Sunday, February 21, 2016

स्यूडो देशभक्त

  भुरटे  द्विदेशद्रोही / [स्यूडो देशभक्त ]

जगातून आदर्शवाद हद्दपार होत असताना, भारतीय लोक मात्र अद्याप आदर्शवादाचा उदो करण्यात मोठाईकी मानतात. स्वत:चे आचरण त्या आदर्शांच्या नेमके उलट असले तरी त्यांना त्याची खंत नसते. किंबहुना, उक्ती आणि आचरण यात विसंगती असणे हे जणू भारतीय जनमानसाचे एक व्यवच्छेदक लक्षण बनून राहिले आहे. जग जडवाद - बुद्धीप्रामाण्यवादाकडे पावले टाकत असताना आपण मात्र `पैसे लाथाडण्याचे' उदात्तीकरण करणारी `परोपकारी गोपाळ'ची कथा, `आई --वडिलांची' सेवा हे एकमेव पुत्रकर्तव्य ठरवणारी `श्रावणबाळाची' कथा ऐकून धन्य होत असतो. देशभक्ती बाबत तर काही विचारायलाच नको. जगातील विचारवंतांनी `देशातीत मानवतावाद' स्वीकारल्यापासून `देशप्रेम-धर्मप्रेम' हे `मानवतावादा'पुढे `संकुचित'पणाचे लक्षण मानले जाऊ लागले. तरीही भारतात देशभक्ती ही मानवी जीवनातील परमोच्च भावना असल्याचे रुजवणाऱ्या, देशासाठी प्राण देणाऱ्या `कान्हेरें'पासून `चाफेकरां'पर्यंत असंख्य देशभक्तांच्या कथा लहानपणापासून ऐकवल्या जातात.

`शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीतीI 
देव देश अन धर्मासाठी  प्राण घेतलं हाती II  '  

अशी गाणी बालपणापासून ऐकत धर्माभिमान, देशाभिमान आपल्या मनात नकळत फुलवला जातो. तथापि देशाभिमान आणि धर्माभिमान यापैकी `देशप्रेम' हीच सर्वोच्च उदात्त भावना असल्याचे बहुतांश लोकांच्या वागण्यातून, संभाषणातून डोकावत राहते. `ने मजसी ने, परत मातृभूमीला' ऐकून स्फुरण पावणारे जनसामान्य देशाला `मातृ'भूमी संबोधतात, यावरून ते देशाला `माते'समान, म्हणजेच सर्वाधिक उदात्त मानतात हेच अधोरेखित होते. देशप्रेमास सर्वोच्च उदात्त मानण्याबाबत काहीशी द्विधा शक्य असली तरी `स्वदेश विरोध', `परदेशधार्जिण्य' या बाबींस `नीचतम' मानण्याबाबत मात्र `ठाम'पणा असतो. स्वदेशविरोध, देशद्रोह हे तर इतके नीचतम कृत्य मानले जाते की, एखाद्याने कायदा हातात घेऊन `स्वत:ला देशविरोधी वाटलेल्या' माणसास ठार मारले, तरी कित्येक लोक ते `पुण्यकर्म' मानतात. त्यामानाने धर्मप्रेम किंवा धर्माभिमान या भावनांचे स्थान समाजमानसात दुय्यम आहे. म्हणूनच  दीन-दुबळ्यांच्या सेवेत आयुष्य वेचणाऱ्या मदर तेरेसांच्या कार्यात `धर्मप्रेमा'चे सावट असल्याचा संशय एका अर्धवस्त्रावृत `स्वयं'घोषित `राष्ट्रसेवक' शिरोमणीला आल्याबरोबर त्याने तेरेसांचे ते कार्य `कमी प्रतीचे' ठरविले. त्याप्रमाणेच, धर्मवादी लोक जरी सेक्युलर लोकांना `स्युडो' म्हणून हिणवत असले तरी, एखादा परधर्मीय खेळाडू आपल्या राष्ट्रातर्फे चांगला खेळ  करत असल्यास त्या परधर्मीय खेळाडूस `आपला' माणूस, मानायला फारसे आढेवेढे घेत नाहीत. याउलट एखाद्या स्वधर्मीय खेळाडूने पैसे घेऊन आपल्या देशाविरुध्द खेळणाऱ्या संघास मदत केली, किंवा बेटींगचे पैसे घेऊन वाईट खेळ केला तरी त्या खेळाडूस तमाम जनता अत्यंत `हीन माणूस' ठरवते. वास्तविक, कोणत्याही क्रीडाप्रकारात वाईट खेळून त्या देशाचा काही विध्वंस किंवा मनुष्यहानी होणार नसते. तरीही पैशांसाठी परदेशास मदत करणे हे अत्यंत गर्हणीय कृत्य मानण्यात येते.[ अर्थात, असेच पैसे घेऊन एखाद्या अल्पसंख्य परधर्मीय खेळाडूने वाईट खेळ केला, परदेशास मदत केली तर त्याला आयुष्यातूनच उठवले जाते, ही गोष्ट अलाहिदा!!]

तथापि, हेच जनसामान्य पैशासाठी खेळ-बीळ सोडा, एखादी विकेट सोडा, पैशांसाठी स्वदेशाचे नागरिकत्व देखील सोडून देणाऱ्या लोकांबद्दल काय विचार करतात? त्यांना देशद्रोही सोडा, त्यांना `स्युडो-देशप्रेमी' तरी मानतात का? निदान त्यांच्या देशप्रेमाला `कमी प्रतीचे' तरी मानतात का? ……. हे प्रश्न पडले ते, वर्षभरापूर्वी अमेरिकेत न्यूयॉर्क येथे झालेल्या भारताच्या पंतप्रधानांच्या सभेत हजारोंनी गर्दी करणाऱ्या आणि पंतप्रधानांनी `भारतमाता की SSSS ' अशी साद घातल्यावर त्याला `जSSSSS य!!' असा ओक्साबोक्शी प्रतिसाद देणाऱ्या अमेरिकस्थ [तथाकथित] भारतीयांना पाहून! भारताचे पंतप्रधान अमेरिकेत आल्यामुळे त्यांचे देशप्रेम उफाळून आले होते म्हणे !! पंतप्रधानांनी `मेडिसन स्क्वेअर' मध्ये `भारतमाता की जय' म्हटले म्हणजे जणू भारताने `अमेरिका'च जिंकून घेतली अशा अविर्भावात प्रेक्षक चेकाळून जल्लोष करत होते आणि ते चेकाळणे हे त्यांच्या देशभक्तीच्या जाज्वल्यतेचे प्रमाण मानून तमाम माध्यमे-वाहिन्या तसे चित्रण भारतीय जनतेसमोर मांडत होत्या!! `तुम्हाला कसे वाटतंय?`असा एकच प्रश्न अनेकांना विचारणाऱ्या आणि `ग्रेट', `प्राउड' `ऑस्स्सम्म' अशी उत्तरे मिळवण्यात गर्क असलेल्या तमाम निवेदकांपैकी एकालाही हा प्रश्न विचारावासा वाटला नाही, की "तुमचे सध्याचे नागरिकत्व भारतीय आहे की अमेरिकन?"

[देशातीत] मानवतावाद्यांच्या दृष्टीने कोणत्या देशाचे नागरिकत्व आहे ही बाब अत्यंत गौण आहे. पण ते तिथे चेकाळून भारताचा `जयघोष' करणारे आणि तिथले चेकाळणे पाहून इथे भारतात चवताळणारे  `मानवतावादी' नव्हते. तिथले बहुतांश लोक स्वत:ला `मातृभूमीप्रेमी' म्हणवून घेणारे `अमेरिकेचे नागरिक बनलेले मूळ भारतीय' होते. तर इथले, स्वत:ला `देशभक्त' समजून `सामान्य माणूस' म्हणवून घेण्यात कमालीची धन्यता मानणारे, `भारतीय मध्यम किंवा उच्च-मध्यमवर्गीय' होते. या दोघांच्याही दृष्टीने `देशभक्ती' ही पराकोटीची उच्च भावना आहे आणि `देशातीत मानवतावाद', `सेक्युलेरीझम' हा निव्वळ भंपकपणा आणि `स्युडो' आहे. मग, प्रश्न असे पडतात की, ज्यांनी दहा-पंधरा लाख रुपड्यांसाठी भारताचे नागरिकत्व सोडले त्यांनी स्वत:ला भारतप्रेमी म्हणावे?? त्यांचे सोडा, इथल्या [स्वयंघोषित] देशभक्तांनीदेखील पैशांसाठी नागरिकत्व सोडणाऱ्याना देशप्रेमी मानावे?? मग त्या पैसे लाथाडणाऱ्या `परोपकारी गोपाळा'चे काय? आपापल्या आई-वडिलांना भारतात सोडून देऊन, आई-बापांना भेटायला वेळ नसणाऱ्या, `अमेरिकन्स ऑफ इंडियन ओरिजिन्स'ना देशभक्त मध्यमवर्गीयांनी `मातृ'भूमीप्रेमी मानावे? मग त्या `श्रावणबाळा'चे काय?? कॉन्स्टयुलेटला अहोरात्र खेटे घालून स्वत:चे नागरिकत्व विकणाऱ्यांना देशभक्त मानावे ?? मग त्या कान्हेरे-चाफेकरांचे काय??? इंटरनेटवरून गाणी अमेरिकेत डाऊनलोड करताना "नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भारत भूमीचा तारा" आणि "तरी आंग्लभूमी भयभीता रे!! अबला न माझीही माता रे" या पंक्ती आपोआप `डिलीट' होतात की काय ?? `बेटिंग' किंवा `स्मगलिंग' करणारे निदान कोट्यावधी रुपयांसाठी आपले `राष्ट्र कर्तव्य' विकतात, ती रक्कम तरी मोठी असते, पण या `एओआयओ'नी दहा-पंधरा लाखांच्या फुटकळ रकमेसाठी `राष्ट्र कर्तव्य'  विकलेले असते! म्हणून आणखी एक प्रश्न पडतो की, या `भुरट्या' देशद्रोह्यांच्या `जSSSSSय'मुळे तमाम भारतीय देशभक्त मध्यमवर्गीय का हुरळून जावेत ??
या प्रश्नाचा खुलासा अवघड नाही. एक म्हणजे, या `एओआयओं'नी माता व मातृभूमीचा एकत्र त्याग करून "देश हा `माते'समान आहे" या त्यांच्या उक्तीशी एका अर्थी सुसंगतच वर्तन केलेले असते. मग इथल्या देशभक्तांना ते आक्षेपार्ह का वाटावे? दुसरे असे की, ते अमेरिकन नागरिक झालेले भारतीय, इकडच्या मध्यम किंवा उच्च-मध्यमवर्गीयांचेच भाऊबंद आहेत. आपल्याच भाऊबंदांना ते `देशद्रोही' कसे म्हणतील? "माझा भाऊ किंवा बहिण, मुलगा किंवा मुलगी, माझे काका किंवा मावशी `देशद्रोही' आहेत" असे म्हणणे खचितच त्यांना भूषणावह वाटणार नाही. उलट त्यांनी आपापले `सख्ख्खे' नातेवाईक `अमेरिकन' झालेले वर्षानुवर्षे मिरवलेले असते. किंबहुना त्यांनाही `अमेरिकन' व्हायचे असते. परंतु ते कठीण असते. म्हणून अगदी तिथे बाळंतपण-`बेबी सिटींग' परवडत नाही, यास्तव इथून `नर्स-अटेंडंट' म्हणून बोलावून घेतलेल्या आई-बापांनी सुध्दा "अमेरिका पाहीलीन होSS!!" म्हणत, मिरवून घेत, दुधाची तहान `ताकावर' भागवलेली असते. मग आता त्यांनाच देशद्रोही कसे ठरवणार?? त्यामुळे इथल्या मध्यमवर्गीयांना त्या भुरट्यांबद्दल `आपुलकी' वाटून ते हुरळून जाणे स्वाभाविक आहे. खरा प्रश्न असा आहे की, ज्यांनी स्वत:हून भारताशी तलाक-तलाक-तलाक घेऊन अमेरिकेशी नागरिकत्व `कबूल' केले, ते इतके जाज्वल्य देशभक्त, भारतप्रेमी कसे? याचे उत्तर असे आहे की, हे `एओआयओ' भारतप्रेमी नाहीतच!!
त्यांचे हे प्रेम देशाबद्दल नव्हते…त्यांना देशाबद्दल प्रेम असते तर त्यांनी देशाचे नागरिकत्व झिडकारलेच नसते! नागरिकत्व ठोकरूनही त्यांना भारतप्रेम आहे असे म्हणावे, तर ते प्रेम याआधीच्या भारताच्या अनेक पंतप्रधानांच्या अमेरिकाभेटीतदेखील उसळून आले असते. ज्याअर्थी यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीत त्यांना या वेळच्यासारखे पिसाळून `जSSSSSSय' असे भुंकावेसे वाटले नाही, त्याअर्थी त्यांचे प्रेम हे देशाबद्दल नसून अन्य कुठल्यातरी सामाईक बाबीबद्दल होते! ही सामाईक बाब भाषा असणे शक्य नाही कारण भारतात अनेकविध भाषा आहेत व त्यातील कोणत्याही एका भाषिकाला दुसऱ्या भाषिकाबद्दल फारसे ममत्व नाही [असलाच तर द्वेष आहे]. संस्कृतीबद्दल प्रेम असणे शक्य नाही कारण तसे असते तर भारतीय संस्कृतीच्याच विरुध्द स्वत:च्या आईबापांना वाऱ्यावर सोडून आणि संगीत, नृत्य, साहित्य, वाङ्मय वगैरे सांस्कृतिक बाबींचा त्याग करून ते गेले नसते, किंवा मग तिथे राहूनही त्यांनी ते सारे जतन केले असते…. काही तुरळक अपवाद वगळता तसे देखील झालेले दिसत नाही. मग उरली ती सामाईक बाब एकच….धर्म! धर्म या सामाईक बाबीमुळे त्यांना प्रेमाचे कढ आले होते!! याखेपेस जे पंतप्रधान अमेरिकेत आले ते त्यांना `स्वधर्मीय' वाटत होते! म्हणून ते अमेरिकन स्वधर्मप्रेमी-`स्युडो'देशभक्त पिसाटून जल्लोष करत होते!! म्हणून त्यांना `स्युडो'सेक्युलर वाटलेल्या पत्रकारावर त्यांनी हल्ला चढवला! आणि म्हणून इथल्या मध्यम, उच्च-मध्यमवर्गाला तो जल्लोष `आपला विजय' वाटत होता!! आणि म्हणूनच फारसे अन्य धर्मीय या जल्लोषात सामील झाले नाहीत!!
अनेकविध, भाषा, धर्म, वंश नांदत असलेल्या भारताच्या विद्यमान पंतप्रधानांना पाहून लोकांना केवळ त्यांचा एक सामाईक असलेला धर्मच का आठवावा? केवळ धर्माच्याच प्रेमासाठी अमेरिकेत भारतमातेचा जयजयकार करणाऱ्या अमेरिकन नागरिक झालेल्या मूळ भारतीयांना काय म्हणावे?? देशप्रेमी की देशद्रोही? प्रेमी किंवा द्रोही जे काही म्हणावे, ते कोणत्या देशाचे? ज्यांनी पैशांसाठी भारताचे नागरिकत्व, त्यांचे मातृभूमीचे कर्तव्य नाकारले आणि मग अमेरिकेचे नागरिकत्व घेतल्यावर तिथले कर्मभूमीचे कर्तव्य देखील नाकारून अमेरिकेतच अमेरिकेऐवजी `भारताचा जयघोष' केला, ते दुहेरी देशद्रोही ठरत नाहीत का? भारतात राहून धर्मप्रेमासाठी पाकिस्तानच्या खेळाडूना प्रोत्साहन देणाऱ्या काही तुरळक लोकांवरून सबंध जमातीलाच हीन आणि नीच लेखणाऱ्या मध्यमवर्गाला या अमेरिकन द्विदेशद्रोहींबद्दल मात्र आपुलकी वाटावी इतका हा वर्ग ढोंगी, दुटप्पी, स्वार्थी कसा झाला ?? या असल्या भुरट्या, द्विदेशद्रोहींच्या `मेडिसन स्क्वेअर'मधील बुभूत्कारावरून पंतप्रधानांची अमेरिकावारी यशस्वी का मानावी ?? हे सारे प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतात!!!

लोकेश शेवडे
२/३/२०१५ १८:१५       

No comments:

Post a Comment