Sunday, February 21, 2016

नेव्हर अगेन

नेव्हर अगेन / स्मारक
बऱ्याच वर्षांपूर्वी मी एका कामानिमित्त उत्तर भारतातल्या एका प्रसिध्द शहरात गेलो होतो. विमानतळापासून हॉटेलपर्यंतचे अंतर बरंच होतं. संध्याकाळच्या आठ-साडेआठची वेळ असावी. त्याकाळी मोबाईल अस्तित्वातच नव्हते, त्यामुळे साहजिकच टैक्सी ड्रायव्हरशी गप्पा सुरु झाल्या. नेमका कसा ते आठवत नाही, पण नकळत विषय दंगलींवर आला. तेथे सहा-सात वर्षांपूर्वी एक मोठी दंगल उसळली होती व त्यात एका अल्पसंख्य गटाचे हजारो लोक मारले गेले होते. त्याच्या मतानुसार ती दंगल नसून दोन राजकीय नेत्यांनी एकाच धार्मिक गटाच्या लोकांचे घडवलेले हत्याकांड होते. वस्तुत: या दंगलीच्या संदर्भात त्या नेत्यांची नावे वर्तमानपत्रात अनेकदा आली होती आणि त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते, परंतु त्याबाबत ठोस पुरावे नसल्यामुळे कार्यवाही प्रलंबित होती. कोर्टाकडून आरोप सिद्ध होऊन सजा सुनावली जात नाही तोपर्यंत असे `पत्रकारी' आरोप मी त्याकाळी खरे मानत नसे. म्हणून मी ड्रायव्हरच्या म्हणण्यावर शंका घेत `कशावरून', `तुला कसे माहीत' वगैरे प्रश्न करू लागलो. अचानक त्यानं टैक्सी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि खाली उतरून स्वत:चा शर्ट काढला आणि माझा दरवाजा उघडून समोर उभा राहिला. त्याच्या पोटापासून खांद्यांपर्यंत एकही इंच त्वचा `नॉर्मल' नव्हती, त्यावर भाजल्या गेल्याचे खोल व्रण होते व पांढरे डाग होते. म्हणाला, " मलाच पेटवलं होतं त्यांनी, त्या पेटवणाऱ्या सर्वांना मी ओळखतो, ते त्या नेत्यांचेच कार्यकर्ते होते…आज देखील ते त्या नेत्यांबरोबरच दिसतात ते मला." त्याचे ते भाजलेले शरीर पाहून मी हादरलो, परंतु त्यापेक्षाही "ते पेटवणारे लोक आजसुध्दा त्यांच्या नेत्यांबरोबर दिसतात" या विधानाने मी उध्वस्त होण्याची पाळी आली. कारण या विधानाचा अर्थ, ते हत्यारे, ते नेते गुन्हा करून सहा-सात वर्षे उलटल्यावरदेखील मोकाट होते, इतपत सीमित नव्हता, तर ते नेते त्याच मतदारसंघातून नुकतेच निवडून आले होते हे क्रूर वास्तवही त्यातून डोकावत होते. असाच एक प्रसंग वर्षभरापूर्वी मी महाराष्ट्रालगतच एका राज्यात गेलो होतो तेंव्हाही घडला. सर्व काही हुबेहूब त्या टैक्सीवाल्याच्या अनुभवासारखेच  होते, हत्यारे व त्यांना भडकवणारे नेते हत्याकांडानंतर आठ-दहा वर्षे मोकाटच होते, आणि नेते निवडणुकीत मोठ्या बहुसंख्येने जिंकलेही होते.… फक्त पीडित धार्मिक गट मोठा होता आणि यावेळी काही लहान मुले-अर्भके देखील कापली गेली होती, एवढाच काय तो फरक! या प्रसंगांनंतर हत्याऱ्यांना निवडून देणारी जनता, सामान्य माणसे यांच्या संवेदनशीलते बाबतच माझ्या मनात मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले …… 

या घटनांत असंवेदनशील, क्रूर भासणारी सामान्य माणसे स्वत:च्या खाजगी आयुष्यात मानवी जीवाला किती महत्व देतात ? सामान्य माणसांना कुठल्याच गुन्ह्याबाबत काहीच वाटत नाही का? त्यांच्या दृष्टीने मानवी हत्येपेक्षाही दुसरा कुठला गुन्हा जास्त गंभीर आहे की काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एखाद्याला आपण जर विचारले की, "समजा, तुझ्या घरी दोन दरोडेखोर वेगवेगळ्या वेळी आले, एकाने घरातील दोन पाच लाख रुपये किमतीचे सोने-नाणे लुटून नेले, तर दुसऱ्याने पैसे न चोरता तुझ्या मुलीचा, मुलाचा किंवा बायकोचा खून केला, तर त्यातील कोणाचा अपराध तू मोठा, अक्षम्य मानशील?" तर तो तत्काळ उत्तर देईल "अर्थातच खून करणाऱ्याचा अपराध मोठा आणि अक्षम्य आहे. दोन-पाच लाख सोडा, अखंड घरदार लुटून नेले तरी चालेल पण कोणाचा जीव जायला नको! पैसे चोरण्याची तुलना खुनाशी होऊच शकत नाही!"  त्याच व्यक्तीला पुढे विचारले की समजा एखाद्या भ्रष्ट माणसाने तुझ्याकडे लाच  मागितली किंवा `घोटाळा' केला, तर त्याचा अपराध मोठा की त्या खुन्याचा? यावरही ताबडतोब उत्तर मिळेल "खुनाचा अपराधच मोठा! शेवटी, चोरी, दरोडा, लाच, घोटाळा हे वेगवेगळे गुन्हे असले तरी ते एकाच प्रकारचे आणि पातळीचे गुन्हे आहेत, खून,  हत्याकांड यांची भयानकता फार मोठी आहे. खुनाची आणि आर्थिक गुन्ह्याची तुलना होऊच शकत नाही." या काल्पनिक संवादांची कायद्याशी किंवा  वास्तवातील घटनांशी तुलना केल्यास त्यामागील विचार-तर्क एकमेकांशी सुसंगत आढळतील. जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील गुन्हेगार  जक्कल-सुतार वगैरेंनी फारसे पैसे चोरले नव्हते पण त्यांना फाशी देण्यात आली. आणि त्या फाशीबद्दल त्याकाळी सामान्य माणसांनी समाधान व्यक्त केले होते. दिल्लीतील `निर्भया' कांडातील अपराध्यांनी काही पैसे चोरले नव्हते. त्यांच्या निव्वळ बलात्कार व हत्या या गुन्ह्यांविरुध्द असंख्य जनसामान्य रस्त्यावर उतरले व त्या गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली. करोडो रुपये लुटणाऱ्या चोर-दरोडेखोरास किंवा घोटाळेबहाद्दरास फाशी द्यावी अशी मागणी कधी केलेली ऐकिवात नाही आणि कोर्टाने कधीही अशा हत्या नसलेल्या निव्वळ चोरी, दरोडा किंवा भ्रष्टाचार प्रकरणात फाशी सुनावलेली नाही. कारण आर्थिक गुन्ह्यांपेक्षा हिंसा, हत्या हे गुन्हे भयानक-गंभीर मानले जातात व जगभर कायदेही तसेच आहेत.

तथापि, बहुतांश जनसामान्यांचे विचार, त्यांच्या मनातल्या प्रतिक्रिया बऱ्यापैकी तर्कशुध्द, कायद्याशी सुसंगत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचे वर्तन, त्यांची कृत्ये मात्र अनेकदा त्यांच्या स्वत:च्याच विचारांच्या उलट असल्याचे आढळते. उदा. मृत्यू ही आपल्या जीवनातील सर्वाधिक भेडसावणारी, भयावह बाब आहे असे सर्वच जण मानतात, परंतु अगदी स्वत:च्या सख्ख्या नातेवाईकांचे मृत्यू देखील १०/१२ दिवसांत विसरून तेराव्याला कामाला लागतात. हे झाले नैसर्गिक मृत्यूबाबतचे वास्तव. पण अपघाती मृत्यू, हत्या याबाबतचे वास्तव फारसे वेगळे नाही. फरक इतकाच की, तेरा दिवसांऐवजी महिना दीड महिना भयानकतेचे सावट राहते, क्वचित २/३ महिने. त्या सावटातसुध्दा पोलिसांच्या तपासाचा सहभाग असतोच. पोलीस जोपर्यंत जाब-जबाबाच्या कामानिमित्त फोन करत असतात तोपर्यंत ते सावट राहते. पुढे  "तपास चालू आहे" अशी साचेबध्द उत्तरे देणे पोलिसांनी सुरु केल्यानंतर त्या जिवलगाच्या मृत्यूची जाणीव, त्यातील वेदना-दाहकता कमी होत होत शेवटी विस्मरणात जाते. आपल्या जिवलगाचा मृत्यू एखाद्या दारू प्यालेल्या वाहनचालकाच्या चुकीमुळे घडला असला तरी बहुतांश लोकांच्या मनातून त्या ड्रायव्हरबद्दलचा संताप, द्वेष, सूडभावना कालांतराने नष्ट होतात आणि त्यांची  जागा `सहिष्णुता', `क्षमाशीलता'  घेते. मग "जे वाईट घडायचे ते घडून गेले, आता याला शिक्षा देऊन गेलेली व्यक्ती काही परत येणार नाही " अशी स्वत:ची व इतरांची समजूत काढून ड्रायव्हरच्या सुटकेस मदतही केली जाते. खून किंवा हत्या घडलेली असल्यास हेच सारे घडते, फक्त घडायला अधिक कालावधी व अधिक 'काँपन्सेशन' लागते. अर्थातच, सरसकट सारे जनसामान्य अस्सेच वागतात असे नाही, `तुरळक' अपवाद असतातच. [नोंदविलेल्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा ठोठावली जाण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प असण्यामागे हे देखील एक महत्वाचे कारण आहे.]

मानवी हत्येसारख्या भयानक गुन्ह्यांचा माणसांना विसर का पडावा? या विसरण्याला `विसरभोळेपणा [short Memory]' म्हणणे योग्य ठरेल की `असंवेदनशीलता'? `क्षमाशीलता' म्हणावे की `क्रौर्य'? यातील काहीही म्हटले तरी जर बहुतांश लोक असे वागत असतील तर ते `सर्वसाधारण [नॉर्मल]' ठरते, त्यामुळे त्यास क्षमाशीलता/क्रौर्य असे नैतिक निकष लावणे योग्य ठरणार नाही. तर त्या विसरण्यामागील [नैसर्गिक] कारणे अभ्यासावी लागतील.

माणसाला ध्यास हा नेहमीच आनंद-सुख मिळवण्याचा असतो. आयुष्यात दु:खद प्रसंग कधी येऊच नयेत अशीच माणसाची मनोमन इच्छा असते. दुर्दैवाने दु:खद घटना घडलीच तर तिच्या आठवणीचे उमाळे सातत्याने काढून तो कधीच आनंदी होऊ शकणार नाही. उलट ती लवकर विसरली गेली तरच तो पुन्हा आनंदाकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळे माणसाचा कल दु:खद प्रसंग विसरण्याकडे असणे स्वाभाविकच आहे. कोणतीही घटना लक्षात ठेवण्यासाठी त्या आठवणीला वारंवार उजाळा देऊन ताजी ठेवावी लागते अन्यथा तिचे विस्मरण घडते हे देखील अत्यंत नैसर्गिक आहे. जिवलगाच्या मृत्यूने सर्वांना तीव्र दु;ख होतेच, एखाद्या अपरीचिताच्या हत्येनेदेखील बहुतांश माणसांच्या मनात दु:ख आणि संताप यांचा उद्रेक होतो, अनेकदा ते पोलिसांनी अपराधी तत्काळ पकडावेत म्हणून रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात. यावरून बहुतांश जनसामान्य संवेदनशीलच असतात हे कबूल करणे भाग आहे. मरण पावलेला जिवलग किंवा हत्या झालेला अपरिचित मृत्यूनंतर आठवणींना उजाळा देऊ शकत नसल्यामुळे तो प्रसंग विस्मरणात जातो ही अपरिहार्यता आहे. म्हणून जनसामान्यांचे विचार व वर्तनातील ही विसंगती समजून घेण्यासारखी आहे. तथापि, या विसंगतीचे राजकीय परिणाम मात्र कमालीचे धक्कादायक आहेत.       

हे धक्कादायक परिणाम जनसामान्य जेंव्हा मतदार असतात तेंव्हा घडतात. खून, हत्याकांडाला सर्वाधिक गंभीर-भयानक गुन्हा व त्यामानाने `चोरी-भ्रष्टाचार-घोटाळा' हे कमी गंभीर गुन्हे असे जनसामान्य [व कोर्ट  देखील] मानत असले तरी खून-हत्याकांड हे गुन्हे कालांतराने विस्मरणात जातात. यातली मेख अशी आहे की भारतात गुन्हे अन्वेषण खाते राज्य सरकारकडे असते, त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांना स्वपक्षीयांचे गुन्हे अन्वेषण दाबणे किंवा लांबणीवर टाकणे सहजसाध्य असते. त्यातही समजा, हत्याकांडातील अशा गुन्हेगारांवर उशिरा का होईना खटले दाखल केले, तरी कोर्टांचे निकाल कधीच लवकर लागत नाहीत. त्यामुळे तोपर्यंत होणाऱ्या निवडणुकांत मतदार त्या गुन्हेगाराला [नैसर्गिक न्यायानुसार] निर्दोष तरी धरतो किंवा ते गुन्हे विसरून जातो. परिणामी गुन्हेगार निवडून येण्यात काहीही अडसर येत नाही. याउलट भ्रष्टाचारी किंवा घोटाळेबहाद्दरांची मात्र हत्याकांडाच्या मानाने त्यांचे गुन्हे कमी गंभीर असले तरी गोची होते. कारण त्यांच्या भ्रष्टाचारातून, घोटाळ्यांतून निर्माण झालेली मिळकत मरण पावत नाही, ती मोठमोठ्या गाड्या, आलिशान बंगले, मोक्याच्या जमिनी यांच्या रूपाने त्यांच्या गुन्ह्यांच्या आठवणीना उजाळा देत मतदारांसमोर सतत उभी  ठाकत असते. भ्रष्टाचार-घोटाळा प्रकरणी उमेदवार गुन्हेगार आहे की नाही हे ठरवण्यासाठी मतदारांना अन्वेषण खात्याची, कोर्टाची गरजच पडत नाही. किंबहुना कोर्टाने जरी एखाद्या उमेदवाराला `क्लीन चिट' दिली तरी मतदार त्यावर विश्वास ठेवत नाही कारण त्या उमेदवाराची मालमत्ता पाहून, उधळपट्टी अनुभवून मतदाराची स्वत:चीच पक्की खात्री झालेली असते. जितक्यांदा मतदार उमेदवाराच्या गाड्या पाहतो, बंगले पाहतो, जमिनी पाहतो तितक्यांदा त्या मतदाराच्या डोक्यात भ्रष्टाचार-घोटाळा यांच्या आठवणींची सणक  जाते व द्वेषाचे थैमान सुरु होते. साहजिकच याचा परिणाम मतदानावर होतो व हे मतदान भ्रष्टाचारी उमेदवाराच्या विरुध्द होते. अर्थात, त्यातून भ्रष्टाचाराविरुध्द मतदान केले जाते ते योग्य व न्याय्यच आहे. [अर्थातच, सगळेच उमेदवार भ्रष्ट असल्यास मतदार `हतबलपणे' त्यातील एकाला मत देतात, हे आणखी एक वास्तव आहेच] मात्र दंगलखोर, हत्यारे, खूनी त्यांचे गुन्हे जास्त गंभीर असूनही सुटतात हे वास्तव भयानक आहे. हत्याकांड एखाद्या विशिष्ट जातीय किंवा धार्मिक गटाचे असले तरी तो जातीय-धार्मिक गट कालांतराने अन्वेषण /  न्याय विलंबामुळे `नैसर्गिक न्यायाने'  गुन्हेगार उमेदवार निर्दोष असण्याची शक्यता स्वीकारतो व `नॉर्मल विस्मरणाला' बळी पडून `क्षमाशील' होतोच. विशेषत: बेकारी, दारिद्र्य, टंचाई वगैरे समस्या असलेल्या समाजाचे समस्येविरुध्दच्या `फायर फाईटींग' प्रक्रियेमुळे `हत्याकांडा'सारख्या बाबींकडे कालौघात दुर्लक्ष होते. याउलट त्यातील पीडित गटाविरुध्दचा गट मात्र त्या गुन्हेगाराच्या बाजूचाच असतो, या हत्याकांडाने तो गट सुखावलेलाच असतो. त्यामुळे तो गट हत्याकांड विसरला किंवा नाही विसरला, तरी गुन्हेगार उमेदवारापासून दुरावत नाहीच व मतदान त्या गुन्हेगारालाच करतो. परस्परद्वेष असलेल्या समाजात, हत्याकांड अल्पसंख्याकांचे व हत्यारा बहुसंख्याकांपैकी असेल तर हत्याऱ्या उमेदवाराला मतदानात भरभक्कम फायदाच होतो.                                    

हे वास्तव भीषण आहे. माणसाने स्वत:च्या नैसर्गिक विचार-तर्कांशी विसंगत आचरण करू नये. विविध मानव समूहांच्या परस्पर-द्वेषांतून घडलेल्या हत्या, संहार, युद्धे यांचा इतिहास न विसरता त्यापासून बोध घ्यावा व  क्षमा-शांतीचा मार्ग स्वीकारावा यासाठी हजारो वर्षे हजारो संत- महात्म्यांनी आपली आयुष्ये वेचली तरी ते अद्याप साध्य झालेले नाही. कारण, दु:ख विसरण्यासाठी `विस्मृती' हा मानवजातीला उ:शाप असला तरी त्यामुळेच बोध घेणे विसरून दु:खद घटनेची पुनरावृत्ती घडवत तोच नैसर्गिक शाप ठरतो. एका अर्थी वैयक्तिक पातळीवर उ:शाप ठरलेली `विस्मृती' सामाजिक व राजकीय पातळीवर शाप ठरते. म्हणून सामाजिक-राजकीय विस्मृतीवर वेगळाच इलाज करणे आवश्यक आहे. सत्तर वर्षांपूर्वी जर्मनीत लोकशाही पध्दतीने निवडून आलेल्या `नाझी' सरकारने धार्मिक द्वेष फैलावून अल्पसंख्य `ज्यूं'चे हत्याकांड केले होते. त्या धार्मिक द्वेषाधारीत राजकीय हत्याकांडाचा लोकांना विसर पडू नये म्हणून हत्याकांडांच्या ठिकाणी स्मारके उभारली गेली आहेत. त्या स्मारकांत हत्याकांडांची छायाचित्रे, चित्रफिती, वस्तू व वास्तू जतन करून ठेवण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने त्याकाळांतील नाझी नेता हिटलरची  धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे, घोषणा, पोस्टर्स, या साऱ्याने प्रभावित होणारे जनसामान्य व त्यांचे `नाझीं'च्या   बाजूने मतदान या बाबी जागोजाग ठळकपणे प्रदर्शित करून  पुढे `नेव्हर अगेन' असे स्मरण-फलक लावले आहेत. एका ठिकाणी तर हजारो `शूज'चा नुसता एक उंच ढीग आहे. जणू तेच स्मारक !! हे `शूज' `गैस-चेंबर'मध्ये जाण्याआधी `ज्यूं'नी काढून ठेवलेले होते. त्यात काही `शूज' पाच-सहा वर्षांच्या बालकांचे आहेत…… ही स्मारके `धर्मद्वेषाला राजकीय बळ मिळण्यातून घडणारा भीषण संहार' मनांत खोलवर  बिंबवतात, जेणेकरून स्मारक पाहणारे  जनसामान्य `हत्यारे व हत्याकांडाला' कधीही विसरणार नाहीत. जगात `ज्यूं'च्या `या' हत्याकांडाखेरीज अन्य हत्याकांडे झालीच नाहीत असे नाही. किंबहुना छळ,  अत्याचार, खून, दंगली, हत्याकांड व युद्धे अशा संहारांच्या अगणित दाखल्यांनी संपूर्ण जगाचा इतिहास जागोजाग भरला आहे. तथापि, लोकशाही देशात राज्यकर्त्यांनीच किंवा लोकप्रतिनिधींनी जर संहार केलेला असेल तर जनसामान्य त्यांच्याविरुध्द मतदान करून संहाराची पुनरावृत्ती टाळू शकतात. अल्पसंख्याकांचा संहार हा लोकशाहीतील सर्वाधिक क्रूर-भीषण पण पुनरावृत्ती टाळता येऊ शकणारा प्रकार आहे. म्हणून लोकशाही असलेल्या देशांत त्याची पुनरावृत्ती घडू नये याची दक्षता `स्मारक' उभारून घेतली गेली. भारतात अशाच तऱ्हेची धार्मिक हत्याकांडाची स्मारके उभारली तरच हत्यारे उमेदवार निवडून येणे थांबेल व अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटेल. 

भ्रष्टाचार हा मोठाच गुन्हा आहे परंतु त्याचे स्मारक राजकीय नेता स्वत:च मालमत्ता रूपाने बांधतो, त्यामुळे तो स्वत:च मतदारांच्या स्मरणशक्तीला सतत टोचणी देत भ्रष्टाचाराविरुध्द जागृत ठेवतो. जातीय-धार्मिक हत्याकांड हा त्याहून फार मोठा व भयानक गुन्हा आहे. मानवजातीला तो कलंक आहे. या कलंकाची पुनरावृत्ती घडू नये म्हणून, जनसामान्यांना `नेव्हर अगेन' ची टोचणी सतत देणारी स्मारके अत्यावश्यक आहेत. 


लोकेश शेवडे

1 comment:

  1. खरचं आहे......
    खूप मन लावून लिहीलय आपण....

    आपण पार्ल्याचे हे माहीत नव्हते....

    ReplyDelete