Friday, April 25, 2014

मध्यम वर्ग, कॉर्पोरेट्स आणि 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'

                      मध्यम वर्ग, कॉर्पोरेट्स आणि  'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'  
मी जर्मनीला येतोय असं यतीन मराठे, म्हणजे माझा बालमित्र `राजू'ला जेंव्हा कळलं तेंव्हाच त्यानं मला फोन करून दटावलं होतं की "किमान दोन दिवस माझ्या घरी राहायचंच!". मी तत्काळ होकारही दिला. राजू गेली १५ वर्षं जर्मनीत राहतोय, पूर्वी `डुसेलडॉर्फ' जवळ `क्रिफ़ेल्ड'ला राहायचा, आता `म्युनिक'ला. त्याची बायको `क्लौडिया' ही मूळची जर्मनच आहे. संपूर्ण जर्मन आचार-विचार आणि कुटुंब पध्दत स्वीकारून राजू, पत्नी व दोन मुलांसह तिथे स्थायिक आहे. राजूबरोबर लहानपणापासूनच खेळ-मस्ती-उनाडक्या केलेल्या असल्यामुळे तिकडे गेल्यावर त्याच्याशी भरभरून गप्पा होणं स्वाभाविकच होतं. पण क्लौडियादेखील तितक्याच उत्साहानं गप्पांमध्ये सामील झाली. पहिल्या दिवशी दोघं मला म्युनिक दाखवायला घेऊन गेले, तर वाटेत स्थळं-वास्तू दाखवण्याबरोबरच ती त्यासंबंधीचा काहीसा इतिहास आणि तिथल्या चाली-रिती यासंबंधीची माहिती देत होती. दुसऱ्या दिवशी काय पाहायचे त्या यादीत म्युनिकमधील आणखी अनेक प्रसिध्द वास्तू, संग्रहालये, मार्केट आणि भव्य राजवाडा वगैरे गोष्टी होत्या. पण याबाबत चर्चा सुरु असताना अचानक क्लौडियानं विचारलं "'कॉन्सन्ट्रेशन कॅंप' बघणार का? बघून खूप क्लेश होतात, आणि बघायला वेळही खूप लागतो, कदाचित दुसरं काही पाहायला वेळ उरणार नाही. तू इथे हौसेमौजेसाठी आला आहेस…त्यामुळे पाहायचं की नाही विचार करून ठरव." क्षणाचाही विलंब न लावता मी म्हणालो "प्रश्नच नाही. उद्या 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'च! बाकी काही बघता नाही आलं तरी चालेल!" तिनं दुसऱ्या दिवशी सकाळी राजू व मला रवाना करत स्वत: येण्याचं नाकारलं.
म्युनिकपासून २५ -३० कि.मी.वर असलेल्या `दाखाउ' या गावात असलेल्या 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप मेमोरियल साईट' या जागी मी राजूसह पोहोचलो.
 
 
 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप'च्या स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार हे त्याकाळी कैद्यांना आणण्या-नेण्यासाठी वापरले जाणारे एकमेव द्वार होते. बाकी संपूर्ण प्रांगणास उंच भिंतीचा विळखा पडलेला होता. त्यामुळे कैद्याला पळून जाण्यास किंचितही फट मिळत नसे. हिटलरने चान्सलरपद हस्तगत केल्यावर काही आठवड्यातच, दि. २२ मार्च १९३३ रोजी हा 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप' त्याच्या विरोधकांसाठी बांधण्यात आला. राजकीय विरोधक व ज्यू लोकांचा छळ व सामुदायिक हत्या करण्यासाठी हिटलरला `वेगवान, खात्रीशीर व किफायतशीर योजना' राबवण्याची निकड होती. अशी योजना `दाखाउ' येथे सर्वप्रथम यशस्वीरित्या राबवण्यात आली व नंतर असे सर्व `कॅंप' बांधण्यासाठी `दाखाउ कॅंप' हा `मॉडेल' धरला गेला. या `छळ-छावणी' चे एकूण १७ भाग आहेत. त्यापैकी ` मेन्टेनन्स' विभागाच्या इमारतीत प्रदर्शन मांडले आहे. या प्रदर्शनात मोठमोठ्या पँनल्सवर १९१८साला पासून, `हिटलर'च्या उदयापासून १९४५ साली छळ-छावणीतील कैद्यांच्या मुक्ततेपर्यंतच्या राजकीय घडामोडींचे छायाचित्रांसह वर्णन, चित्रफिती, तसंच, छळ-छावणीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू, आयुधे, रजिस्टर्स, शिक्के वगैरे बाबी मांडून ठेवल्या आहेत. प्रदर्शनातील प्रत्येक खोलीत शिरताना तेथील `नाझी' शिपायांची मानवी उंची इतकी मोठी छायाचित्रे उभी केली आहेत. त्यामुळे खोलीत शिरताना अनेकदा समोर नाझी सैनिकच उभा असल्याचा भास होतो व दचकायला होतं.
 
प्रदर्शनातील पँनल्सवर सुरुवातीला, १९१८ साली सेप्टेंबरमध्ये पहिल्या महायुध्दात जर्मनीचा पाडाव होऊन जर्मनीचा राजा कैसर हा हॉलंडला पळून गेला यासंबंधीची छायाचित्रे व माहिती लावलेली होती. त्यातच पुढे अशी माहिती होती की, दोस्त राष्ट्रांनी जर्मनीपुढे ठेवलेल्या `शरणागतीच्या करारावर' सह्या करण्यासाठी जर्मनीच्या वतीने कोणी राष्ट्रप्रमुखच न राहिल्यामुळे नाइलाजास्तव [त्यावेळी त्रिशंकू अवस्थेत असलेल्या] जर्मन संसदेत त्यातल्या त्यात सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या `सोशल डेमोक्राट्स' या पक्षाला सह्या करणे भाग पडले. या काळात जर्मनीत तीन-चार प्रमुख पक्ष होते. १] सोशल डेमोक्राट्स- समता व बंधुत्व हा त्यांचा नारा होता २] ख्रिश्चन सोशलिस्ट- यांचा `ज्यू'ना प्रखर विरोध असला तरी नेते मात्र खाजगीत `ज्यूं'शी मैत्रीचे संबंध ठेवत. त्यांच्या नेत्याचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. नेत्यांच्या व त्यांच्या भाषणांच्या लोकप्रियतेच्या बळावर हा पक्ष अवलंबून होता. ३] पँन जर्मन नाशनालिस्ट - जर्मन वंश [प्रामुख्याने प्रोटेस्टंट] व जर्मन भूभागाचे एकीकरण आणि डाव्यांचा विरोध असे यांचे प्रमुख उद्दिष्ट होते [यांच्यातही बहुतांश जणांना `ज्यूं'बद्दल द्वेष वाटे]. ४] कम्युनिस्ट- जर्मनीचा पराभव त्यांना साम्राज्यवाद-भांडवलदारीचा पराभव वाटत होता व कामगार-क्रांती साठी चालून आलेली सुवर्णसंधी वाटत होती. याखेरीज अन्य पक्ष होतेच, परंतु ते प्रमुख चार पक्षांना आलटून पालटून पाठींबा देत भुरट्या राजकारणातच गर्क होते. त्याकाळातील या राजकीय माहिती सोबत पँनल्सवर त्या नेत्यांची, बैठकांची व शरणागती सह्या करतानाची छायाचित्रे लावलेली होती. कैसर पळून गेल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या सोशल डेमोक्राट्सना आपोआप सत्ता मिळाली. परंतु त्याबरोबरच शरणागतीवर सह्या क्रमप्राप्त ठरल्या. पुढील काळात जर्मनीवर युध्द व पराभव या दोन्हींचे प्रचंड परिणाम घडू लागले. पायाभूत सुविधा बऱ्याच अंशी उध्वस्त झाल्या होत्या, चलन फुगवटा प्रचंड होऊन महागाईने टोक गाठले होते. विरोधक तर होतेच, पण सत्तेत सहभागी असलेले पक्ष देखील सोशल डेमोक्राट्सना धमकावून अडचणीत आणत, स्वत:च्या मर्जीतल्या लोकांना सरकारी कंत्राटे मिळवून देत असत. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला होता. सर्व विरोधक व विशेषत: कम्युनिस्ट जनतेत सतत असंतोष माजवत होते व संप करून सत्ता उलथवण्यास चिथावणी देत होते. शरणागती करारावर सोशल डेमोक्राट्सनी नोव्हेंबर [१९१८] मध्ये सह्या केल्या होत्या म्हणून त्यांना `नोव्हेंबरचे हरामखोर' म्हणून हिणवले जाऊ लागले. प्रदर्शनातील पँनल्सवरची त्याकाळातील निवडणुकांतील पोस्टर्स, जाहिराती, मोर्चाची छायाचित्रे पाहून पूर्वी मी वाचलेल्या जर्मनीच्या इतिहासाचा पडताळा होत होता आणि का कुणास ठाऊक, भारताच्या सद्य:स्थितीशी मनोमन तुलनाही होत होती.
 
याच काळात हिटलरने राजकारणात पदार्पण करून सोशल डेमोक्राट्स बरोबरच `ज्यूं'वर पराभवाचे खापर फोडायला सुरुवात केली. [त्याकाळी बहुतांश बँका-पतपेढ्या सकट सावकारी धंदा `ज्यूं'च्या हाती होता. बरेचसे अवैध धंदेही `ज्यू' लोकांच्या हाती होते. तसेच काही `ज्यूं'वर फितुरी केल्याचा व जर्मनीची काही गोपनीय कागदपत्रे शत्रूस विकल्याचा आरोप केला जात होता. ] त्याकाळी युरोपियन्सना, विशेषत: जर्मन्सना `ज्यू' लोकांबद्दल कमालीचा तिरस्कार होता. त्यामुळे हिटलरने `ज्यूं'च्या विरुध्द भाषणे देण्यास सुरुवात केल्याबरोबर त्याला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. लोकांच्या प्रतिसादाचा कानोसा घेऊन त्याने एप्रिल १९२०मध्ये आपल्या पक्षाचे नाव बदलून `नाझी' [नाशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी] असे नाव दिले व पक्षाचे धोरण व उद्दिष्ट जाहीर केले. : १] सर्व जर्मन भूमी एकत्र करून `विशाल जर्मनी' स्थापन करणे २] `ज्यूं'चे नागरिकत्व काढून घेऊन सरकारी पदांवरून काढून टाकणे. त्यानंतर त्याने शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी `व्यायाम, खेळ व [जर्मन] संस्कृतीचे' प्रशिक्षण देण्यासाठी `एस. ए.' नामक एक संघटना सुरु करून जागोजाग त्या संघटनेच्या शाखा स्थापन केल्या. यानंतर लागलीच पक्षाची `एस.एस.' नामक एक `सैनिकी संघटना'ही सुरु केली. जर्मन वंशाचा, संस्कृतीचा व देशाचा जाज्वल्य अभिमान तरुणांमध्ये रुजवण्याचे कार्य या नावाखाली प्रत्यक्षात मात्र `ज्यू' धर्मियांचा द्वेष पसरवण्याचे विषारी काम `एसएस' व `एसए' या संघटना करीत असत. हे सर्व सांभाळण्यासाठी काय करावे हे सोशल डेमोक्राट्सना कळत देखील नव्हते. आणि कळले, तर उपाययोजना करण्याची धमकच त्यांच्या नेत्यांत नव्हती. अन्य पक्षियांचा पाठींबा मिळवत कशीबशी सत्ता टिकवण्याची केविलवाणी धडपड करण्यात त्यांचा शक्तिपात होत होता. या वाचलेल्या इतिहासापैकी बरेच उल्लेख या प्रदर्शनात छायाचित्रांसह सापडत होते. आणि त्यात भारतीय राजकारण अनिवारपणे डोकावत होते.
 
सुरुवातीच्या काळात केवळ २.६टक्के मते मिळवू शकणाऱ्या हिटलर व त्याच्या पक्षाला १९३२ साली, म्हणजे पुढील केवळ ११-१२ वर्षांत ३७ टक्के मते मिळाली. एवढी दीर्घ व वेगवान झेप नाझी घेऊ शकण्याचे कारण एसएस व एसए या संघटनांनी चोख बजावलेले `ज्यू' द्वेष पसरवण्याचे कार्य हे जितके होते, तितकेच शेवटच्या तीन वर्षांत आलेली जागतिक मंदी, त्यामुळे आलेली बेरोजगारी, भडकलेली महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार व ही सारी परिस्थिती हाताळण्यात सोशल डेमोक्राट्सना येणारे सपशेल अपयश, त्यांच्या नेतृत्वात असलेला दुबळेपणा हे देखील होते! सर्व प्रश्नांवर सोशल डेमोक्राट्सकडे फक्त "शांतता, समता व बंधुभाव!" यापलीकडे उत्तर नव्हते. याउलट हिटलर बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचार या साऱ्याचे अगदी सोप्पे कारण देत होता, ते म्हणजे `ज्यूं'चा देशद्रोह व सोशल डेमोक्राट्सनी चालवलेले `ज्यूं'चे तुष्टीकरण!! जणू देशभक्ती म्हणजेच `ज्यू' द्वेष!! हे जनतेला झटकन आकर्षून घेणारे तत्वज्ञान होते. `ज्यूं'चा द्वेष हा ते आपल्या देशभक्तीचा पुरावा मानू लागले. हिटलर त्याच्या सभांमध्ये गर्जत असे, " सोशल डेमोक्राट्स हा पक्ष म्हणजे समता व बंधूभावाचा बुरखा पांघरलेली रोगट वेश्या आहे!!" आणि जनता टाळ्यांचा कडकडाट करत असे. हिटलरच्या सभांना होणारी गर्दी पाहून कॉर्पोरेट्स मागे राहणे शक्यच नव्हते. हिटलरच्या बाहूंना [आर्थिक] बळ देण्यासाठी `हायडेलबर्ग' च्या कारखानदारांपासून बीएमडब्ल्यू, फोक्स-वेगन पर्यंत सारे विख्यात उद्योगपती हिटलरचे गोडवे गात नाझींच्या तंबूत दाखल झाले. हे बळ वापरून हिटलर कम्युनिस्टांसह अन्य पक्षांची मदत घेऊन [नाझी विरोधी] सोशल डेमोक्राट्सप्रणीत आघाडी सरकार विरुध्द सेप्टेम्बर १९३२मध्ये अविश्वासाचा ठराव आणून तो संमत करून घेऊ शकला. याच उद्योगांच्या `आर्थिक बळावर' पुढच्या मुदतपूर्व निवडणुकीत नोव्हेंबर १९३२ मध्ये नाझी पक्षाला ५४५ पैकी १९६ जागा मिळूनही तो चान्सलरपद हस्तगत करू शकला आणि पुन्हा मुदतपूर्व निवडणूक घेऊन मार्च १९३३ मध्ये २८८ [बहुमत] जागा मिळवू शकला. एकंदरीत `भिन्नधर्मियांच्या द्वेषावर आधारित `राष्ट्रवाद' आणि उद्योगपतींचे आर्थिक बळ यांच्या मैथुनातून २१ मार्च १९३३ रोजी हिटलरचे `थर्ड राइश' जन्माला आले!!
 
आणि २२ मार्च १९३३ रोजी `दाखाउ' छळ छावणी प्रस्थापित झाली. इतिहास वाचताना तारखा अशा कधी भयानकरीतीने समोर आल्या नव्हत्या. प्रदर्शनानंतर छळ-छावणीतील बराचसा भाग जतन करून ठेवला आहे तो पाहिला. कैद्यांचे [प्रामुख्याने `ज्यू'] हजेरी घेण्याचे मैदान, त्यांचा कोंडवाडा, शौचालय व सर्वात शेवटी शॉवर [स्नानगृह] म्हणजेच छुपे गैस चेंबर व त्याच्या बाजूला दहनगृह. एका कोंडवाड्यात ६००, असे एकूण ४० कोंडवाड्यात मिळून २४,००० कैदी डांबण्याची तेथे `व्यवस्था' होती. या सर्व कैद्यांपैकी बहुतांश कैदी `ज्यू' असल्यामुळे "ते देशद्रोही असणारच, मग त्यांची चौकशी, न्यायनिवाडा करण्याची गरजच काय??" म्हणून एसएस व एएसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ट्रकमधून आणल्यावर आरोप-गुन्हे वगैरे कसलीही शहानिशा न करता ते `ज्यू' आहेत हाच गुन्हा असल्याचे गृहीत धरून कैद्यांची वर्गवारी केली जाई. १] `उपयुक्त' [तरुण, जे अंगमेहनतीचे काम करू शकतील असे] २] मध्यम उपयुक्त [मध्यमवयीन. जे मेहनत करू शकत नसत. त्यामुळे विविध रोगांचे व औषधांचे परिणाम तपासण्याच्या प्रयोगांसाठी वापरले जात, असे] ३] अनावश्यक [ज्यांचा कुठलाच उपयोग नाही असे म्हातारे]. `उपयुक्त' वर्गातील `ज्यू' स्त्रियांचा `उपयोग' साहजिकच तेथील एसएस व एएस संघटनांचे पदाधिकारी `सांस्कृतिक कार्यासाठी' करीत असत. तर `मध्यम उपयुक्त' स्त्रिया `राष्ट्रभक्त' ज्येष्ठ जर्मन अधिकाऱ्यांच्या `घरगुती कामासाठी' वापरल्या जात. स्मारकाच्या शेवटच्या भागात गैस चेंबर व दहनगृह आहे. गैस चेंबरमध्ये एका वेळी ५० `अनावश्यक वर्गीयांना' [`ज्यूं'ना] ठार मारण्याची व दहनगृहात ६ मेलेल्या `अनावश्यकांना' जाळण्याची `सोय' केलेली होती. त्यामुळे गैस चेंबरबाहेर दहनासाठी प्रेतांचे `वेटिंग' असे. गैस चेंबरच्या बाहेर चेंबरमध्ये नेण्यात येणाऱ्या व त्यानंतर दहनासाठी रचण्यात आलेल्या प्रेतांच्या ढिगाची छायाचित्रे लावली आहेत. पुढचे छायाचित्र २९ एप्रिल १९४५ रोजी अमेरिकन सैन्याने येथील कैद्यांना मुक्त केले त्याचे होते. तोपर्यंत संस्कृतीचे अभिमानी व राष्ट्रभक्त एसएस व एएसच्या सदस्यांनी अदमासे ४१,५०० कैद्यांना चेंबरद्वारे या `इहलोकातूनच मुक्त' केले होते. काहीकाळ मी सुन्न होऊन तिथेच उभा राहिलो.
 
परत आल्यावर देखील काहीच बोलावेसे वाटत नव्हते. काही वेळानंतर `क्लौडीया'ला विचारले, "तुझ्या आई-वडिलांना कधी विचारले होतेस का, की त्या काळात हिटलरला इतकी मतं कशी मिळालीत? हिटलरबद्दल त्यांचे त्याकाळी काय मत होते?" क्लौडिया काही क्षण गप्प बसली. मग म्हणाली, "माझी आई सांगायची, `सगळा मध्यमवर्ग `जर्मन राष्ट्रवाद' आणि `ज्यू'द्वेषानं पेटला होता. त्यात `दुबळ्या लोकशाही'चा त्यांना तिटकाराही आला होता, त्यांना हिटलर `पोलादी पुरुष' वाटत होता. काही जाणते लोक सांगत की, हिटलर हुकुमशहा बनेल, तो पुन्हा देशाला युध्दाकडे नेईल, विरोधकांची कत्तल घडवेल! पण सामान्य लोकांचा त्यावर विश्वासच बसत नसे. हत्याकांड, युध्द वगैरे होणं इतकं सोपं आहे का? असा ते प्रतिप्रश्न करत. काहीजण तर काही `ज्यू' मेले तर मरू देत, हिटलर हुकुमशहा झाला तर होऊ देत! पण तो देश तरी सुधारेल! असे म्हणत."या माहितीमुळे मला आश्चर्य वाटलं आणि ती सध्याच्या भारतातील मध्यमवर्गाबद्दल बोलतेय की काय असंही वाटायला लागलं. पुन्हा विचारलं, " आईचं स्वत:चं मत काय होतं?" ती म्हणाली, "आईच नव्हे, संपूर्ण मध्यमवर्ग तेंव्हा महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारानं गांजून गेला होता त्यामुळे `दुबळ्या शांतता-समतावादी सरकार विरोधी झाला होता. माझे आजोबा बेरोजगार झाले होते, त्यांना नाझींमुळे नोकरी मिळाली, त्यामुळे त्यांना हिटलर देशाला तारेल असे मनापासून वाटत होते, असे आई सांगत असे. पहिल्या काही दिवसात हिटलरनं भ्रष्टाचारी `ज्यूं'ना पकडलं होतं, महायुध्दात उध्वस्त झालेले पूल, रस्ते, इमारती वगैरे दुरुस्तीची कामे, नवीन प्रकल्प उभारणीची कामं खूप वेगानं केली होती. त्यामुळे मध्यमवर्गाला हिटलर हा पोलादी पुरुष, `डायनामिक' आणि देशाचा तारणहार वाटत होता" क्लौडिया सांगत होती, आणि मी भारतातील साम्यस्थळ जाणवून धास्तावत होतो. "माझे वडील तर प्रभावित होऊन जर्मन सैन्यात दाखल झाले होते. त्यांना युध्दकैदी म्हणून पकडून इंग्लंडला नेलं होतं. नंतर सोडलं त्यांना, ते अत्याचारात सामील नव्हते म्हणून " - ती पुढं म्हणाली. मी स्तिमित होऊन विचारलं, "मग नंतरच्या काळात त्यांना काय वाटायचं ते तू विचारलंस का त्यांना?" "हो. खूप वेळा. पण त्यांनी कधीच त्याचं उत्तर दिलं नाही. नुसतं शून्यात बघायचे. मी मोठी झाल्यावर प्रश्न नव्हे जाब विचारू लागले वडलांना… पण नंतर ते आणखी आणखी गप्प होत गेले. पुढे पुढे तर ते काहीच न बोलता घुम्यासारखे बसून असायचे. आता मला खूप वाईट वाटतं, मी त्यांना टोचणारे प्रश्न विचारून क्लेश दिले म्हणून. ते एकटेच नव्हे सगळा मध्यमवर्गच भुलला होता की `एकव्यक्तीकेन्द्री' नाझीवादाला, त्या सर्वांनाच मनापासून वाटत होतं की, `नोव्हेंबरच्या हरामखोरांना आणि ज्यूंना हाकलून दिल्याखेरीज देश सुधारणार नाही असे!' वेर्नर हायडर हे एक होते अशा असंख्य लोकांपैकी! सगळ्यांनी मिळून हिटलरला निवडून दिलंय एकट्या वेर्नर हायडरने नव्हे!"- ती म्हणाली. "वेर्नर हायडर म्हणजे कोण?"मी विचारलं. " माझे वडील. मी माझ्या वडलांना जाब विचारून क्लेश दिल्याबद्दल जितकं दु:ख होतं, तितकंच वडलांनी हिटलरला मत देऊन नंतर त्याच्याबाजूनं युध्द केल्याबद्दलही !!! डोकं भणाणून जातं याबाबतीत विचार करून!"- ती म्हणाली. " तुझ्या आणि तुझ्या पुढच्या, म्हणजे हल्लीच्या पिढीला काय वाटत नाझी कालखंडाबाबत?"- मी विचारलं. ती अधिकच खिन्नपणे म्हणाली, "आमची पिढी तर जर्मन असण्याची केवळ लाज बाळगत जगली. जगभरात कुठेही `जर्मन' म्हणून ओळख देताना मान खाली जायची. आमची पिढीनं दुभंगलेला देश अनुभवला. आत्ताच्या पिढीला कदाचित तितके अपमानित वाटत नसेल. कारण आता पुन्हा जर्मनी एक झाला, आता नाझींच्या आठवणी सांगू शकणारे त्या पिढीतले कोणी राहिलेले नाहीत फारसे. पण तरी या `दाखाउ' 'कॉन्सन्ट्रेशन कॅंप मेमोरियल सारख्या वास्तू आहेत ना बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे आपल्या पूर्वजांचं पाप विसरणं अशक्य आहे नवीन पिढीला देखील. क्वचित एखादा निओ नाझी निपजतो आणि काही कारवाया करूही पाहतो. परंतु असे लोक अर्धा टक्का देखील नाहीत. आणि दुसरं, जर्मनीत हिटलर, नाझी याचं दुरान्वये देखील समर्थन करणे, किंवा `ज्यूं'बद्दल अप्रत्यक्षदेखील अपशब्द बोलणं हा कायद्यानं मोठा गुन्हा आहे. त्यामुळे धार्मिक द्वेष आणि आक्रमक राष्ट्रभक्ती या दोनही जीवघेण्या रोगांना जालीम प्रतिबंधक लस संपूर्ण नव्या पिढीला टोचली गेली आहे." क्लौडियाचं ऐकताना `दाखाउ'ला येण्याचं तिनं का नाकारलं त्याचा उलगडा मला झाला.
 
जर्मनीत १५ वर्षे राहिलेला राजू एव्हाना भारताबद्दल ऐकण्यास अधीर झाला होता. संधी मिळताच राजूनं विचारलं, "भारतात कसं आहे रे सध्या? मी गप्प बसलो. त्यानं पुन्हा विचारलं "तिथंही डायनामिक नेत्यांच्या मागे मोठेमोठे उद्योगपती पैशाच्या थैल्या घेऊन उभे राहिलेत म्हणे?". हा प्रश्न ऐकून वेर्नर हायडरप्रमाणे मलादेखील शून्यात पाहात राहण्याखेरीज पर्याय दिसेना…
 
 
लोकेश शेवडे ४/११/१३ दुपारी १.४०

No comments:

Post a Comment