी `मातृ'भूमीप्रेमी मानावे? मग त्या `श्रावणबाळा'चे काय?? कॉन्स्टयुलेटला अहोरात्र खेटे घालून स्वत:चे नागरिकत्व विकणाऱ्यांना देशभक्त मानावे ?? मग त्या कान्हेरे-चाफेकरांचे काय??? इंटरनेटवरून गाणी अमेरिकेत डाऊनलोड करताना "नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भारत भूमीचा तारा" आणि "तरी आंग्लभूमी भयभीता रे!! अबला न माझीही माता रे" या पंक्ती आपोआप `डिलीट' होतात की काय ?? `बेटिंग' किंवा `स्मगलिंग' करणारे निदान कोट्यावधी रुपयांसाठी आपले `राष्ट्र कर्तव्य' विकतात, ती रक्कम तरी मोठी असते, पण या `एओआयओ'नी दहा-पंधरा लाखांच्या फुटकळ रकमेसाठी `राष्ट्र कर्तव्य'  विकलेले असते! म्हणून आणखी एक प्रश्न पडतो की, या `भुरट्या' देशद्रोह्यांच्या `जSSSSSय'मुळे तमाम भारतीय देशभक्त मध्यमवर्गीय का हुरळून जावेत ??
या प्रश्नाचा खुलासा अवघड नाही. एक म्हणजे, या `एओआयओं'नी माता व मातृभूमीचा एकत्र त्याग करून "देश हा `माते'समान आहे" या त्यांच्या उक्तीशी एका अर्थी सुसंगतच वर्तन केलेले असते. मग इथल्या देशभक्तांना ते आक्षेपार्ह का वाटावे? दुसरे असे की, ते अमेरिकन नागरिक झालेले भारतीय, इकडच्या मध्यम किंवा उच्च-मध्यमवर्गीयांचेच भाऊबंद आहेत. आपल्याच भाऊबंदांना ते `देशद्रोही' कसे म्हणतील? "माझा भाऊ किंवा बहिण, मुलगा किंवा मुलगी, माझे काका किंवा मावशी `देशद्रोही' आहेत" असे म्हणणे खचितच त्यांना भूषणावह वाटणार नाही. उलट त्यांनी आपापले `सख्ख्खे' नातेवाईक `अमेरिकन' झालेले वर्षानुवर्षे मिरवलेले असते. किंबहुना त्यांनाही `अमेरिकन' व्हायचे असते. परंतु ते कठीण असते. म्हणून अगदी तिथे बाळंतपण-`बेबी सिटींग' परवडत नाही, यास्तव इथून `नर्स-अटेंडंट' म्हणून बोलावून घेतलेल्या आई-बापांनी सुध्दा "अमेरिका पाहीलीन होSS!!" म्हणत, मिरवून घेत, दुधाची तहान `ताकावर' भागवलेली असते. मग आता त्यांनाच देशद्रोही कसे ठरवणार?? त्यामुळे इथल्या मध्यमवर्गीयांना त्या भुरट्यांबद्दल `आपुलकी' वाटून ते हुरळून जाणे स्वाभाविक आहे. खरा प्रश्न असा आहे की, ज्यांनी स्वत:हून भारताशी तलाक-तलाक-तलाक घेऊन अमेरिकेशी नागरिकत्व `कबूल' केले, ते इतके जाज्वल्य देशभक्त, भारतप्रेमी कसे? याचे उत्तर असे आहे की, हे `एओआयओ' भारतप्रेमी नाहीतच!!
त्यांचे हे प्रेम देशाबद्दल नव्हते…त्यांना देशाबद्दल प्रेम असते तर त्यांनी देशाचे नागरिकत्व झिडकारलेच नसते! नागरिकत्व ठोकरूनही त्यांना भारतप्रेम आहे असे म्हणावे, तर ते प्रेम याआधीच्या भारताच्या अनेक पंतप्रधानांच्या अमेरिकाभेटीतदेखील उसळून आले असते. ज्याअर्थी यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीत त्यांना या वेळच्यासारखे पिसाळून `जSSSSSSय' असे भुंकावेसे वाटले नाही, त्याअर्थी त्यांचे प्रेम हे देशाबद्दल नसून अन्य कुठल्यातरी सामाईक बाबीबद्दल होते! ही सामाईक बाब भाषा असणे शक्य नाही कारण भारतात अनेकविध भाषा आहेत व त्यातील कोणत्याही एका भाषिकाला दुसऱ्या भाषिकाबद्दल फारसे ममत्व नाही [असलाच तर द्वेष आहे]. संस्कृतीबद्दल प्रेम असणे शक्य नाही कारण तसे असते तर भारतीय संस्कृतीच्याच विरुध्द स्वत:च्या आईबापांना वाऱ्यावर सोडून आणि संगीत, नृत्य, साहित्य, वाङ्मय वगैरे सांस्कृतिक बाबींचा त्याग करून ते गेले नसते, किंवा मग तिथे राहूनही त्यांनी ते सारे जतन केले असते…. काही तुरळक अपवाद वगळता तसे देखील झालेले दिसत नाही. मग उरली ती सामाईक बाब एकच….धर्म! धर्म या सामाईक बाबीमुळे त्यांना प्रेमाचे कढ आले होते!! याखेपेस जे पंतप्रधान अमेरिकेत आले ते त्यांना `स्वधर्मीय' वाटत होते! म्हणून ते अमेरिकन स्वधर्मप्रेमी-`स्युडो'देशभक्त पिसाटून जल्लोष करत होते!! म्हणून त्यांना `स्युडो'सेक्युलर वाटलेल्या पत्रकारावर त्यांनी हल्ला चढवला! आणि म्हणून इथल्या मध्यम, उच्च-मध्यमवर्गाला तो जल्लोष `आपला विजय' वाटत होता!! आणि म्हणूनच फारसे अन्य धर्मीय या जल्लोषात सामील झाले नाहीत!!
अनेकविध, भाषा, धर्म, वंश नांदत असलेल्या भारताच्या विद्यमान पंतप्रधानांना पाहून लोकांना केवळ त्यांचा एक सामाईक असलेला धर्मच का आठवावा? केवळ धर्माच्याच प्रेमासाठी अमेरिकेत भारतमातेचा जयजयकार करणाऱ्या अमेरिकन नागरिक झालेल्या मूळ भारतीयांना काय म्हणावे?? देशप्रेमी की देशद्रोही? प्रेमी किंवा द्रोही जे काही म्हणावे, ते कोणत्या देशाचे? ज्यांनी पैशांसाठी भारताचे नागरिकत्व, त्यांचे मातृभूमीचे कर्तव्य नाकारले आणि मग अमेरिकेचे नागरिकत्व घेतल्यावर तिथले कर्मभूमीचे कर्तव्य देखील नाकारून अमेरिकेतच अमेरिकेऐवजी `भारताचा जयघोष' केला, ते दुहेरी देशद्रोही ठरत नाहीत का? भारतात राहून धर्मप्रेमासाठी पाकिस्तानच्या खेळाडूना प्रोत्साहन देणाऱ्या काही तुरळक लोकांवरून सबंध जमातीलाच हीन आणि नीच लेखणाऱ्या मध्यमवर्गाला या अमेरिकन द्विदेशद्रोहींबद्दल मात्र आपुलकी वाटावी इतका हा वर्ग ढोंगी, दुटप्पी, स्वार्थी कसा झाला ?? या असल्या भुरट्या, द्विदेशद्रोहींच्या `मेडिसन स्क्वेअर'मधील बुभूत्कारावरून पंतप्रधानांची अमेरिकावारी यशस्वी का मानावी ?? हे सारे प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतात!!!

लोकेश शेवडे
२/३/२०१५ १८:१५       

नेव्हर अगेन

नेव्हर अगेन / स्मारक
बऱ्याच वर्षांपूर्वी मी एका कामानिमित्त उत्तर भारतातल्या एका प्रसिध्द शहरात गेलो होतो. विमानतळापासून हॉटेलपर्यंतचे अंतर बरंच होतं. संध्याकाळच्या आठ-साडेआठची वेळ असावी. त्याकाळी मोबाईल अस्तित्वातच नव्हते, त्यामुळे साहजिकच टैक्सी ड्रायव्हरशी गप्पा सुरु झाल्या. नेमका कसा ते आठवत नाही, पण नकळत विषय दंगलींवर आला. तेथे सहा-सात वर्षांपूर्वी एक मोठी दंगल उसळली होती व त्यात एका अल्पसंख्य गटाचे हजारो लोक मारले गेले होते. त्याच्या मतानुसार ती दंगल नसून दोन राजकीय नेत्यांनी एकाच धार्मिक गटाच्या लोकांचे घडवलेले हत्याकांड होते. वस्तुत: या दंगलीच्या संदर्भात त्या नेत्यांची नावे वर्तमानपत्रात अनेकदा आली होती आणि त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते, परंतु त्याबाबत ठोस पुरावे नसल्यामुळे कार्यवाही प्रलंबित होती. कोर्टाकडून आरोप सिद्ध होऊन सजा सुनावली जात नाही तोपर्यंत असे `पत्रकारी' आरोप मी त्याकाळी खरे मानत नसे. म्हणून मी ड्रायव्हरच्या म्हणण्यावर शंका घेत `कशावरून', `तुला कसे माहीत' वगैरे प्रश्न करू लागलो. अचानक त्यानं टैक्सी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि खाली उतरून स्वत:चा शर्ट काढला आणि माझा दरवाजा उघडून समोर उभा राहिला. त्याच्या पोटापासून खांद्यांपर्यंत एकही इंच त्वचा `नॉर्मल' नव्हती, त्यावर भाजल्या गेल्याचे खोल व्रण होते व पांढरे डाग होते. म्हणाला, " मलाच पेटवलं होतं त्यांनी, त्या पेटवणाऱ्या सर्वांना मी ओळखतो, ते त्या नेत्यांचेच कार्यकर्ते होते…आज देखील ते त्या नेत्यांबरोबरच दिसतात ते मला." त्याचे ते भाजलेले शरीर पाहून मी हादरलो, परंतु त्यापेक्षाही "ते पेटवणारे लोक आजसुध्दा त्यांच्या नेत्यांबरोबर दिसतात" या विधानाने मी उध्वस्त होण्याची पाळी आली. कारण या विधानाचा अर्थ, ते हत्यारे, ते नेते गुन्हा करून सहा-सात वर्षे उलटल्यावरदेखील मोकाट होते, इतपत सीमित नव्हता, तर ते नेते त्याच मतदारसंघातून नुकतेच निवडून आले होते हे क्रूर वास्तवही त्यातून डोकावत होते. असाच एक प्रसंग वर्षभरापूर्वी मी महाराष्ट्रालगतच एका राज्यात गेलो होतो तेंव्हाही घडला. सर्व काही हुबेहूब त्या टैक्सीवाल्याच्या अनुभवासारखेच  होते, हत्यारे व त्यांना भडकवणारे नेते हत्याकांडानंतर आठ-दहा वर्षे मोकाटच होते, आणि नेते निवडणुकीत मोठ्या बहुसंख्येने जिंकलेही होते.… फक्त पीडित धार्मिक गट मोठा होता आणि यावेळी काही लहान मुले-अर्भके देखील कापली गेली होती, एवढाच काय तो फरक! या प्रसंगांनंतर हत्याऱ्यांना निवडून देणारी जनता, सामान्य माणसे यांच्या संवेदनशीलते बाबतच माझ्या मनात मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले …… 

या घटनांत असंवेदनशील, क्रूर भासणारी सामान्य माणसे स्वत:च्या खाजगी आयुष्यात मानवी जीवाला किती महत्व देतात ? सामान्य माणसांना कुठल्याच गुन्ह्याबाबत काहीच वाटत नाही का? त्यांच्या दृष्टीने मानवी हत्येपेक्षाही दुसरा कुठला गुन्हा जास्त गंभीर आहे की काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एखाद्याला आपण जर विचारले की, "समजा, तुझ्या घरी दोन दरोडेखोर वेगवेगळ्या वेळी आले, एकाने घरातील दोन पाच लाख रुपये किमतीचे सोने-नाणे लुटून नेले, तर दुसऱ्याने पैसे न चोरता तुझ्या मुलीचा, मुलाचा किंवा बायकोचा खून केला, तर त्यातील कोणाचा अपराध तू मोठा, अक्षम्य मानशील?" तर तो तत्काळ उत्तर देईल "अर्थातच खून करणाऱ्याचा अपराध मोठा आणि अक्षम्य आहे. दोन-पाच लाख सोडा, अखंड घरदार लुटून नेले तरी चालेल पण कोणाचा जीव जायला नको! पैसे चोरण्याची तुलना खुनाशी होऊच शकत नाही!"  त्याच व्यक्तीला पुढे विचारले की समजा एखाद्या भ्रष्ट माणसाने तुझ्याकडे लाच  मागितली किंवा `घोटाळा' केला, तर त्याचा अपराध मोठा की त्या खुन्याचा? यावरही ताबडतोब उत्तर मिळेल "खुनाचा अपराधच मोठा! शेवटी, चोरी, दरोडा, लाच, घोटाळा हे वेगवेगळे गुन्हे असले तरी ते एकाच प्रकारचे आणि पातळीचे गुन्हे आहेत, खून,  हत्याकांड यांची भयानकता फार मोठी आहे. खुनाची आणि आर्थिक गुन्ह्याची तुलना होऊच शकत नाही." या काल्पनिक संवादांची कायद्याशी किंवा  वास्तवातील घटनांशी तुलना केल्यास त्यामागील विचार-तर्क एकमेकांशी सुसंगत आढळतील. जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील गुन्हेगार  जक्कल-सुतार वगैरेंनी फारसे पैसे चोरले नव्हते पण त्यांना फाशी देण्यात आली. आणि त्या फाशीबद्दल त्याकाळी सामान्य माणसांनी समाधान व्यक्त केले होते. दिल्लीतील `निर्भया' कांडातील अपराध्यांनी काही पैसे चोरले नव्हते. त्यांच्या निव्वळ बलात्कार व हत्या या गुन्ह्यांविरुध्द असंख्य जनसामान्य रस्त्यावर उतरले व त्या गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली. करोडो रुपये लुटणाऱ्या चोर-दरोडेखोरास किंवा घोटाळेबहाद्दरास फाशी द्यावी अशी मागणी कधी केलेली ऐकिवात नाही आणि कोर्टाने कधीही अशा हत्या नसलेल्या निव्वळ चोरी, दरोडा किंवा भ्रष्टाचार प्रकरणात फाशी सुनावलेली नाही. कारण आर्थिक गुन्ह्यांपेक्षा हिंसा, हत्या हे गुन्हे भयानक-गंभीर मानले जातात व जगभर कायदेही तसेच आहेत.

तथापि, बहुतांश जनसामान्यांचे विचार, त्यांच्या मनातल्या प्रतिक्रिया बऱ्यापैकी तर्कशुध्द, कायद्याशी सुसंगत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचे वर्तन, त्यांची कृत्ये मात्र अनेकदा त्यांच्या स्वत:च्याच विचारांच्या उलट असल्याचे आढळते. उदा. मृत्यू ही आपल्या जीवनातील सर्वाधिक भेडसावणारी, भयावह बाब आहे असे सर्वच जण मानतात, परंतु अगदी स्वत:च्या सख्ख्या नातेवाईकांचे मृत्यू देखील १०/१२ दिवसांत विसरून तेराव्याला कामाला लागतात. हे झाले नैसर्गिक मृत्यूबाबतचे वास्तव. पण अपघाती मृत्यू, हत्या याबाबतचे वास्तव फारसे वेगळे नाही. फरक इतकाच की, तेरा दिवसांऐवजी महिना दीड महिना भयानकतेचे सावट राहते, क्वचित २/३ महिने. त्या सावटातसुध्दा पोलिसांच्या तपासाचा सहभाग असतोच. पोलीस जोपर्यंत जाब-जबाबाच्या कामानिमित्त फोन करत असतात तोपर्यंत ते सावट राहते. पुढे  "तपास चालू आहे" अशी साचेबध्द उत्तरे देणे पोलिसांनी सुरु केल्यानंतर त्या जिवलगाच्या मृत्यूची जाणीव, त्यातील वेदना-दाहकता कमी होत होत शेवटी विस्मरणात जाते. आपल्या जिवलगाचा मृत्यू एखाद्या दारू प्यालेल्या वाहनचालकाच्या चुकीमुळे घडला असला तरी बहुतांश लोकांच्या मनातून त्या ड्रायव्हरबद्दलचा संताप, द्वेष, सूडभावना कालांतराने नष्ट होतात आणि त्यांची  जागा `सहिष्णुता', `क्षमाशीलता'  घेते. मग "जे वाईट घडायचे ते घडून गेले, आता याला शिक्षा देऊन गेलेली व्यक्ती काही परत येणार नाही " अशी स्वत:ची व इतरांची समजूत काढून ड्रायव्हरच्या सुटकेस मदतही केली जाते. खून किंवा हत्या घडलेली असल्यास हेच सारे घडते, फक्त घडायला अधिक कालावधी व अधिक 'काँपन्सेशन' लागते. अर्थातच, सरसकट सारे जनसामान्य अस्सेच वागतात असे नाही, `तुरळक' अपवाद असतातच. [नोंदविलेल्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा ठोठावली जाण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प असण्यामागे हे देखील एक महत्वाचे कारण आहे.]

मानवी हत्येसारख्या भयानक गुन्ह्यांचा माणसांना विसर का पडावा? या विसरण्याला `विसरभोळेपणा [short Memory]' म्हणणे योग्य ठरेल की `असंवेदनशीलता'? `क्षमाशीलता' म्हणावे की `क्रौर्य'? यातील काहीही म्हटले तरी जर बहुतांश लोक असे वागत असतील तर ते `सर्वसाधारण [नॉर्मल]' ठरते, त्यामुळे त्यास क्षमाशीलता/क्रौर्य असे नैतिक निकष लावणे योग्य ठरणार नाही. तर त्या विसरण्यामागील [नैसर्गिक] कारणे अभ्यासावी लागतील.

माणसाला ध्यास हा नेहमीच आनंद-सुख मिळवण्याचा असतो. आयुष्यात दु:खद प्रसंग कधी येऊच नयेत अशीच माणसाची मनोमन इच्छा असते. दुर्दैवाने दु:खद घटना घडलीच तर तिच्या आठवणीचे उमाळे सातत्याने काढून तो कधीच आनंदी होऊ शकणार नाही. उलट ती लवकर विसरली गेली तरच तो पुन्हा आनंदाकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे माणसाचा कल दु:खद प्रसंग विसरण्याकडे असणे स्वाभाविकच आहे. कोणतीही घटना लक्षात ठेवण्यासाठी त्या आठवणीला वारंवार उजाळा देऊन ताजी ठेवावी लागते अन्यथा तिचे विस्मरण घडते हे देखील अत्यंत नैसर्गिक आहे. जिवलगाच्या मृत्यूने सर्वांना तीव्र दु;ख होतेच, एखाद्या अपरीचिताच्या हत्येनेदेखील बहुतांश माणसांच्या मनात दु:ख आणि संताप यांचा उद्रेक होतो, अनेकदा ते पोलिसांनी अपराधी तत्काळ पकडावेत म्हणून रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात. यावरून बहुतांश जनसामान्य संवेदनशीलच असतात हे कबूल करणे भाग आहे. मरण पावलेला जिवलग किंवा हत्या झालेला अपरिचित मृत्यूनंतर आठवणींना उजाळा देऊ शकत नसल्यामुळे तो प्रसंग विस्मरणात जातो ही अपरिहार्यता आहे. म्हणून जनसामान्यांचे विचार व वर्तनातील ही विसंगती समजून घेण्यासारखी आहे. तथापि, या विसंगतीचे राजकीय परिणाम मात्र कमालीचे धक्कादायक आहेत.       

हे धक्कादायक परिणाम जनसामान्य जेंव्हा मतदार असतात तेंव्हा घडतात. खून, हत्याकांडाला सर्वाधिक गंभीर-भयानक गुन्हा व त्यामानाने `चोरी-भ्रष्टाचार-घोटाळा' हे कमी गंभीर गुन्हे असे जनसामान्य [व कोर्ट  देखील] मानत असले तरी खून-हत्याकांड हे गुन्हे कालांतराने विस्मरणात जातात. यातली मेख अशी आहे की भारतात गुन्हे अन्वेषण खाते राज्य सरकारकडे असते, त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांना स्वपक्षीयांचे गुन्हे अन्वेषण दाबणे किंवा लांबणीवर टाकणे सहजसाध्य असते. त्यातही समजा, हत्याकांडातील अशा गुन्हेगारांवर उशिरा का होईना खटले दाखल केले, तरी कोर्टांचे निकाल कधीच लवकर लागत नाहीत. त्यामुळे तोपर्यंत होणाऱ्या निवडणुकांत मतदार त्या गुन्हेगाराला [नैसर्गिक न्यायानुसार] निर्दोष तरी धरतो किंवा ते गुन्हे विसरून जातो. परिणामी गुन्हेगार निवडून येण्यात काहीही अडसर येत नाही. याउलट भ्रष्टाचारी किंवा घोटाळेबहाद्दरांची मात्र हत्याकांडाच्या मानाने त्यांचे गुन्हे कमी गंभीर असले तरी गोची होते. कारण त्यांच्या भ्रष्टाचारातून, घोटाळ्यांतून निर्माण झालेली मिळकत मरण पावत नाही, ती मोठमोठ्या गाड्या, आलिशान बंगले, मोक्याच्या जमिनी यांच्या रूपाने त्यांच्या गुन्ह्यांच्या आठवणीना उजाळा देत मतदारांसमोर सतत उभी  ठाकत असते. भ्रष्टाचार-घोटाळा प्रकरणी उमेदवार गुन्हेगार आहे की नाही हे ठरवण्यासाठी मतदारांना अन्वेषण खात्याची, कोर्टाची गरजच पडत नाही. किंबहुना कोर्टाने जरी एखाद्या उमेदवाराला `क्लीन चिट' दिली तरी मतदार त्यावर विश्वास ठेवत नाही कारण त्या उमेदवाराची मालमत्ता पाहून, उधळपट्टी अनुभवून मतदाराची स्वत:चीच पक्की खात्री झालेली असते. जितक्यांदा मतदार उमेदवाराच्या गाड्या पाहतो, बंगले पाहतो, जमिनी पाहतो तितक्यांदा त्या मतदाराच्या डोक्यात भ्रष्टाचार-घोटाळा यांच्या आठवणींची सणक  जाते व द्वेषाचे थैमान सुरु होते. साहजिकच याचा परिणाम मतदानावर होतो व हे मतदान भ्रष्टाचारी उमेदवाराच्या विरुध्द होते. अर्थात, त्यातून भ्रष्टाचाराविरुध्द मतदान केले जाते ते योग्य व न्याय्यच आहे. [अर्थातच, सगळेच उमेदवार भ्रष्ट असल्यास मतदार `हतबलपणे' त्यातील एकाला मत देतात, हे आणखी एक वास्तव आहेच] मात्र दंगलखोर, हत्यारे, खूनी त्यांचे गुन्हे जास्त गंभीर असूनही सुटतात हे वास्तव भयानक आहे. हत्याकांड एखाद्या विशिष्ट जातीय किंवा धार्मिक गटाचे असले तरी तो जातीय-धार्मिक गट कालांतराने अन्वेषण /  न्याय विलंबामुळे `नैसर्गिक न्यायाने'  गुन्हेगार उमेदवार निर्दोष असण्याची शक्यता स्वीकारतो व `नॉर्मल विस्मरणाला' बळी पडून `क्षमाशील' होतोच. विशेषत: बेकारी, दारिद्र्य, टंचाई वगैरे समस्या असलेल्या समाजाचे समस्येविरुध्दच्या `फायर फाईटींग' प्रक्रियेमुळे `हत्याकांडा'सारख्या बाबींकडे कालौघात दुर्लक्ष होते. याउलट त्यातील पीडित गटाविरुध्दचा गट मात्र त्या गुन्हेगाराच्या बाजूचाच असतो, या हत्याकांडाने तो गट सुखावलेलाच असतो. त्यामुळे तो गट हत्याकांड विसरला किंवा नाही विसरला, तरी गुन्हेगार उमेदवारापासून दुरावत नाहीच व मतदान त्या गुन्हेगारालाच करतो. परस्परद्वेष असलेल्या समाजात, हत्याकांड अल्पसंख्याकांचे व हत्यारा बहुसंख्याकांपैकी असेल तर हत्याऱ्या उमेदवाराला मतदानात भरभक्कम फायदाच होतो.                                    

हे वास्तव भीषण आहे. माणसाने स्वत:च्या नैसर्गिक विचार-तर्कांशी विसंगत आचरण करू नये. विविध मानव समूहांच्या परस्पर-द्वेषांतून घडलेल्या हत्या, संहार, युद्धे यांचा इतिहास न विसरता त्यापासून बोध घ्यावा व  क्षमा-शांतीचा मार्ग स्वीकारावा यासाठी हजारो वर्षे हजारो संत- महात्म्यांनी आपली आयुष्ये वेचली तरी ते अद्याप साध्य झालेले नाही. कारण, दु:ख विसरण्यासाठी `विस्मृती' हा मानवजातीला उ:शाप असला तरी त्यामुळेच बोध घेणे विसरून दु:खद घटनेची पुनरावृत्ती घडवत तोच नैसर्गिक शाप ठरतो. एका अर्थी वैयक्तिक पातळीवर उ:शाप ठरलेली `विस्मृती' सामाजिक व राजकीय पातळीवर शाप ठरते. म्हणून सामाजिक-राजकीय विस्मृतीवर वेगळाच इलाज करणे आवश्यक आहे. सत्तर वर्षांपूर्वी जर्मनीत लोकशाही पध्दतीने निवडून आलेल्या `नाझी' सरकारने धार्मिक द्वेष फैलावून अल्पसंख्य `ज्यूं'चे हत्याकांड केले होते. त्या धार्मिक द्वेषाधारीत राजकीय हत्याकांडाचा लोकांना विसर पडू नये म्हणून हत्याकांडांच्या ठिकाणी स्मारके उभारली गेली आहेत. त्या स्मारकांत हत्याकांडांची छायाचित्रे, चित्रफिती, वस्तू व वास्तू जतन करून ठेवण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने त्याकाळांतील नाझी नेता हिटलरची  धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे, घोषणा, पोस्टर्स, या साऱ्याने प्रभावित होणारे जनसामान्य व त्यांचे `नाझीं'च्या   बाजूने मतदान या बाबी जागोजाग ठळकपणे प्रदर्शित करून  पुढे `नेव्हर अगेन' असे स्मरण-फलक लावले आहेत. एका ठिकाणी तर हजारो `शूज'चा नुसता एक उंच ढीग आहे. जणू तेच स्मारक !! हे `शूज' `गैस-चेंबर'मध्ये जाण्याआधी `ज्यूं'नी काढून ठेवलेले होते. त्यात काही `शूज' पाच-सहा वर्षांच्या बालकांचे आहेत…… ही स्मारके `धर्मद्वेषाला राजकीय बळ मिळण्यातून घडणारा भीषण संहार' मनांत खोलवर  बिंबवतात, जेणेकरून स्मारक पाहणारे  जनसामान्य `हत्यारे व हत्याकांडाला' कधीही विसरणार नाहीत. जगात `ज्यूं'च्या `या' हत्याकांडाखेरीज अन्य हत्याकांडे झालीच नाहीत असे नाही. किंबहुना छळ,  अत्याचार, खून, दंगली, हत्याकांड व युद्धे अशा संहारांच्या अगणित दाखल्यांनी संपूर्ण जगाचा इतिहास जागोजाग भरला आहे. तथापि, लोकशाही देशात राज्यकर्त्यांनीच किंवा लोकप्रतिनिधींनी जर संहार केलेला असेल तर जनसामान्य त्यांच्याविरुध्द मतदान करून संहाराची पुनरावृत्ती टाळू शकतात. अल्पसंख्याकांचा संहार हा लोकशाहीतील सर्वाधिक क्रूर-भीषण पण पुनरावृत्ती टाळता येऊ शकणारा प्रकार आहे. म्हणून लोकशाही असलेल्या देशांत त्याची पुनरावृत्ती घडू नये याची दक्षता `स्मारक' उभारून घेतली गेली. भारतात अशाच तऱ्हेची धार्मिक हत्याकांडाची स्मारके उभारली तरच हत्यारे उमेदवार निवडून येणे थांबेल व अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटेल. 

भ्रष्टाचार हा मोठाच गुन्हा आहे परंतु त्याचे स्मारक राजकीय नेता स्वत:च मालमत्ता रूपाने बांधतो, त्यामुळे तो स्वत:च मतदारांच्या स्मरणशक्तीला सतत टोचणी देत भ्रष्टाचाराविरुध्द जागृत ठेवतो. जातीय-धार्मिक हत्याकांड हा त्याहून फार मोठा व भयानक गुन्हा आहे. मानवजातीला तो कलंक आहे. या कलंकाची पुनरावृत्ती घडू नये म्हणून, जनसामान्यांना `नेव्हर अगेन' ची टोचणी सतत देणारी स्मारके अत्यावश्यक आहेत. 


लोकेश शेवडे

Friday, March 13, 2015

नॉट मी

                                                     नॉट मी
 
 या हंगामातील निवडणूक जाहीर झाल्यावर कोणीतरी `रेबीज'सारखा एखादा जंतू जनतेत सोडला होता की काय न कळे, कारण निवडणुका जाहीर झाल्यापासून  वय वर्षे नऊ ते वय वर्षे नव्वद या गटातील तमाम नागरिक पिसाळल्यासारखे लोकशाही, भ्रष्टाचार, नैतिकता याविषयावर त्यांच्या त्यांच्या  संबंधित गल्ल्यांमध्ये कळपा-कळपाने भुंकू लागले. उसंत असली की विरंगुळा म्हणून मीदेखील त्यांचे ऐकायला उभा राहात असे. पण मी  आजतागायत मतदान कधीच केलं नाही हे जेंव्हा त्यांना कळायचे तेंव्हा ते सगळेच्या सगळे एकमेकांवरचे भुंकणे थांबवून एकत्रितपणे माझ्यावर शिव्यांची धार सुरु करायचे! जणू मी  म्हणजे  इलेक्ट्रिकचा खांब!! त्यांच्या मते सर्व समस्यांचे मूळ मतदान न करण्यात आहे. जणू मी मतदान केले नाही  त्यामुळे भारतीय लोकशाही  रसातळाला गेली आणि मी मतदान केले असते तर  आपला देश एकदम टकाटक  होऊन एक नंबर बनला असता!! प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मला हा जाच सहन  करावा  लागतो, यावेळी तो  आणखी वाढला, कारण प्रत्येक जण सांगे, "तुला मतदान करायचे नसले तरी यावेळी तू मतदानाला जा कारण आता तू `नोटा' दाबू शकतोस!" मतदानसंदर्भात `नोटा दाबणे' याचा मला माहीत असलेला `अर्थ' वेगळाच  होता. आता त्यातील महत्वाचा `अर्थ' निघून जाऊन `उरलेला' कोरडा  ठणठणीत `नोटा' दाबून  काय फायदा? असा विचार डोक्यात आलाच. तरी, निदान माझ्या मत न देण्यामुळे  देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे या आरोपातून एकदाची सुटका  होईल. हे ध्यानात आल्यामुळे मी यावेळी  सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन थडकलो.
 
 
बाकी कोणी येण्याच्या  आत आपण पोहोचलो तर रांगेत उभे राहावे लागणार नाही व वेळ वाचेल असा विचार  करून आंघोळ करण्यात वेळ न दवडता, मॉर्निंग वॉकवरून परस्पर  केंद्रावर सक्काळी सात वाजताच  पोहोचलो. पाहतो, तर तिथे दोन-पाचशे लोक मतदान सुरु होण्याआधीच रांगेत ताटकळत उभे होते, सगळे  माझ्या आजूबाजूचेच, ओळखीचे रहिवाशी  होते. त्यातील बहुतांश लोक रोज मी सकाळी सहाला मॉर्निंग वॉकला  जातो तेंव्हा झोपलेले असतात, मी सात  वाजता परत येतो तेंव्हाही झोपलेले असतात आणि मी  कामावर आठ  वाजता निघतो तेंव्हाही बरेचदा झोपलेलेच असतात. आज मात्र सर्वांनी कमालच केली होती. सगळे भल्या  पहाटे उठून, आंघोळ-पाणी उरकून, चांगले-चुंगले कपडे घालून सातच्या   आधी मतदानाच्या रांगेत!!! जणू आज  एखादा मोठा सण असावा. मी काहीशा साशंकतेने बाजूच्या गलेलठ्ठ गृहस्थाला  विचारले, 'मतदानासाठी आधी आंघोळ करणे कंपल्सरी आहे का?"
"छे छे!!" तो त्याच्या डाव्या हाताची तर्जनी आणि तिच्यातील हिऱ्यांची अंगठी कुरवाळत म्हणाला, "मी तर  कालदेखील आंघोळ केलेली  नाही, आज  फक्त नवे कपडे अंगावर चढवले अन आलो इथे"
"म्हणजे, नवे कपडे घालणे कंपल्सरी आहे का?" मी चिंतेने विचारलं.
"कंपल्सरी नसलं तरी, केंद्रावर टीव्हीवाले येणार, ते नाही आले तर आपणच आपल्या मोबाईलवर आपल्या  बोटासकट  फोटो काढणार, मग चांगले कपडे  घालायलाच पाहिजेत ना?" ते ऐकून मी चमकून आजूबाजूला  पाहिलं तर सर्वत्र टीव्ही चैनलवाल्यांचे उगारलेले कॅमेरे आणि त्यांच्यासमोर जणू दुश्मनाच्या सैन्याचा खात्मा करायला निघाल्यासारखे छाती फुगवून आणि  दंतमंजन-जाहिरातसुलभ हास्य चेहऱ्यावर  आणून  सरसावणारे मतदार दिसत होते. मला हे फोटोप्रकरण आधी न उमगल्यामुळे  मी बावळट ठरलो असे वाटू  लागले. माझ्याशी बोलणारा  गृहस्थ बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिध्द होता.  नुकतीच त्याच्यावर  आयकर  विभागाने धाड टाकून बेनामी मालमत्तेची कागदपत्रे व मोठी बेहिशेबी रोकड जप्त केली होती. त्याने  मला ओळख दाखवली आणि बोलला यामुळे मात्र मी सुखावून गेलो. त्याच्याच ओळखीतून माझ्या एका  प्लॉटचे अडकलेले पेपर्स क्लिअर करून घ्यायचे असे मी मनात लगेच ठरवले.  मी पुन्हा त्याला  विचारले,     
"तुमची हरकत नसेल तर, कोणाला मत देणार ते सांगाल का?" यावर अचानक एखाद्या स्कूटरचा सायलेन्सर  फुटावा तसा मोठ्ठ्या आवाजात  म्हणाला,     
"त्यात न सांगण्यासारखे काय? अहो, किती भयानक परिस्थिती आलीय देशात!! भ्रष्टाचारानं, गैरव्यवहारानं सबंध देश पोखरला गेलाय. " त्याच्या या खुलाश्यावरून मला वाटलं की त्याला  स्वत:च्या व्यावसायिक मार्गाबद्दल पश्चात्ताप होत असावा. म्हणून मी "आता व्यवसाय बंद करणार  का?" असे   विचारणार होतो, तेवढ्यात पुन्हा त्याच्या कंठाचा सायलेन्सर फुटला,
"माजलेत हो राजकारणी, या हरामखोरांना जागा दाखवून द्यायला पाहिजे." याचा अर्थ, त्याला स्वत:च्या नव्हे, तर फक्त राजकारण्यांच्या गैरव्यवहाराबद्दल  आक्षेप होता हे लक्षात आले. पण त्याचे मत कोणाला याचा  उलगडा मात्र झाला  नाही. म्हणून मी पुन्हा विचारलं,
"म्हणजे मत कोणाला?"
" अर्थातच, मी `अमुक' पक्षालाच मत देणार!! दुसरा ऑप्शन काय?" इतक्यात एका कॅमेराचा रोख त्याच्याकडे आला म्हणून त्याने माझ्याशी बोलणे थांबवून प्रतिष्ठासुलभ पोज घेतली.  मग मीदेखील त्या फोटारड्याला सोडून आमच्या गल्लीत राहणाऱ्या ओळखीच्या मुलाकडे मोर्चा वळवला. याचे  वडील पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता होते. आपल्या अभियांत्रिकी  `कौशल्या'ची ओळख  लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एक आमच्या गल्लीत तर  दुसरा पुण्यात असे  दोन  प्रशस्त  बंगले आणि एक फार्म हाउस बांधले होते. त्यातील त्यांच्या  बंगल्यांचा उपयोग त्यांच्याच दोन प्रशस्त बायका करत असत, तर फार्म हाउसचा उपयोग माझ्यासमोर उभे असलेले त्यांचे अजस्त्र चिरंजीव रेव्ह पार्ट्यांसाठी  करत असत. वर्षभरापूर्वी  हा बालक सतरा वर्षांचा असतानाच त्याने घरी काम करणाऱ्या मोलकरणीला तो `युवक' झाल्याचे प्रात्यक्षिक दिले होते. नुकत्याच फुटलेल्या मिसरुडावरून तो पहिल्यांदाच मतदान  करत असावा हे दिसत असलं तरी त्याच्या आत्मविश्वासावरून आणि तांबारलेल्या  डोळ्यांवरून मात्र तो पाचदा निवडून आलेला खासदार भासत होता. मी कुतूहलानं विचारलं,
   "काय रे, आजच लवकर उठलास की रोज लवकरच उठतोस?"
   "काहीतरीच काय? यावेळी रोज मी झोपायला बेडरूम मध्ये शिरत असतो. आज मतदान आहे म्हणून झोपायला न जाता सरळ इथेच आलो. आता मतदान करून फोटो काढले की  जाऊन ताणून देणार!!" त्यानं स्वत: सिगरेट शिलगावत मलाही ऑफर केली.             
    "मतदानासाठी झोप सोडून आलास? कमाल आहे! इतका त्याग कशासाठी??" मी त्याचीच सिगारेट ओढत त्यालाच टोमणा मारला.   
    "झोपच  काय, मतदानासाठी  ब्रश करायचेदेखील सोडून आलो." तो टोमणा कळण्याच्या पलीकडे गेला होता. 
   "कोणाला देणार मत ते सांगशील का? "
  "कमॉन अंकल, तुम्हाला का नाही सांगणार? अहो, वी डोंट हेव एनी चॉइस अंकल. सो मच करप्शन, सो मच इन्फ्लेशन यु नो!!" तो कोणाबद्दल  बोलतोय ते मी विचारणार तेवढ्यात त्याचे फाडफाड इंग्रजी पुन्हा सुरु  झाले, "आय हेट दीज ब्लडी डर्टी पॉलीटिशियन्स! ऑल ब्लडी कॅरेक्टरलेस, दे डोंट हेव एनी मॉरल वेल्यूज!  इफ वि वाँट क्लीन ऎंड गुड पिपल इन पार्लमेंट, वि हेव टू वोट `तमुक' पार्टी!!!" 
 
त्या इंग्रजीच्या पापडाचे बोलणे संपण्याच्या आत माझ्या कानांचा ताबा माझ्यासमोरच्या चाळीत राहणाऱ्या  तिघा गृहस्थांनी घेतला. त्यातील एकाचे `भुरटे' असे नामकरण चाळवासियांनी  केले होते. कोणाच्याही घरी  किंवा एखाद्या दुकानात गेले की आजूबाजूच्यांच्या नकळत एखाद दोन गोष्टी लंपास करण्याची त्यांना खोड होती. एकदा कोपऱ्यावरच्या मेडिकल स्टोअर्समध्ये  त्यांनी जिलेट ब्लेड्सची दोन पाकीटे हडप करतांना मी पाहिलं होतं तेंव्हा त्यांनी त्यातलं एक हळूच माझ्या खिशात सरकवलं होतं. दुसरे गृहस्थ पेन्शनर होते.दिवसभर काही ना काही कारण काढून चाळीतील वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन फुकटात चहा,  बिस्कीट, पोहे सदरी पाडून घ्यायचे ही त्यांची दिनचर्या! बऱ्याच बायकांच्या मते ते कप, प्लेट वगैरे देता-घेताना बायकांना चोरटे स्पर्श करायचे. नुकतेच त्यांच्या मुलाचे लग्न झाल्यामुळे त्यांच्या हाती पत्रिका वाटताना चाळीबाहेरच्या बायकांचे स्पर्श आणि हुंड्याचे पैसे लागले होते. तिसरे गृहस्थ त्या चाळीच्या  रहिवाशी संस्थेचे  अध्यक्ष होते. त्यांच्या खोल्या एका कोपऱ्यात होत्या फायदा घेत त्यांनी कॉमन पैसेज खोलीशी ऐटेच करून एन्क्लोज करून घेतला होता आणि त्यास स्वत:ची अध्यक्षीय  संमतीदेखील घेऊन टाकली होती. भुरटे आणि  पेन्शनर या दोघांची जात एकच होती, त्यामुळे ते नेहमी एकत्रच  फिरत. दोघेही मला हिरीरीने सांगायला लागले,
" आमच्या काळातली संस्कृतीच नष्ट झालीय देशातली, संपूर्ण देश पोखरलाय जातीयवादानं …हल्लीच्या  नेत्यांना फक्त पैसा खायचा माहिती आहे…नीतीमत्तेची  काही चाडसुध्दा  राहिली नाहीये. आमच्या काळात  चांगली माणसं यायची राजकारणात…  राजकारण पुन्हा पूर्वीसारखं चांगलं करायचं असेल तर … `ढमुक' पक्षच निवडून यायला हवा…" मी त्यांना काही प्रतिसाद देणार, तेवढ्यात अध्यक्षांनी समारोपाचे भाषण  ठोकण्याच्या थाटात मला सांगायला सुरुवात केली.
"काय आहे साहेब, राजकारण कधी सुधारणे शक्यच नाही. कारण सगळे नेते सारखेच नालायक  आहेत. एक टक्का फरक नाही एकाही नेत्यात. आत्ताच पाहा ना,  एक तरी उमेदवार `माणूस' म्हणण्याच्या लायकीचा आहे का? च्यायला, कोणीही निवडून आला तरी पैसा  खाणारच!! मी तर `नोटा'च  दाबणार आहे, `नन ऑफ द अबौव्ह'!! साला, आपण मत द्यावं अशी एकाचीही लायकी नाही!!"   
 
 
अध्यक्षाचे शेवटचे वाक्य मात्र एकदम माझ्यावर येऊन आदळल्यासारखे मला वाटले. चाळीचा कॉमन पैसेज हडप करणारा हा अध्यक्ष  कोणत्या नैतिक बळावर `सगळे  उमेदवार पैसे  खातात' असे म्हणू शकतो? आणि स्वत: अध्यक्ष असल्याचा गैरफायदा घेणारा हा महाभाग कोणत्या नैतिक आधारावर तमाम  उमेदवारांना `नालायक' ठरवू शकतो? भारतात `फक्त  नेत्यांमुळे' भ्रष्टाचार, अनैतिकता बोकाळली आहे' असे ओक्साबोक्शी सांगण्याचा त्या फ़ोटारड्या  बिल्डरला, त्या इंग्रजीच्या पापडाला, भुरटे आणि पेन्शनरना  अधिकार आणि  आत्मविश्वास कोठून येतो? या प्रश्नांनी मी घेरला गेलो. हे असे बोलणाऱ्या सर्वांशी माझे  सौहार्दाचे संबंध आहेत याची मलाच लाज वाटायला लागली.  त्यात जिलेट ब्लेड, लग्नाचे जेवण आणि सिगारेट घेऊन मी देखील त्यांच्यात सामील  झालो  या विचाराने मला गरगरायला लागले. एव्हाना लोक बूथच्या आत जाऊन, मत देऊन, आपापले दात आणि बोट  दाखवत बाहेर यायला लागले होते. ते सगळे मतदार मलाच बोटे दाखवत आहेत आणि माझ्याकडेच पाहात दात विचकत आहेत असे मला वाटायला लागले. नकळत मी बाजूच्याला विचारले,
"`नोटा' प्रमाणे `नॉट मी' असे बटन असते का हो त्या मतदान यंत्रात?" 
त्याने माझ्याकडे संशयाने रोखून पाहात विचारलं, "म्हणजे?"
"मत द्यायची ज्याची लायकी नसेल, त्याच्यासाठी एखादे बटन असते का?"
"नाही." तो म्हणाला. 
 
मी पुन्हा मत न देताच परत आलो.      
 
    
                
 
लोकेश शेवडे 
 ७/५/२०१४ १२.४५

Tuesday, July 15, 2014

इशारा, तात्पर्य आणि टीप

      इशारा, तात्पर्य आणि टीप
 
`माकड' या  प्राण्यात उत्क्रांती घडत जाउन त्यातून पुढे `माणूस' तयार झाला असावा हे उत्क्रांतीवाद्यांचे म्हणणे पटण्यासारखे आहे. माकड  जसे वाट्टेल तिथून वाट्टेल तिथे वाट्टेल तशा उड्या मारू शकतं तसे  माणूस शारीरिकरित्या करू शकत नसला तरी माणसाचे विचार तश्शाच, किंबहुना त्याहून पलिकडच्या उड्या मारू शकतात, यावरून ते सिद्धच होतं. एका अर्थी, माणसाचा मेंदू हा माकडासारखाच असतो. अनेकजण  साध्या-सरळ बाबीतसुध्दा कोणत्याही मुद्द्यावरून कोणत्याही तर्कावर उड्या मारताना आढळतात त्यामागे  हेच कारण असावे. उदा. चांगल्या वस्तूची किंमत जास्त असते म्हणून महाग वस्तू  चांगली असते असा तर्क करून माणूस महाग वस्तू विकत घेतो. तर्काची ही `पलटी' बरोब्बर `माकडाच्या `शारीर पलटी'सारखीच  आहे.  माणूस नावाच्या  नि:पुच्छ प्राण्याच्या या  `वैचारिक माकडचेष्टां'ची सुरुवात बहुधा बालपणीच होत  असावी. तान्हेपणी माणसाचे हावभाव, हातवारे तर माकडासारखे असतातच, पण वरून त्यानंतर बाल्यावस्थेच्या काळात बडबडगीतांतून विसंगती आणि  असंबध्दतेचे  बाळकडूदेखील दिले जाते. उदा. राम  म्हणजे देव, देवच्या उलट वदे, वदे म्हणजे बोलतो,  `बोलतो'चे क्रियापद `बोलणे', बोलण्याचे `आज्ञा'रूप `बोला', ``बोला' म्हणजे  हिंदीत `बोलो', बोलोच्या  उलट `लोबो', लोबो हा एक  शास्त्रज्ञ होता,  म्हणून राम म्हणजे  शास्त्रज्ञ! अशा अजब तर्कटांवर आधारित बरीच बडबडगीतेअसतात. परिणामी, मोठे झाल्यावरही माणसे  अशाच  वैचारिक मर्कट किंवा तर्कटलीला  करत राहतात आणि त्या लीलांना `प्रगल्भता' मानतात. किंबहुना विसंगती, असंबद्धता हा माणसाच्या दैनंदिन जीवनाचा  भागच बनून राहिला आहे.  उदा. एखाद्या मुखपत्रात त्याच्या मालक असलेल्या राजकीय नेत्याची अथवा पक्षाची वारेमाप स्तुती त्याचा पगारी संपादक करत असतो. अर्थातच, तशी स्तुती करण्याच्या हेतूनेच त्या मुखपत्राची स्थापना व संपादकाची नेमणूक झालेली असते. तरीही त्या मुखपत्रात विवक्षित ठिकाणी चौकट टाकून ठळकपणे छापलेले असते, `या मुखपत्रात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतील असे नाही.' हे छापण्यात त्या संपादकाला, मुद्रकाला काहीही विसंगत वाटत नाही, इतकेच नव्हे तर वाचकालादेखील काही विचित्र वाचतो आहोत असे वाटत नाही. कित्येक  माणसांना  कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टीवरून  कोणत्यातरी  असंबध्द,  ऊटपटांग गोष्टी आठवतात आणि त्यासाठी ते कशी का असेना, पण तर्कसंगती देखील देत नाहीत, तरीही लोकांना ती समजावी  त्यांची अपेक्षा असते. उदा. मध्यंतरी दोन परस्पर विरोधी ज्येष्ठ नेत्यांच्या  मुलाखती टीव्हीवर दाखवल्या गेल्या.  त्यात दोन्ही नेत्यांना  `दंगल व हत्याकांड' या विषयावर  प्रश्न केल्यावर एकाने `देशात दारिद्र्य निर्मूलन  आवश्यक आहे' असे उत्तर दिले तर दुसऱ्याने `पाणी मागवले' व ते पिऊन मुलाखत सोडून निघून गेला.  मूळ  प्रश्न ऐकल्यावर एकाला दारिद्र्य आणि दुसऱ्याला पाणी का आठवावे? या प्रश्नाचा उलगडा श्रोत्यांना झालाच नाही. पण तसा उलगडा कोणाला  आवश्यकदेखील  वाटला नाही, कारण दोन्ही मुलाखती नंतर श्रोते आपापल्या नेत्याची ही वैचारिक उडी होती असे मानून बेहद्द खुश झाले होते. आणि टीव्हीवरील  विचारवंत [!!!] तर, आपापल्या नेत्यांच्या `उडी'रूप प्रतिक्रियांबाबत  `बडबडगीत ष्टाईल' तर्कट मांडत होते. 
 
 
तर, असंबध्दता आणि विसंगतीमध्ये `तर्कट' मांडण्यावरून आठवले. आमच्या कॉलेजच्या काळात अनेक  नावांनी व पध्दतींनी अवैध जुगार खेळला जात  असे.  त्यात `मटका', `वळण' हे प्रकार इतके लोकप्रिय होते की जुगाऱ्यांसाठी  `लंगडेकी  चाल' `जय बाबा' अशा अत्यंत चित्रविचित्र नावांनी मटका खेळण्याचे प्रशिक्षण  आणि हमखास जिंकण्याच्या युक्त्या देणारी पुस्तके फुटपाथवर जागोजाग मिळत असत. आमचा एक मित्र  `मटका' लावत असे, तर त्याचा मोठा  भाऊ घोडे लावत असे, म्हणजे धाकटा मटक्यावर तर थोरला रेसमधल्या घोड्यांवर पैसे लावत असे. दोघेही लायब्ररीमध्ये येऊन आमच्या ग्रूपच्या बाजूलाच  बसून त्यांची `जुगारलेली' पुस्तके वाचायचे व त्यानुसार पैसे लावायचे. कधी हरायचे तर कधी जिंकायचे, पण पैसे लावण्यापूर्वी कोणत्या  आकड्यावर  किंवा घोड्यावर  हमखास विजय मिळेल ते अभ्यासण्यासाठी आणि  हरले की हरण्याची कारणे  शोधण्यासाठी ते पुन्हा त्या पुस्तकांचे पारायण करत एखाद्या जाणकाराप्रमाणे एकमेकांशी व अधूनमधून आमच्याशी, म्हणजे सर्वसामान्यांशी चर्चा करायचे. आम्ही सर्वसामान्य असल्यामुळे, साहजिकच आम्हाला  त्यातील ओ की ठो  कळत नसे, पण त्यामुळे रंजन होई म्हणून आम्ही देखील उगाचच काहीतरी आकडे किंवा  नावे सुचवत असू. आकडा किंवा घोडा जिंकण्याची किंवा हरण्याची त्यांनी दिलेली कारणे  मात्र अत्यंत रोचक आणि  अद्भुत असत. एखादा घोडा हरला याचे कारण त्याची शेपटी मोठी होती, त्या घोड्याचा तबेला योग्य  नव्हता, याउलट एखादा घोडा जिंकला तर त्याचे कारण त्या घोड्याचा बाप अस्सल जातिवंत होता, त्याची  खोगीर उच्च  दर्जाची होती अशी कुठलीही कारणे अत्यंत गंभीरपणे द्यायचे. धाकटा तर आकडा लावताना तोच आकडा लागणार असल्याची ग्वाही देताना समजा, जुलैच्या सतरा तारखेचा मटका असेल तर, जुलै म्हणजे  सातवा महिना-सतरा तारीख, शिवाय शहात्तर साल म्हणजे तीनही  ठीकाणी सात आहेत; याचा अर्थ सात  गुणिले तीन, म्हणजे एकवीस; एकवीसमध्ये दोन  आणि एक हे आकडे; यांची बेरीज तीन, त्यामुळे आज `तीन' हाच  आकडा  लागेल,  असे  काहीतरी सांगायचा आणि मग समजा तोच तीन हा आकडा न येता सहा आकडा आला, की  मग "अरे, संध्याकाळी सहा वाजता   आकडा लावला होता, ते चुकलं, सहा वाजता आणि शहात्तर  साल आणि शनिवार  म्हणजे आठवड्याचा  सहाव्वा दिवस! त्यामुळे तिन्ही ठिकाणी सहा आकडा होता.  त्यामुळे तीन ऐवजी  सहा आकडा आला" असे सांगायचा. पण हे  दोघेही अव्याहतपणे जिंकण्या-हरण्याची तमा न बाळगता आपापले अंदाज, होरे हे  तार्किकदृष्ट्या बरोबर कसे आहेत हे सांगत फिरायचे. 
 
 हे सारं आठवण्याचं कारण, अर्थातच अगदी असंबध्द! नुकत्याच निवडणुका पार पडून त्यांच्या निकालाविषयी अनेक तज्ञ मंडळी त्या निकालाचे विश्लेषण व चिंतन करताना टीव्हीवर सतत दाखवत होते. खरं म्हणजे, मला  निवडणूक आणि त्यांचे निकाल यात काडीमात्रही स्वारस्य कधीच नव्हते. गेली अनेक  वर्षे मी निवडणुका  आणि त्यांचे  निकाल  पाहतो आहे. एकाही  निवडणुकीचे  निकाल  पाहून आणि त्यानंतरच्या पाच वर्षांतील
 देशाची वाटचाल अनुभवून जनतेने  हे प्रतिनिधी का नेमके का निवडून दिले असावेत  आणि ज्यांना  पाडले  त्यांना का पाडले असावे याचा कधीही बोध झाला नव्हता. पण समोर टीव्हीवर सर्व पक्षांची आकडेवारी विविध रंगात दाखवणारे बहुरंगी वर्तुळ मला गोल रंगीत तबकडीसारखे भासले, रंगीत तबकडीवरून कॅसिनो हा जुगाराचा प्रकार आठवला, जुगारावरून मटका आठवला, मटक्यावरून कॉलेजमधले ते दोन भाऊ आठवले, त्या दोघांवरून त्यांचे तर्कट आठवले आणि त्यांच्या तर्कटावरून  अचानक निकालामागील कारणमीमांसाच  उलगडली. उमेदवाराचे कार्य, व्यक्तिमत्व आणि त्याचा विजय यांची सांगड लक्षात आली. उदा. जनतेला घोटाळे  नकोसे झाले होते, त्यामुळे अशोक चव्हाण निवडून आले.  जनतेला घराणेशाही समूळ नष्ट करायची  होती म्हणून खडसे यांची सून व   गावित  यांची कन्या  निवडून आल्या. जनतेला सरंजामशाही उखडून  टाकायची होती म्हणून उदयनराजे भोसले प्रचंड बहुमताने  निवडून आले. आणि निर्णायकपणे घराणेशाही व भ्रष्टाचाराचे निर्मूलन करून  केवळ विकास आणि अविरत समाजकार्य करणाऱ्यांनाच  खासदार करायचे म्हणून प्रमोदकन्या  पूनम महाजन यांना जनतेने जबरदस्त  मताधिक्याने निवडून आणले. जनता काही  खुळी नाही, मतदारांना कोणी उल्लू बनवू शकत नाही हे मागील सर्व निकालांप्रमाणे  यावेळच्या निकालावरून सिद्ध झालेलेच होते. याखेरीज याखेपेस जनतेला `बदल' हवा होता, म्हणून जनतेने निम्मे खासदार हे त्यांनी  फक्त त्यांचा पक्ष  `बदल'ल्यावरच निवडून दिले. यावरून, मतदार अत्यंत चाणाक्ष असतात, कमालीच्या हुशारीने आपले प्रतिनिधी निवडतात. हे अगदी अधोरेखित झाले. हा  साक्षात्कार मला टीव्हीवरील विश्लेषण पाहतानाच का झाला? याचे उत्तर इतकेच की, माकडाची शारीरिक आणि माणसाची वैचारिक उडी कोठून  कुठे काही जाईल ते सांगता येत नाही!!! 
 
वैधानिक इशारा: जुगार खेळणे वैचारिक व आर्थिक आरोग्यास हानिकारक आहे. 
तात्पर्य: बडबडगीत, जुगार आणि निवडणुकीचे निकाल यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही!! 
टीप: या लेखात यदाकदाचित मत व्यक्त झालेच असल्यास, त्या मताशी केवळ संपादकच नव्हे,  तर खुद्द लेखक देखील सहमत नाही. 
 
 
 
लोकेश शेवडे 
२५/०५/१४ सायं ५.४५