Friday, April 25, 2014

एसटूबीटू

   एसटूबीटू
 
मी ५/६ वर्षांचा असताना जेंव्हा मला वाचता येऊ लागलं तेंव्हा माझ्या वडलांनी रोज माझ्यासमोर वर्तमानपत्रे ठेवायला सुरुवात केली. त्यांचा उद्देश असा की रोज फक्त गोष्टीची पुस्तके वाचण्याबरोबरच हळूहळू वर्तमान देखील जाणण्याची सवय लागावी. त्या वयात वर्तमानपत्रे वाचून मला काय  कळणार  होते [आज तरी काय कळते, म्हणून फक्त `त्या वयाला' दोष द्यावा?]?? हा प्रश्न अलाहिदा. बाकी काही कळो  न कळो पण, तेंव्हापासून `सामान्य माणूस' हा  शब्द प्रयोग रोज माझ्या वाचनी येऊ लागला. साहजिकच हा `सामान्य माणूस' म्हणजे नेमका कोण? हा प्रश्न मला तेंव्हा पडला.  या प्रश्नाचे समाधानकारक  उत्तर मला कोणी दिले नाही, पण काही वर्षानंतर आमच्याकडे टाईम्स येऊ लागला तेंव्हा लक्ष्मणच्या व्यंगचित्रामध्ये नेहमी एक धोतर, कोट आणि चष्मा  लावलेला माणूस असतो, तो कोण? असा प्रश्न विचारल्यावर `तो' सामान्य माणूस आहे असे मला वडलांनी सांगितले. लक्ष्मणने रेखाटलेला तो प्रतिकात्मक  `सामान्य माणूस' पाहून मौज वाटली. पण तरीही त्या चित्रामुळे प्रत्यक्षातला सामान्य माणूस कोण, याबद्दलचे कुतूहल काही कमी झाले नाही. पुढील  आयुष्यात अक्षरश: रोज सकाळ-संध्याकाळ `सामान्य माणसाला अमुक वाटतंय, सामान्य माणसाला तमुक वाटतंय, सामान्य माणसाला अमुक नकोय, सामान्य  माणसाला  ढमुक हवंय, सामान्य माणसाच्या  मनात संताप आहे, सामान्य माणसाच्या मनात प्रेम आहे' असे कोणी ना कोणी फेकलेले संवाद कानावर  आदळत राहिले.  हे संवाद ऐकले की प्रत्येक वेळी मला बोलणाऱ्याची कॉलर पकडून त्याला विचारावसं वाटतं, की "तू उठसूट ज्याचा संदर्भ देतोयेस तो सामान्य माणूस  कोण? एकदा दाखव तर खरा तो तुझा सामान्य माणूस!!" काही लोकांच्या बोलण्याची सुरुवात तर चक्रावून टाकणारी  असते.  उदा.  "माझ्यासारख्या एका  सामान्य माणसाला…" आणि मग यापुढे कोणत्याही प्रकारचे, कोणत्याही अर्थाचे शब्द, विधाने येतात. गम्मत अशी, की ही विधाने झोपडपट्टीमधल्या जीर्ण  कपड्यातल्या  माणसापासून चकचकीत कोऱ्या मर्सिडीज  बेंझ मधून सुटाबुटात फिरणाऱ्या माणसापर्यंत कोणाच्याही तोंडून स्रवताना ऐकू येतात. अशा  वैविध्यपूर्ण लोकांच्या तोंडून ही विधाने ऐकून प्रथम गोंधळायला झाले तरी नंतर `हा जो कोणी सामान्य माणूस असेल, तो त्यांच्यासारखा असेल' असा  समज मात्र झाला.  म्हणून अशी विधाने करणाऱ्या लोकांनाच विचारणा केली तेंव्हा लक्षात आले की त्यांच्या`सारखा' म्हणजे सूटबूट घालून मर्सिडीजच्या  मागच्या सीटवर आपल्या लेडी पीएशी `त्यांच्यासारखे' चाळे करणारा नव्हे किंवा बायकोच्या कष्टाच्या पैशांवर  दारू पिऊन बायकोलाच `त्यांच्यासारखा' मारणारा नव्हे, रिक्षा-टेक्सीच्या मीटरमध्ये  फेरफार करून पैसेंजरना लुटणारा नव्हे किंवा बाल्कनी अवैधपणे एन्क्लोज करून महापालिकेचा कर बुडवणारा नव्हे, मुलाच्या लग्नात सुनेकडून `त्यांच्यासारखा' हुंडा घेणारा नव्हे किंवा बारगर्लवर  `त्यांच्यासारखा' दौलतजादा करणारा नव्हे ……ते स्वत: जरी अगदी तस्सेच असले  तरी त्यांच्या मते सामान्य माणूस म्हणजे कधीही-कोणतेही गैरकृत्य करणारा नव्हे… तर  सामान्य माणूस म्हणजे वट्ट `साधा-सरळ, भोळा-भाबडा'! हल्लीच्या  भाषेत बोलायचे तर सामान्य माणूस म्हणजे `S२-B२'  म्हणजे एसटू बीटू!! हा झाला सामान्य माणसाच्या मानसिकतेचा उलगडा!  
 
 
सामान्य माणसाच्या मानसशास्त्रीय उलगडा होण्याबरोबरच आणखी एक उलगडा असा झाला की, या एसटूबीटूचा एक गुणधर्म असा आहे की तो नेहमी पीडीतच  असतो. तो जर पीडीत नसेल तर त्याचे एसटूबीटूत्व काढून घेण्यात येते. उदा. एखाद्या रांगेत २५ लोक काहीतरी घेण्यासाठी उभे आहेत. त्यातील २४ लोकांना  जे पाहिजे ते मिळाले आणि एकाला नाही मिळाले तर तो `न मिळालेला' एक हा सामान्य माणूस, सॉरी, एसटूबीटू ठरतो आणि ज्यांना मिळाले ते २४ जण त्या `न मिळालेल्या' माणसापेक्षा गरीब, दुबळे किंवा अपंग असले, तरी त्यांना `सामान्य'त्व मिळत नाही. इथे `सामान्यत्व' हे फार  `असामान्य' आहे असे वाटले  तरी ते साफ चूक आहे. कारण, समजा पुढे दुसऱ्या  एखाद्या रांगेत त्या अगोदरच्या `एसटूबीटू'ला हवे ते मिळाले आणि बाकीच्या २४ जणांना नाही मिळाले  तर त्या अगोदरच्या  `एसटूबीटू'चे  सामान्यत्व काढून घेतले जाईल आणि त्या २४ जणांना सामान्यत्व  मिळेल!! इथे हा उलगडा `संख्याशास्त्रीय' वाटत असला  तरी ती दिशाभूल आहे समजून घेतले पाहिजे. कारण २४ असो की १ हे महत्वाचे  नसून `पीडीत' असणे हे वैगुण्य महत्वाचे आहे. म्हणजेच ते  `वैगुण्य' हे एका अर्थी सामान्य माणसाचा `गुण'धर्म आहे. इथे हा उलगडा गुणात्मक वाटत असला तरी त्यात `वैगुण्य' हेच `गुण' ठरत असल्यामुळे  तो  वास्तवात `विरोधाभास अलंकार', म्हणजे `भाषाशास्त्रीय' ठरतो. एकंदरीत, सामान्य माणसाबद्दल जे काही मांडले जाते ते फक्त `अलंकार' आहेत, ते देखील प्रत्यक्षातील नव्हे, तर भाषेतील!!! 
 
 
सामान्य माणसाबाबत मराठी भाषेतील या उलगड्याने दिलेल्या धक्क्यातून  मी सावरतोय न सावरतोय तोच त्याच बाबतीत अचानक हिंदी भाषेनं त्याहून  मोठा धक्का दिला. हिंदीत आंब्याला `आम' म्हणतात असे आम्हाला शाळेत राष्ट्रभाषा शिकलो तेंव्हापासून माहित होते. आणि `आंबा' हा सामान्य  माणसाला  `न परवडणारा' असतो हे अनुभवातून माहित झाले होते, त्यामुळे `आंब्या'चा सामान्यांशी संबंध पूर्णपणे तुटला आहे हे मला ठाऊक झाले होते. पण काही  महिन्यांपूर्वी बातम्यांतून ऐकले की, हल्ली हिंदीत `सामान्य माणसाला' `आम आदमी' म्हणतात!!  म्हणजे, मुळात `सामान्य  माणूस' कोण याचा अद्याप पत्ता  लागलाच नव्हता, त्यात आता त्याला हिंदीत `आम आदमी' का म्हणतात त्याचाही छडा लावायचे  डोक्याला नवीन काम लागले!!!! या साऱ्याचा परिपाक म्हणून गेले काही महिने मी `आम आदमी' म्हणजे कोण? किंवा एखाद्याला `आम आदमी'  का म्हणतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. `आम आदमी' बाबत मी अभ्यास सुरु केला तेव्हढ्यात कळले की दिल्लीमध्ये एक `पार्टी' सुरु झालीय आणि तिचे नाव `आम  आदमी' आहे. हे ऐकून मी बेशुध्दच पडलो!
 
 
 
शुद्धीवर आल्यावर मात्र लक्षात आले की  दिल्ली या शहराचा अभ्यास केल्यास आम आदमी कळेल आणि तो कळला की मग फायनली सामान्य माणूस  म्हणजे कोण ते कळू शकेल. अभ्यास सुरु केल्यावर कळले की दिल्ली हे ऐतिहासिक व राजकीय बाबींत एक नंबरचे शहर असले तरी औद्योगिक  वर्तुळात मात्र ते भारतभरात `दोन नंबर'चे शहर मानले जाते. यातील `दोन नंबर' हा अनुक्रम किंवा `शिशु' विहारातील सांकेतिक आकडा नसून `आर्थिक परिभाषेतील' शब्द आहे. उद्योग व व्यापार या दोन्हीबाबत दिल्ली प्रसिध्द आहे, ती `विदाउट बिल', म्हणजे काळ्या पैशांसाठी, म्हणजेच `दोन नंबर'च्या  व्यवहारांसाठी!! दिल्लीत उद्योग-व्यापार किंवा स्थावर व्यवहार मोठ्या प्रमाणात अबकारी कर, विक्रीकर, स्टेंप ड्युटी वगैरे सारे कर बुडवूनच केले जातात आणि  खरेदी करणाऱ्या तिथल्या जनतेलादेखील वस्तू किंवा वास्तू खरेदी करताना कर-बीर भरून खरेदी करायला  आवडत नाही, विदाउट बिल-कमी किमतीत खरेदी करायलाच  आवडते. पालिका बझार, कॅनॉट प्लेसपासून अगदी करोलबाग व जुन्या दिल्लीतील  छोट्या `हट्ट्या'पर्यंत सर्वत्र अशी ही नंबर दोनची  खरेदी-विक्री  अव्याहत सुरु  असते. दिल्लीतील लोकप्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीबद्दल काय बोलावे?? ते तर टीव्ही-वर्तमानपत्रांमधे रोज वाचत असतो, त्यात खरे किती आणि  खोटे किती कुणास ठाऊक? मात्र अशा व्यवहाराला  दिल्लीत `एक' किंवा `दोन नंबरचा' व्यवहार किंवा पैसा असे म्हणत नाहीत. तर `तीन नंबरचा' व्यवहार  म्हणतात. काळा पैसा हा कर न भरलेला  असला तरी तो त्या  व्यक्तीचा स्वत:चाच असतो. कष्ट करून, उद्योग-धंदा करून मिळवलेल्या स्वत:च्या कमाईवर  कर भरला की तो पैसा `एक नंबर', त्याच कमाईवर कर भरला नाही की तो `दोन नंबर'चा पैसा.  तत्राप, जी मालमत्ता किंवा पैसा मुळात स्वत:चा नाहीच, दुसऱ्यांचा म्हणजे जनतेचा  आहे तो परस्पर  डल्ला मारून त्यावर केलेल्या व्यवहाराला `तीन  नंबरचा' व्यवहार म्हणतात. हे विचित्र असले तरी न समजण्यासारखे मुळीच नाही. शब्द आणि त्यांच्या व्याख्या निर्मितीमध्ये दिल्लीकर  जनतेसमोर पुणेकरदेखील `नंबर दोन'  ठरतील एवढे ध्यानात ठेवले तर पुढचे समजणे सोपे आहे!! किंबहुना दिल्लीकर जनता विक्षिप्तपणातदेखील  पुणेकरांच्या पुढे, म्हणजे संपूर्ण देशात `नंबर एक' आहे. उदा. दिल्लीकर जनता  स्वत:च व्यवहारात नंबर दोनच्या-काळ्या पैशांचा आग्रह धरत असली तरी  हीच जनता दर काही दिवसांनी  त्याच काळ्या पैशांविरुध्द आंदोलन करत रस्त्यावर  उतरते. त्या आंदोलनात का कुणास  ठाऊक पण रस्त्यांवर पथदीप असतांना आणि त्यांचा लख्ख उजेड पडलेला असतांनादेखील ही जनता मेणबत्त्या लावून रस्त्यावर फिरते. त्यामुळे  दिल्लीत मेणबत्त्यांचे उत्पादन व व्यापार  करणाऱ्यांची संख्या  वेगाने  फोफावली आहे. अर्थातच ते  सर्व उत्पादक  व व्यापारी या मेणबत्त्या  विदाउट बिल, म्हणजे `दोन नंबर'च्या  व्यवहारात विकतात. परिणामी आंदोलनकर्ते त्या काळ्या पैशातल्या मेणबत्त्या  विकत घेऊन काळ्या पैशाच्या विरुध्द आंदोलनाचा उजेड  पाडतात!!!असा विक्षिप्तपणा पुणेकर कध्धीच करणार नाहीत. ते खचित मेणबत्त्यांचे पैसे वाचवतील आणि त्या पैशांत `प्रतिकात्मक आंदोलने अयशस्वी का होतात?' यावर एक परिसंवाद आयोजित करतील. असो. 
 
 
कोणत्याही राष्ट्राच्या महसुलाचा काही भाग हा त्याच्या `राजधानी'च्या विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी राखीव ठेवलेला असतो. दिल्लीत बहुतांश उद्योजक, व्यापारी, बिल्डर्स आणि जनता कर बुडवत असूनही `दिल्ली' राजधानी असल्यामुळे साहजिकच तिथे सरकारी इमारती, रस्ते, पूल, बगीचे वगैरे सर्व मात्र मुबलक आणि भव्य-दिव्य आहे. याचा अर्थ, भारतभरातील लोक वेगवेगळ्या प्रकारचे कर भरण्याचे  कार्य करतात, त्या करांतून सरकार दिल्लीच्या  विकासाचा, बाग-बगीच्यांचा, सुशोभीकरणाचा आणि तिथल्या ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचे कार्य करते आणि दिल्लीकर जनता ते सारे वापरण्याचे, उपभोगण्याचे कार्य  करते. एकंदरीत, स्वत: फारसे कर न भरता मोठ-मोठे रस्ते, पूल, बगीचे वगैरेंसकट अनेकविध सुखसोयी उपभोगणे हे दिल्लीकर जनतेचे खास वैशिष्ट्य! थोडक्यात, संपूर्ण भारतातील जनतेच्या कष्टांवर चैन करणे हे दिल्लीतील केवळ राजकारण्यांचाच नव्हे तर बहुतांश  जनतेचादेखील `स्वभाव' आहे.  
 
 
तर मुद्दा असा की, `सामान्य माणूस' कोण? हे समजण्यासाठी मी त्याला हिंदीत `आम आदमी' का म्हणतात ते समजून घेऊ पाहात होतो. तेवढ्यात असे  कळले की दिल्लीत `आम आदमी पार्टी' सत्ताधारी  झाली आणि अगोदरच सारे काही फुकट  मिळणाऱ्या त्या दिल्लीकर जनतेला त्यांनी आता वरून पाणी फुकट आणि वीज स्वस्त द्यायलादेखील सुरुवात केली. हे ऐकून मी पुन्हा एकदा बेशुध्द पडलो. आणि पुन्हा  शुद्धीवर  आल्यावर पुन्हा सामान्य माणसाला `हिंदीत' आम का म्हणतात त्याचा शोध सुरु केला. शोध घेताना एक हिंदी वाक्प्रचार ऐकला, `आम के आम, और गुठलीयोंके दाम' ! अर्थ विचारल्यावर कळले की एखाद्याचे  भाग्य फारच फळफळले की त्याला आंबे फुकट खायला तर मिळतातच पण ते खाल्यानंतर उरलेल्या कोयींचे देखील पैसे मिळतात!! वाक्प्रचाराचे  मर्म कळल्याबरोबर निदान दिल्लीच्या तमाम जनतेला  `आम आदमी' म्हणणेच समर्पक असल्याचे लक्षात आले. त्यावरून उर्वरीत भारतातील भारतीय हा  दिल्लीकरांसारखा `आम' होऊ शकत नाही या गोष्टीचा `दर्द ना जाने कोय' हे देखील ध्यानात आले. पण ज्यासाठी `आम'चा अभ्यास केला तो `आदमी' काही उमगलाच नाही. बालपणापासून मी ज्याचा शोध घेतो आहे तो भारतातला `सामान्य माणूस' कोण? गर्भनिदान करून स्त्रीभ्रूण हत्या करणारा की भक्तांची रांग मोडून लवकर देवदर्शन मिळावे म्हणून पुजाऱ्याला `दक्षिणा' देणारा? स्वत: लठ्ठ पगार मिळवूनही मोलकरणीला मात्र तुटपुंजा पगार देणारा की स्वच्छतेच्या गप्पा मारत प्रत्येक कोपऱ्यात पचकन थुंकणारा ….… स्वत: कर बुडवून, भ्रष्टाचाराविरुध्द बोंबा मारत, सरकारकडून सारे फुकट मिळण्याची अपेक्षा करणारा की धर्मांधतेला आणि जातीयतेला शिव्या घालत स्वत:च्याच  धर्माच्या किंवा जातीच्या उमेदवारालाच मतदान करणारा?? किंवा असाच  कुठलातरी, भारतात जागोजाग आढळणारा….पण नेमका कोण? ………. ते मात्र शेवटी कळले नाही…ते नाहीच.  
 
 
लोकेश शेवडे 
६/२/१४ सायं ६.१५            
             

No comments:

Post a Comment